परंपरावादी समाज संस्थेची व सामाजिक रूढी, चालीरिती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांसह मूठभर उच्चवर्णीयांचे प्रभुत्व इथल्या समाजाचे सतत शोषण करीत होते.उच्चवर्णियांनी लादलेल्या नियमादी धर्माची पकड हजारों वर्षे येथील लोकसमुहावर पक्की बसलेली होती, त्यामुळे मूठभर लोकांकडून धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाला वेठीस धरून त्यांचे आर्थिक व सामाजिक शोषण केले जात होते. याविरुद्ध महाराष्ट्रातील पुण्यासारख्या कर्मठ व सनातन्यांच्या बालेकिल्ल्यातून जोतीराव गोविंदराव फुले यांनी कृतीशील बंड पुकारले. स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीचा अंगीकार केला. त्यासाठी समाज प्रबोधन व जातीभेदाच्या भक्कम भिंती जमीनदोस्त करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत ही चळवळ उभी केली.
गुलामगिरी, जातीभेद, वर्णभेद यासारख्या समाजविघातक प्रवृत्तीचा मुळापासून बीमोड करण्यासाठी, तसेच हरिजन, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता स्त्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आयुष्याच्या अंतापर्यंत प्रखरपणे लढले. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी कृतीशील बंड करणारे ते भारतांतील पहिलें पुरूष होत. बहुजन समाज अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या खाईत लोटला गेला आहे, त्यामुळे तोझ आपलं जीवन दैन्यावस्थेत कंठत आहे, तो दोन वेळच्या घासालाही मुकला आहे, अंगावर पुरेसे कपडे मिळणे दुरापास्त झाले आहे. घराच्या खापऱ्या सुध्दा तो बदलू शकत नाही, ही त्याची दैन्यावस्था केवळ अज्ञानामुळे झाली आहे,या बिकट परिस्थितीत विद्येविना बहूजन समाजाची प्रगती होणे केवळ अशक्य आहे, हे त्यांनी अचूक ओळखले होते.
शिक्षणाचा अभाव हे आपल्या बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीचे प्रमुख कारण आहे, यासाठी निरक्षरता दूर केली पाहिजे,तर मग या समाजातील दैन्य,दारीद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा,व भेदभाव नष्ट होईल आणि प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव होईल, असा विचार त्यांनी सातत्याने मांडला. केवळ विचार मांडून ते थांबले नाहीत तर आजुबाजुला धर्ममार्तंड व धर्माच्या ठेकेदारांची प्रचंड दहशत असतांनाही व बहूजन समाजाला ज्ञान न देण्याचा एकप्रकारे सामाजिक फतवा काढला असतांनाही त्यांनी शिक्षणाप्रसाराचे कार्य हाती घेतले. बहूजन समाजाची अधोगती शिक्षण न घेतल्यामुळे झाली आहे, म्हणून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अर्थपूर्ण अशा रचनेत मांडले आहे.ती रचना आता महामंत्र झाली आहे. ती म्हणजे......
विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेलीं !
नीती विना गती गेली,गतीविना वित्त गेले !
वित्ताविना शूद्र खचले,!! इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले....
शिक्षणाबरोबरच ते स्त्री स्वातंत्र्याचे ही प्रवर्तक होते. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत शतकानुशतके अज्ञान आणि अंधःकारात बंदीस्त झालेल्या स्त्री वर्गाची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल उचलले, अर्थात असे धाडस सर्व प्रथम जोतिराव फुले यांनीच केले.पुण्यासारख्या अत्यंत कर्मठ आणि सनातन विचारांचे प्राबल्य असलेल्या शहरातील भीडे वाड्यात पहीली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले.भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून ती गणली जाते. बारा वर्षांखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावें अशी आग्रही मागणी त्यांनी इंग्रज सरकारकडे केली होती.
अत्यंत टोकाचा विरोध असतानाही त्यांनी स्वत:च्या पत्नीला, सावित्रीबाईना सर्व प्रथम शिक्षित केले. "जिच्या हातात पाळण्याची दोरी,ती राष्ट्राला उध्दारी" या शब्दात स्त्री वर्गाचा गौरव केला, समाजातील तळागाळातील लोकांच्या मध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी 'गुलामगिरी' हे पुस्तक लिहिले.समाजात परीवर्तन घडविण्यासाठी जनजागृती केली.शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्था काढल्या. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ-कनिष्ठ नसून तो आपल्या कर्तृत्वाने लहान-मोठा ठरत असतो, हा विचार त्यांनी सर्वश्रृत केला. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी, या मुख्य उद्देशाने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जोतीराव फुले लोकशाही चे खंदे पुरस्कर्ते होते. लोकशाही ही जीवनप्रणाली व्हावी, गरीब-श्रीमंत, उच्च-निच्च, मालक-मजूर ही मांडणी केवळ लोकशाही प्रणालीच बदलू शकते, यांवर त्यांचा विश्वास होता. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी शक्तिशाली धर्ममार्तंडांशी दोन हात केले. समाज परिवर्तन व न्यायाधिष्ठित समाज निर्मिती या गोष्टी लोकशाहीतच घडू शकतात,यात कोणालाही अमर्याद स्वातंत्र्य नसते, सर्व स्त्री-पुरूष, नागरिक कायद्यापुढे समान असतात, यासाठी लोकशाहीचा ते पुरस्कार करीत .
मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी 'सार्वजनिक सत्य धर्मा'ची स्थापना केली.या धर्मात श्रमप्रतिष्ठेला त्यांनी महत्त्व दिले. धार्मिक सहिष्णुता, गुलामगिरीस विरोध, जातिभेदाला विरोध, वर्णभेदाला फाटा, आचार-विचार स्वातंत्र्य, अंधश्रद्धेचे उच्चाटण ही मूलभूत तत्वे त्यांनी या धर्मात अंतर्भूत केली होती.
शेतकऱ्यांना दिलासा व त्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या मुला-मुलींना सक्तीचे शिक्षण यांवर त्यांनी लिहिलेले 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक आजही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे. शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचे कसे आर्थिक शोषण होते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. तसेच शेतकरी सावकाराच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सावकाराच्या विरोधात आवाज उठवला. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ लागलेल्या होत्या, यासाठी त्यांनी सरकारला 'ॲग्रीकल्चरल रिलीफ ॲक्ट' संमत करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते. अलीकडच्या काळातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका पाहीली की, जोतीरावांचे शतकांपूर्वीचे कार्य किती बहुमोल होते याची कल्पना येते.
कामगारांच्या अस्मितेला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले.त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.मूठभर भांडवलदारांच्या विरोधात संघटीत लढा देण्यासाठी व मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर केले. बौद्धिक गुलामगिरीच, सामाजिक विषमता आणि शेटजी-भटजींकडून होणा-या आर्थिक शोषणाला पायबंद घालण्यासाठी त्यांनी प्रखरपणे व निर्भीडपणे लढा दिला.
जोतीराव फुले हे आद्य महात्मा होत.ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक,स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत.तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत. भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाजशास्त्रज्ञांनी केला आहे, तो सार्थच आहे. अर्थात ह्या सगळ्याच्या पाठीमागे बहूजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी मनोमन ओळखले होते, त्यामुळे सर्वप्रथम शिक्षणप्रसार यासाठीच त्यांनी तत्कालीन समाजाचा रोष ओढवून घेऊन समाजकार्याची सुरुवात केली.आज देशातील प्रशासन, शिक्षण, संरक्षण तसेच औद्योगिक यासह अनेक क्षेत्रात महिला मोठ्या आत्मविश्वासाने व धडाडीने काम करीत आहेत,याचे सर्व श्रेय जोतीराव व सावित्रीबाई फुले यांना द्यावे लागेल, हे निर्विवाद सत्य आहे.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने तसेच बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment