Halloween Costume ideas 2015

सैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा


भारतीय सैन्यदलात एकूण 14 लाखांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत असून अनेकांनी कामाच्या तणावातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. देशात सैनिकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याशिवाय दहशतवाद आणि नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी दलाच्या जवानांचे शहीद होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहीद झालेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानांची संख्या सर्वाधिक आहे. 

जम्मू-काश्मीरच्या दहशतग्रस्त भागापासून ते नक्षलग्रस्त भागापर्यंत तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांपैकी 950 जवान तीन वर्षांत कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. दुसरीकडे, सैनिकांच्या आत्महत्येची आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये 153 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 56 जवान सीआरपीएफचे तर 42 जवान बीएसएफचे होते. नक्षलग्रस्त भागात शहीद झालेल्या जवानांची संख्या 57 टक्के आहे. सर्व दलातील जवानांना एकत्र घेतले तर 2019 मध्ये 15 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 622, 2020 मध्ये 14 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 691 आणि 2021 मध्ये 18 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 729 जवान शहीद झाले आहेत. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2015 ते 2020 या 6 वर्षांमध्ये चकमकींपेक्षा बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. 2015-2020 दरम्यान सुमारे 680 जवानांनी आत्महत्या केल्या तर 323 जवान चकमकीत शहीद झाले. म्हणजेच शहीद होण्याच्या तुलनेत सैनिकांच्या आत्महत्येचे प्रमाण दुपटीहून अधिक होते.

कामाचे अनियमित तास, वरिष्ठांकडून मिळणारी तुच्छ वागणूक, संसाधनांची कमतरता, बदली आणि बढतींमध्ये होणारा भ्रष्टाचार, असंवेदनशील नेतृत्व, महिनोमहिने न मिळणाऱ्या रजा तसेच राहण्या-खाण्याची होत असलेली गैरसोय, धोकादायक ठिकाणच्या तासंतास चालणाऱ्या ड्यूट्या, पाठीची वाट लावणाऱ्या कठीण भूभागावर काम, एकाकीपणा, कुटुंबापासून दुरावलेपण, घरातल्या समस्यांबाबत काहीही करता न येणे आणि अक्षरशः प्रत्येक गोष्टीबाबतची अनिश्चितता यामुळे सैनिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अनेकवेळा सैनिकांना उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे नसल्याचा फटका सहन करावा लागतो. मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात एक छोटीशी चूक देखील भारी पडू शकते. दुर्गम भागात रोगराईही त्यांच्या मृत्यूचे कारण बनते. मागच्या 15 वर्षांपासून आपल्या सैनिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात भारतीय सैन्यदल आणि सुरक्षा मंत्रालय अपयशी ठरले आहे.

लष्करात जवानांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी आहे. मोबाइलमुळे जवानांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे मोबाइल हातात ठेवण्यास आळा घालण्यासाठी एका प्रशिक्षण केंद्रात सैनिकांचे मोबाइल जप्त करण्यात आले होते. त्यांच्यावर दगड घालून ते फोडून टाकले होते. 

मोबाइल फोडण्यामागे जवानात शिस्त पालनांची भावना जागृत करण्याचा हेतू आहे. यावर्षीच्या एकमेव  घटनेत, 17 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये एका जवानाने मेजर शिकर थापा यांच्यावर गोळीबार केला. ड्युटीवर असताना मोबाईल फोन वापरल्याबद्दल या अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याने नाईक कैथी रतनने त्यांच्यावर एके-47 रायफलने हल्ला केला. भूदल, हवाईदल आणि नौदल यांच्यातील तणाव निवळण्यासाठी संरक्षण आस्थापनांनी सर्व तथाकथित उपाययोजना करूनही सशस्त्र दलांमधील आत्महत्या आणि गुन्हेगारी प्रकरणे थांबत नाहीत. कारण सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे एकाकीपणाचे बळी ठरत आहेत.

या जवानांनी आत्महत्या करण्यापूर्वी फोनवर खूप वेळ संवाद साधला होता, असे 70 टक्के प्रकरणात आढळून आले, अशी माहिती  सैन्यदलात आत्महत्यांच्या प्रकरणी करण्यात आलेल्या मानसशास्त्रीय संशोधनात दिसून आले आहे. यास सायकॉलॉजीकल अ‍ॅटॉप्सी असे म्हटले जाते. यात मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीचे वागणे कसे होते? याचे विश्लेषण केले जाते. लष्करात आत्महत्यांना आळा घालण्यासाठी सायकॉलॉजिकल अटॉप्सी’ करण्यात आली. सायकॉलॉजिकल अटॉप्सी हे एक मनोवैज्ञानिक पोस्टमॉर्टम आहे. शरीराऐवजी एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या वर्तनाची बारकाईने तपासणी होते. मरण्यापूर्वी ती व्यक्ती कोणाशी, कधी-कधी, काय बोलत होती? त्याचे खाणे-पिणे आणि दिनक्रम कसा होता? तो कोणकोणांशी भेटत होता? त्यांच्याशी त्याचे वर्तन कसे होते? हे पाहिले जाते. यानुसार, आत्महत्यांच्या अनेक प्रकरणात असे आढळून आले की, जवान सुटींवरून परतल्यानंतर तो घराकडून नुकताच आलेला आहे. सैनिकांना त्यांच्या कौटुंबिक, घरगुती समस्यांशी सामना करता येत नसल्यामुळे अनेकदा प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो, ज्यामध्ये मालमत्ता विवाद आणि सामाजिक घटकांकडून होणारा छळ ते आर्थिक आणि वैवाहिक समस्यांपर्यंत असू शकतात. तो जेंव्हा घरी जातो तेव्हा कोणातरी जवळच्या नातेवाइकांशी त्याचे कडाक्याचे भांडण झालेले आढळले. हे भांडण इतके विकोपाला गेलेले असते की, जवानांच्या मनात आत्महत्येच्या विचाराने घर केलेले असते. जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये दीर्घकालीन तैनातीमुळे सैनिकांच्या शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या सर्व कारणांमध्ये कमी वेतन, रजा नाकारणे, मूलभूत सुविधांचा अभाव, कुचकामी नेतृत्व आणि काहीवेळा अधिकाऱ्यांच्या हातून अपमानाची भावना यांचा समावेश होतो.

संरक्षण मंत्रालयाने मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी काही मनोवैज्ञानिक समुपदेशकांची नियुक्ती करण्याव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने अधिका-यांना सल्लागार म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर उपाय देखील करण्यात आले आहेत ज्यात राहणीमान आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा, अतिरिक्त कुटुंब निवास व्यवस्था आणि उदारीकृत रजा धोरण तसेच तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आणि सैन्याच्या प्रत्येक युनिटमध्ये योग आणि ध्यानाचा नियमित सराव समाविष्ट आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख ते 45 लाख रुपयांपर्यंतची एकरकमी नुकसानभरपाई दिली जाते. भारत के वीर’ पोर्टलद्वारे 15 लाखांपर्यंतचे सार्वजनिक योगदानही दिले जाते तसेच शहीद विवाहित सैनिकांच्या पालकांना वीर कॉर्प्स ऑफ इंडियाकडून 10 लाखांची अतिरिक्त मदत दिली जाते.

आपल्या सुरक्षा रक्षकांमध्येही तणावांच्या विकारांचे प्रमाण मोठे आहे. पण ज्या देशात शारीरिकदृष्ट्या अपंग सैनिकही त्यांचे वैध अधिकार मिळावेत याकरिता व्यवस्थेशी लढत आहेत, तिथे मानसिक अपंगत्वाला मान्यता देणे आणि त्यासाठी काही उपाय करणे ही फार दूरची गोष्ट आहे. आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी लष्कराने काही उपायांचा अवलंब सुरू केला आहे, जसे की अधिक रजा, अधिक चांगले अन्न आणि पायाभूत सुविधा, अधिकाऱ्यांबरोबर अधिक संवाद, समुपदेशन सत्रे, इ. त्यांचा थोडाफार उपयोगही होऊ शकतो. पण केवळ शारीरिक कष्टांमुळेच मानसिक आघात होत नाही! तसे असते तर जगातले सर्वात श्रीमंत सैन्य, अमेरिकन लष्कराने फार पूर्वीच यावर उपाययोजना केली असती. आतल्या आत चालू असलेले द्वंद्व - जे स्वतःच्या देशातल्या नागरिकांशी लढताना सर्वाधिक असते. सैनिकांच्या मनातल्या नैतिक आंदोलनांना कारणीभूत असते, आणि एक दिवस त्याचे संतुलन हरवते. जीवावर उदार होऊन देशाची रक्षा करणारा सैनिकंच मानसिकरित्या खचलेला असणं हे भारतीय सैन्यदलाच्या कारभारात सर्वकाही आलबेल नसल्याचाच पुरावा आहे. मागे एका भारतीय सैनिकानं सैन्यदलात मिळत असलेली वाईट वागणूक आणि किमान सोयी-सुविधांची असलेली वाणवा याला वाचा फोडत बनवलेला व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर लागलीच भारतीय लष्करातून त्याचं निलंबनही करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या गैरकारभाराची बाहेर वाच्यता न होऊ देण्यासाठी सैनिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दबाव पाडला जात असल्याच्या अनेक घटना याआधीही पाहायला मिळाल्या आहेत.

- सुरेश मंत्री, 

अंबाजोगाई

 9403650722


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget