राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने....
कोल्हापूर जिल्ह्यात आज दिसत असलेल्या ‘हरितक्रांती’चे खरे प्रणेते राजर्षी शाहू महाराज होत. शिवाय महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीने जी आर्थिक व सामाजिक प्रगती साधली आहे; तसेच इथल्या सामान्यजणांचे जीवनमान उंचावण्याचे जे अदद्भुत कार्य घडले आहे, त्याचे सर्वस्वी श्रेय सुद्धा राजर्षी शाहू महाराजांकडेच जाते. राजर्षींच्या कारकीर्दीतच कोल्हापूर इलाख्यात सन 1912 साली ‘सहकार विषयक कायदा’पारित करण्यात आला. आज सर्वसामान्यांची आर्थिक गंगोत्री म्हणून नावारूपाला आलेली ‘दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक’ आणि काही वर्षांपूर्वी अपना सहकारी बँक या राज्य पातळीवर अग्रेसर असलेल्या सहकारी बँकेत विलीनीकरण झालेली ‘श्री बलभीम को-ऑप बँक’ या सहकारी बँका त्यांच्याच कारकीर्दीत स्थापन झाल्या होत्या. या बँका स्थापन करण्यामागे राजर्षींचे सहकार व आर्थिक चळवळींचे दूरदृष्टीने अंमलात आणलेले कृतीशील विचारच कारणीभूत होते. 1920-21 साली कोल्हापूर संस्थानात एक-दोन नव्हे, तर तब्बल 37 सहकारी सोसायट्या अस्तित्वात होत्या. यावरूनच राजर्षींचे आर्थिक धोरण व त्यासाठीचे कृतिशील प्रोत्साहन प्रकर्षाने लक्षात येते. यासंदर्भात राजर्षींच्या भाषणातून व्यक्त झालेले विचार मोठे बोलके आहेत. ते एका भाषणात म्हणतात, “पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा व अंग मेहनत एकत्र केली पाहिजे. पूर्वी फार तर एक कुटुंब एका ठिकाणी काम करीत व येणारा नफा त्या कुटुंबातील माणसांना उपयोगी पडे, आता ही आपली कुटुंबाची व्याख्या पुष्कळ विस्तृत केली पाहिजे. 10/ 20/25 कुटुंबे उद्योगधंद्यासाठी एक झाली पाहिजेत. आपण सहकार्य करायला शिका. आपली सहकारी पतपेढी काढा, इतकेच नव्हे तर सहकारी कारखाने, सहकारी दुकानेही काढा...”
कोल्हापूर जिल्ह्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्र राज्याच्या आजच्या आर्थिक विकासाला व प्रगतीला कारणीभूत असलेली सहकाराची गंगोत्री राज्यभरात दूथडी भरून वाहत आहे, यांचा वेध घेतला तर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या व विचारांच्या मुळाशी जावे लागते. आपले संस्थान लहान आहे, लोकसंख्या कमी आहे, व्यापार उदीम अल्प प्रमाणात आहे. रयतेला व्यापारी किंवा कारखानदारी विषयक दृष्टिकोन नाही, प्रजा अशिक्षित आहे, तशीच ती चाकोरीप्रधान आहे इ.सर्व गोष्टी राजर्षींना जाणवत होत्या. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी ते रात्रंदिवस विचार करीत. तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या काळातही कात, कॉफी यासारख्या आधुनिक शेतीमधील नवनवीन प्रयोगाला चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेषत: नगदी पिके घेण्यासाठी तसेच परंपरागत, शेती मशागतीच्या पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीही प्रयत्न केला. श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी लोखंडी नांगर तयार करण्याचा कारखाना सुरू केला, मात्र कच्चे-पक्के लोखंड त्यांना मिळत नाही, ही त्यांची अडचण राजर्षीच्या कानावर गेली. त्यांनी ही अडचण लक्षात घेऊन तत्काळ आपल्या संस्थानातील जुन्या ऐतिहासिक तोफा श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना दिल्या. केवळ उद्योग-व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतूनच त्यांनी उदार मनाने हा क्रांतिकारी निर्णय घेतला. पुढे श्री. किर्लोस्करांचा कारखाना भरभराटीस आला. किर्लोस्करांचे संपूर्ण घराणे उद्योगपती म्हणून नावारूपास आले. खेडूत तसेच परंपरागत कापड विणणारे देवांग कोष्टी समाजातील विणकर लोक भविष्यकाळात यंत्रयुगातील यंत्रोत्पादित मालासमोर टिकाव धरू शकणार नाहीत व कापडाच्या वाढत्या मागणीची सक्षम पूर्तता करू शकणार नाहीत, हे राजर्षींच्या दूरदृष्टीने हेरले व कोल्हापूर तसेच शिरोळ येथे कापडाच्या गिरण्या सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण केवळ गिरण्या उभा करून चालणार नाही, त्यासाठी कुशल तंत्रज्ञ व कारागीर यांची निर्मिती करण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले.त्यासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित केले. पुढे या भागात सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या सुरू झाल्या. अर्थात या सूतगिरण्यांच्या निर्मितीमागे राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि विचारच कारणीभूत असल्याचे यामधून दिसून येते. त्यांनी कोल्हापुरात टेक्निकल स्कूलची निर्मिती केली. तसेच या अनुषंगाने छोटे-मोठे उद्योग सुरू व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एक दोघे जण एकत्र येऊन काम करण्यापेक्षा पंचवीस पन्नास जण एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर उद्योग व्यवसाय सुरू केल्यास व्यक्तिगत व सामाजिक प्रगती झपाट्याने होईल याची राजर्षी शाहू छत्रपती यांना जाणिव झाली होती, त्यामुळेच त्यांनी सहकारी चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
कोल्हापूर इलाख्यात इतर अन्नधान्याबरोबरच ऊस मोठ्या प्रमाणात लावला जातो व उसापासून गूळ तयार केला जातो. या गुळाला व्यापक बाजारपेठ आहे हे लक्षात आल्यावर राजर्षींनी गूळ उत्पादनावर भर दिला. गुळाची बाजारपेठ निर्माण केली. मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर उसाचे घाणे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, त्या वेळी उसाच्या घाण्यात शेतकर्यांची बोटे चिरडतात, हे पाहून ते व्यथित झाले. तेव्हा तत्काळ घाण्यात हात सापडणार नाही आणि सापडलाच तर फार मोठी इजा होणार नाही अशा तर्हेचा निर्धोक घाणा तयार करण्यासाठी संस्थानात गॅझेट प्रसिद्ध करविले. माजी एरिगेशन इंजीनिअर मे.शानन यांनी राजर्षीना हवा तसा निर्धोक उसाचा घाणा बनविला. त्याला राजर्षींनी मान्यता दिली तसेच संस्थानातून मोठी बिदागी दिली. सदर घाण्याचा एकेक नमुना शेतकर्यांना तसेच फडकर्यांना पाहण्यास मिळावा म्हणून सर्व पेठांच्या मामलेदार व मालकरी यांच्याकडे पाठविण्यात आला. तसेच अशा प्रकारच्या घाण्याचा किती लोकांची प्रत्यक्ष उपयोग केला व किती लोकांनी केला नाही यासंबंधीची माहितीही वर्ष अखेरीस मागविली. ऊस शेतीसाठी सहकारी तत्त्वावर प्रयोग करून एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा मंत्र संस्थानात रुजविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते.
कोल्हापूरच्या व्यापारपेठेचे ते जनक होत. 1895 साली त्यांनी शाहूपुरी येथे व्यापारी पेठ स्थापन केली. या पेठेत व्यापार पेढ्या काढणार्या व्यापार्यांना मोठमोठ्या आकाराचे प्लॉटस् विनामूल्य दिले. करात सवलती दिल्या. शिक्षण, कार्यालये आदींना आवश्यक असणारी शाईसारखी गोष्ट जर आपल्या संस्थानात तयार होत असेल तर त्याला उत्तेजन देण्यासाठी राजर्षींनी खास आदेश काढले होते. वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगर माथ्यावरील ‘दवणा’ या वनस्पतीपासून अत्तर तयार करण्याचा कारखाना उभा करण्याचाही राजर्षींचा मानस होता. हरी परसू मांग यास सरसाचा कारखाना काढण्यासाठी लागणारे सर्व साहित्य संस्थानातून खरेदी करून देण्याची व्यवस्था स्वत: राजर्षींनी केली. अर्थात, किरकोळ वाटणार्या पण उपयुक्त अशा वस्तूंचे उत्पादन करणारा जो कोणी पुढे येईल त्या त्या सर्वांना राजर्षींनी प्रोत्साहन दिले. त्यामध्ये कारागीर होते, कलावंत, मूर्तिकार, चर्मकार, टायपिस्ट, यंत्रे निर्मिती करणारे आदी लहान-मोठ्या उद्योगांना त्यांनी आपल्या संस्थानातून आर्थिक सहाय्य केले. राजर्षांच्या आर्थिक धोरणांचे व व्यवहाराचे प्रतिबिंब स्पष्टपणे त्यांच्या कार्यात दिसून येते. वास्तविक उद्योगधंदे काढणे व चालविणे हे राजाचे काम नाही अशा विचारांचा प्रभाव असलेला तो काळ होता, उद्योग, व्यवसाय, धंदे, व्यापार आदी आर्थिक व्यवहार वाढविण्याचे काम शासनाचे नाही असे तत्कालीन परिस्थितीत मानले जाई. ब्रिटिश सरकारचे धोरणसुद्धा यापेक्षा वेगळे नव्हते. भारताची औद्योगिक प्रगती व्हावी असे ब्रिटीशांना वाटत नव्हते, अशा काळात राजर्षीचे आर्थिक संपन्नतेविषयीचे विचार आणि सहकारांविषयीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भाषणातील उतारे त्यांचे आर्थिक धोरण स्पष्ट व अधोरेखित करतात. ते म्हणतात... “आर्थिक संपन्नता औद्योगिकीकरणावर अवलंबून आहे. लोकांनी मात्र एकत्र येऊन सहकारी कारखाने, सहकारी संस्था व सहकारी बाजारपेठांची व्यवस्था राबविली पाहिजे. कोल्हापूर संस्थान त्याकरिता सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे'."
या भाषणातील राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला ‘सहकार’ या शब्दावरील भर अतिशय महत्वाचा आहे. याहूनही संस्थान सर्व प्रकारची मदत देण्यास तयार असल्याचा त्यांचा अंतरीचा उमाळा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले पिताश्री श्री. जयसिंगराव यांच्या स्मरणार्थ त्यांनी ‘जयसिंगपूर’ ही नवी वसाहत सुरू केली. निपाणी-शिरोळ, सांगली-मिरज-कुरुंदवाड- इचलकरंजी या विभागाचा जयसिंगपूर हा केंद्रबिंदू व्हावा, व्यापार-उद्योगाचे ते प्रमुख ठिकाण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. एका दृष्टीने ब्रिटिश मुलूख व विविध संस्थाने यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘जयसिंगपूर’ व्हावे, या नव्या वसाहतीला सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, दळणवळणाची साधने व सोयी उपलब्ध व्हाव्यात, वसाहतीची रचना आदर्श असावी अशी संकल्पना त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने मांडली व ती वास्तवात साकारली. यासंबंधी काढलेल्या हुकूमनाम्यामध्ये राजर्षी शाहू महाराज स्पष्ट करतात की, ‘जयसिंगपूर वसाहतीमध्ये व्यापार, धंदा लवकरच वाढून वसाहतींची भरभराट होऊन लोकांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात अशी फार इच्छा आहे. वसाहतीसंबंधी प्रत्येक बाबींबद्दल हकीकत घेऊन पुढील तजवीज ठेवीत जावे...!’ राजर्षींच्या या उदार आर्थिक धोरणासंबंधीच्या कृती-कल्पना आणि प्रत्यक्ष हुकूमनाम्यावरुन त्यांचे समाजोपयोगी विधायक अर्थकारण स्पष्ट होण्यास साहाय्यभूत होते. आज कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा वाढलेल्या पसारा व या सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्य शेतकरी तसेच कामगार वर्गाचे उंचावलेले राहणीमान पाहिले की, राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे निश्चितच कौतुक करावेसे वाटते.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारतसरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ‘करवीर काशी’चे संपादक आहेत.)
Post a Comment