सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
दारुल अद्ल” संकल्पनेच्या मुळाशी बरनीचे आर्थिक समानतेचे तत्व प्रेरणादायी ठरले आहे. अल्लाउद्दीन खिलजी बाजारातील मुल्य नियंत्रीत राहवेत म्हणून दक्ष होता. त्याने बाजारातील मुल्यांचा दैनंदीन अहवाल मागवण्यास सुरुवात केली. एसामी म्हणतो,“ बाजारातून रोज सुर्य मावळल्यानंतर, हरकारे ( बरीद ) अन्नधान्याच्या विक्रीमुल्याची वार्ता आणत. हे सर्व विक्रीमुल्य सुलतानांच्या समोर पठण केले जात. एक - एक करुन प्रत्येक संध्याकाळी.”15 अल्लाउद्दीन खिलजीने बाजारमुल्यासंदर्भात दक्षता बाळगल्यामुळचे नैसर्गिक संकटात देखील सामान्य रयत सुखा समाधनाने जगत होती. ह्या संपूर्ण बाजारमुल्य नियंत्रणाच्या प्रक्रीयेबद्दल बरनीने विस्ताराने लिखाण केले आहे. ह्या इतिहासाव्यतिरिक्त त्याने स्वतंत्र मुल्यं देखील सांगितली आहेत. बाजारमुल्यावर नियंत्रण करण्यासाठी बादशाहने काय करावे? दुष्काळ पडल्यानंतर बादशाहची कोणती कर्तव्ये आहेत ? वस्तूंचे मुल्य कमी झाल्यानंतर कोणते फायदे होतात ? हे सर्व फतुहाते जहांदारीच्या माध्यमातून बरनीने मांडले आहे.
दुष्काळ पडल्यानंतर बादशहाची कर्तव्ये आणि
साठेबाजारी रोखण्याचे उपाय
दुष्काळ पडल्यानंतर मध्ययुगीन समाजाचे पूर्ण जीवनमान विस्कळीत व्हायचे. महसूल संकलन ठप्प झाल्याने राजव्यवस्था देखील कोसळून पडायची. अशा परिस्थितीत बादशहाची कोणती कर्तव्ये आहेत. हे बरनीने सांगितले आहे. बरनी म्हणतो, “ दुष्काळाच्या वेळी जे दैवी संकट आहे, आणि जेंव्हा वर्षा होत नाही तथा कृषी आणि अन्नधान्याची अत्याधिक हानी व्हायला लागते तेंव्हा अशा स्थितीत बादशाह कडे प्रजेच्या सहाय्यतेशिवाय अन्य कोणतेच उपाय असत नाहीत. बादशाहकडे खराज आणि जजिया मध्ये कमी करणे तथा खजिन्यातून सहाय्यता प्रदान करण्याशिवाय अन्य कोणतेही मार्ग नसते. ” अशा काळात देखील साठेबाजारी (बरनीने यासाठी मुळ पाठात एहतेकार हा शब्द वापरला आहे.) करण्यासाठी काही लोक प्रयत्नशील असतात. त्यामूळे बाजारात वस्तूंचे मुल्य वाढते. त्यावेळी मुल्य कमी करण्यासाठी यथासंभव प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बरनी लिहतो. 16
“ राज्यव्यवस्था आणि शासन संबधी कार्यात अन्न (अन्नधान्य) तथा कपड्यांची सुगमता (अन्न व वस्त्र) ह्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्या राज्याची सुंदर व्यवस्था तथा न्यायाला सामग्रीच्या स्वस्त होण्याशी संबधित समझा. बाजारातील गुमाश्ते 17, शहरातील शहन आणि कोतवालांना आदेश द्या की, राजधानीत ऐहतेकार (साठेबाजारी ) कधी होउ देउ नका. ऐहतेकार करणार्यांचे अन्न जाळून टाका. मुहम्मद साहेब (प्रेषित स.) ऐहतेकार करणार्यांचे अन्न जाळून टाकत असत. ” 18
क्रय विक्रयावर नियंत्रण
बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायासंबधी बरनी लिहतो, “रईसांना आदेश द्या की, बाजारवाल्यांना त्यांनी आपल्या नियंत्रणात ठेवावे. आणि बाजाराचे भाव बाजारवाल्यांच्या हातात राहू देउ नये. भाव निश्चित करणे आणि क्रय विक्रय संबंधी कार्यात अत्याधिक प्रयत्नशील राहायला हवे. ह्या महान कार्यात ज्यामुळे खास आणि आम लोकांना लाभ प्राप्त होत राहतो, त्यात कमी करु नये. आणि कोणत्याही प्रकारचे लोभ करु नये. मुल्य निश्चित करण्याच्या कार्याला साधारण कार्य समजू नये. अनभिज्ञ, ग्रामीण, नाबालीग ( सज्ञ न झालेले किंवा वयात न आलेले), ग्रामीण, असहाय तथा वृध्द क्रय विक्रय करणार्यांची सहाय्यता करत रहावी. क्रय विक्रयात न्याय करत रहा. आधिक मुल्यावर वस्तू विकणारे तथा त्या लोकांना जे एखादी वस्तू वेगळी असून वेगळीच महती सांगून विकतात. नानाप्रकारे अपमानित करुन दंड करा. बाजारी, नक्काल, शिल्पकारांना दीन -दु:खी, बालक, अनभिज्ञ लोकांवर अन्याय करु देउ नका.
जे लोक आपल्या कौडीला रत्न तथा रत्न विकणार्याला कौडी विकणारा म्हणतात त्यांना बादशाह जर आपले आधिकार तथा शक्ती असतानाही, दीन-दु:खी, दरिद्री तथा शक्तीहीन,बालक तथा अनभिज्ञ लोकांवर अत्याचार करण्यापासून रोखत नसेल आणि त्यांना ह्या गोष्टीची अनुमती देत असेल तथा न्याय करत नसेल तर त्याला इश्वराची सावली म्हणू नये.19 बादशाह क्रय विक्रयाशी संबधित जे मार्ग निश्चित करतो राज्याचे आधिकारी तथा प्रजाजन त्यावर चालतात. ”20
मुल्य कमी झाल्याने होणारे लाभ
मुल्य कमी झाल्याने कोणते लाभ होतात ह्यावर बरनी म्हणतो, “ तुम्हाला हे ज्ञात असावे की, सामग्रीचे मुल्य कमी होण्यात मोठे लाभ आहेत. प्रथम लाभ हे आहे की, ज्या राजधानीत तथा प्रदेशात अन्न आणि जिविकेच्या संबंधी सामग्री, कपडे, घोडे तथा सैन्याची सामान ह्यांचे मुल्य कमी असते तेथे सेने समग्रपणे एकत्रित होउ शकते. सेना जी बादशाहीचे भांडवल आहे. प्रजेची रक्षक आहे. शीघ्र सुव्यवस्थीत होते आणि सुव्यवस्थीत राहते. त्यामूळे बादशाह सेना आणि सर्वांनाच लाभ मिळतो.
दुसरा लाभ हा होतो की, मुल्य कमी झाल्याने बादशाहच्या राजधानीत अत्याधिक बुध्दीमान , कलाकार तथा शिल्पी एकत्र होतात. ह्यामूळे जे लाभ बादशाह आणि प्रजेला होतात ते कोणापासून लपलेले नाहीत.
तृतीय लाभ हा आहे की, जेंव्हा विरोधी, शत्रू, बादशाहच्या कार्याचे प्रभाव सैन्याची दृढता, आराम तथा निश्चिन्तता च्या विषयात ऐकतो तेंव्हा त्या राज्यावर आधिकार मिळवण्याच्या कुत्सीत विचारांचे त्याच्या हृदयातच अंत होते. त्याठिकाणी आतंक भय आरुढ होते. त्यामूळे राजाला आणि प्रजेला लाभ होतो.
चतुर्थ हे की, प्रजेच्या जीवीकेसंबंधी वस्तू स्वस्त झाल्याने हे लाभ होते की, यामूळे बादशहाची ख्याती होते. आणि हि ख्याती वर्षानुवर्षे लोकांच्या जीभेवर राहते. अन्न तथा जीवीकेसंबधी वस्तू झाल्याने लोकांची एक दुसर्या प्रतीची इर्ष्या समाप्त होते. आणि प्रत्येक दिशेला प्रफुल्लता, संपन्नता आणि परोपकार दृष्टीगत होउ लागतो. बेईमानी आणि एहतेकारीमुळे ( साठेबाजीमुळे) खूप थोड्या बेईमान लोकांच्या घरात संपन्नता राहते.आणि सहस्त्र खेरदीदारांच्या घरी अव्यवस्था निर्माण होते. साठेबाजी करणार्या तथा आधिक मुल्य घेणार्यांच्या प्रती सर्वसामान्यांच्या हृदयात सर्वदा प्रतिकाराची भावना जागृत राहते. ”21 यापध्दतीने जियाउद्दीन बरनीने वस्तू स्वस्त झाल्यानंतर होणारे लाभ म्हणून 10 मुद्दे मांडले आहेत. ह्या दहा मुद्यांचा अभ्यास केल्यानंतर बरनीच्या चिंतनाची उंची स्पष्ट होते.
मुल्य निश्चित करण्याचे नियम
मुल्य कमी झाल्यानंतर होणारे लाभ सांगितल्यानंतर बरनीने मुल्य कमी करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी लिहतो “ बादशाह मुल्यांना दोन प्रकारे निश्चित करु शकतो. एक प्रकार असा आहे की, त्याने न्याय करण्याचे अत्याधिक प्रयत्न करावेत. आपली तथा अन्य कुणाचीही या संदर्भात त्याने चिंता करु नये. न्यायाच्या प्रती इतके आधिक प्रयत्न केल्याने लोक न्यायाचे अधिन होतात की, व्यापारी आधिक मुल्यावर वस्तू विकणे थांबवतात. साठेबाजारी करणारे साठेबाजार रोकतात. आणि ते देखील न्याय करु लागतात. त्यांच्या राज्याची प्रजा परस्पर न्याय करायला लागते. कारण प्रजा बादशहाच्या धर्माचे पालन करते.
बादशाह मुल्य निश्चित करण्याचे याप्रकारे देखील प्रयत्न करु शकतो बादशाहला जेंव्हा हे दिसेल की, वर्षा झाल्यानंतर देखील पिक चांगले आल्यानंतर संपन्नता आल्यानंतरही व्यापारी तथा कारवान वाले आपली सवय सोडत नाहीत, आणि साठेबाजारी करणारे साठेबाजारी सोडत नाहीत, बाजारवाले तथा बक्काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुध्दीमान तथा अनभिज्ञ ग्राहकांना छळत राहतात, आणि बाजारमुल्याचे मालक बनले आहेत. इच्छेनुसार आपली सामग्री विकतात. ना इश्वराप्रती लज्जा प्रदर्शित करतात ना बादशाहचे त्यांना भय वाटते. बादशाहसाठी हे आवश्यक आहे की, खास आणि आम लोकांच्या हितासाठी अशा गोष्टींचे अंत करावे आणि अन्न,वस्त्र आणि सामग्री ज्याची रात्र दिवस गरज असते मुल्य निश्चीत करावेत.” ह्यानंतर बरनीने बाजारमुल्य ठरवण्यासाठी आधिकार्यांची नियुक्ती करण्याची सुचना केली आहे. राज्यात काम करणार्या आधिकार्यांना साठेबाजारी रोखण्यासाठी आदेश देण्यात यावेत. कोणतीही वस्तू महाग होउ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे त्याने सुचित केले आहे.22
जियाउद्दीन बरनी उपेक्षा आणि उपेक्षाच
मध्ययुगीन भारतात झालेल्या असंख्य विद्वानात बरनीचे स्थान वेगळे आहे. अभ्यासू आणि मर्मग्राही चिंतन करणार्या बरनीला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरदेखील उपेक्षेचा सामना करावा लागला. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात त्याला विद्वानांमधील राजकारणामुळे राजकारणापासून दूर रहावे लागले. मोहम्मद तुघलकाच्या काळात त्याला काही राजकीय लाभ झाले. मात्र नंतर अखेरच्या काळात त्याला हालाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागले. बरनीच्या मृत्यूनंतर त्याच्या साहित्याची देखील उपेक्षा झाली. अल् बेरुनी प्रमाणे मध्ययुगात त्याच्या साहित्याचा अभ्यास कुणी केल्याचे दाखले मिळत नाहीत. आधुनिक काळात तर त्याला धर्मांध म्हणून हिणवण्यात आले. प्रक्षेपकांनी केलेल्या अन्यायाने बरनीच्या मुळ साहित्यच शिल्लक राहिले नाही. त्यामूळे बरनी म्हणजे एका उपेक्षेचा प्रवास आहे.
संदर्भ व टिपा
1) बरनी जियाउद्दीन, फतुहाते जहांदारी, इंडीया ऑफीस मेन्युस्क्रिप्ट, अनुवाद- रिजवी सय्यद अतहर अब्बास, तुगलक कालीन भारत पृष्ठ क्र. 277, सन 2016, नवी दिल्ली.
2) तत्रैव पृष्ठ क्र.277
3) तत्रैव पृष्ठ क्र. 282 आणि 283 ( बरनीच्या संपूर्ण ग्रंथात त्याचे ह्यासंबधीचे विचार पहायला मिळतात. त्याने अनेकठिकाणी बादशहाच्या सत्यावलोकानाची चर्चा केली आहे.)
4) तत्रैव पृष्ठ क्र. 284, (5) तत्रैव पृष्ठ क्र.285
6) तत्रैव पृष्ठ क्र. 285 (7) पारुथी एस.के., सल्तनतकालीन भारत का आर्थिक इतिहास, पृष्ठ क्र. 105, सन 2013, नवी दिल्ली. (8)बरनी जियाउद्दीन, पुर्वोक्त पृष्ठ क्र. 286
9) तत्रैव पृष्ठ क्र. 293
10) बरीदांच्या संदर्भात इब्ने बतुता ने विस्ताराने माहिती दिली आहे. बतुता बरीदांना गुप्तहेरांच्या समकक्ष मानतो. असे त्याच्या एकुण विश्लेषणावरुन दिसून येते. बरीदांच्या संदर्भात अन्य साधनांमध्ये आधिक माहिती मिळत नाही. त्यामूळे बरीद म्हणजे सुचना देणारा आणि पत्र पोहचवणारा असा साधारण समज आहे. बरनीनेदखील त्याच्या विश्लेषणात बरीदांचा उल्लेख करताना गुप्त सुचनांचे वहन करण्यासंदर्भातील बाबींची देखील चर्चा केली आहे.
11) जियाउद्दीन बरनी तत्रैव पृष्ठ क्र. 295
12) डि.डी. कोसम्बी, एन इन्ट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडीयन हिस्ट्री, पृष्ठ क्र.370 पासून पुढे, सन 1975, मुबंई
13) यासंदर्भात मोहम्मद हबीब यांनी ‘सुलतान महमूद ऑफ गजनी’ आणि त्यांच्या अन्य ग्रंथात विस्ताराने मांडणी केली आहे. इरफान हबीब ह्यांनी संपादीत केलेले त्यांचे काही लेख देखील ह्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरु शकतात.
14) प्रा. हबीब, इरफान, मध्यकालीन भारत, खंड 4, इरफान हबीब यांचा, अल्लाउद्दीन खिलजी के मुल्यनियंत्रण के उपाय : जिया बरनी के समर्थन में, ,पृष्ठ क्र.26, नवी दिल्ली, सन 1992. (15)-एसामी कृत फतुहुस्सलातीन पृष्ठ 315, उद्धृत प्रा. हबीब, इरफान, मध्यकालीन भारत खंड- 4, पृष्ठ क्र.27, नवी दिल्ली, सन 1992. (16)-बरनी जियाउद्दीन, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. 297. (17)-गुमाश्ते हा बाजारावर देखरेख करणारा आधिकारी असल्याचे अमीर खुसरो, एसामी आणि जियाउद्दीन बरनी यांचे विश्लेषण सांयुक्तीक आहे. (18)- बरनी जियाउद्दीन पुर्वोक्त पृष्ठ क्र. 296 (19)-मध्यकाळात बादशहाला इश्वराची सावली म्हटले जायचे. बरनीने देखील अनेक ठिकाणी बादशहाचा उल्लेख त्याच पध्दतीने केला आहे. (20)-बरनी जियाउद्दीन पुर्वोक्त पृष्ठ क्र. 297. (21)-तत्रैव पृष्ठ क्र. 297 ,298
22) तत्रैव पृष्ठ क्र. 299
Post a Comment