Halloween Costume ideas 2015

देशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज

‘सामाजिक कार्यच जातीयवादाला समाप्त करू शकेल’


इस्लाम एक नैसर्गिक व्यवस्था आहे. माणसाच्या प्रकृतीशी अनुकूल आहे. जी माणसाची प्रकृती आहे तोच इस्लाम आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’आणि जेव्हा हे त्यांना ऐकवले  जाते तेव्हा ते म्हणतात आम्ही यावर श्रद्धा ठेवली.’’ हे सत्य आहे की, हे आमच्या अल्लाहकडून आहे. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत’’ प्रत्येक चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला  असेच वाटते. जेव्हा इस्लामी मुल्य त्यांच्यासमोर सादर केली जातात तेव्हा त्यांच्या अंतरआत्म्यातून त्याला स्वीकारण्याची आवाज येते. इस्लामकडे परत येणे वास्तविक पाहता आपल्या  मूळ प्रवृत्तीकडे परत येण्यासारखे आहे. जर काही लोकांना इस्लाम विषयी संवेदना वाटत नसेल, त्याच्या संदेशामुळे कोणाला अस्वस्थ वाटत असेल, इस्लाम विषयी घृणेचा भाव उत्पन्न  होत असेल तर त्याचे कारण हे आहे की, त्यांच्या प्रवृत्तीवर काही पडदे पडलेले आहेत. त्या पडद्यांना हटवून इस्लामचा संदेश त्यांच्यासमोर मांडावयाचा आहे. ज्या अडचणी आहेत त्या  दूर कराव्या लागतील. मग प्रश्न असा पडतो की, हे पडदे किंवा अडचणी काय असू शकतात? सर्वात मोठा पडदा तर गैरसमजाचा पडदा आहे. अशा लोकांनी चुकीच्या प्रवृत्तीच्या  मुस्लिमांकडे पाहून इस्लामविषयी आपले मत बनविलेले असते. मुस्लिम समाजात स्थापित झालेल्या चुकीच्या पद्धती, गुन्हेगारी इत्यादीकडे पाहून त्यांनी इस्लामविषयी स्वतःचे मत  बनविलेले आहे. अनावश्यक जातीय प्रतिस्पर्धा, हट्ट आणि जातीय अस्मितेमुळे हट्टीपणा वाढतो. हा सुद्धा एक पडदाच आहे. अशा पद्धतीचे हे जे पडदे आहेत, त्यांना हटवावे लागेल आणि  इस्लामची वास्तविक संकल्पना त्यांच्यासमोर सादर करावी लागेल. असे झाल्यास मानवाची मूळ प्रवृत्ती आपोआप त्याकडे आकर्षित होईल.
अशा परिस्थितीमध्ये करावयाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्याला सामाजिक स्तरावर एक शक्तीशाली आंदोलन चालवावे लागेल. देशबांधवांसमोर व त्यांच्यातील वेगवेगळ्या  गटांशी आपले चांगले संबंध वृद्धींगत करावे लागतील. त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल,  त्यांच्या मनाची दारे ठोठवावी लागतील, त्यांची मने जिंकावी लागतील, त्यांना सांगावे लागेल की  खरा इस्लाम काय आहे? आणि इस्लामचा संदेश काय आहे? तुम्ही त्यांना दाखवून द्या की इस्लाम शांतीचा ध्वजवाहक आहे, इस्लाम आंतरराष्ट्रीय बंधूभावाचे नाव आहे, इस्लाम माणुसकीचे नाव आहे, हा कुठल्या खास गटासाठी नाही तर जगातील सर्व लोकांसाठी आहे. सर्व लोकांना आपसात जोडणे, हा त्याचा उद्देश आहे. मानवाला या जीवनामध्ये आणि  मरणोपरांत जीवन जे की कायम राहणार आहे, दोन्हीमध्ये यशस्वी करण्यामध्ये त्याला रस आहे. हे जगातील सर्वात मोठे सत्य आपल्याला अतिशय प्रेम, सहृदय आणि अत्यंत तडफेने  इथल्या लोकांना सांगावे लागेल.
हे सामाजिक कार्यच जातीयवादाला समाप्त करू शकेल. जातीयवाद नष्ट करण्याचा दूसरा कुठला मार्गच नाही. तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस जातीयवादाचा सामना करत बसाल  तर कितीही शतके झाली तरी जातीयवाद नष्ट होणार नाही. हा जातीयवाद सामाजिक कार्याने समाप्त होईल आणि सामाजिक काम याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आहे. तुम्ही  त्यांच्यापर्यंत पोहचा. त्यांच्या बुद्धी आणि मनावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मी एसआयओमध्ये असतांना माझ्या तरूण मित्रांना नेहमी सांगत होतो आणि सांगतो की, जे  विद्यार्थी महाविद्यालय आणि विद्यापीठात आपल्या सोबत विद्यार्जन करत आहेत तेच उद्या या देशाची सुत्रे सांभाळतील. प्रत्येक विद्यार्थी 11 वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत  कमीत कमी 7 वर्षे तेथे असतो. जर मुस्लिम विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आणि शपथ घेतली की आपल्या सात वर्षाच्या या महाविद्यालयीन कालखंडामध्ये सात विद्यार्थ्यांना  इस्लामचा परिचय करून देऊ आणि इस्लामचा खरा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू, तेव्हा त्यांच्या मनामध्ये इस्लाम विषयी एक ओलावा निर्माण होईल. इस्लामचा संदेश काय आहे हे  आपल्या वाणी आणि वर्तनाने या सात वर्षात सात विद्यार्थ्यांसमोर मांडणे अवघड काम आहे काय? आज भारतातील सर्वच मुस्लिम तरूणांनी हे काम करण्याचा निश्चय केला तर दहा  वर्षानंतर भारत कसा असेल याची कल्पना करा.
आज तुम्ही ज्या मोठ-मोठ्या वृत्तवाहिन्याने हैराण आहात उद्या त्या चॅनलच्या टेबलावर तेच लोक असतील जे आज तुमच्या सोबत शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या मनाला तुम्ही स्वच्छ  केलेले असेल. ज्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश योग्य स्वरूपात पोहोचवलेला असेल. जे लोक उद्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणार आहेत ते हेच लोक असतील ज्यांच्यापर्यंत  तुम्ही इस्लामचा संदेश विद्यार्थी अवस्थेमध्येच पोहोचवलेला असेल. नोकरशाहीमध्ये, पोलिसांमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच लोक असतील ज्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच त्यांच्यापर्यंत  इस्लामचा वास्तविक संदेश पोहोचलेला असेल. घृणेला संपविण्याचा, जातीयवादाशी सामना करण्याचा, वर्गव्यवस्थेला नष्ट करण्याचा, देशात खऱ्या अर्थाने न्यायाची स्थापना करण्याचा  हाच सर्वात सोपा मार्ग आहे. हे सर्व तुम्हा विद्यार्थ्यांच्या हातात आहे. तुम्ही जर निश्चय केला की हे काम करायचेच आहे तर हे काम सहजरित्या होऊ शकेल. अलिगढ विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांना या कामामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. अल्लाहने तुम्हाला एका अशा ठिकाणी आणि अशा स्तरावर ठेवलेले आहे की, पूर्ण देशातील विद्यार्थ्यांवर तुमचा परिणाम होतो.  तुम्हाला याची खात्री करावी लागेल की, तुमच्या विद्यापीठातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी हे काम करेल. इन- शा- अल्लाह. मग देशातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी या कामाकडे  आकर्षित होणे अवघड नाही. देशात हा जो जातीयवाद पसरलेला आहे अशाच पद्धतीने पसरवला गेलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मन आणि बुद्धीला प्रभावित केलेले आहे. म्हणून याची  सफाईसुद्धा याच पद्धतीने करावी लागेल.
इस्लामचा संदेश केवळ मौखिकरित्या देउन उपयोग होणार नाही. असे प्रयत्न परिणामकारक ठरणार नाहीत. आपण भाषण कराल, त्यांना पुस्तकं द्याल आणि मौखिकरित्या सांगाल  की  इस्लाम सर्वश्रेष्ठ जीवन व्यवस्था आहे. पण हे पुरेसे नाही. या सोबत आपल्या वर्तणुकीतून इस्लाम श्रेष्ठ असल्याचा पुरावा त्यांच्यासमोर ठेवावा लागेल. आम्हाला प्रत्यक्षात इस्लाम कसा  आहे, याची साक्ष आपल्याला वर्तनाने द्यावी लागेल. आपले वैयक्ति आणि सामुहिक चारित्र्य सुद्धा दुसऱ्यांना इस्लामकडे आकर्षित करेल असे ठेवावे लागेल.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला इस्लामचे नाव वाढविणाऱ्यांमध्ये केंद्रीय स्थान प्राप्त आहे. लोक येथील वातावरणावरून मुस्लिम समाजाला समजण्याचा प्रयत्न करतात. म्हणून येथील  विद्यार्थ्यांना माझी दूसरी विनंती अशी आहे की, या विद्यापीठाला त्यांनी इस्लामचे केंद्र बनवावे. इस्लाम काय आहे? त्याचा संदेश काय आहे? इस्लामचा संदेश शांती आणि प्रेम कसा आहे? तो समतामूलक कसा आहे? अलिगढ विद्यापीठामध्ये प्रवेश केल्याबरोबर येथील वातावरणातून लोकांना त्याची जाणीव व्हायला हवी. काल मला खूप आनंद झाला जेव्हा माझ्या  मित्रांनी मला कळविले की, येथे मुलींबरोबर जी वर्तणूक ठेवली जाते ती अतिशय चांगली आहे. त्यांना सुरक्षित वातावरण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा जो  सन्मान या ठिकाणी होतो ते पाहून बहुसंख्यांक बंधुसुद्धा आपल्या मुलींना उच्चशिक्षणासाठी या ठिकाणी पाठवून आनंदी होत आहेत. मला हे ही सांगण्यात आले आहे की, अनेक  महत्त्वाच्या पदावर असलेल्या हिंदू बंधूंनी त्यांना सांगितले की, या विद्यापीठामध्ये आपल्या मुलींना पाठवून त्यांना समाधान मिळत आहे. त्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबद्दल  काळजी वाटत नाही. त्याच वेळेस त्यांनी हे ही सांगितले की, देशातल्या कुठल्याच विद्यापीठामध्ये असे वातावरण नाही. हे ऐकूण आपल्याला अंदाज होणार नाही की, मला किती आनंद  झाला. माझी मान गर्वाने उंच झाली. तुमच्यासाठी माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे दुआ निघाली. यासाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये या विद्यापीठाची अशीच  प्रतिमा राहिली तर त्याचा अर्थ असा होईल की इथे इस्लाम प्रत्यक्षात आचरणात आणला जातोय आणि हे विद्यापीठ इस्लामच्या खऱ्या शिक्षणाची साक्ष देण्याचे केंद्र बनून जाईल. हे  वाळवंटातील ओयासिस (मरूद्यान) सारखे केंद्र बनून जाईल की सगळे लोक याच्याकडे आकर्षित होतील. सगळ्या देशाला हे जर कळेल की, अलिगढ विद्यापीठ हे एक असे विद्यापीठ  आहे जेथे रॅगिंग होत नाही. कारण इस्लामला ते मान्य नाही, जेथे मुलींशी छेडछाड केली जात नाही, त्यांना कुठलाच त्रास दिला जात नाही, कारण की इस्लामला ते मान्य नाही. हे एक  असे विद्यापीठ आहे की ज्याच्या वातावरणामध्ये प्रेम, आपुलकी, शांती खच्चून भरलेली आहे. कारण हाच इस्लामचा संदेश आहे.
हे एक असे विद्यापीठ आहे ज्या ठिकाणी जाती आणि धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये कुठलाच भेदभाव केला जात नाही. एका दलित विद्यार्थ्याला भाऊ समजून त्याची गळाभेट घेतली जाते.  त्याचा माणूस म्हणून सन्मान केला जातो. त्याला तेच स्थान मिळते जे कुठल्याही उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थ्याला मिळते. हे भारताचे एकमेव विद्यापीठ आहे जेथे असे सकारात्मक  वातावरण आहे. याचे प्रात्यक्षिक देशभरामध्ये प्रचारित केले गेले तर ती ही वर्तणुकीतून इस्लामची दिलेली साक्ष ठरेल. हे इस्लामचे प्रात्यक्षिक आहे. हे असे एक विद्यापीठ आहे जेथे  गरीब विद्यार्थी प्रवेश घेताच सर्व विद्यार्थी त्याच्या मदतीला धावून येतात. त्याला एक क्षणासाठीही असे वाटत नाही की विद्यापीठाचे अमूक क्षुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत,  पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, बाईक घेण्यासाठी पैसे नाहीत, येणेप्रमाणे त्याला वंचित असल्याचा अनुभव येथील विद्यार्थी येवूच देत नाहीत. सारे विद्यार्थी पुढे येवून त्याला  आपला भाऊ समजून जमेल तशी त्याला मदत करतो. अशी प्रतिमा जर आपण तयार करू शकाल तर ती सुद्धा इस्लामची प्रत्यक्ष साक्ष देण्यासारखे होईल आणि आपली ही वर्तणूक  हजारो भाषणांवर, लाखो पुस्तकांवर, अनेक शिबिरांवर भारी पडेल. मीडियाने पसरविलेले सारे विष निघून जाईल. मग त्यानंतर टेलिव्हिजनवाले कितीही ओरडत राहो इस्लाम आतंकवाद  पसरवितो, म्हणून कितीही म्हणत राहो, महिलांवर अत्याचार करतो म्हणून कितीही ओरडत राहो, मुस्लिम ’असे’ आहेत ’तसे’ आहेत, असे कितीही म्हणो, आपल्या सामुहिक चारित्र्याच्या नमुन्यापुढे हा सारा दुष्प्रचार धाराशाही होऊन जाईल. लोकांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध टेलीव्हिजनच्या व्यर्थ चर्चेपेक्षा श्रेष्ठ असतात. मीडियाचा दुष्प्रचार त्या ठिकाणी यशस्वी होतो ज्या ठिकाणी तुमचे संबंध इतरांशी नसतात. जर का तुम्ही आपल्या वाणी आणि वर्तनातून लोकांना तुमच्याबद्दल खरी माहिती द्याल तर मीडियाच्या चुकीच्या प्रचारावर कोणीही  विश्वास ठेवणार नाही. एखाद्या व्यक्तीबाबत मीडियाने तो चोर आहे म्हणून प्रचार करावयास सुरूवात केली तर ते लोक त्याला चोर समजू शकतात जे त्याला ओळखत नाहीत. मात्र जे  लोक त्या व्यक्तीशी रास्त संपर्कात आहेत, जे त्याच्या चारित्र्याला जाणून आहेत, ते मीडियाच्या दुष्प्रचारावर मुळीच विश्वास ठेवणार नाहीत उलट ते मीडियाच्या या प्रचाराकडे दुर्लक्ष करतील.
प्रिय मित्रांनों ! माझी विनंती ही आहे की, आपण इस्लामचा संदेश देण्याच्या कामाचे ध्वजवाहक बना. दुसरी विनंती अशी की, या विद्यापीठाला इस्लामचे प्रात्यक्षिक केंद्र बनवा, चलता-  फिरता इस्लाम या ठिकाणी इतरांना दिसायला हवा. लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी इस्लामला येथे पहावे. त्यांना येथे येताच या गोष्टीचा अनुभव यावा की इस्लामचे पवित्र वातावरण  कसे असते? इस्लाममुळे कसे लोक घडतात आणि विद्यार्थ्यांचा कसा समाज निर्माण होतो?
मित्रांनों! शेवटची गोष्ट अशी की, याचबरोबर हे सुद्धा आवश्यक आहे की, आपण उच्चशिक्षण ग्रहण करावे, समाजावर परिणाम करण्यासाठी आपण उच्चशिक्षित असणे आवश्यक आहे. उच्च योग्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल आलेले आहेत. जे त्याच्यात यशस्वी झालेले आहेत ते जर येथे उपस्थित असतील तर  किंवा त्यांचे नातेवाईक येथे उपस्थित असतील तर किंवा त्यांचा गुरूजनवर्ग येथे उपस्थित असेल तर मी मनापासून त्या सर्वांचे अभिनंदन करतो. अल्लाह त्यांच्यातील योग्यता आणखीन  वृद्धींगत करो. त्यांना देश आणि देशबांधवांसाठी उपयोगी बनवो. मित्रांनों! प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचे भांडवल आहे. भांडवल बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक इच्छाशक्ती आणि दूसरे दुसऱ्यांसाठीचे प्रेम. तुम्ही सर्व समाजसेवेसाठी संवेदनशील व्हा. देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, याची मनात खूनगाठ बांधा. सर्व मंगल हो.   योग्यता नसेल तर आपण फार छोट्या प्रमाणात काम करू शकतो. मात्र आपण उच्च योग्यता प्राप्त केली असेल तर आपण मोठी सेवा बजावू शकतो.
तुम्ही नोबेल पारितोषिक पटकाविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात वेगवेगळ्या विषयामध्ये नोबेल पारितोषिकाला गवसणी घालावी. आपल्या  विषयामध्ये असाधारण संशोधन करावे. असे झाल्यास त्याचा उपयोग सुद्धा देशाला मोठ्या प्रमाणात होईल. देशासाठी आपण भांडवल बनाल आणि तेव्हा तुम्ही जो संदेश द्याल संपूर्ण देश तो संदेश लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही कॅन्सरवरील औषध शोधून काढा, इतर घातक आजारांवरील औषध शोधून काढा, इतर मोठ्या समस्यांवर उपाय शोधून काढा, तुम्ही आर्थिक आणि  सामाजिक समतेचे नवीन मापदंड शोधून काढा, तेव्हा देश तुमचा संदेश लक्षपूर्वक ऐकेल. अशा प्रकारे तुम्ही देशावर स्वतःची छाप पाडू शकाल. जर आपल्याला आपल्या समाजाला श्रेष्ठ   बनवायचे असेल, समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर उच्चकोटीची योग्यता अंगी बाळगणे आवश्यक आहे. खासकरून विद्यार्थीदशाच ती आदर्श अवस्था आहे जिच्यामध्ये  आपण उच्च योग्यता प्राप्त करू शकू. माझी विनंती राहील की आपण आपले लक्ष उच्च ठेवा. विद्यापीठाची परीक्षा पास करणे त्यात चांगले गुण प्राप्त करणे हा काही मोठा उद्देश्य  नाही. यापेक्षाही मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवा. आपल्या विषयात तुम्ही जगाचे नेतृत्व करण्याइतपत योग्यता मिळविण्याचे लक्ष ठेवा. जर तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल तर  अर्थशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत, जर तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी असाल तर राज्यशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत क्षमता तुमच्यामध्ये हवी आणि ती क्षमता निर्माण करणे हेच  तुमचे ध्येय असायला हवे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती योग्यता मिळविण्यात तुम्ही जर यशस्वी झालात तेव्हा तुम्ही जे म्हणाल त्याचा परिणाम साऱ्या देशावर होईल  आणि तेच सकारात्मक बदलाचे कारण ठरेल.
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. या विद्यापीठाने भूतकाळामध्ये अडचणीच्या वेळेस मुस्लिम समाजाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे नेतृत्व केलेले आहे. त्यांना मार्ग  दाखविलेला आहे. फसलेल्या समाजाला चक्रव्यूवहातून बाहेर काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. मी आशा करतो भूतकाळातील आपल्या भूमिकेशी साधर्म्य राखून  भविष्यातही आपण आपली भूमिका वठवाल. अल्लाह आपल्या सर्वांना आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याची प्रेरणा देवो, मदत करो आणि त्यासाठी आवश्यक ती  योग्यता प्रदान करो. आमीन.

(सदरचे भाषण अमीरे जमात सआदतुल्लाह हुसैनी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थी परिषदेसमोर 21 एप्रिल 2019 रोजी दिलेले होते. उर्दूचे मराठी भाषांतर एम.आय. शेख व बशीर शेख यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget