(८०) लूत (अ.) ने सांगितले, ‘‘जर माझ्याजवळ इतके सामर्थ्य असते तर मी तुम्हाला सरळ केले असते, अथवा एखादा भक्कम आधारच असता तर मी त्याचा आश्रय घेतला असता.’’
(८१) तेव्हा दूतांनी त्याला सांगितले, ‘‘हे लूत (अ.)! आम्ही तुझ्या पालनकत्र्याचे पाठविलेले दूत आहोत, हे लोक तुझे काहीच बिघडवू शकणार नाहीत. बस्स, तू थोडी रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा. आणि पाहा, तुमच्यापैकी कुणीही मागे वळून पाहू नये.८९ पण तुझी पत्नी (बरोबर जाणार नाही) कारण तिच्यावरही तेच काही ओढवणार आहे जे या लोकांवर ओढवणार आहे.९० यांच्या विनाशासाठी सकाळची वेळ निश्चित आहे, आणि सकाळ होण्यास आता अवकाशच किती आहे!
(८२) मग जेव्हा आमच्या निर्णयाची वेळ आली तेव्हा आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले आणि तिच्यावर भाजलेल्या मातीच्या दगडांचा ताबडतोब वर्षाव केला,९१
(८३) ज्यापैकी प्रत्येक दगड तुझ्या पालनकत्र्याच्या येथे चिन्हांकित होता.९२ आणि अत्याचाऱ्यांपासून ही शिक्षा काही दूर नाही.९३
(८४) आणि मदयनवाल्याकडे आम्ही त्यांचा भाऊ शुऐब (अ.) याला पाठविले.९४ त्याने सांगितले, ‘‘हे माझ्या देशबंधुंनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. आणि वजनमापात कमी देत जाऊ नका. आज मी तुम्हाला चांगल्या स्थितीत पाहात आहे परंतु मला भय आहे की उद्या तुमच्यावर असा दिवस येईल ज्याचा प्रकोप सर्वांना वेढून टाकील.
(८५) आणि हे देशबंधुंनो, ठीक ठीक न्यायानिशी पूर्णपणे मोजमाप व वजन करा आणि लोकांना त्यांच्या वस्तूंमध्ये घट देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजवत फिरू नका.
(८६) अल्लाहने दिलेली बचत तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही श्रद्धावंत असाल आणि कोणत्याही परिस्थितीत मी काही तुमच्यावर नियुक्त केलेला निरीक्षक नाही.’’९५
(८७) त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे शुऐब (अ.)! तुझी नमाज तुला हेच शिकविते९६ काय की आम्ही त्या सर्व उपास्यांना सोडावे ज्यांची उपासना आमचे वाडवडील करीत होते?
८९) म्हणजे तुम्हाला तर हीच चिंता लागली पाहिजे की कशाप्रकारे या क्षेत्रातून (वस्ती) बाहेर पडावे. असे होऊ नये की मागे स्फोटांचे आवाज ऐकून तुम्ही रस्त्यात थांबावे आणि जी वस्ती (क्षेत्र) प्रकोप होण्यासाठी निश्चित केली त्यावर प्रकोप होताना तिथे तुमच्यापैकी कोणी थांबून राहावे.
९०) ही तिसरी बोधप्रद घटना आहे. या अध्यायात लोकांना शिकवण देण्यासाठी वर्णन केली आहे की तुम्हाला एखाद्या बुजुर्गांचे नातेसंबंध किंवा एखाद्या बुजुर्गाची शिफारस आपल्या अपराधाच्या शिक्षेपासून वाचवू शकत नाही.
९१) हा प्रकोप एका भयानक भूकंप किंवा ज्यालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरुपात आला होता. भूकंपाने त्यांच्या वस्तींना उलटून टाकले आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाने त्यांच्यावर दगडांचा वर्षाव झाला होता. मातीचे पक्के दगड म्हणजे ज्वालामुखीच्या क्षेत्रातील मातीचा पक्का थर जो ज्वालामुखीमुळे तयार होतो. अद्याप लूत सागराच्या दक्षिण आणि पूर्वेकडे या ज्वालामुखी फुटण्याच्या निशाण्या चहुकडे दिसतात.
९२) म्हणजे प्रत्येक दगड अल्लाहकडून निवडलेला होता की त्याला विनाशाचे कोणते काम करावयाचे आहे आणि कोणत्या दगडाला कोणत्या अपराधींवर पडावयाचे आहे.
९३) म्हणजे आज जे लोक अत्याचाराच्या या पद्धतीवर चालत आहेत तेसुद्धा या प्रकोपाला आपल्यापासून लांब समजून बसू नये. पैगंबर लूत (अ.) यांच्या राष्टावर तो आला होता तर कोणावरही (कोप) येऊ शकतो. अल्लाहला लूत (अ.) यांचे राष्ट्र विवश करू शकत नव्हते तसेच हेसुद्धा विवश करू शकत नाही.
९४) सूरह ७ रुकुअ ११ ची टीप नजरेसमोर ठेवा.
९५) म्हणजे माझा काही जोर तुमच्यावर नाही. मी तर एक चांगले इच्छिणारा हितैषी आहे. जास्तीतजास्त हेच करू शकतो की तुम्हाला समजावून सांगावे. पुढे तुमचा अधिकार आहे मान्य करा अथवा करू नका. प्रश्न माझ्या हिशेब घेण्याची भीती असण्याचा अथवा भीती नसण्याचा नाही. खरी गोष्ट अल्लाहचा हिशेब घेणे आहे. याचे तुम्हाला काही भय असेल तर आपल्या या कर्मांपासून दूर राहा.
९६) हे एक व्यंगात्मक वाक्य आहे. हे वाक्य चपखल त्या समाजाला लागू होते जो समाज अल्लाहपासून गाफील आणि दुष्टता आणि दुराचारात लिप्त असतो. नमाज धामिर्कतेचे सर्वप्रथम आणि सर्वात जास्त प्रभावी प्रतीक आहे. धामिर्कतेला अवज्ञाकारी आणि दुष्कर्मी लोक सर्वात जास्त खतरनाक रोग समजतात. म्हणून नमाज अशा समाजात उपासनेऐवजी रोगाचे लक्षण समजले जाते. एखाद्याला आपल्यामध्ये नमाज पढतांना पाहिल्यावर त्यांना त्वरित अनुभव होतो की या माणसावर "धामिर्कतेच्या रोगा" चा हल्ला झाला आहे. हे लोक दीनदारी (धामिर्कता) च्या त्या वैशिष्ट्यालासुद्धा जाणून आहेत की ते ज्या माणसाच्या मनात घर करते तेव्हा तो आपल्या सत्कर्मांनाच पर्याप्त समजत नाही तर दुसऱ्यांनासुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतो. असा मनुष्य अधर्म आणि दुष्चरित्रावर काही सांगितल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून नमाजवर त्यांची बेचैनी केवळ यामुळेच होत नाही की त्यांच्या एका भावाला दीनदारीचा (धामिर्कतेचा) झटका आला आहे; परंतु त्यांना हा खटका लागून असतो की आता लवकरच नैतिकता आणि सत्कर्माचा उपदेश सुरु होईल; तसेच सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्रात चूका दाखविण्याचा एक न संपणारा क्रम सुरु होईल. म्हणून अशा समाजात नमाज मोठ्या प्रमाणात व्यंग आणि चेष्टेचा विषय बनते. नमाजी माणसाने जर दुराचाराची आलोचना आणि सदाचाराचा प्रसार सुरु केला तर असे लोक त्या नमाजला नावें ठेवू लागतात जणूकाही हे अरिष्ट नमाजमुळेच आले आहे.
Post a Comment