प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की माणसाच्या इस्लामची खुबी ही आहे की ज्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नसेल ते सोडून द्यावे. (ह. अबू हुरैरा, तिर्मिजी)
अबू मुहम्मद यांच्या वक्तव्यानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, या चांगल्या नैतिकतेची मदार चार निकषांवर आहे.
१) अल्लाह आणि परलोकावर ज्याची श्रद्धा असेल त्याने भल्या गोष्टी सांगाव्या किंवा गप्प राहवे.
२) माणसाच्या इस्लामची खुबी ही आहे की त्याने निरर्थक गोष्टी सोडून द्याव्यात.
३) रागावू नये.
४) एका श्रद्धावंतानं आपल्या भावासाठीही त्याचीच निवड करावी जशी त्याची स्वतःची आवड असेल.
ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद म्हणतात, एक व्यक्ती प्रेषित (स.) यांच्याकडे आली आणि विचारलं, माझ्या समूहाचे लोक मला मान देतात. मी सांगितलेलं ऐकतात. मला सांगा, की त्यांना काय मार्गदर्शन करू?
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास सांगितले की, त्यांना सांगा, एकमेकांना सलाम करत राहावे. ज्या गोष्टींचा संबंध तुमच्याशी असेल त्याव्यतिरिक्त कमीतकमी बोलावे.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ह. इब्राहीम (अ.) यांच्या ग्रंथामध्ये असे आढळते की एका समंजस माणसावर हे अनिवार्य आहे की त्याने आपली बुद्धिमत्ता दुसऱ्या कुणाच्या अधीन करू नये. दिवसातून एक घटिका आपल्या विधात्याची प्रार्थना करावी. एक घटिका स्वतःच्या मनःस्थितीची तपासणी करावी. एक घटिका अल्लाहने जी सृष्टी निर्माण केली आहे त्यावर विचारविनिमय करावा. आणि एक घटिका आपल्या उपजीविका – खाण्यापिण्यासाठी कार्य करावे. एक समंजस माणसाने केवळ तीन बाबींसाठी प्रयत्नशील राहावे. परलोकाच्या तयारीसाठी, आपल्या ऐहिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि अशा आरामदायी जीवनाची पूर्तता करत राहावे जे निषिद्ध नाहीत. एका समंजस मानसावर हेदेखील अनिवार्य आहे की त्याने आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर विचार करावा. आपल्या कार्यावर लक्ष द्यावे. आपल्या जिभेचे रक्षण करावे. बोलताना मोजून मापून बोलावे.
प्रेषित (स.) म्हणतात की, श्रद्धावंत लोक आपसात एकमेकांशी स्नेह, सहानुभूती आणि दयेच्या संबंधात एका शरीराप्रमाणे आहेत. जर एखादा अवयव आजारी पडतो तेव्हा त्याच्या वेदना साऱ्या शरीराला जाणवतात.
जे लोक या जगात अहंकार आणि अनाचार माजवत नाहीत त्यांच्याविषयी अल्लाह म्हणतो की, परलोकाचे ठिकाण आम्ही अशा लोकांसाठी राखून ठेवले आहे जे धरतीवर आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करू इच्छित नाहीत आणि जे अनाचार माजवत नाहीत. चांगला परिणाम केवळ सदाचारी लोकांसाठी असेल. (पवित्र कुरआन, अल कसस-४३) (गंजीन-ए-हिकमत)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment