Halloween Costume ideas 2015

एकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कसा मिळेल?

सत्तेतल्या बदलानंतर ‘मॉब लिंचिंग’ नावानं हत्येचं नवं तंत्र विकसित झालं. त्याची सुरुवात पुण्यामध्ये मोहसीन शेख या तरुणाच्या हत्येनं झाली. कोणतंही कारण नसताना एका  विशिष्ट धर्ममताचा अनुयायी म्हणून त्याला संपवण्यात आलं. २ जून २०१४ रोजी ही घटना घडली. नुकतीच या घटनेला पाच वर्षं पूर्ण झाली. या दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. या  हत्येच्या सर्व २२ आरोपींना जामीन देण्यात आला. दुसरीकडे न्यायासाठी लढणाऱ्या मोहसीनच्या पित्याचंदेखील हृदयविकारानं निधन झालं. ते आपल्या मुलाला न्याय मिळाल्याचं पाहू  शकले नाहीत. शासनानं दिलेलं मदतीचं आश्वासन पूर्ण झालं नाही. त्याच्या लहान भावाला नोकरी देण्याचा शब्द फिरवण्यात आला. आता मोहसीनचं कुटुंब असहाय्य आहे. त्यांना  न्यायाचा विश्वास देण्याची गरज आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातील तरुणांनी ‘जस्टीस फॉर मोहसीन मूव्हमेंट’ सुरू केली आहे. उद्या त्यांच्यावतीनं मोहसीनच्या जन्मगावी सोलापुरात  निदर्शनं केली जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेकडो तरुण यात सहभागी होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर ‘जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट’च्या वतीनं मोहसीन शेखचा भाऊ मुबीन शेखची मुलाखत...

तुमची कौटुंबिक पाश्र्वभूमी सांगाल?
माझे आजोबा पोस्टमन होते. त्यांना सहा मुलं. त्यात माझे वडील हे तिसरं अपत्य. आजोबा कमी पगारात कुटुंबाचा गाडा हाकत होते. मोठ्या कुटुंबामुळे माझ्या वडिलांना कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची जबाबदारी कमी वयात स्वीकारावी लागली. त्यामुळे रोजगाराच्या शोधात ते दुबईला गेले, पण काही दिवसांतच तेथून परतले. त्यानंतर त्यांनी म्हणजे १९८५ साली  सोलापूरमध्ये झेरॉक्स आणि दूरध्वनी केंद्राचा व्यवसाय सुरू केला. माझा मोठा भाऊ मोहसीनच्या हत्येच्या आधी दोन वर्षापूर्वी त्यांचा हा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे कुटुंबात आर्थिक  अडचणी जाणवत होत्या. मोहसीनचं शिक्षण नुकतंच संपलं होतं. पदवीनंतर त्याने सॉफ्टवेअरचे कोर्स केले. कौटुंबिक अडचणींची मोहसीनला जाणीव होती. पण शिक्षण अर्धवट सोडायचं  नव्हतं. त्यामुळे पुण्यात एका खाजगी प्रशिक्षण केंद्रात संगणक शिक्षकाची नोकरी करत त्यानं शिक्षण सुरू केलं. त्यानंतर मोहसीनला सेंट्रल ग्लोबल कंपनीत नोकरी लागली. कालांतरानं  मीदेखील त्याच्यासोबत पुण्यात मार्केटिंगचं काम करू लागलो.

मोहसीनच्या हत्येपूर्वी तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली होती का?
वडिलांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर काही काळातच मी आणि मोहसीन दोघंही पुण्यात नोकरी करायला लागलो. आम्हा दोघा भावांपैकी एकाचा पगार राहण्या-खाण्यात खर्च व्हायचा. दुसऱ्याचा पगार आम्ही आई-वडिलांना सोलापुरात पाठवायचो. त्यांना त्याचा आधार होता. त्यावरच त्यांची गुजराण व्हायची. परिस्थिती हलाखीची होती. पण वडिलांना व्यवसाय बंद  पडल्याचं दु:ख जाणवत नव्हतं. दोन–तीन वर्षं कुटुंबाला मोहसीनचा आधार होता.

मोहसीनच्या हत्येपूर्वी वातावरण संवेदनशील झाल्याची माहिती होती?
आम्ही दोघंही स्वारगेट परिसरात नोकरीला होतो. खोलीवर साधारणत: सायंकाळी ७.३० पर्यंत पोहोचायचो. त्या दिवशीदेखील आम्ही नेहमीच्या वेळी खोलीवर परतलो. कामाच्या तणावात  आम्हाला इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसे. त्यामुळे शहरात अथवा अन्य ठिकाणी काय घडतंय याची आम्हाला माहिती नव्हती. मोहसीनने सोशल मीडिआवर  आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची बातमी दिली जाते, त्याची सत्यता काय? आम्ही रोजच्या जगण्याशी संघर्ष करत होतो. आमच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या होत्या. आमच्यासमोर आमचं  कुटुंब कसं जगवायचं हा प्रश्न होता. मोहसीनला तर त्याची जाणीव अधिक होती. त्यातही मोहसीनचा स्वभाव मितभाषी होता. त्यानं कधीच कोणत्याही सामाजिक घटनेवर प्रतिक्रिया  दिल्याचं आम्ही पाहिलेलं नाही. काही वृत्तवाहिन्यांनी मोहसीनने एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याची माहिती प्रसारीत केली. नंतर त्यांना सत्यता कळाल्यानंतर त्यांनी  माफीही मागितली. त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्या घरी येऊन दिलगिरी व्यक्त केली.

मोहसीनची हत्या कशा प्रकारे झाली?
त्या दिवशी कामावरून परतल्यानंतर आम्ही रात्री ८.३० वाजता नमाजसाठी गेलो. तेथून मी खोलीवर आलो. मोहसीन व त्याचा एक मित्र नमाज झाल्यानंतर रात्रीच्या जेवणाचा डबा   आणण्यासाठी मेसला गेले. तेथून डबा घेऊन ते परतत होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या सदस्यांनी माझ्या भावाची दाढी आणि त्याचा पेहराव पाहून त्याच्यावर हल्ला  केला. हॉकीस्टीक आणि रॉडने त्याला मारहाण केली. नंतर त्याच्या डोक्यात दगड घातला.

मोहसीनला मारहाण झाल्याची माहिती कशी मिळाली?
मला मोहसीनसोबत असलेल्या मित्रानं फोन केला. आम्ही जिथं राहायचो तिथं जवळच ही घटना घडली होती. त्यामुळे मी तातडीनं तिथं पोहचलो. त्याला मारहाण करणारे तिथंच  कॉर्नरवर मोडतोड करत होते. मी माझ्या भावाची अवस्था पाहून अनेकांना मदतीसाठी हाक मारली. मी ओरडत होतो, ‘रिक्षा थांबवा. फक्त माझ्या भावाला उचलून रिक्षामध्ये घाला.’ मी  विनवणी करत होतो, पण कुणीच ऐकत नव्हतं. रिक्षाही मिळत नव्हती. मी भावाला तसंच टाकून खोलीवर गेलो. दुचाकी आणि एका मित्राला घेऊन आलो. तितक्यात जवळ पोलीस व्हॅन   असल्याचं दिसलं. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना परिस्थिती सांगितली. मग पोलिसांच्या व्हॅनमध्येच मी भावाला घेऊन मगरपट्ट्याच्या जवळ ग्लोबल हॉस्पिटलला गेलो. सोलापूरला घरी   फोनवरून माहिती दिली. मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात मोहसीनला पोहचवण्यासाठी आम्हाला एक तास लागला. रात्री दहा वाजता मोहसीनवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात  आले. मात्र दगडाचा घाव डोक्यात खोलवर झाल्यानं रात्री १२.३० वाजता मोहसीनचा मृत्यू झाला. मग पहाटे दोन वाजता पुण्याहून मोहसीनचा मृतदेह घेऊन मी आणि माझा चुलत भाऊ सोलापूरला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्युनंतर सरकारकडून मदतीची घोषणा कधी करण्यात आली?
अंत्यसंस्कारानंतर एनडीटीव्हीवर पुण्यात मॉब लिंचिंगमध्ये मोहसीन शेखला मारल्याची बातमी प्रसारीत झाली. त्यानंतर राजकारण्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला. स्थानिक स्तरावरील  अनेक नेते घरी येऊन भेटू लागले. पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची घोषणा झाली नव्हती. आ. प्रणिती शिंदे यांनी मला व माझ्या वडिलांना मुख्यमंत्र्यांकडे नेले.  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटल्यानंतर मदत म्हणून पन्नास लाख रुपये मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यातील काही रक्कम महापालिका देणार होती. मला  नोकरीचं आश्वासन देण्यात आलं. पण त्यातील काही रक्कम फक्त मिळाली. वडील त्यासाठी लढत होते. पण त्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा हा लढा अर्धवट राहिला.

वडिलांचं निधन कोणत्या कारणामुळे झालं?
मोहसीनच्या निधनाचा वडिलांना मोठा धक्का बसला होता. ते दिवसभर त्याची चर्चा करायचे. पुण्याला खटल्याच्या कामासाठी जायचे. मी सोबत असायचो. मला नोकरी मिळावी म्हणून  मंत्रालयात चकरा मारायचे. काही दिवसांनी जीआर नसल्यामुळे आम्ही नोकरी देऊ शकत नसल्याचं पत्र मंत्रालयातून आलं. त्यानंतर वडिलांना आणखी एक धक्का बसला. मधुमेहाचा आजार त्यांना पूर्वीपासूनच होता. त्यातच माझं लग्न झालं. लग्नानंतर मला एक मुलगी झाली. त्यावेळी ते आनंदी होते. मात्र माझ्या मुलीचं निधन झाल्यानं ते पुन्हा दु:खी झाले. अशा   अवस्थेत सहा महिन्यापूर्वी १७ डिसेंबरला त्यांचं निधन झालं. माझ्या भावाला न्याय मिळाल्याचं न पाहताच ते गेले याचं मोठं शल्य आहे. दोन-तीन वर्षांत आमच्या कुटुंबानं तीन मृत्यू  पाहिले. आता आई सारखी आजारी असते. वडिलांच्या मृत्यूनंतर ती खूप अस्वस्थ झाली आहे.

खटल्याच्या सुनावणीला विलंब का होतोय?
सुरुवातीला खटल्याला सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचा बनाव केला. मात्र नंतर त्यांचा हा बनाव उघडा पडला. प्रारंभी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यात  आलं. पण काही दिवसांतच त्यांनी केस  सोडली. आता सरकारतर्फे कुणीच येत नाही. त्यामुळे खटल्याचं कामकाज पुढे सरकत नाही.

उज्ज्वल निकम यांनी केस का सोडली?
त्यांनी केस सोडल्यानंतर वडिलांनी त्यांना संपर्क केला. मेसेजही केला. पण त्यांनी कारण सांगितलं नाही. फार विचारणा केल्यानंतर त्यांनी ‘तुम्ही केस लढा. जिंका.’ असं सांगितलं.

आता खटल्याची स्थिती काय आहे?
निकम यांनी केस सोडल्यानंतर सरकारनं त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणाची नेमणूक केलेली नाही. दोन वर्षं झाली. खटल्याला सरकारतर्फे वकील नाही. आमच्याकडून अ‍ॅड. हाफीज काझी  हे काम पाहत आहेत. सरकारतर्फे वकील नसल्यामुळे मध्यंतरी सर्व २२ आरोपींना जामीन दिला गेला. ते लोक आता उजळ माथ्यानं फिरतात. आम्हाला मात्र आधार शोधावा लागतोय. 

आता न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे?
माझे वडील न्यायासाठी याचना करत गेले. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. तीदेखील अर्धवट राहिली. मला नोकरी देण्याचा शब्द नंतर फिरवला गेला. आता बऱ्याच लोकांना  या घटनेचा विसर पडलाय. लोक विसरतात, ते विसरू शकतात; कारण त्यांना आमच्या वेदनांची, व्यथांची तीव्रता माहीत नाही. आमच्या कुटुंबाचे दोन्ही आधार गेले. आता मी एकटाच   घरात पुरुष आहे. मलादेखील रोजगाराच्या शोधात फिरावं लागतंय. मोहसीनच्या हत्येनंतर आई पुण्याला जाऊ देत नाही. सोलापुरात मला काम मिळत नाही. कुटुंब कसं चालवायचं ही  समस्या आहे. समाजातील काही निवडक लोक सोबत आहेत. अशा अवस्थेत न्यासासाठी आम्ही एकट्यानं लढू शकत नाही. सरकारला हे प्रकरण दुर्लक्षित करायचं आहे. आरोपींना  जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मिरवणुका काढल्या. त्यांचं धैर्य वाढलं आहे आणि एकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कसा मिळेल?

- सरफराज अहमद
गाजियुद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget