Halloween Costume ideas 2015

तथाकथित गोरक्षकांना कोर्टाची चपराक!

-शाहजहान मगदुम
२९ जून २०१७ हजारीबाग येथील ४५ वर्षीय अलीमुद्दीन अन्सारीला गाय तस्करीचा आरोप करत मॉब लिंचिंगमध्ये ठार मारण्यात आले होते. या प्रकरणात नुकताच झारखंडमधील रामगढ येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने २१ मार्च २०१८ रोजी तब्बल ११ गोरक्षकांवर दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या शिक्षेमुळे कथित गोरक्षकांना चाप बसेल व भविष्यातील हल्ले रोखले जातील. हे देशातील पहिले असे प्रकरण आहे ज्यात तथाकथित गोरक्षकांना कोर्टाने शिक्षा दिली जाईल. हे प्रकरण देशातल्या तथाकथित गोरक्षकांच्या क्रौर्यावर प्रकाशझोत टाकणारे आहे. कडव्या हिंदुत्वनिष्ठ विचारांचे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्यानंतर, आपणच प्राचीन भारतीय परंपरेचे वारसदार आहोत, असे समजणाऱ्या देशभरातल्या गोरक्षकांना नवा चेव आला. त्याच उन्मादातून ही घटना घडली असल्याचे निष्पन्न होते. योगी आदित्यनाथ यांनी सत्तासूत्रे हाती घेताच, उत्तर प्रदेशातले बेकायदा कत्तलखाने बंद पाडले. आपल्या राज्यात गोरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईल आणि गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी जाहीर केल्याने, कायदा हातात घेऊन तथाकथित गोरक्षण करणाऱ्यांना चिथावणी मिळाली. परिणामी गोपालन आणि गो संरक्षण करणाऱ्या तथाकथित ठेकेदारांना आपण कायदा हातात घेऊन, निरपराध्याचा प्राण घेत आहोत, याचे भान राहिले नसल्यानेच अलीमुद्दीन अन्सारीची हत्या झाली होती. कायदा हातात घेऊन निरपराध्यांना दोषी ठरवून चोपून काढणे, हे काही गोरक्षण नव्हे. गायीचे रक्षण करायसाठी माणसाचा प्राण घेणे त्यांचा छळ करणे हे काही समर्थनीय होऊच शकत नाही. खुद्द आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मठातल्या गोशाळेचे प्रमुख आणि कर्मचारी मुस्लिम धर्मीयच आहेत, ही बाबही गोहत्येच्या कायद्याचे स्वयंघोषित रक्षक असणाऱ्यानी लक्षात घ्यायला हवी. देशातले लाखो मुस्लिम शेतकरीही गायींचे पालन करीत आहेत. ते शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांना आणि गोपालकांना कोणत्याही धर्माची पट्टी लावता येणार नाही. धर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या विवेकहीन कृत्यामुळे आपले धार्मिक ऐक्य धोक्यात आले आहे. गायीसाठी माणूस मारणारे धर्मरक्षक नसून धर्मासाठी कलंक आहेत. ज्यांच्याकडे किमान माणुसकी, करूणा नाही आणि जे निरपराध माणसे मारण्याइतके निष्ठूर होऊ शकतात अशांना धर्म कधी कळणार? गोरक्षकांनी परस्पर अशा कारवाया करणे आणि संबधितांना मृत्युपर्यंतची शिक्षा देणे हे कोणत्या अधिकारात बसते? त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. अशा प्रवृत्ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून त्यांना चाप लावणे हे राज्यकत्र्यांचे कर्तव्य आहे. गोहत्येच्या नावाखाली देशात गुंडगिरी सुरू असून अशा घटनांमध्ये एकसारखी वाढच होत असताना दिसून येते. हिंदू-मुस्लिमांत भाईचारा प्रस्थापित करण्याऐवजी अशा घटनांमुळे राज्यकर्ते त्यात तेल ओतत राहतात आणि द्वेषाचा हा वणवा आणखी विस्तारत जातो. खरेतर भारतात गवालंब, गोमेध, शूलगव अशा यज्ञात गायीची आहूती दिली जायची. इतकेच नाही तर नंतर प्रसाद म्हणून गाईचा कोणता भाग कोणी खायचा याचीही वर्णने आढळतात. पूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ‘मधुपर्वâ’ हा प्रकार सर्रासपणे दिला जायचा. त्यात गायीच्या वासराचे कोवळे मांस असायचे. आपली पशूपालक संस्कृती असल्याने असे मांस खाणे हे गैर नव्हते. जनावरे वाचवा असे सांगणाऱ्या काही रानटी टोळ्या त्यासाठी निर्दयीपणे माणसे मारत आहेत. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गोरक्षकांना सुनावले होते. गोरक्षणाच्या नावावर अनेक व्यक्ती आणि संस्था राजकारण करत असल्याने त्यांचा सुळसुळाट आवरला पाहिजे असेही पंतप्रधान म्हणाले होते. त्यात त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले, ‘आपल्याकडे गायींच्या जितक्या कत्तली केल्या जातात त्याहून अधिक गायींचे मृत्यू प्लॅस्टिक कागद खाल्ल्याने होतात. त्यामुळे रस्त्यात किमान प्लॅस्टिक टावूâ नका; कुणी टाकलेच तर ते आधी उचला. तुम्ही इतके काम जरी केले तरी अनेक गायींचे प्राण वाचू शकतील!’ मात्र त्यांच्या या सूचनेकडे कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. म्हणूनच सरकारला प्लॅस्टिकवर बंदी घालणारा कायदा करावा लागत आहे. अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे ही गोष्ट वेगळी! शेतकरी जनावरांवर अपत्याप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे ते त्यांना मारायचा विचारही करत नाहीत. मात्र अनेकदा अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जनावरे विकण्याशिवाय पर्यायही नसतो. त्यातून काही भाकड जनावरे हृदयावर दगड ठेवून विकली जातात. या सगळ्या समस्यांचा शोध घेऊन उपाययोजना करण्याऐवजी स्वयंघोषित गोरक्षकांनी उच्छाद मांडला होता. कायदा हातात घेऊन संबधितांना शिक्षा देण्याचे काम तेच करतात. इतकेच नव्हे तर माणसे ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तथाकथित गोरक्षकांना झालेल्या शिक्षेमुळे निश्चितच अशा घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget