तरदामनी पे शैख हमारी न जाईयो
दामन निचोड दें तो फरिश्तें वजू करे
मागील आठवड्यात दोन दुर्देवी घटना घडल्या. एक 21 मार्च 2022 रोजी भादू उर्फ बहादूर शेख (रा. रामपूर हाट ग्रा.पं. बारिशल हाट, बीरभूम पश्चिम बंगाल) या उपसरपंचाची बाहुती गावाच्या पुलावर देशी बॉम्ब फेकून हत्या करण्यात आली. तो टीएमसीचा नेता होता. त्याच्या हत्येचा बदला म्हणून त्याच्या समर्थकांनी हत्या करणाऱ्यांच्या रामपूर हाट (बीरभूम) येथील घराला बाहेरून कडी लावून जाळून टाकले. त्यात जहांआरा (38), शेलीबीबी (32), नुरेनहर बीबी (52), मीना बीबी (40), रूपाली बीबी (39), काजी रहेमान (22), लिला खातून (18), तूली खातून (7). हे 8 लोक जीवंत जळून मरण पावले. स्वयंपाक करताना साधा चटका करताना माणसाला किती यातना होतात याची जाणीव असणाऱ्यांनी या जीवंत माणसांना जळतांना किती यातना झाल्या असतील याची कल्पना येईल. दूसरी घटना उत्तर प्रदेशच्या खुशीनगरची आहे. येथे राहणाऱ्या बाबर नावाच्या तरूणाची त्याच्याच दोन मुस्लिम शेजारी तरूणांनी हत्या केली. कारण की, बाबर हा भाजप समर्थक होता. त्याने निवडणुकींमध्ये भाजपचा प्रचारच केला नाही तर भाजप जिंकल्यावर त्याने फटाकेही वाजविले होते. ही बाब त्याच्या शेजाऱ्यांना रूचली नाही व त्यांनी बाबरची हत्या केली.
या दोन्ही घटनांमधील आरोपी आणि फिर्यादी दोघेही मुस्लिम आहेत आणि या दोन्ही घटना भारतीय मुस्लिमांची राजकीय जाण किती सुमार दर्जाची आहे हे दाखवून देणाऱ्या आहेत. निवडणुका मग कोणत्याही असोत, घोषणा होताच मुस्लिम वस्त्यांतून उत्साहाचे वारे वाहू लागते आणि एखाद्या उत्सवाप्रमाणे हे लोक आपापल्या पसंतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये गुंग होऊन जातात. निवडणुका संपल्या की हे लोक शांत होऊन जातात आणि आपापल्या कामाला लागतात. याशिवाय प्रत्येक पक्षात मुस्लिम कार्यकर्त्यांची एक फौज असते जी आपापल्या नेत्याच्या मागे वेड्यासारखी धावत असते. यांना फक्त शोभेची पदं दिली जातात. चार-दोन कामे केली जातात. उपसरपंच, उपनगराध्यक्ष किंवा उपमहापौर केले जाते, एखादे प्रायमरी उर्दू स्कूल दिले जाते आणि आयुष्यभर यांच्याकडून काम करवून घेतले जाते. मुस्लिमांचा भारतीय राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध एवढाच असतो. कुरआनशी प्रत्यक्षात नाळ तुटल्याने मुस्लिमांना इस्लामिक इथिकल पॉलिटिक्स अर्थात इस्लामी मुल्याधारित राजकारणाची जाणीवच नाही. ज्यांना जाणीव आहे तो धार्मिक गट राजकारणाशी लांबच राहतो. राजकारणावर टिका करणे सोपे असते परंतु प्रत्यक्ष राजकारणात उतरून जनमाणसांचे मत परिवर्तन करणे कठीण असते. मुस्लिमांच्या राजकीय जाणीवेसंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी खालीलप्रमाणे आपले मत नोंदवितात. ’’आपका बोया हुआ कोई बीज फूल पत्ते नहीं ला सकता, जबतक आप इस कोशिश में उस कानून की पूरी-पूरी पाबंदी न करें जो खेतों के फसल उगाने के लिए तय कर दी गई है. उसी तरह क़यादत के निज़ाम (राजकीय नेतृत्व व्यवस्था) की वो तब्दिली भी जो आप चाहते हैं सिर्फ दुआओं और (उर्वरित पान 2 वर )
पाक तमन्नाओं से नहीं आ सकती, बल्के उसके लिए भी जरूरी है के, आप उस कानून को समझें और उसकी सारी शर्तें पूरी करे जिसकी तहेत कयादत कायम होती है. किसी को मिलती है और किसीसे छीन ली जाती है.’’ (संदर्भ : मशमुला तहेरिकी तरबियत).
मौलाना मौदूदींच्या वर नमूद मतांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आपल्या राजकीय प्रगल्भतेकडे पाहतो तर आपल्याला आपली प्रगल्भता साधारण किंवा त्यापेक्षाही कमी आहे, याची जाणीव प्रकर्षाने होते. मुस्लिमांचे राजकारण बिगर मुस्लिमांच्या राजकारणापेक्षा किंचितही वेगळे नाही, हे ही तेवढेच भ्रष्ट आहेत जेवढे की ते, यांचेही चारित्र्य तेवढेच वाईट आहे जेवढे की त्यांचे, कुरआनमध्ये दिलेल्या राजकीय तत्वांशी फारकत घेतल्यामुळे भारतीय मुस्लिमांचे सामुहिक राजकीय चारित्र्य पोकळ झालेले आहे. त्यामुळे ते कोणत्याही एका मुस्लिम राजकीय पक्षात फार काळ टिकून राहत नाहीत. ते फक्त बिगर मुस्लिम पक्षांंमध्ये कार्यकर्ते म्हणून दीर्घकाळ राहू शकतात. पोकळ चारित्र्य आणि बेताची राजकीय समज असल्यामुळे पाकिस्तान नावाचा वेगळा देश घेऊनही मुस्लिमांनी त्या देशाची काय अवस्था केली हे आजकालच्या पाकिस्तानमधील अराजकतेवरून दिसून येते. वाईट चारित्र्याच्या लोकांनी इस्लामच्या नावाने वेगळी भूमी तर घेतली पण तिचे वाटोळे करून टाकले. मुस्लिमांनी राजकारणात उतरलेल्या मुस्लिम राजकीय पक्षांना अपयशी बनविले आहे. महत्त्वाची गोष्ट राजकीय चारित्र्य आहे. त्या अभावी कोणताही मुस्लिम राजकीय पक्ष यशस्वी होऊ शकणार नाही. 70 वर्षे प्रयत्न करून पाहिला आणखी 70 वर्षे प्रयत्न करून पाहा, काही फरक पडणार नाही. आपल्यामध्ये खरी राजकीय जाणीव प्रगल्भ करावयाची असल्यास कुरआनला चांगल्या प्रकारे अर्ग्युमेंट्स सहीत तिच्या खऱ्या आत्म्याला समजून घ्यावे लागेल. नाहीतर अशीच विनाकारणाची राजकीय बोंबाबोंब होत राहणार प्रत्यक्षात काहीही हाती लागणार नाही.
भारतीय राजकारणाची उत्तरोत्तर होणारी दुरवस्था काही लपलेली गोष्ट नाही. स्वातंत्र्यापूर्वीच्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य आणि त्यानंतर आलेल्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य यांची तुलना केली तर एक गोष्ट स्पष्ट होेते की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या नेत्यांच्या चारित्र्याचा आलेख दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. आजमितीला तो निच्चांकाला पोहोचलेला आहे. स्वातंत्र्यांनतर आलेली सर्व सरकारे आणि बहुतेक नेते भ्रष्ट होते व आहेत. भ्रष्टाचाराचा हा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. या राजकीय दुरवस्थेचे मूळ अपात्र लोकांना मताधिकार दिल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात आहे. आपली तब्येत बिघडली तर आपल्याला तज्ञ डॉक्टर लागतो, घर बांधावयाचे असल्यास तज्ञ वास्तुविशारद लागतो, कोर्टात केस लढवायची असल्यास तज्ञ वकील लागतो मात्र देश चालवायला कुठलीच पात्रता लागत नाही, हे राजकारणाच्या अधःपतनाचे प्रमुख कारण आहे. खरे तर देश चालविणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ लोक निवडून देणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे. मात्र एक खर्जुली कोंबडी, देशी दारूचा एक पव्वा व सोबत पाचशे रूपयाची नोट यावर मतदार जर विकले जात असतील तर ज्या लायकीचे नेते निवडले जातील व निवडून आल्यावर ते जे करतील तेच आज कमी अधिक प्रमाणात देशात होत आहे.
महत्प्रयासाने व लाखो लोकांच्या बलीदानाने मिळालेल्या या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दिशेने नेत्यांचे व मतदारांचे जे प्रशिक्षण व समुपदेशन करणे गरजेचे होते त्याकडे लक्ष न दिल्या गेल्याने आज खालपासून वरपर्यंत राजकीय भ्रष्टाचाराने थैमान घातलेले आहे. ज्या प्रमाणात व आकारात राजकीय भ्रष्टाचार होत आहे तो देशाला गरीबीच्या खाईत लोटण्यासाठी पुरेसा आहे. कोट्यावधी लोकांना पाच किलो धान्य मोफत देऊन त्यावर लाजण्याऐवजी ते काम सरकारची उपलब्धी आहे, असे वाटणारे सरकार जेव्हा सत्तेवर असेल तेव्हा मतदार आणि सत्ताधारी या दोघांच्याही राजकीय जाणीवा किती प्रगल्भ आहेत, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही आणि हेच कारण आहे की स्वातंत्र्यानंतर उत्तरोत्तर देशातील गरीबी वाढत आहे. नेत्यांचे भ्रष्ट आचरण ही देशाची प्रमुख समस्या आहे. हे कमी की काय म्हणून त्यांच्यातील अनेकांची नितीमत्ताही दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे, हे सत्य नयना सहानी पासून ते पूजा चव्हाण पर्यंत नेत्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक महिलांच्या गेलेल्या बळीतून सिद्ध झालेले आहे.
कोणत्याही समाजाची तीन प्रमुख शक्तीस्थळे असतात. 1. राजसत्ता 2. अर्थसत्ता 3. ज्ञानसत्ता. आणि ही शक्तीस्थळे कोणत्या व्यक्ती आणि समुहाच्या हाती आहेत यावर त्या समाजाची प्रगती अवलंबून असते. या तीनी शक्तीस्थळांवर आपल्या देशात भ्रष्ट लोकांचे नियंत्रण आहे हे सत्य कोणालाही नाकारता येण्यासारखे नाही. म्हणूनच शिक्षण, चिकित्सा, अर्थव्यवस्था आणि राजकारण हे गरीबांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. यात शक्तीस्थळांवर दुष्ट, बदमाश आणि लुटारूवृत्तीचे लोक (अपवाद खेरीज करून) विराजमान झालेले आहेत. ब्रिटिश संसदेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासंबंधीची चर्चा जेव्हा टिपेला गेली होती तेव्हा त्याला विरोध करतांना ब्रिटिश संसदेमध्ये स्वातंत्र्याच्या अवघ्या पाच महिन्यापूर्वी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल याने जे म्हटले होते आणि ज्याचा पुनर्रउल्लेख न्यायमूर्ती मार्कडेंय काटजू यांनी जानेवारी 2015 मध्ये केला होता ते म्हणने भारतीय राज्यकर्त्यांनी तंतोतंत खरे करून दाखविले आहे. चर्चिल म्हणाले होते, ’’भारताला स्वातंत्र्य दिल्यास सत्ता दुष्ट, बदमाश आणि लुटारूंच्या हाती जाईल. भविष्यातील सर्व नेते निम्न क्षमतेचे आणि भुस्कटासारखे असतील. त्यांची जीभ जरूर गोड असेल मात्र त्यांची मनं कठोर असतील. ते सत्तेसाठी एकमेकांशीच भांडतील आणि एकदिवस असा येईल की भारतात वाऱ्यावर आणि पाण्यावर सुद्धा कर लावला जाईल.’’
बरे ! जनतेने पक्ष बदलूनही पाहिले. काँग्रेस, भाजपाच नव्हे तर इतर अनेक प्रादेशिक पक्ष या सर्वांना संधी देऊन पाहिली. परंतु कोणताही पक्ष जनकल्याणासाठी समर्पित नाही, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. आम आदमी पार्टीचा यात एकमेव अपवाद करता येईल, अशी परिस्थिती अलिकडे निर्माण झालेली आहे यासाठी ईश्वराचे धन्यवाद. बाकी भ्रष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचे नेेते आणि त्यांना निवडणारे लोक दोघेही सारखेच जबाबदार आहेत. प्रचलित व्यवस्थेमध्ये चांगली माणसं निवडून येऊच शकत नाहीत, याला शेवटी जनताच जबाबदार आहे. भारतीय राजकारणाने देशाची अशी अवस्था करून टाकलेली आहे की, लोकांना आनंदाने जगता येणे तर सोडा विष पिऊन सन्मानाने मरताही येत नाही म्हणून झाडावर लटकून शेतकऱ्यांना अपमानास्पदरित्या आत्महत्या कराव्या लागत आहेत. एवढी दारून परिस्थिती निर्माण झालेली आहे की, हजारो आत्महत्या होवूनही गेंड्याच्या कातडीच्या बहुतेक नेत्यांना याचे काहीच वाटत नाही, याचेच आश्चर्य वाटते.
भारतीय राजकारणाने संवेदनहीन समाज निर्माण केलेला आहे. गरीबांच्या दुःखाची श्रीमंतांना जाणीव नाही. मुलभूत सुविधा ग्रामीण आणि नागरी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत.
भारतीय राजकारणाच्या अधःपतनाचे एक कारण हे ही आहे की, यात जातीयवादाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भारतीय प्रतिनिधीत्वाचा कायदा 1957 अन्वये कोणताही पक्ष धर्माच्या आधारे मतं मागू शकत नाही. वाचकांना आठवत असेल की मागील शतकाच्या आणि 1970 आणि 80 च्या दशकात शिवसेनेसह अनेक खासदारांच्या खासदारक्या निवडून आल्यानंतरही उच्च न्यायालयाकडून याच कारणाने रद्द ठरविल्या गेल्या होत्या. मात्र लवकरच जातीयवादी राजकारण्यांनी भ्रष्ट वकिलांच्या सहकाऱ्याने कोर्टाकडून असे निर्णय येणार नाहीत, याची व्यवस्था करवून घेतली. निवडणूक आयोगानेही या संदर्भात आपली जबाबदारी (टी.एन. शेषन यांचा अपवाद खेरीज करून) खंबीरपणे पार पाडली नाही. परिणामी आज जनहिताच्या मुद्यांऐवजी धार्मिक मुद्यांवर निवडणुका जिंकल्या जातात व त्यातून अपात्र नेते निवडून येतात. आज भारतीय राजकारणाची अवस्था अशी आहे की, बहुतेक नेत्यांकडे नैतिक मुल्यही नाहीत, नीतीही नाही आणि चांगली नियतही नाही. पक्ष बदलून उपयोग नाही, नेते बदलून उपयोग नाही, मुळापासून राजकारणात सकारात्मक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सामान्य नागरिकांना हे जरी कळत नसले तरी भारतीय मुस्लिमांशिवाय, दुसऱ्या कोणाकडेच हे अमुलाग्र परिवर्तन कसे करावे, याचा रोडमॅप नाही. मुस्लिमांचे सौभाग्य आहे की, त्यांच्याकडे हे परिवर्तन करण्याचा रोडमॅपच नाही तर अशा परिवर्तनाचे एक यशस्वी मॉडेलही त्यांच्याकडे (प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि मदीना येथे त्यांनी केलेल्या व्यवस्था परिवर्तनाच्या स्वरूपात) उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने मुल्याधारित राजकारणाचा परिचय भारतीय मुस्लिमांनी करून दिल्यास भ्रष्ट राजकारणाच्या घुप्प अंधारात ती एक प्रकाशाची आशेची किरण ठरेल यात किमान मलातरी शंका नाही. ही मुस्लिमांची दुहेरी जबाबदारी आहे. एक धार्मिक तर दूसरी राष्ट्रीय. परंतु त्यांच्याकडून एवढी मोठी अपेक्षा करण्यापूर्वी त्यांचे सध्याचे राजकारण कसे आहे? हे अगोदर पाहू व त्यानंतर ते कसे असायला हवे यावर चर्चा करू.
भारतीय मुस्लिमांचे राजकारण
भारतीय मुस्लिमांचे स्वतंत्र असे राजकारण कधीच राहिले नाही. ते स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये विभाजीत होते. स्वातंत्र्यानंतरही ते तसेच विभागलेले आहे. कथित धर्मनिरपेक्ष (?) पक्ष आणि मुस्लिमांचे राजकारण करणारे पक्ष अशी ही विभागणी आहे. धर्मनिरपेक्ष पक्षात काँग्रेस सहीत बीएसपी, स.पा., आप इत्यादी पक्षांना मुस्लिमांचे मोठे समर्थन प्राप्त आहे. तर मुस्लिम लीग, मजलिस, पीस पार्टी आणि युडीएफ अशा मुस्लिम राजकारण करणाऱ्या पक्षांकडे ही मुस्लिमांचा छोटासा गट आकर्षित झालेला आहे. शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाल्यास मुस्लिमांनी सुद्धा अनेकवेळा भाकरी फिरवून पाहिली पण प्रत्येकवेळा त्यांची भाकरी करपली. कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षांने प्रामाणिकपणे त्यांची साथ दिली नाही. किंबहुना हिंदुत्ववादी पक्षांच्या तुलनेत धर्मनिरपेक्ष पक्षांनीच मुस्लिमांचे अधिक नुकसान केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुस्लिमांचे राजकारण करणाऱ्या पक्षांना सुद्धा फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मुस्लिम बहुल भागापुरतेच त्यांचे राजकारण मर्यादित राहिल्याने त्यांचे यशही मर्यादित राहिलेले आहे. म्हणून राष्ट्रीय राजकारणावर त्यांना आपला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. एकंदरित परिस्थिती अशी आहे की, धर्मनिरपेक्ष पक्ष, मुस्लिमांचे पक्ष आणि काही प्रमाणात हिंदुत्ववादी पक्ष यामध्ये मुस्लिम मतदार विभागले गेलेले आहेत. म्हणून स्वातंत्र्या नंतरच्या मुस्लिम राजकारणाचा गोषवारा पाहता मुस्लिमांच्या वाट्याला निराशाच जास्त आलेली आहे व ती येणे स्वाभाविक आहे. कारण की, कोणत्याही लोकशाहीमध्ये त्याच समाज घटकाचा विकास होतो जो सरकारे बनविण्यामध्ये किंवा पाडण्यामध्ये आपली भूमिका वठवितो. मुस्लिमांचे राजकारण मतदान करण्यापलिकडे गेलेले नाही. म्हणून त्यांचा विकास झालेला नाही.
मुस्लिमांची राजकीय कोंडी
प्रत्येक राजकीय पक्षाने 20 कोटींपेक्षा जास्त संख्येने असलेल्या मुस्लिमांची दखल घेऊ नये हे सहज घडत असेल असे ज्याला वाटत असेल त्याला वाटो पण मला खात्री आहे की हे सहज घडत नाहीये. यामागे ईश्वरीय इच्छा आहे. मुद्दामहून या लोकसमुहाला दंडित करण्याची ही ईश्वरीय योजना असावी, असे समजण्यास भरपूर वाव आहे. कारण की या समुहाला जी पैगंबरीय जबाबदारी दिली गिली होती ती जबाबदारी पार पाडण्यास हा समूह असमर्थ ठरत आहे. आता प्रश्न हा आहे की ती जबाबदारी कोणती? तर कुरआन त्याचे स्पष्ट उत्तर देतो की,
’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा) साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारा पासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.
(सुरे अल ए इमरान आयात क्रमांक :110)
स्पष्ट आहे, वरील प्रमाणे भारतीय मुस्लिमांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली पैगंबरीय जबाबदारी पार पाडण्यात कुचराई केलेली आहे. किंबहुना बहुतेक मुस्लिम यात अयशस्वी ठरलेले आहेत. उलट ते स्वतःच वाममार्गाला लागलेले आहेत. असे कोणते वाईट वर्तन नाही की जे भारतीय मुस्लिमांमध्ये नाही? याचा विचार ज्याचा त्यांनी करावा. कुरआनमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यात ईश्वरीय आदेशाची अवहेलना करणाऱ्या अनेक लोकसमुहांना जबर शिक्षा करण्यात आलेली आहे. उदाहरणा दाखल बनी इस्राईल या जनसमुहाचा उल्लेख पाहूया. हा जनसमुह ईश्वराचा एक लाडका जनसमुह होता. इतका लाडका की, त्यांना ’रिज्क’ (अन्न) कमवावे लागत नसे. ते थेट आकाशातून (मन-सलवा) जमीनीवर अवतरित होत असे. त्या समुहाने जेव्हा ईश्वरीय आज्ञेचा अव्हेर सुरू केला तेव्हा ईश्वराने त्यांचे काय हाल केले, याचे सविस्तर वर्णन कुरआनमध्ये अनेक पानांवर पसरलेले आहे. भारतीय मुस्लिम सुद्धा तीच चूक करत आहेत जी की बनी इसराईलने केली होती. म्हणून एवढ्या मोठ्या जनसमुहाची कोंडी झालेली आहे. ही ईश्वरीय कोंडी आहे. ही तेव्हाच फुटू शकेल जेव्हा भारतीय मुस्लिम हे ईश्वराच्या आदेशाचे मनापासून पालन सुरू करतील व व्यवहारात नैतिकता आणतील आणि मुल्याधारित राजकारण करून जनतेसमोर खरे राजकारण कसे असते याचे उदाहरण प्रस्तुत करतील. आपण असे नाही केले व (ईश्वर न करो) ही पैगंबरीय जबाबदारी पूर्ण करण्यात दुर्दैवाने अयशस्वी ठरलो तर काय होईल याचे उत्तर ही कुरआन आपल्याला देतो.
’’जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही तर काही पर्वा नाही. अल्लाहने त्याला त्याप्रसंगी मदत केली आहे जेव्हा अश्रद्धावंतांनी त्याला काढून टाकले होते. जेव्हा तो फक्त दोनपैकी दुसरा होता, जेव्हा ते दोघे गुहेत होते, तेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता, दुःखी होऊ नकोस. अल्लाह आपल्या सोबत आहे. त्यावेळी अल्लाहने आपल्याकडून त्याच्यावर मनःशांती उतरविली आणि त्याला अशा लष्कराद्वारे मदत केली जे तुम्हाला दिसत नव्हते व अश्रद्धावंतांचे वचन खाली पाडले व अल्लाहचे वचन तर उच्चच आहेच, अल्लाह जबरदस्त, द्रष्टा व बुद्धिमान आहे.’’ (सुरे तौबा बा :40)
भारतीय मुस्लिमांना आपल्या राजकीय जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी कुरआनमध्ये दिलेल्या राजकीय निर्देशांचे पालन करावेच लागेल, तरच ते यशस्वी होतील. हे काम कठीण आहे. म्हणूनच ते करण्यालायक आहे. हे कठीण काम करणाऱ्याला धीर देण्यासाठी ईश्वराने म्हटलेले आहे की, ’’वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही श्रद्धावंत असाल.’’ (सुरे आलेइमरान :139) मुस्लिमांना आपण अल्पसंख्यांक आहोत याचा न्यूनगंड सोडून राजकारणात भरपूर सहभाग नोंदवावा लागेल आणि आपल्या इस्लामी मुल्याधारित राजकारणाची जाणीव देशाला करून द्यावी लागेल. तेव्हाच देशातील राजकारण बदलेल आणि एक कल्याणकारी राजकारण ज्याचे की स्वप्न महात्मा गांधीसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिले होते, ते प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होईल. म्हणून मुस्लिमांनी कुरआनच्या खालील निर्देशावर विश्वास ठेऊन राजकारण करावे की, ’’अनेकदा असे घडले आहे की एक लहानसा गट अल्लाहच्या आज्ञेने एका मोठ्या गटावर प्रभावी ठरला आहे, अल्लाह सहनशील लोकांचा सहाय्यक आहे.’’ (सुरे अल्बकरा : 249)
शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, आम्हा भारतीय मुस्लिमांची राजकीय समज प्रगल्भ करून त्यांना नैतिक राजकारण करण्याची समज आणि शक्ती दे. आमच्या हातून या प्रिय भारत देशाची सेवा घडू दे. (आमीन.) जय हिंद !
- एम. आय. शेख
Post a Comment