Halloween Costume ideas 2015

‘भारत प्यारा’ सर्वहारा पासून दूर लोटला जातोय

ईद संपली, शुभेच्छांचा वर्षाव सरत्या पावसासारखा हळूहळू कमी झाला. श्रावणसरी अन् पावसाचा खेळ जसा, तसाच खेळ विचार-भूमिकांचा. टीव्हीतल्या, पेपर्समधल्या ’कुर्बानी’ चर्चा संपल्या. ’चवीने खाणार त्याला देव देणार’ म्हणत खवय्यांच्या पंगती झडल्या - उठल्या. केरळच्या भिषणतेत मानवतेचा सुंदर आधार दिसला. हजारो हातांचे बळ... दु:खितांचा कळवळा मानवी संवेदनशीलतेचा रंग गडद दिसला.
या सगळ्या पावसाळी कोलाहलात काही बेडकांनी डरकाळीचा आव आणत पुन्हा तीव्र द्वेषाचा राग आळवला. अश्रूंची जात शोधावी, जगण्यावरचा विश्वास सपशेल उडून जावा आणि माणूसपणाची कीव करावी इतक्या नीच मानसिकतेच्या प्रचार विखारी यंत्रणाची मांदियाळी सजली. यासोबत सजत राहिले. कौशल्यविकास योजनांचे जाहिरात पोस्टर. ’विकास’ केवळ पूर्वापार लुप्त झालेल्या संस्कृती कल्पनेचा भास बनून राहिलाय. योजनांच्या यात्रेत हरवलेले कौशल्याचे ’शल्य’ उरले केवळ, राहूल मिठी नंतर सिद्धूमिठीचा मिठास वारा वाहू लागला. आता अस्थिकलशाचे मार्केटींग सुरूय. 
मार्केटींगच्या योजनाबद्धतेतून सामान्य नागरिक संमोहित झालाय. देशाच्या सर्व अंगावर गोबेल्सी भाकडपणा चढवला जातोय. जगण्यासाठी अखंड प्रामाणिक धडपड करणाऱ्याला उपेक्षित, वंचित ठेवलं जातय. देश लुटून पळून जाणाऱ्यांना संरक्षण आणि सुरक्षित केलं जातय. 
एकीकडे भूकेपोटी, रोजीरोटीचा सवाल विचारणाऱ्यांचा लोंढा उकिरड्यावर जनावरांसारखा ढकलला जातोय. मंदिर निर्मितीच्या वल्गनांचे बाण मारून धर्मांधतेचा कळस चढवला जातोय. घटना, कायदे यापेक्षा स्वतंत्र न्यायालयांचा ’पाट’ मांडला गेलाय. शाळा, कॉलेजेस मधून मेंदूत धार्मिक शिक्षणाचा बटाटेबाजार भरवला जातोय. मुल्यशिक्षण, वैदिक कालीन, छद्मी सोईस्कर द्वेषी इतिहास इत्यादी विषयांतून वर्ग-वर्ण- वर्चस्वाचा ठसा जड केलाय या व्यवस्थेनं. तंत्रज्ञान - विज्ञानाची कास धरून डिजिटल इंडियाचा उदो उदो करताना आपल्याच एकतर्फी कट्टर मुल्यांचा प्रचार प्रसाराचा पूर घराघरांत पोहचवलाय. सातत्याने प्रतिक मुल्ये मांडणी कथा साहित्य, कविता, कंपूगिरी, यातून जाणीवांचे बधीरीकरण बढीया होत आहे. या सगळ्यात आर्थिक मायाची उदारता काही बाबाबुवांच्या माध्यमातून फोफावत आहे. देशाला गुंगीत ठेवायचं आणि ’सत्तेसाठी वाट्टेल ते’ चा कित्ता गिरवायचा ही प्रचंड घातकी क्रूरता हसऱ्या रूपाने भूरळ घालत आहे. हजारो पायांनी वळणारे असत्य, त्याला पकडायचे तरी कसे? पकड मजबूत करण्यासाठी समदु:खी संवेदनशील विचारांची मूठ बांधली जाते. पण पुन्हा एकीतून बेकीचा दुर्देवी शाप पिच्छा सोडत नाही. देशभरातील सगळ्याच क्रूर घटनांना सामुहिक प्रतिक्रिया एकजूटीने उठत असताना, फोडा-झोडाची अनुवांशिक निती संघीव्यवस्थेनं वापरलीच. 
पद,पैसा, प्रतिष्ठा लोभ याचे आमिष, सामदाम दंड भेद चारित्र्य आणि मृत्यूभय यामुळे एकीच्या बळाचे विभाजन होत आहे. दिशा देणारे समतेेचे मोट बांधणारे, सर्वसामान्य भारतीयांचे मनोबल वाढवत माणुसकीवरचा विश्वास सबळ ठेवणाऱ्यांच्या येकीचे, काळजीने तुकडे केले जाताहेत. यासाठी कधी जातीय अस्मिता, कधी धर्मजाणीवा तर इतिहासातून छोटेमोठे सहेतूक उदात्तीकरण किंवा मग पुन्हा पद पैसा प्रतिष्ठा... 
या भयाण चक्राला बळी पडत... आपला बळी वामनापायी गाडलाच जातोय. शासकसत्ता हत्तीचे बळ घेऊन कट्टर उजव्या धर्मांधवाद्यांना रसद पुरवित राहते आणि तुरळक गर्दित कोकलत राहतो. देशप्रेमी सामान्य माणूस. आपल्या एकूण अस्तित्वाच्या संकटामुळे पैदा झालेली नैराश्यता, उदासिनता यामुळे फावलेल्या धर्ममुखंडाना मुखवट्याआडून सहज जेतेपद मिळत आहे. 
परंपरेच्या ठिपक्यांना जोडत... दु:खाच्या अश्रूंचेच डाग काळजावर अधिक... गेल्या किमान तीनेक दशकांत ’भारत प्यारा’ ’सर्वहार’ पासून दूर लोटला जातोय. 
हल्ली वंचितामध्ये सर्वात वंचित ठेवलं जातय... ते मुस्लिमांना बरं... एवढे जरी उल्लेखीले तरी सध्या भिती वाटतेय.. जातीय, धार्मिक कट्टर वगैरे ठरण्या-ठरवण्याची ! घाई नसली बदलायची तरी परीवर्तनाच्या वाटेवर आता दबलेल्या भयप्रद राहिलेल्या समाजातील पावलांचे निर्भय ठसे उमटलेच पाहिजेत. 
विखुरलेले, विस्कटलेले कार्य एकत्रित संघटित इमानेइतबारे करण्यासाठी बाहेर पडलेच पाहिजे. संकुचित ठेवून, भयप्रद ठेऊन, धार्मिक राजकीय पोळी भाजणाऱ्यांना चटका दिलाच पाहिजे. जे खरं आहे.
सत्य आहे, त्यासाठी कारवां केलाच पाहिजे. मंजिल दूर असली तरी मुश्किल नाही. केवळ वळवळीपेक्षा व्यापक योजनाबद्ध लोकचळवळीतून किमान बधिर गुंग मेंदूला थोडंतरी शुद्धीत आणण्याचे प्रयत्न केलेच पाहिजेत. 
नाहीत पुन्हा तेच. 
टि.व्ही. मैफिली कविता, गाणी, गप्पा, साहित्य, लेख, चर्चा-बिर्चा राजकीय पद, खोटी प्रतिष्ठा, एकीची बेकी, अर्धवट प्रवास, बधिर मेंदू, मूल्यांचे मरण, पिढी बर्बाद...
माझ्या तुमच्यातील बधिरता जाऊन संवेदनशीलतेचा एक धागा जीवंत आहे तो टिकवूया...

किन लफ्जों में इतनी कडवी इतनी कसिली बात लिखूं?
शेर की मैं तहजीब निभाऊ या हालात अपने लिखूं? 
गम को मैं गम न लिखूँ, जश्न लिखूँ क्या मातम?
देखे हैं जो मैने जनाजे क्या उनको बारात लिखूँ?


- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
9923030668

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget