Halloween Costume ideas 2015

मानवावर प्रेम : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू पुण्यकार्य क्षुल्लक समजू नकोस. तू आपल्या  बंधुला हसतमुखाने भेटलास तरी ते पुण्य आहे आणि आपल्या हौदातील पाणी बंधुच्या भांड्यात ओत, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’  (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन मनुष्यांदरम्यान तडजोड घडवून आणा,  हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्ही एखाद्याला आपल्या वाहनावर बसवा, अथवा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवा हेदेखील पुण्यकर्म  आहे. चांगले बोलणेदेखील पुण्यकर्म आहे. नमाजकडे उठणारे तुमचे प्रत्येक पाऊल पुण्यकर्म आहे. वाटेतील दगड व काटे बाजूला  सारणे हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : दुसऱ्या एका हदीसमध्ये आहे की ‘‘तुम्ही आपल्या संपत्ती व प्रतिष्ठेद्वारे एखाद्याला लाभ पोहचवाल, हेदेखील  पुण्यकर्म आहे. एक मनुष्य आपले मत चांगल्या प्रकारे सांगू शकत नसेल आणि तुम्हाला ती देणगी मिळाली असेल तर आपल्या  बंधुची बाजू मांडणे आणि त्याचे मत स्पष्ट करून सांगणे, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्हाला शक्ती प्रदान करण्यात आली आहे तर  एखाद्या दुर्बलाची मदत करा, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुमच्याजवळ ज्ञान आहे, तेव्हा दुसऱ्यांना योग्य गोष्ट सांगणे, हेदेखील  पुण्यकर्म आहे.’’ 
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक मुस्लिमावर ‘सदका’ (दान)  करणे अनिवार्य आहे.’’ तेव्हा मी विचारले, ‘‘जर एखाद्याजवळ देण्यासाठी काहीही नसेल तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याने कमवावे,  स्वत: खावे आणि गरिबांनाही द्यावे.’’ मी म्हणालो, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘एखाद्या गरजवंत संकटात  सापडलेल्या मनुष्याची मदत करावी.’’ मी विचारले, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना पुण्य करण्यास  प्रोत्साहित करावे.’’ मी म्हणालो, ‘‘जर तो असे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नये, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या बंधुच्या गरजेला उपयोगी  पडणाऱ्या मनुष्याला त्याच्या गरजेच्या वेळी अल्लाह मदत करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : एका हदीसमध्ये आहे की ‘‘अल्लाहने आपले काही दास लोकांची मदत करण्यासाठी निर्माण केले आहेत. लोक  आपली गरज त्यांच्यापर्यंत पोहचवितात आणि ते ती पूर्ण करतात. हे लोक अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहचा राग आणि  शिक्षेपासून सुरक्षित राहतील.’’ 
आचरणाचे शिष्टाचार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले की अल्लाहने सांगितले, ‘‘मी दुसऱ्या भागीदारांच्या  तुलनेत अनेकेश्वरत्वापासून अधिक निस्पृह आहे. ज्या मनुष्याने एखादे पुण्यकर्म केले आणि त्यात माझ्याबरोबर त्याने कोणा  दुसऱ्याला भागीदार बनविले तर माझा त्याच्या आचरणाशी काहीही संबंध नाही. मी त्याच्या आचरणाने निराश आहे. ते आचरण त्या दुसऱ्याचा वाटा आहे ज्याला माझ्याबरोबर भागीदार बनविले.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : विशेषत: पुण्याईची ईशकृपा लाभलेल्या लोकांनी आणि ‘दीन’चे कार्य करणाऱ्यांनी विचार करायला हवा की या  हदीसमध्ये काय सांगितले गेले आहे. यात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की पुण्याईचे कसलेही कार्य असू दे, मग त्याचा  संबंध उपासनेशी असो की व्यवहारांशी, नमाजशी असो की अल्लाहच्या दासांच्या सुश्रूषेशी, अथवा त्याचा उद्देश देखावा आणि प्रतिष्ठा  करणे असो की एखाद्या गटाकडून किंवा मनुष्याकडून शाबासकी मिळविण्याशी असो; अल्लाहपाशी त्याचे मूल्य फक्त शून्य असेल.  जर त्याची प्रसन्नतादेखील याचा उद्देश असेल आणि लोकांची प्रशंसा प्राप्त करणेदेखील त्याचा हेतू असेल तरीही ते आचरण वाया जाईल आणि जर सुरूवातीला अल्लाहच्या प्रसन्नतेने आचरणास प्रोत्साहन मिळाले मात्र नंतर दुसऱ्यांच्या प्रसन्नतेने त्याची जागा  घेतल्यास हेदेखील आचरण वाया जाईल. म्हणून अतिशय सतर्क राहावे लागेल. शैतान येण्याचे हजारो दरवाजे आहेत. अशा अदृश्य  शत्रूच्या हल्ल्यांपासून बचाव करण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे अल्लाहपुढे नतमस्तक होणे, त्याला आपली विवशता सांगणे,  अल्लाहने मदत केली नाही तर दुर्बल मनुष्य शैतानाच्या हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget