Halloween Costume ideas 2015

इमामसाहेब तुम्हीं जिंकले

बशीर शेख
“ मैं शांती चाहता हूं! मेरा बेटा चला गया है, मैं नहीं चाहता की कोई दूसरा परिवार अपना बेटा खोए. मैं नहीं चाहता कि अब और किसी का घर जले. मैंने लोगों से कहा है कि, अगर मेरे बेटे की मौत का बदला लेने के लिए कोई कार्रवाई की गई तो मैं आसनमोल छोडकर चला जाऊंगा. मैने लोगों से कहा है कि अगर आप मुझे प्यार करते हैं तो उंगली भी नहीं उठाएंगे. मैं पिछले तीस साल से इमाम हूं, मेरे लिए जरूरी है कि मैं लोगों को सही संदेश दूं और वो संदेश शांती का. मुझे व्यक्तिगत नुकसान से उभरना होगा. ”   - इमाम इमादुल रशीदी

ऐरवी रामनवमी म्हणजे एक शांततेत साजरा होणारा एक दिवसीय उत्सव असतो. मात्र यावर्षी उत्तर भारतात रामनवमीचा उत्सव जरा जास्तच उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातही बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये या उत्साहाला हिंसेचे गालबोट लागले. बिहारमध्ये हिंसेची सुरूवात भागलपूर येथून झाली. हे भागलपूर तेच भागलपूर आहे जेथे 1989 साली झालेल्या दंगलीत मुस्लिमांचे प्रचंड नुकसान झालेले होते. भागलपूरहून सुरू झालेली हिंसेची ही साखळी समस्तीपूर, मुंगेर पर्यंत लांबली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा गृहजिल्हा नालंदाही या हिंसेच्या कचाट्यातून सुटू शकला नाही. कधीकाळी सांप्रदायिक हिंसेच्या विरूद्ध मुखर असणारे नितीश कुमार यावेळी अतिशय हतबल दिसून आले. आपले राजकीय सहभागी भाजपचे नेते हे हिंसेससाठी उघड चिथावणी देत असताना नितीश कुमार इंटरनेट सेवा खंडित करण्यापलिकडे काही करू शकले नाहीत. वास्तविक पाहता 2005 ते 2013 त्यांनी भाजपा बरोबर बिहारमध्ये शासन केले अन् त्यावेळेस त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेशी तडजोड केली नाही. यावेळेस मात्र त्यांचा चेहरा दंगापीडित व्यक्तीएवढाच केविलवाणा भासत होता. 
भागलपूरमध्ये झालेल्या दंग्याची सुरूवात केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अर्जित चौबे याच्या चिथावणीवरून झाली. त्याने पोलिसांनाच नव्हे तर सगळ्या व्यवस्थेला खुंटीला टांगून प्रक्षोभक भाषणे देऊन लोकांना चिथावणी दिली होती. तो उघडपणे पोलिसांसमोर वावरत होता. त्याला अटक करण्याची पोलिसांची हिम्मत झाली नाही. त्याचा अपराध किती गंभीर होता हे त्याची अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळून निदर्शनास आणून दिलेले आहे. बिहारमध्ये ठरवून मुस्लिमांच्या दुकानांना आगी लावण्यात आल्या. कोट्यावधींची मालमत्ता भस्म करण्यात आली. पीडितांना एक रूपयाचीही मदत देण्यात आलेली नाही. या दंगलींमध्ये बंगाल आणि बिहारमध्ये एकूण चार लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. तसे पाहता हे चारही मृत्यू निषेधार्ह आहेत. मात्र त्यापैकी 16 वर्षाच्या हाफिज-ए- कुरआन सिबगतुल्लाह चा मृत्यू अधिक चटका लावून गेला. रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या सिबगतुल्लाहला मिरवणुकीतील लोकांनी ओढून नेले व नंतर त्याचे शव अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मिळून आले. ही घटना बंगालच्या आसनसोल शहरात घडली. आसनसोल हे मुस्लिम बहूल शहर असून, सिबगतुल्लाहच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज एकत्रित झाला असता समाजाला उद्देशून आसनसोल जामा मस्जिदीचे इमाम व शहीद सिबगतुल्लाहचे वडील इमाम इमदादुल रशिदी यांनी समाजाला उद्देशून सांगितले की, मला शांती हवी आहे. माझा मुलगा मृत्यू पावलेला आहे. मला दुसर्या कोणाचा मुलगा मेलेला चालणार नाही. मी कोणाचे घर जळत असतांना पाहू शकणार नाही. जर माझ्या मुलाच्या मृत्यू संदर्भात तुमच्यापैकी कोणी हिंसक कारवाई केली तर मी नेहमीसाठी आसनसल शहर सोडून निघून जाईल. मी गेल्या 30 वर्षांपासून इमामत करून आपल्या सर्वांची सेवा करीत आहे. तुमचा माझ्यावर व इस्लामवर विश्वास असेल तर तुम्ही कुठल्याही हिंदू व्यक्तीकडे द्वेषाने बोट सुद्धा उगारू नका. मला व्यक्तिगत नुकसान जरी झालेले असले तरी समाज मला तेवढाच प्रिय आहे. समाजच नव्हे तर समाजातील सर्व घटक तेवढेच प्रिय आहेत.” 
इमामसाहेब हे आवाहन करून तुम्ही अवघ्या देशाला जिंकलात. आपले हे आवाहन प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. समाज माध्यमांवर त्याची मोठ्या प्रमाणावर दखल घेण्यात आली. आपले आवाहन ज्या नाजूक परिस्थितीत केलेले होते ते पाहता महात्मा गांधींनी नवखालीच्या दंगलीत अगदी याच परिस्थितीत शांतीसाठी केलेल्या आवाहनाची देशास आठवण झाली. आपण सच्चे मुस्लिम आहात. आपण कुरआनमध्ये दिलेल्या खालील निर्देशाचे तंतोतंत पालन केलेले आहे. ज्यात अल्लाहने म्हटलेले आहे की, ” हे पैगंबर (सल्ल.)! भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईने निरसन करा जी अत्युत्तम असाल. तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते तो जीवलग मित्र बनलेला आहे.” (कुरआन ः 41 ः 34).
कुरआनची ही आयत आपण अक्षरशः जगलात. आपल्या मुलाची शहादत आणि आपल्या मनाचा मोठेपणा वाया जाणार नाही. आपण केलेले आवाहन देशाला चटका लावून गेलेले आहे. भाजपाप्रणित केंद्र सरकार अन्-अनुभवामुळे फारसे काही करू शकलेले नाही. चार वर्षी संपलेली आहेत. नोटबंदी व जीएसटीसारखे अर्थघाती निर्णय घेऊन सरकारने आपण अर्थसाक्षर सुद्धा नाहीत हे सिद्ध केलेले आहे. निवडणुका तोंडावर आहेत. सात आठ महिन्यात निवडणुका होतील. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणासाठी आदर्श पुरूष राम यांची आठवण करून देणार्या रामनवमीच्या पावनपर्वाची सुद्धा या लोकांनी परवा केलेली नाही. जाणून बुजून हिंदू-मुस्लिम दंगे भडकावण्याचा मंत्री पुत्रांनी उद्योग केलेला आहे. सर्व प्रकारचे नुकसान सहन करून सुद्धा मुस्लिम समाज शांत राहिलेला आहे. 
तरूण मुलाचा जनाजा वृद्ध बापाच्या खांद्यावर असणे यापेक्षा मोठे दुर्देव नाही. एवढा मोठे दुर्देव सहन करून आपण शांतीसाठी प्रयत्न केले. इमामसाहेब आपण आमच्या सर्वांचे मन जिंकलेले आहे. आपल्या सारख्या मुस्लिमांची या देशाला गरज आहे. आपण इस्लामचे खरे प्रतिनिधी आहात. नुकसान सहन करून सुद्धा माणुसकी न सोडण्याचा आपला निर्णय खरोखरच महान आहे. याची इतिहास नक्कीच दखल घेईल. दंगेखोर लोकांना सुद्धा आत्मपरिक्षण करायला भाग पाडणार्या आपल्या या निर्णयाचा व आपल्या मुलाच्या शहादतीचा नक्कीच आदर केला जाईल व देशात शांतता नांदेल, अशी अपेक्षा करू.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget