- प्रा. आरिफ ताजुद्दीन शेख, औरंगाबाद
इज्तेमाच्या माध्यमातून बरेचसे संदर्भ समोर आले आहेत. इज्तेमामध्ये भाविकांना अल्लाहाची ओळख करून देणे व पैगंबरांच्या कार्यपद्धतीवर कशा पद्धतीने मार्गक्रमण करावे यासाठी मनोमिलनाचा कार्यक्रम म्हणजे इज्तेमा होय.
औरंगाबादच्या पाणीदार भूमीत भव्य-दिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारा जो कार्यक्रम लिंबेजळगाव येथे झाला, त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इज्तेमागाहसाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते हिंदू बांधव. त्यांनी उभं पिकलेले शिवार पिकाची कापणी न करता या सत्कार्यासाठी दिली त्यांना माझा सलाम. त्यांचे हे औदार्य मुस्लिम बांधवांच्या मनाच्या पलीकडे आहे. या इज्तेमातून हिंदू-मुस्लिम, दलित, ब्राह्मण, सोनार, कुंभार, माळी, साळी यांच्यासाठी समन्वयाचा सेतू उभारणारा हा कार्यक्रम ठरला.
गंगा-जमनी संस्कृतीचे अप्रतिम उदाहरण इज्तेमाच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. या इज्तेमाला यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी जरी मुस्लिम बांधवाची भूमिका महत्त्वाची होती. त्यापेक्षा मुस्लिमेतर लोकांची भूमिका वाखाणण्याजोगी होती. या कार्यक्रमाची रुपरेषा चार महिन्यांपूर्वी आखली तेव्हापासून या कार्याला सर्वांनी हातभार लावला. या ठिकाणी जातिभेदाच्या भिंती पुर्णत: कोलमडल्या. एवढेच नव्हे तर त्या भिंती भुईसपाट झाल्या. स्वयंसेवकांमध्ये मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मांतील लोक होते. ते आपल्या परीने इज्तेमासाठी आलेल्या भाविकांची सेवा तन, मन व धनाने करत होते. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जा, माणसाच्या मूलभूत वृत्ती -प्रवृत्ती किंवा भावभावना यामध्ये काहीच भेद नसतो. वर्ण, वंश, वर्ग, जात, धर्म, भाषा आणि पंथादीची संपुष्टे बाजुला केली की जात दिसते. ‘जी जात नाही ती जात’ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपणाला वेगळेपण जाणवते. तरी माणूस मात्र इथूनतिथून सारखाच असतो. इस्लाममध्ये समानतेचे धोरण आहे. कुरआन शरीफमध्ये कुठेही जातिश्रेष्ठतेचे समर्थन केलेले नाही. सर्व माणसं एकाच समान पातळीवरून विचारात घेतली जातात.
वारकरी संप्रदायाची दिंडी नाथष्टीला जात असताना मुस्लिम स्वयंसेवकांनी मोठ्या आदराने व आत्मीयतेने त्यांना बसविले, त्यांना चहापाणी व अल्पोपहार दिला. हे जेव्हा दृश्य पाहिले तेव्हा मला मुस्लिम मराठी संत आठवले. कारण मी संत साहित्याच छोटासा अभ्यासक आहे. वारकरी संप्रदायाला जशी शेख महंमद या संताविषयी जवळीक वाटली तशीच महंमदांनाही वारकरी संप्रदायाबद्दल वाटली. अशी आत्मीयता विविध मुस्लिम संतांना महाराष्ट्रातल्या अन्य धर्मसंप्रदायाबद्दलही वाटत आली आहे. इस्लामी सूफी अवलियांनी महाराष्ट्रीय धर्मसंप्रदायांशी जवळीक होती व त्यांना मऱ्हाठी संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतले होते. मराठी माणसांशी त्यांनीही अत्यंत जिव्हाळ्याचे ह्रदयसंवाद केला होता आणि मराठी माणसानेदेखील त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये परकेपणाची भावना कधीच निर्माण होऊ दिली नव्हती. त्याची प्रचिती इज्तेमाच्या माध्यमातून नवा सांस्कृतिक इतिहास आपल्या डोळ्यासमोर तरंगलेला नव्हे तर तिरंग्यात रंगलेला आपणास आढळून आला आहे. या ठिकाणी मी वरील विधानात यमक जो जोडला. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा झेंडा अनुयायांच्या हातात नव्हता. फक्त मला एका ठिकाणी तिरंगा दिसला. कारण सर्व झेंड्यांत माझा तिरंगा भारी आहे. हे तिरंग्यावरील प्रेम निरपेक्ष आहे.
इज्तेमाच्या माध्यमातून मुस्लिम समुदायाला हेच संदेश देण्यात येतो की तुम्ही धर्माचे आचरण करा. अल्लाहावरील निष्ठा प्रांजळपणाने ठेवा. या निष्ठेमुळे ते धार्मिक आहेत, धर्मांध नाहीत हेही स्पष्ट होते. जीवनविषयक दृष्टिकोनाचा विचार करत असताना विज्ञानाच्या साच्यात इस्लामाचा अंगीकार मुस्लिम समाज जो करत आहे त्यामध्ये तब्लीग जमातीची भूमिका फार महत्त्वाची आहे. मी तर म्हणेन इन्शा अल्लाह जर मुस्लिम तरुणाच्या एका हातात कुरआन शरीफ आणि दुसऱ्या हातात संगणक असतील तर आपल्या देशाला धोका नाही, कारण भौतिक सुविधा या क्षणिक आहेत. त्यापेक्षा आत्मिक समाधान हे धार्मिक कार्यातून, समाजसेवेतून मिळते, ही शिकवण आपल्या देशाने नेहमी दिली आहे. इज्तेमा म्हणजे मनोमिलनाचा कार्यक्रम होय. इज्तेमामध्ये जे मौलवी प्रवचन करतात ते दुभंगलेली मने कशी जोडायची व आपल्यापासून सर्व समाज व प्राणिमात्रांना कसा फायदा होईल, याचे पालन करावयाचे कुरआन शरीफमध्ये तुम्ही चांगली उम्मत आहात, ‘तुम अच्छाईका हुक्म करते हो और बुराईसे रोकते हो’ अशा पद्धतीचे मुस्लिम व्हावे. नावाने मुस्लिम होत नसते तर त्याला आचरणाने मुस्लिम व्हावे लागेल. तुमच्या कार्यावरून लोकांनी तुम्हाला मुस्लिम म्हणावे नावावरून नव्हे. याची सजग जाणीव इज्तेमाच्या माध्यमातून दिली जाते. इज्तेमा म्हणजे गर्दी जमवणे नव्हे तर त्या गर्दीतून दर्दी लोक बाहेर आले पाहिजेत, जेणेकरुन प्रत्येक समाजातील व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान व आध्यात्मिक शांती लाभो ही प्रार्थना यासाठीच केली जाते.
मुस्लिम समुदायातील प्रभावशाली व सशक्त जमात म्हणजे तब्लीग होय. लोक जरी या जमातीला तब्लीग जमात म्हणत असेल तरी इ.सन १९३० मध्ये मौलाना इलियास रह॰ यांनी या जमातीची स्थापना केली, परंतु मौलाना या जमातीला- तब्लीग जमातीला ‘तहरीक ए ईमान’ असेही म्हणत असत, कारण सर्वांना ईमानमध्ये वाढ करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे तब्लीग जमातीचं जागतिक कार्यालय दिल्ली येथील 'हजरत निजामुद्दीन मर्कज’ आहे. येथूनच जगभरात जमाती जातात व येतात. हे आपल्या देशाचे भाग्य आहे की एवढे पवित्र काम करण्याची संधी आपल्या देशाला मिळाली.
जगाच्या इतिहासात आजतागायत तब्लीगचा एवढा मोठा इज्तेमा झाला नव्हता तो आपल्या औरंगाबादच्या भूमीत झाला. यामध्ये कामकाज पद्धतीचे रेकॉर्ड सापडणार नाही. कारण जो तो आपापल्या पद्धतीने श्रमदान करण्यासाठी येत असे. पोस्टर, बॅनर, संघटनप्रमुखाचे फोटो,जाहिरातबाजी नाही. कोणत्याच प्रकारचे झेंडे नाहीत. जो तो तरुण आबालवृद्ध सर्व तन मन धनाने काम करत होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व शिस्तीचे अनोखे दर्शन औरंगाबाद येथे घडले. व्यवस्थापन चोख होते. या इज्तेमाची तयारी तीन-चार महिन्यांपासून सुरू होती. यात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सेवा करत होते. जेव्हा तेथून लोक निघत होते तेव्हा स्वयंसेवक म्हणत होते ‘साथी आरामसे जाओ’ त्या स्वयंसेवकांत हिंदू व इतर समाजाचेदेखील होते, तेसुद्धा म्हणत होते ‘साथी आरामसे जाओ और दुआ में याद रखो!’ हे दृश्य पाहून माझे डोळे पाणावले की आपला देश सुंदर आहे. परंतु काही स्वार्थी लोकांनी आपले राजकीय दुकान चालविण्यासाठी या दोन्ही समाजाला कधीच एकत्र येऊ दिले नाही. परंतु इज्तेमाने मुस्लिम समाजालाच नव्हे तर प्रत्येक समाजाला या ठिकाणी एकत्र आणलं. एवढेच नव्हे तर मंदिरातसुद्धा लोकांनी नाश्ता आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. हे आमच्या देशातील हिंदू मन हे मेणाहून मऊ आहे हे जगाने अनुभवले. त्यामुळे ज्या सर्वांनी इज्तेमात सेवा केली त्यांनी आलेल्या भक्तांची मनं जिंकली. ही चर्चा सर्वदूर झालेली आहे. भारतीय मातीत शेकडो वर्षे जी सहिष्णुता आणि तत्त्ववैचारिक, पारमार्थिक बहुविधता रुजली आहे. तिला आता गोमटी भौतिक फळेही लागत आहेत. अशी फळे शेजारच्या देशांमध्ये का येत नाहीत, त्याचे कारण या भूमीत हिंदू, बौद्ध, जैन, इस्लामसह नाथ, महानुभाव, वारकरी, सूफी संप्रदाय असे नवसृजनाचे प्रवाहही एकत्र गुण्यागोविंदाने नांदले. सामाजिक समतेची पेरणी या भूमीत झाली. मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, बहिणाबाई, एकनाथ, तुकाराम यांच्यासह अनेक सूफी संतांच्या कार्याने या भूमीची 'मशागत' झाली या संतानी ही मशागत मानवाच्या मनावर करून त्यांना अध्यात्मप्रवण केले आहे.
संत महंताची भूमी
माही मराठवाड्याची
भोळी भाबडी माणसं
लई पुण्यवान माती
कवी देशमुखांनी रेखाटलेले हे शब्दचित्र या भूमीला लागू पडते. हे औरंगाबाद येथे झालेल्या इज्तेमाच्या माध्यमातून संबंध देशाला जाणवले. या भोळ्या-भाबड्या माणसांच्या सहिष्णू मनाचे येथे दर्शन घडते. इज्तेमाच्या माध्यमातून मराठवाड्याची भूमी आध्यात्मिक कार्यासाठी सुपीक होण्याचे कारण या भूमीवर अनेक वर्षांपासून संतमहंत व सूफी संतांनी मानवाच्या मनावर मशागत केली, त्यामूळे या भूमीवरच नव्हे तर भारतीय भूमी त्यांनी अध्यात्मप्रवण केली व इज्तेमाच्या माध्यमातून सर्व समाजाचे मन हे अध्यात्मप्रवण झालेले दिसले, कारण या ठिकाणी प्रत्येक समाजात इज्तेमाचे कुतूहल प्रत्येकाच्या मुखी दिसत होते. तब्लीगची संपूर्ण बांधणी सहा तत्त्वांवर आधारित आहे. ती पुढीलप्रमाणे- १) ईमान- इस्लामवर श्रद्धा, २) नमाज- पाच वेळा प्रार्थना, ३) इल्म ए दीन- चांगलं काय व वाईट यातील फरक, ४) इकाम- लहान मोठ्यांचा आदर, ५) इखलास- कोणतेही सत्कार्य नि:स्पृहपणे करणे, ६) दावत- धार्मिक प्रचार.
वरील सहा तत्त्वांवर सखोल मंथन करणे व अनुकरण करणे. या तत्त्वांशिवाय कोणाही वक्त्याचं प्रवचन भरकटणार नाही याची दक्षता ते नेहमी घेत आले आहेत. गर्दी दिसली की जीभ घसरलेले आपण वक्ते पाहिले असतील, परंतु येथे आचरणातून वक्ते घडतात, ते बोलघेवडे नसतात, याचा प्रत्यय औरंगाबादच्या पोलीस यंत्रणा असो की राजकीय मंडळी असो किंवा इतर समाजाने अनुभवला आणि ते भारावून गेले.
भूतकाळ आपला नाही भविष्यकाळावर आपला अधिकार नाही, पण वर्तमानातला प्रत्येक क्षण आपल्यासाठी आहे. वर्तमानात हिंदू, मुस्लिम, दलित समाजात सहिष्णुता जर घडवून आणावयाची असेल तर इज्तेमासारख्या कार्यक्रमांची भूमिका महत्त्वाची असते. येथे प्रत्येकाच्या भावनेचा आदर केला जातो. ‘सद्गुण दुर्गुणांना नाहिसे करतो.' अर्थात चांगुलपणा आणि दुव्र्यवहार एकसमान होऊच शकत नाहीत. दुव्र्यवहाराचे प्रत्युत्तर चांगल्या वर्तनांने द्या, हा इस्लामी संदेश इज्तेमाच्या माध्यमातून देण्यात आला. मग पाहा शत्रूदेखील तुमचा जीवलग मित्र होईल, हा आशावाद इज्तेमाच्या शिकवणीतून मिळाला. अन्य धर्मियांच्या भावनेला ठेच पोहचू नये ही दक्षता घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे. या शिकवणुकीचा पाढा औरंगाबाद येथे झालेल्या इज्तेमाने अनुभवला. या इस्तेमामध्ये जवळपास ८० लाख लोकांचे हात दुआसाठी उठले. केवळ ते देशामध्ये व सबंध जगामध्ये शांतता, समृद्धी प्राप्त होवो, ही इज्तेमा घेण्यापाठीमागची भूमिका होती.
Post a Comment