नागपूर
वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केले. याचवेळी, राज्यातील भोंगेसदृश्य परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. तर, बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी महाराज यांवरही मत मांडलं.
सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. जगात बायडेन, पुतीन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र, शेक्सपिअर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नाहीत, ते साऱ्या जगाचे नायक आहेत, असे सबनीस यांनी म्हटले. दरम्यान, एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी शिवाजी महाराज आणि ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर वादावरही स्पष्ट भूमिका मांडली. राजकारणात भ्रष्टाचार आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य जाती-धर्मापलीकडचे होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन सुरु असलेला वाद आणि त्यांच्या ''छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका'' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत विभागणाऱ्या ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित इतिहासकारांचा त्यांनी समाचार घेतला. छत्रपती शिवरायांबद्दल विकृत इतिहास लिहिण्याचा प्रघात निंदनीय असून त्या सर्वांचा इतिहास विवेकवादाने खोडला आहे. “ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही,” असेही यावेळी त्यांनी म्हटले.
“ब्राह्मणेत्तर विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुलकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले, पण कृष्णाजी कुलकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनीच मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी,” असे सबनीस यांनी म्हटले.
Post a Comment