Halloween Costume ideas 2015

बांग्लादेशामध्ये रोहिंग्या मुलींना वेश्यावृत्तीमध्ये ढकलले जात आहे

वेश्या बनण्यासाठी विवश होणे यापेक्षा मोठा अपमान एका स्त्रीचा असूच शकत नाही. गरज जेव्हा आपल्या शेवटच्या टप्प्यावर जाते तेव्हा पायात घुंगरू बांधून घेते. याची पुढची पायरी वेश्यावृत्ती असते. तीव्र गरीबीमध्ये माणसाच्या इमानाला धोका निर्माण होतो. 1947 साली इस्लामच्या नावावर पाकिस्तान नावाचा देश तयार झाला. तर 1972 साली बंगाली अस्मितेच्या नावावर बांग्लादेश नावाचा देश निर्माण झाला. तांत्रिकरित्या बांग्लादेश आपल्या देशासारखाच एक धर्मनिरपेक्ष देश असला तरी प्रत्यक्ष रूपात तो एक मुस्लिम बहुल देश आहे. असे असतांना सुद्धा आशियातील सर्वात मोठा वेश्याव्यवसाय याच देशात चालतो. याची त्या देशातील शेख हसीना सरकारला लाज वाटत नाही आणि वेश्याव्यवसाय संपविण्यासाठी ते फारसे गंभीर नाहीत. ही बाब त्यांच्या इमानचा दर्जा दाखविण्यासाठी पुरेशी आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बीबीसीने एक मोहिम घेऊन एक रिपोर्ट प्रकाशित केली आहे. त्यात म्हटलेले आहे की, लुटल्या-पिटल्या अवस्थेत कसे-बसे जीव वाचवून म्यानमारमधून पळून आलेले रोहिंग्या मुस्लिमांच्या 13 ते 20 वर्षीय वयोगटातील अनेक मुलींना फूस लावून काही मुस्लिम महिला ढाक्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय करण्यासाठी बाध्य करीत आहेत. घोर गरीबीत असल्यामुळे या मुलींना हे सर्व निमुटपणे करावे लागत आहे. बीबीसीच्या टीमने खोटे ग्राहक बणून दोन मुली आणि त्यांना पुरविणारा एजंट यांना पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. मुली मुस्लिम, एजंट मुस्लिम, त्यांचा उपभोग घेणारे मुस्लिम, पकडून देणारे मात्र बीबीसीचे ख्रिश्चन बांधव. बांग्लादेशातील काही मुस्लिमांच्या नैतिक अधःपतनाचा हा एक अंतरराष्ट्रीय पुरावा आहे. 
सध्या उन्हाळ्याचा मोसम सुरू आहे. दोन महिन्यात पाऊस सुरू होईल. त्यावेळेस 7 लाखाच्या कॉक्स बाजार येथील शरणार्थ्यांच्या वस्तीमध्ये साथीच्या रोगांचा जो हाहाकार माजेल त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपल्या देशात पाहूणे म्हणून आलेल्या या दुर्देवी रोहिंग्यांच्या कोवळ्या मुलींचा आपली वासना शमविण्यासाठी बांग्लादेशातील उच्चभ्रू लोक दुरूपयोग करीत आहेत, ही बाब अतिशय वेदनादायक आहे. 
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याबद्दल कुरआनने म्हटलेले आहे की, ” निःसंशयरित्या तुम्ही नैतिकतेच्या सर्वोच्च स्तरावर आहात.” (सुरे अलकलम आयत नं.4). अशा जबरदस्त प्रेषितांच्या बांग्लादेशातील उम्मतीचे हे नैतिक अधःपतन आलमे इस्लामसाठी शरमेची बाब आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना प्रतिबंध करत होते व त्या मार्गाला वक्र करू इच्छित होते आणि परलोक नाकारणारे होते”. (सुरे एराफ आयत नं. 45).या आयातीत म्हटल्याप्रमाणे अल्लाहने कुरआनमध्ये जो सरळ मार्ग दाखविलेला आहे त्याप्रमाणे जीवन जगणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. मात्र समाजामध्ये असेही काही लोक आहेत जे अल्लाहने दिलेल्या सद्मार्गापासून विचलित होवून वक्र मार्ग अवलंबू इच्छितात. बांग्लादेशातील रोहिंग्या मुलींना वाममार्गाना लावणारे लोक याच वर्गात मोडणारे आहेत व आपल्या या नीच कृत्याने त्यांनी अल्लाहच्या गजबला आव्हान दिलेले आहे. 
बांग्लादेशामधील ही परिस्थिती पाहता भारतीयांना ही एक धडा असा घेता येईल की आपल्या देशातील गरीब दलित, मुस्लिम, आदिवासी, सवर्ण सर्वच स्तरातील मुलींच्या भाग्यात असा क्षण येवू नये. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असावे. भांडवलशाही व्यवस्थेच्या नादी लागून पैसा कमाविण्याच्या नादात वेश्याव्यवसाय हत्यार व्यवसायानंतरचा दूसरा मोठा आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. गरीबांच्या अनेक कोवळ्या मुलींना आमिष दाखवून, मोठी-मोठी स्वप्ने दाखवून शहरात नेवून या धंद्यात अडकविले जाते. यासाठी प्रत्येक स्तरावर आपण सर्वांनी दक्ष राहून कोणाचीच मुलगी अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, यासाठी सर्वांनी दक्ष रहावे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget