Halloween Costume ideas 2015

सूरह अल् अन्फाल : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(४४) आणि स्मरण करा की जेव्हा मुकाबल्याच्या वेळी अल्लाहने तुम्हा लोकांच्या नजरेत शत्रूंना कमी दाखविले आणि त्यांच्या नजरेंत तुम्हाला कमी करून दाखविले जेणेकरून जी गोष्ट घडणार होती तिला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे, आणि सरतेशेवटी सर्व मामले अल्लाहकडेच रुजू होतात. 

(४५) हे श्रद्धावंतांनो! जेव्हा एखाद्या समूहाशी तुमचा सामना होईल तेव्हा दृढ राहा आणि अल्लाहचे खूप स्मरण करा, अपेक्षा आहे की तुम्हाला यश मिळेल. 

(४६) व अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञा पाळा व आपसांत भांडू नका नाहीतर तुमच्यात दुर्बलता येईल व तुमचा वचक नाहीसा होईल. संयम राखा.३७ निश्चितच अल्लाह संयमी लोकांबरोबर आहे. 

(४७) आणि त्या लोकांसमान रंगढंग अंगीकारू नका जे आपल्या घरातून ऐटीत आणि लोकांना आपली शान दाखवीत निघाले व ज्यांचे वर्तन असे आहे की अल्लाहच्या मार्गापासून रोखतात,३८ जे काही ते करत आहेत ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. 

(४८) जरा विचार करा त्या प्रसंगाचा जेव्हा शैतानाने त्या लोकांच्या कारवाया त्यांच्या दृष्टीत शोभिवंत करून दाखविल्या होत्या आणि त्यांना सांगितले होते की आज कोणीही तुमच्यावर वर्चस्व मिळवू शकत नाही आणि असे की मी तुमच्या संगतीत आहे, मग जेव्हा दोन्ही समूह समोरासमोर उभे ठाकले तेव्हा तो उलट्या पावली फिरला आणि म्हणू लागला की माझी तुमची संगत नाही. मी काही पाहात आहे ते तुम्ही लोक पाहात नाही. मला अल्लाहची भीती वाटते आणि अल्लाह फार कठोर शिक्षा देणारा आहे. 

(४९) जेव्हा दांभिक आणि ते सर्व लोक ज्यांच्या हृदयांना रोग जडला आहे, म्हणत होते की या लोकांना तर यांच्या धर्माने पछाडले आहे.३९ वस्तुत: जर एखाद्याने अल्लाहवर विश्वास ठेवला तर निश्चितच अल्लाह मोठा सामर्थ्यशाली व बुद्धिमान आहे. 

(५०,५१) जर तुम्ही ते दृश्य पाहू शकला असता तर किती छान झाले असते! जेव्हा दूत विद्रोहींचे प्राणहरण करताना त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर मारा करीत म्हणत होते, ‘‘घ्या आता जळण्याची शिक्षा भोगा, हा तो मोबदला आहे ज्याची सामग्री तुम्ही स्वहस्ते अगोदरच उपलब्ध करून ठेवलेली होती. एरव्ही अल्लाह तर आपल्या दासांवर मुळीच अत्याचार करणारा नव्हे.’’ 

(५२) हा प्रसंग यांच्यावर तसाच ओढवला जसा तो फिरऔनवाल्यांवर व त्यांच्या पूर्वीच्या लोकांवर ओढवत राहिला आहे, की त्यांनी अल्लाहच्या संकेतांना मान्य करण्यास नकार दिला आणि अल्लाहने त्यांच्या अपराधापायी त्यांना पकडले. अल्लाह शक्तिशाली व कठोर शिक्षा करणारा आहे. 

(५३) हे अल्लाहच्या या रीतीप्रमाणेच घडले की तो आपली कोणतीही देणगी की जी त्याने एखाद्या जनसमूहाला बहाल केलेली असेल तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत ते लोक स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करीत नाहीत.४० अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. 

(५४) फिरऔनवाले व त्यांच्या पूर्वीच्या लोकांच्या संबंधाने जे काही घडले ते याच नियमाप्रमाणे होते. त्यांनी आपल्या पालनकत्र्याच्या वचनांना खोटे लेखले, तेव्हा आम्ही त्यांच्या अपराधामुळे त्यांना नष्ट करून टाकले आणि फिरऔनवाल्यांना बुडवून टाकले. हे सर्व अत्याचारी लोक होते. 

(५५) खचितच अल्लाहजवळ जमिनीवर चालणाऱ्या निर्मितीपैकी सर्वात जास्त वाईट ते लोक आहेत ज्यांनी सत्य मानण्यास नकार दिला. मग कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यास ते तयार नाहीत. 

(५६) (विशेषत:) त्यांच्यापैकी ते लोक ज्यांच्याशी तू करार केला मग ते प्रत्येक प्रसंगी तो भंग करतात आणि त्यांना जरादेखील अल्लाहच्या प्रकोपाचे भय वाटत नाही.४१ ३७) म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांना वशीभूत करा. उताविळपणा, भय, भीती, लोभ, घबराट आणि अनुचित उत्तेजनापासून स्वत:ला दूर ठेवा. शांत मनाने आणि संतुलित निर्णय शक्तीद्वारा काम करीत राहा. संकट आणि अडथळे समोर असले तर तुमचे पाऊल डगमगले जाऊ नये. उत्तेजनापूर्ण समयी क्रोध व उन्मादाने तुम्ही एखादे अनुचित कार्य करू नये. संकटे समोर असतील आणि स्थिती बिघडली असे वाटत असेल तर घाबरून तुम्ही विचलीत होऊ नये. उद्देशप्राप्तीच्या उन्मादात किंवा कच्चे पक्के उपायांनाच वरवर प्रभावकारी समजून तुमचे ध्येय गडबडीचे शिकार बनू नये. जग, जगाचे फायदे आणि मनाच्या इच्छांचे प्रलोभने तुम्हाला खुणवित असतील तर तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षित होण्याइतपत कमजोर बनू नये. हा सर्व तपशील एक लहानसा शब्द `सब्र' (धैर्य) मध्ये समाविष्ट आहे. अल्लाह सांगतो की जे लोक या सर्व दृष्टीने सब्र करणारे (धैर्यवान) आहेत, माझे समर्थन त्यांनाच आहे.
३८) संकेत आहे कुरैशी शत्रूंकडे ज्यांचे सैन्य मक्का येथून या रूबाबात निघाले होते की गाणाऱ्या, नाचणाऱ्या बाया बरोबर होत्या. जागोजागी थांबून नाचगाणे आणि मदिरापान होत होते. जे जे कबिले आणि गावे रस्त्यात भेटत होते त्यांच्यावर आपली शक्ती, वैभव, भारी संख्या आणि युद्धसामुग्रीचा प्रभाव पाडत जात होते आणि भाव मारत होते की आमच्यासमोर कोण डोके वर काढू शकतो. ही अशी होती त्यांची नैतिक दशा! यावर आणखी अभिशाप होता की त्यांचा आगेवूâच करण्याचा उद्देश त्यांच्या चरित्रापेक्षासुद्धा अधिक अपवित्र होता. ते आपल्या जीवाची आणि संपत्तीची बाजी लावण्यासाठी निघाले नव्हते की सत्य आणि न्यायचा ध्वज उंचावला जावा; ते तर यासाठी निघाले होते की असे होऊ नये. आणि तो एकमेव गट जो जगात एकटाच सत्य आणि न्यायाचा ध्वज उंचावण्यासाठी सरसावला आहे त्यास नष्ट केले जावे जेणेकरून त्या ध्वजाला उंचावणारा जगात कोणीही राहू नये. यावर मुस्लिमांना सचेत करण्यात येत आहे की तुम्ही कधी असे बनू नयेत. तुम्हाला अल्लाहने ईमान आणि सत्यवादीतेची देणगी दिली आहे. त्याची निकड आहे की तुमचे चरित्र पवित्र असावेत आणि तुमचे युद्धध्येयसुद्धा पवित्र असावेत.
हा आदेश फक्त तात्कालिक आदेश नव्हता. आजच्यासाठी आहे आणि सततचा राहणारा आहे. शत्रूंच्या सैन्याची जी स्थिती  त्या काळी होती ती आजसुद्धा तशीच आहे. वेश्यालये आणि दारूअड्डे आजसुद्धा आहेत. गुप्त्पणे नव्हे तर राजरोसपणे आजसुद्धा हे धंदे धुमधडाक्यात सुरु आहेत. सैन्याच्या वासनापूर्तीसाठी आणि त्यांच्या निर्लज्जतेच्या पूर्तीसाठी सर्वकाही केले जाते. त्यांच्या या नैतिक घाणीचा  जाब  विचारणारा  समाजात  आजसुद्धा  कोणी  दिसत  नाही. अशा  सैन्यापासून  दूसरे राष्ट्र कोणती चांगली आशा बाळगेल. या सैन्याचा गर्व आणि ऐट त्यांच्या वर्तनातूनच दिसते. त्यांचे राजकीय पुढारी त्यांच्यासमोर गर्वाने म्हणतात की आमच्या पुढे सर्व शक्तीहीन आहेत. तुमच्यावर आज कोणीच विजय प्राप्त् करू शकत नाही. या नैतिक घाणीपेक्षा अधिक घाण त्यांचे युद्धउद्देश आहेत. जगाला धोका देऊन ते सांगतात की त्यांचा उद्देश मानवताकल्याण हेच आहे. परंतु वास्तविकपणे त्यांच्यासमोर मानवतेचे हित सोडून बाकी सर्व उद्देश असतात. त्यांच्या युद्धांचा उद्देश हा असतो की अल्लाहने जमिनीत आपल्या दासांसाठी जे काही निर्माण केले आहे, त्याला फक्त त्यांच्या राष्ट्राने हडप करावे आणि जगातील दुसरे राष्ट्र त्यांचे दास आणि नोकर बनून राहावेत. म्हणून ईमानधारकांसाठी कुरआनची शाश्वत शिकवण आहे की त्या अवज्ञाकारी आणि इस्लामच्या शत्रूंपासून सावध राहावे व त्यांच्या पद्धतीपासून दूर राहावे. त्यांच्या अपवित्र हेतूप्राप्तीसाठी आपली शक्ती खर्च करू नये.
३९) मदीना शहरातील दांभिक आणि ते सर्वजन जे भौतिकतेच्या मागे लागलेले आहेत आणि अल्लाहपासून निष्काळजी  होते. मुस्लिमांची थोडी  संख्या  कुरैशच्या  बलाढ्य सैन्याशी टक्कर देण्यासही जात आहे, हे पाहून ते  सर्वजण आपापसांत म्हणत असत की आता हे लोक आपल्या धार्मिक उन्मादात वेडे झालेले आहेत. आता युद्धात त्यांचा विनाश अटळ आहे. याच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्याच्यांवर असा जादू चालवला आहे की त्यांची मती गुंग झाली आहे आणि डोळे असून हे मृत्यूच्या दाढेत जात आहेत.
४०) म्हणजे जोपर्यंत एखादे राष्ट्र स्वत:ला अल्लाहच्या देणगीसाठी पूर्णत: अपात्र बनवत नाही, अल्लाह त्यांच्यापासून आपली देणगी हिसकावून घेत नाही.
४१) येथे मुख्यरुपाने संकेत यहुदींकडे आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीना येथे आल्यानंतर प्रथमत: त्यांच्याशीच चांगल्या शेजाऱ्यासारखा व्यवहार आणि परस्पर सहयोग आणि साह्यतासाठीचा करार केला होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते की त्यांच्याशी चांगले संंंबंध स्थापित केले जावेत. तसेच धार्मिक रुपाने पैगंबर मुहम्मद (स.) यहुदींना अनेकेश्वरवादींपेक्षा जवळचे समजत होते आणि प्रत्येक गोष्टीत अनेकेश्वरवादींच्या मुकाबल्यात यहुदीं (ग्रंथधारक) च्या पद्धतींना प्रमुखता देत असत. परंतु त्यांचे विद्वान आणि बुजुर्ग मंडळीला विशुद्ध एकेश्वरत्व पसंत नव्हते. तसेच त्यांना सच्च्रित्राचा प्रचार तसेच ईशप्रणित जीवनपद्धती (दीन) च्या स्थापनेसाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रयत्न अजिबात पसंत नव्हते. त्या लोकांचे प्रयत्न सततचे होते की हे नवीन आंदोलन कोणत्याहीप्रकारे सफल होऊ नये. याच उद्देशाने यहुदी लोक मदीनेतील दांभिक मुस्लिमांशी साठगाठ करून होते. याच कारणामुळे ते औस आणि खजरजच्या लोकांमधील जुन्या काळातील शत्रुत्वाला भडकवित असत. इस्लामपूर्व या दोन्ही टोळयांमुळे खुनी टकराव होत असत. यामुळे कुरैश आणि इतर इस्लामविरोधी कबिल्यांशी यहुदी लोकांचे कटकारस्थान रचण्याचे काम चालू होते. ही सर्व कटकारस्थाने मैत्रीकरार झाला असतानासुद्धा चालत होती. हा करार यहुदी आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामध्ये झालेला होता. जेव्हा बदरचे युद्ध सुरु झाले तेव्हा प्रारंभी त्यांना वाटत होते की कुरैश सैन्याचा पहिलाच प्रहार इस्लामी आंदोलनाचा अंत करून टाकील. परंतु जेव्हा परिणाम त्यांच्या इच्छेविरुद्ध झाला तेव्हा त्यांच्या मनातील द्वेषअग्नी आणखीनच भडकला. बदर युद्धाचा विजय इस्लामी शक्तीचा एक स्थायी धोका आपल्यासाठी न बनो, ही त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी आपल्या विरोधी प्रयत्नांना आणखीन प्रखर बनविले. त्यांचा एक पुढारी काब बिन अशरफ (जो कुरैशचा पराजय झाला हे ऐवूâन ओरडला की आज जमिनीचे पोट आमच्यासाठी तिच्या पाठीपेक्षा उत्तम आहे.) स्वत: मक्का येथे गेला तेथे त्याने उत्तेजनापूर्ण शोकगीते ऐकविली आणि कुरैश लोकांच्या मनात प्रतिशोध घेण्याची भावना भडकविली. यहुदीचे कबिले बनीकैनुकाअ यांनी चांगले शेजारीच्या कराराविरुद्ध मुस्लिम स्त्रियांशी छाड करण्यास सुरवात केली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांच्या या दुष्ट कर्माची निंदा केली तेव्हा त्यांनी धमकी दिली, ``आम्ही कुरैश नाही. आम्ही लढणारे आणि मरणारे लोक आहोत. आम्ही लढणे चांगल्या प्रकारे जाणतो. आमचा मुकाबला करण्यासाठी याल तर तुम्हाला कळून येईल की मर्द कोणाला म्हणतात.''

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget