Halloween Costume ideas 2015

प्रक्षेपकांमुळे धर्मांध ठरलेला समतावादी विचारवंत जियाउद्दीन बरनी

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
- भाग 1-
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला कट्टरतावादी विचारवंत म्हणून जियाउद्दीन बरनी ची ओळख. बरनी म्हणजे धर्मांध, शब्दांच्या माध्यमातून स्वधर्माचे अवडंबर माजवणारा धर्मपिसाट, धर्मभेद करुन इतरांना अधिकार नाकारणारा माथेफिरु. जियाउद्दीन बरनी विषयी या आणि अशा अनेक आरोपांवर आधारीत लिखाण करण्यात आले आहे. त्यापलिकडे बरनीची चर्चा कुणी केलीच असेल तर अल्लाउद्दीन खिलजीच्या बाजारमुल्यांच्या निर्णयाला सैध्दांतिक बैठक देणारा विद्वान म्हणून. ती चर्चा देखील एक दोन अपवाद सोडले तर मर्यादित स्वरुपाची आहे. बरनी चे धर्माविषयी चे विचार, जे समोर आणले जात  आहेत, असमर्थनीय आहेत. वंशाचा दुराभिमान, धर्मभेदावर आधारीत माणसांचे मुल्य ठरवण्याचा अघोरीपणा ह्या गोष्टी मान्य करता येत नाहीत. मात्र ज्या जियाउद्दीन बरनीने आर्थिक समता, राजाचे अधिकार, प्रजेचे अधिकार, प्रशासकीय कर्तव्य, राजकारणाचे नियम यावर एखाद्या तत्त्ववेत्याप्रमाणे चर्चा केली. एका दार्शिनिकाप्रमाणे त्याने मुल्याधिष्ठीत राजसंहिता निर्मिली. तो जियाउद्दीन बरनी दुसरीकडे विषमतावादी कसा असू शकतो ? हि उलटतपासणी अद्याप कुणी केली नाही? त्याचे समतावादी, आर्थिक शोषण नाकारणारे विचार आणि धर्मभेदावर त्याने केलेली मांडणी , हि एकाच व्यक्तीची उपज असू शकते का? असा साधा विचार देखील बुध्दीप्रामाण्यवादी इतिहासकारांना स्पर्शून गेला नाही? बरनीच्या दोन्ही विचारांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न देखील कुणी करत नाही. कारण तौलनिक अभ्यासातून बरनी निर्दोष ठरण्याचा धोका अभिनिवेष अंतःकरणात बाळगलेले इतिहासकार कसा पत्करतील. मध्ययुगीन काळातील अनेक ग्रंथामध्ये प्रक्षेप करण्यात आला आहे. बाबरने लिहिलेल्या ‘वाकीआनामा’ (बाबरनामा) मध्ये हुमायुंन ने मागाहून काही प्रसंग घुसवल्याची नोंद त्याने स्वतः बाबरनाम्याच्या एका हस्तलिखित प्रतीत करुन ठेवलीय. सुदैवाने बाबरनाम्याच्या दुसर्या प्रती उपलब्ध झाल्याने त्यातील प्रक्षेप बाजूला सारता आला. पण बरनी हा त्याबाबतीत दुर्दैवी आहे. बरनीच्या ग्रंथाच्या खूप कमी प्रती उपलब्ध आहेत. फतुहाते जहांदारी ची एकच प्रत इंडीया ऑफीस लायब्ररी मध्ये आहे. आणि दुसर्या प्रतींचाही काही शोध लागलेला नाही. त्याच्या ‘तारीखे फिरोजशाही’ च्या काही प्रती देशात इतरत्र देखील पाहायला मिळतात. त्या प्रती एकसारख्या आहेत. जे उतारे बरनीच्या धर्मांधतेचा नमुना म्हणून सादर केले जातात. त्यातील बहुतांश उतारे हे ‘फतुहाते जहांदारी’ ह्या ग्रंथातील आहेत. त्यामूळे त्याच्या उपलब्ध असलेल्या एका प्रतीवरुन आपण त्याच्यातील सत्यता पडताळून पाहू शकत नाही. किंवा त्यातला प्रक्षेपित भाग काढून टाकू शकत नाही. त्यातही बरनी ने दोन्ही ग्रंथ लिहल्यानंतर त्याच्या किती प्रती स्वतः बनवल्या होत्या ह्याची माहीती मिळत नाही. त्यामुळे इंडीया ऑफीस लायब्ररीची प्रत देखील बरनीने स्वतः लिहलेली प्रत आहे की अन्य कुणी त्याची नक्कल केली आहे, हे देखील उमजत नाही. हि परिस्थिती कोणतेही तथ्य काढण्यासाठी पोषक मानता येत नाही. तरीही  अशा स्थितीत ह्या प्रतींमधील सर्वच मजकूर बरनीचा असल्याची मान्यता दिली जाते. त्यामुळे आर्थिक समता सांगणारा बरनी सामाजिक विषमता मांडणारा होता. अशी परस्परविरोधी समज पसरविली जाते व त्याला पुर्वग्रहदुषित समाजाकडून मान्यताही मिळते. जे उतारे कट्टरतावादी आहेत. ते बरनीनेच लिहिल्याचे मान्य केल्यानंतर देखील अनेक प्रश्न उभे राहतात. ह्या सगळ्या भानगडीत मुळ जियाउद्दीन बरनी कसा होता? हा प्रश्न अनिर्णित राहतो. त्याविषयीचे उत्तर एखाद्या लेखातून शोधता येणार नाही. किंवा बरनीची खरी प्रतिमा अशीच होती हा दावा देखील एखाद्या मर्यादीत लेखात कुणी करु शकत नाही. पण बरनी ची नाकारलेली दुसरी बाजू मात्र समोर आणता येईल. प्रस्तुत लेखात आपण तोच प्रयत्न करणार आहोत. जियाउद्दीन बरनीच्या ‘फतुहाते जहांदारी’ च्या चर्चेतून बरनीचे एक वेगळे रुप  समोर येते. त्याविषयीच्या चर्चा प्रस्तुत लेखातून आपण करत आहोत.  
बरनी कृत ‘ फतुहाते जहांदारी’
    फतुहाते जहांदारी ह्या ग्रंथाची सुरुवात करताना ऱाज्यकर्त्यांचे महत्त्व विदीत करुन बरनी ने राज्यव्यवस्थेचे स्वरुप स्पष्ट केले आहे. राजा सामान्य माणसापेक्षा कसा वेगळा आहे. त्याने सामान्य माणसाशी कसे वागले पहिजे ह्याची चर्चा संबंध पुस्तकात बरनीने केली आहे. कित्येक ठिकाणी त्याने राज्यव्यवस्था रयतकेंद्रीत असावी हे मांडताना  इस्लामी तत्त्वांचे दाखले दिले आहेत. त्यामूळे त्याच्या टिकाकारांना त्याला धर्मांध ठरवायला आयतेच संदर्भ मिळाले आहेत. त्याने फुतहाते जहांदारी लिहताना धर्मकेंद्रीत मांडणी केली आहे. मध्ययुगीन समाजाची मानसिकता लक्षात घेतली तर त्याची हि मांडणी सांयुक्तीक होती. मध्ययुगीन समाज धर्म आणि रुढींच्या पलिकडे पाहत नसे.
    एखादी चांगली गोष्ट धर्म नियम असल्याचे दाखले दिल्यानंतर सामान्य माणूस त्याचे आचरण करताना कोणताही विचार करीत नसे. त्यामुळे संतांच्या चळवळी, भक्ती आंदोलने हि धर्माला आधार बनवूनच मार्गक्रमण करीत राहिली. जियाउद्दीन बरनीने देखील याहून वेगळे काही केले नाही. जीवनाचे अतिसुक्ष्म निरिक्षण करुन त्याला उन्नत करण्यासाठी बरनी जीवनमार्ग शोधत राहिला. फतुहाते जहांदारी उन्नत जीवनमार्गाची सुंदर व्याख्या आहे. त्यामध्ये राजकारणाचे आदर्श नियम आहेत. राजा आणि प्रजा ह्यांच्या नातेसंबधांचे विश्लेषण त्यामध्ये सामावलेले आहे. बरनीने मुसलमानांच्या धर्ममुल्यांची प्रस्थापना करणे गरजेचे असल्याचे मत अनेक ठिकाणी मांडले आहे. त्यातून एखाद्या निरपेक्ष विचारवंताला एकांगीपणा जाणवणे साहजिक आहे. पण बरनीची विचारभूमी लक्षात घेतली तर ह्यात काही गैर वाटत नाही.  कारण बरनी असो अथवा सामान्य मुसलमान कुरआनला जीवनाची संहिता मानत आला. कुरआनने देखील जीवन जगतानाच्या नियमांवरच आधिक भाष्य केले आहे. तीच मांडणी बरनीने सामान्य शब्दांत आपल्यासमोर आणली. कुरआनच्या अर्थकारणाचे नियम, सामाजिक चारित्र्य आणि नैतिकता ह्यावर कुरआनने केलेले भाष्य, बरनीने आपल्या मांडणीचा आधार बनवले असण्याची शक्यता आहे. बरनीने त्याचे विश्लेषण राजापासून सुरु करुन सामान्य माणसाच्या जीवनापर्यंत विस्तारत नेले आहे. सामान्य माणसाच्या जीवन आणि त्याच्या प्रत्येक पैलूचे अभ्यास करुन बरनी तथ्य मांडण्यास उभा राहतो. 
कठोर मुहतसीबची नियुक्ती
मध्ययुगीन भारतातील मुसलमान राज्यकर्ते ‘मुहतसीब’ ह्या पदावर कर्तव्यदक्ष आधिकार्याची नियुक्ती करण्याठी प्रयत्नरत असत. राज्यामध्ये ज्या गोष्टींना अवैध ठरवले आहे, जे कायदे केले आहेत, त्याचे पालन होते की ना? ह्याची माहिती घेण्याचे काम ‘मुहतसीब’ द्वारा करण्यात येई. ह्या पदावरील व्यक्ती कसा असावा ह्याविषयी बरनी म्हणतो, “राजधानी नगर आणि प्रदेशात कठोर स्वभावाचे मुहतसीब नियुक्त करावेत.”1 सामान्य माणूस कायद्याचे पालन करताना कुचराई करत असेल तर त्याला दंड आकारण्यात यावे. जे खुलेआम गुन्हा करतात. त्यांना कठोर शिक्षा द्यावी. कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळत असल्याचे बरनीचे मत आहे. नियमांची अंमलबजावणी करणारा अधिकारी उच्च बुध्दीप्रामाण्यवादी व तर्क करणारा असावा हे सांगताना बरनी म्हणतो, “ प्रेषित जे इतर मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ होते. ते अत्याधिक तीव्र बुध्दी व इश्वराचे मार्गदर्शन मिळत असताना देखील तर्काला ( बुध्दीप्रामाण्यवादाल) महत्त्व देतात. बादशहांकडे ना तर उत्कृष्ट ( प्रेषितांच्या तुलनेत)  बुद्धी असते ना इश्वराचे मार्गदर्शन येते. अनुभवी हितैषी (तर्ककठोर) व्यक्तींच्या अभावात कसे उत्कृष्ट राजप्रबंध शक्य आहे.”2 बरनीने प्रशासनाच्या अंमलबजावणीत बुध्दीप्रामाण्यवादाचे महत्व विषद करण्यासाठी ‘फतुहाते जहांदारी’ मध्ये अनेक ठिकाणी मुद्यांची पुनरावृत्ती केली आहे. पुरुक्तीचा दोष त्याने पत्करला असला तरी त्याच्या लेखी बुध्दीप्रामाण्यवादी प्रशासकीय अधिकार्याचे महत्त्व कीती होते हे स्पष्ट होते.
राज्य करताना सत्यावलोकन आणि बादशहा
बादशहाने राज्यकारभार करताना  चौकसबुध्दीने सर्व व्यवहार पाहिले पाहिजेत. त्याने भूतकाळाचा अभ्यास करुन वर्तमान परिस्थिती हाताळताना भविष्याचा वेध घ्यावा.राज्यातील प्रत्येक घटनेचे त्याला ज्ञान असणे गरजेचे असल्याचे सांगताना बरनीने बादशहाच्या दहा गुणांची चर्चा केली आहे. विस्तार भयास्तव त्यातील सर्व मुद्यांवर इथे चर्चा करता येणार नाही. त्यातील काही निवडक मुद्ये आपण पाहूयात. बरनीची काही विधाने - “ (बादशाहने) पुर्णतः विवेकाने निर्णय घ्यावा. थोड्याशा माहितीच्या आधारे घेतलेले निर्णय योग्य ठरत नाहीत.(बादशाहला) मनुष्याला समजण्याचे पुर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तो राज्य करु शकत नाही. सदाचरण आणि पावित्र्य जपावे. सत्यावलोकन पापी लोकांच्या हृद्यात जन्म घेत नाही. त्याच्यामध्ये (बादशहामध्ये) संयम असणे गरजेचे आहे. उतावळेपणा आणि क्रोधामुळे सत्यावलोकनाची दृष्टी येत नाही. ” बरनी ने बादशहाच्याविषयी मांडलेले हे विचार तत्कालीन समाजाच्या विचारकक्षांच्या खूप पुढे जाणारे होते. त्यामुळे बरनीला समकालीनांच्या टिकेला तोंड द्यावे लागले. मोहम्मद तुघलकासारख्या काळाच्या पुढे पाहणार्या एखाद्याच सुलतानाने त्याचा सन्मान केला. अन्यथा बरनीला संपूर्ण आयुष्य उपेक्षेतच जगावे लागले. राज्य करताना सल्ला मसलत करणे गरजेचे आहे. पण त्याच्या काही अटी असल्याचे बरनीचे मत आहे. बरनी म्हणतो, “ सल्ला देण्याची पहिली अट हि आहे  की, सल्ला देणार्याला जी गोष्टी उमजेल ती त्याने कोणत्याही भयाशिवाय थेट सांगितली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सल्ला देताना तर्क वितर्क करावेत. सल्ला घेल्यानंतर त्यावर सामान्य सहमती आवश्यक आहे. त्यावर कोणालाही कोणतेच आक्षेप नसेल तर त्यापध्दतीने कार्य करावे.” असे बरनी बादशहाला सुचित करतो. तो पुढे म्हणतो,“ज्या लोकांकडून सल्ले घ्यायचे आहेत. ते निर्भय असावेत. ते अनुभवी निष्ठावान आणि एकदुसर्याच्या समान असावेत. एक मोठा ज्ञानी आणि दुसरा मुर्ख असू नये. एखादा खूप श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असू नये. अन्यथा सत्यावलोकन असमान (त्रोटक) असेल. (सल्लागार मंडळातील) सल्लागाराला राज्यातील सर्व गुप्त बाबींचे ज्ञान असावे. त्यामध्ये असे लोक असू नये जे विश्वासपात्र बनण्यास अपात्र ठरावेत. जेंव्हा सल्ला देणारे राज्याच्या गुप्त बाबींशी अनभिज्ञ असतील तेंव्हा राज्याच्या हिताचा सल्ला देऊ शकणार नाहीत.”3 बरनीने त्याच्या ग्रंथात सत्यावलोकन आणि सल्लागार मंडळाच्या महत्वाविषयी विस्ताराने लिखाण केले आहे. (क्रमशः) (लेखक इतिहासतज्ञ व पत्रकार आहेत)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget