दिवाळी हा भारतीय उपखंडात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण. अगदी दिवाळी एवढेच महत्व मुस्लीम बांधव रमजानला देतात. पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील नवव्या महिण्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्र दर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच रमजानची सुरवात होते. ‘चांद नजर आ गया...’ असं म्हणत प्रत्येकजण रमजान प्रारंभाचा आनंद व्यक्त करीत असतो.
इस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख स्तंभ (अरकान) आहेत. कलमा हा मंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे तर वर्षातून एक महिना रमजानचे उपवास ठेवायला हवेत. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्याने आयुष्यात किमान एकदा तरी हज करावा. तर जकात म्हणजे प्रत्येकाने काही ठराविक रक्कम दरवर्षी दान केली पाहिजे. असे या अरकानांचे अर्थ आहेत.
रात्रीच्या म्हणजे इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची 20 रकात नमाज अदा करावी लागते. तिला 'तरावीह' असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम साहेब कुराणाच्या ओवींचे सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक मुस्लिमाच्या कानावर वर्षातून किमान एकवेळ तरी कुराणाचा पवित्र संदेश पडत असतो. प्रत्येक मशिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी लोकांची गर्दी पाहता दोन पाळीत 'ही' नमाज अदा केली जाते.
‘रोजा’ हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ काढल्या जातो. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोज्यांचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त ‘फाका’ (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवन पध्दती आहे. ती जीवन जगण्याची आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असतांना बराच वेळा बिनधास्त होवून जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठिण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करित असतो अगदी तसेच इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी या मागे धारणा आहे.
यावर्षीचे रोजे हे परिक्षा पाहणारेच आहेत. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना यावेळी रोजेदारांना राहावे लागले. दरवेळी 13 ते 14 तास उपवासाचा काळ असतो. यावर्षी तब्बल चौदा तास उपवास चालला. यंदाचा रमाजान एप्रिल महिन्यात आला आहे. पुढील वर्षीही रमजान मार्च आणि एप्रिल महिन्यात असेल. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या 10 दिवस आधी येतो. अशा प्रकारे 10 दिवसाने रमजान मास दरवर्षी पुढे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतू पुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिन्यात, प्रत्येक ऋतूत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीत सुध्दा असेल आणि त्याहीपुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण येईल. 35 ते 40 वर्षांनी रमजानचे एक चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक ऋतूत रमजानचे असे फिरणे हे त्याचे 'अद्वितीय' असे वैशिष्ट्य होय.
रमजान मधील सर्वात महत्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे ‘टॅक्स’. तुम्हाला समाजात जगत असतांना समाजातील बऱ्या, वाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समाजासाठी महत्वाचा असून समाजातील लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट उल्लेख कुराणात आहे. येथे लहान, मोठे हे शब्द आर्थिक स्थिती दर्शविणारे आहेत. म्हणजेच समाजातील गरीबांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी अल्लाहने श्रीमंतांवर टाकली आहे. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 2.5 टक्के जकात काढण्याचे कुराण सांगतो. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करुन शिल्लक असलेल्या सोने, चांदी, रुपये वा इतर मालमत्तेवर अडीच टक्के जकात लावली जाते. ही जकात कपडे, अन्नधान्य, रुपये वा खाण्यापिण्याच्या वस्तू या रुपात वाटता येते. किंबहुना ती वाटावीच लागते. आपल्यापेक्षा गरीब नातेवाईक, शेजारी वा गरजवंताला अशी जकात वाटप केली जाते. जकात ज्याला दिली जाते त्याचा धर्म, लिंग, जात असा कोणताही भेद न मानता गरजवंताला ती दिली जाते.
अशा प्रकारे सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे कार्य पवित्र रमजान करीत असतो. रमजान ईदने या पवित्र पर्वाचा शेवट होतो. हा गोड शेवटच परत पुढील रमजानसाठी लोकांना तयार करीत असतो.
- आमीन चौहान
दिग्रस जि. यवतमाळ,
मो. 9423409606
Post a Comment