Halloween Costume ideas 2015

महागाईवर मौन; सर्वसामान्यांचे मरण!


गलत निकले सब अंदाजे हमारे 

के दिन आए नहीं अच्छे हमारे

अगर हम पर यकीं आता नहीं तो 

कहीं लगवालो अंगुठे हमारे

देशात दिवसेंदिवस महागाईचा कहर सुरू आहे मात्र विरोधी पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना गप्प असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस काळात 1 रूपया पेट्रोल, डिझेल, गॅस महागले तर आकाश पाताळ एक करणारे भाजपाचे कार्यकर्ते आज 112 पार पेट्रोल गेले तरी मुग गिळून गप्प बसले आहेत. विरोधी पक्षांना तर आपसांतील तंटे मिटविण्यातून वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय, केंद्रीय संस्थांच्या कारवाईचे धागेदोर आपल्याकडे येतील या भितीने ते ही महागाईच्या विरोधात रान उठवायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना गरीबांची दशा पहावयात नसल्याने व सरकारमध्ये राहून विरोधात बोलता येत नसल्याने त्यांनी म्हटले की विरोधी पक्ष वाढला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्याने पक्षवाढीसाठी कार्य करावे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेली. यामुळे सर्वसामान्यांची  आर्थिक घडी विस्कटली. लाखोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली, रोजगाराच्या संधी बंद झाल्या. यामुळे सरकारी दुषित धान्य खाऊन दिवसे काढावी लागली. 2022 उजाडले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र भाजपा सरकारने महागाईचा एवढा उच्चांक गाठला की, खाजगी नोकरदारच काय शेतकरी आणि सर्वसामान्य गरीब माणसं जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत. घरगुती गॅस एक हजार रूपयांवर गेला आहे. यामुळे सर्वच साहित्यांचे भाव वाढले आहेत. यामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन करायची ताकदही आता सर्वसामान्यांत राहिली नसल्याचे दिसून येत आहे.   

दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या डाळी, खाद्यतेले, भाज्या, दूध, गहू आदी साऱ्याच जिनसा महागल्या आहेत. 50 रूपयांत पिशवी भर येणारा भाजीपाला आता दीडशे रूपयांवर पोहोचला आहे. कपड्यांत तर 40 टक्के वाढ झाली आहे. पादत्राणांच्या किमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शालेय साहित्य, औषधींमध्ये 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. महागाईमुळे येणारा प्रत्येक दिवस जिवंत राहूनही मेल्याची अनुभुती देत आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशात भावनिक आणि धार्मिक मुद्दे पुढे करून सरकार महागाईवरील आंदोलनांना नियंत्रित करण्यात पुरेशी सफल झालेली आहे. आज अनेकजण कश्मीर फाईल्स, हिजाबसारख्या मुद्यांवर चर्चा करताना दिसत आहेत मात्र सरकारी धोरणांवर टिका करताना दिसत नाही. त्यामुळे डिव्हाईड अँड रूलची निती पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहे. 

महागाईच्या तेलात रशीया-युक्रेन युद्धाने भर टाकली आहे. मात्र सरकार जर महागाईवर नियंत्रण आणायचे ठरविल्यास ते काही अशक्य नाही. दुचाकी, चारचाकी गाड्यांचे दर वाढत आहेत.  कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे कंपन्या एसीच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्यासोबत खिशाला चटके बसणार आहेत. एसीची प्रति युनिट किंमत 1500 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तसेच दूधाच्या किंमतीतही वाढ होणार आहे. खाद्यतेल पावणे दोनशेवर पोहोचले आहे. त्यामुळे आम ते खास परिवार महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. सिमेंट, खडी, वाळू, लोखंड आदी बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर बांधण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकार गरीबांसाठी घरकुल योजना राबवित असली तरी देत असलेल्या रक्कमेत पाया आणि एक भिंत उभारणेही अवघड झाले आहे. त्यातही संबंधित अधिकाऱ्याला थोडे पैसे द्यावे लागतात.अशातच रमजानचा महिना सुरू झाला आहे. महागाईमुळे रमजानच्या उत्साहावर पाणी फिरेल की काय अशी अवस्था झालेली आहे. म्हणून यावेळेसचे रमजान कसे जातील आणि ईद उल फित्र कशी होईल, याची आतापासून चिंता लागून राहिली आहे. 

- बशीर शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget