अजानविषयी अतिशय संतुलित संवैधानिक भुमिका घेणे गरजेचं आहे. पण याविषयी दोन्ही बाजुंनी अतिशय टोकाच्या भुमिका घेतल्या जात आहेत. सगळ्याच धर्मस्थळांवरचे लाऊड स्पीकर्स बंद करून टाकायचे, फटाके, डिजे, वाजंत्री, टाळ, मृदंग यावर सरसकट बंदी आणून टाकायची, अजिबात ध्वनी नावाचा प्रकारच देशात नको, ही अतिरेकी भुमिका एकीकडे.
दुसरीकडे सण उत्सवांच्या नावाने कानफाडू डिजे लावायचे, फटाके फोडायचे, भोंग्यांचं तोंड करून उंच मोठ्या आवाजात अजान म्हणायची ही टोकाची भुमिकाही चुकीची आहे. तर यातला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे. कोणत्या साउंड झोनमध्ये किती डेसीबलपर्यंतच्या ध्वनी मर्यादा हव्या, सायलेन्स झोन (दवाखाने, शाळा परिसर) मध्ये किती, औद्योगिक परिसरात किती याचा सगळा चार्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) तर्फे पुढीलप्रमाणे निश्चित केलेला आहे -
1) औद्योगिक परिसर - दिवसा 75, रात्री 70 डेसीबल्स
2) व्यावसायिक परिसर - दिवसा 65, रात्री 55 डेसीबल्स
3) नागरी वस्तींचा परिसर - दिवसा 55, रात्री 45 डेसीबल्स
4) सायलेन्स झोन - दिवसा 50, रात्री 40 डेसीबल्स.
अशाप्रकारे या मर्यादांच्या चौकटीत राहून, इतर सर्व प्रशासकीय औपचारिकतांची पूर्तता करून प्रत्येक धर्मस्थळाच्या व्यवस्थापन समित्यांनी ध्वनिक्षेपक वापरले पाहिजे. सरकारनेही एका मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या निर्मितीवरच बंदी आणली पाहिजे. आणि हो, जनतेला काडीचाही फायदा नसणाऱ्या राजकीय सभा घेणाऱ्यांनीही न्यायालयाच्या मर्यांदांचे पालन करण्याची गरज आहे. सरकारने याबाबतीत धर्मदाय संस्थांमध्ये जनजागरण करण्यासाठी तशी पत्रके उपलब्ध करुन दिली पाहिजे. सरकार, धर्मदाय संस्था, सीव्हिल सोसायटी आणि पोलीस प्रशासन मिळून मार्ग काढू शकतात. ध्वनी प्रदुषण नकोच, ते आरोग्यासाठी घातक आहेच, पण त्यासोबतच हे वास्तव पण स्वीकारलं पाहिजे की, भारत हा संस्कृतिप्रधान देश आहे, सुरीला, स्वरमय देश आहे. येथे अजान, भजन, त्रीशरण, गुरुबानी होणारच अन् ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरात होणारच. वेगवेगळ्या मोहोल्ल्यातील मस्जिदींमध्ये स्थानिक लोकांच्या वेगवेगळ्या सवलतीप्रमाणे सामुदायिक नमाजच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यांचं वेळापत्रक ॠतुमानानुसार दर महिन्याला थोडं थोडं बदलत असतात. त्यामुळे कोणत्या मस्जिदीत सामुदायिक नमाजची कोणती वेळ आहे, ते दुसऱ्या मोहोल्यातून आलेल्या किंवा रस्त्यात जाता जाता वेळ झाल्यावर नमाज पढणाऱ्यांना माहिती असणे शक्य नाही. या अडचणही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून देशाचा जातीय सलोखा क़ायम राखण्यासाठी मध्यम मार्ग काढणे आवश्यक आहे.
मस्जिदीवरच्या स्पीकर्सचं महत्व त्या मातेला विचारा, जिचं लेकरू हरवल्यावर मस्जिदिंच्या माईकवरून सुचना मिळाल्यावर तीचं लेकरू तीला सापडलं होतं. महत्वाचं म्हणजे मुस्लिमांनीही अजानचं मराठी, हिंदी व इतर भाषेत भाषांतर करून ते मुस्लिमेतर लोकांना समजाऊन सांगितले असते तर त्यांना कदाचित अजान कर्कश वाटली नसती.
Post a Comment