इस्लामची उपासनेविषयी धारणा इबादत/इस्लामी उपासनेचा सर्वसाधारणपणे हाच अर्थ घेतला जातो की, पाच वेळा नमाज अदा केली जावी, वर्षातून एक महिना रोजा पाळला जावा,जकात दिले जावे, आणि आयुष्यातून एकदा हज यात्रा केली जावी. इस्लामी उपासणा विषयक श्रद्धेचा हा एक अंश मात्र आहे. कारण इस्लाम धर्मात उपासनेची व्याख्या इतकी व्यापक व विस्तृत आहे की, यात माणसाच्या सर्व जीवन व्यवहारांचा समावेश होतो. इबादत माणसाच्या त्या सर्व कार्यक्षेत्रापर्यंत व्याप्त आहे, मग त्यांचा संबंध माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी असो किंवा सामाजिक जीवनाशी जे ईश्वराला पसंत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इबादत म्हणजे अल्लाहच्या प्रसन्नते खातर त्याने दाखविलेल्या पद्धतीनुसार केले गेलेले एखाद्या व्यक्तीचे कोणतेही काम किंवा कथन.अशा प्रकारे यात श्रद्धा तत्वे,सामाजिक रीतिरिवाज आणि कोणत्याही सजीवांच्या हितासाठी त्यांनी उचललेला वाटा या सर्व गोष्टी सम्मिलित आहेत.
इस्लाम माणसाचा संपूर्ण विचार करतो. माणसाने स्वतःला सर्वतोपरी अल्लाहच्या स्वाधीन करावे,ही इस्लामची निकड आहे. कुरआन निवेदनानुसार हजरत मुहम्मद सलम यांना घोषणा करायला सांगितले गेली, हे मुहम्मद सांगा माझी नमाज, माझी कुर्बानी,माझे जगणे माझे मरणे सर्व अल्लाहला समर्पित आहे. त्याचा कोणीही सहभागी नाही आणि मला हा आदेश दिला गेला आहे की, मी त्याचा अज्ञाधारक मुस्लिम बनून राहावे. या समर्पणाचा स्वभाविक परिणाम असा होतो की, माणसाचे सर्व जीवन व्यवहार त्याच्याकरिता प्रधान ठरतात ज्यास त्याने स्वतःला वाहून घेतले आहे.
जीवन व्यवस्थेत पोषक असण्याच्या नात्याने ईस्लाम आपल्या अनुयायांकडून ही अपेक्षा बाळगतो की, त्यांनी आपले जीवन इस्लामच्या शिकवणीच्या प्रकाशात सर्व दृष्टीने आदर्श बनवावे. हा व्यक्तिगत मामला माणसाचा ईश्वराशी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्याचा एक मार्ग आहे. खरे पाहता, इस्लाम कर्मकांडावर जोर देत नाही जे यंत्रवत पार पाडले जातात आणि एखाद्या माणसाच्या अंतरात त्याचा कसलाही प्रभाव पडत नाही. कुराण म्हणतो.
सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अंतिम दिवसावर इमानधारण करतात तसेच सर्व दूतांवर.
सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितावर इमान धारण करतात. ईश्वर प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी संकटे व युद्धप्रसंगी देखील संयम राखतात हेच लोक सत्यशील आणि अल्लाहच्या कोपाचे भय बाळगणारे आहेत.
उपरोक्त सर्व सत्कर्म सत्कर्मी लोकांचे कर्म होत आणि ते उपासनेचा ते एक भाग आहेत.
प्रेषित मुहम्मद सल्ल यांनी उपासनेचा आधार असलेल्या इमाना विषयी फर्मावले आहे, की याच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी सर्वात उच्च एका ईश्वरावर इमान ठेवणे आहे. अर्थात अल्लाह खेरीज दुसरा कोणीही ईश्वर नाही आणि सर्वात खालची शाखा म्हणजे माणसाने मार्गातील अडथळे दूर करणे आहे.
प्रत्येक शालींनता पूर्णकाम इस्लाम मध्ये एक प्रकारे उपासना आहे .
प्रेषित मुहम्मद सलम् यांनी सांगितले संध्याकाळी ज्या कोणा माणसाला काम केल्यामुळे थकवा जाणवला अल्लाह त्याच्या अपराधाना माफ करील तसेच ज्ञान प्राप्त करणे ही उपासनेची सर्वाधिक उच्चतम पातळी आहे. पैगंबर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. आणखी एका वचनात त्यांनी सांगितलं ज्ञान प्राप्त करण्यात एक तास घालवणे सत्तर वर्ष उपासना करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. एकमेकाविषयी दया दाखवणे आणि सहयोग देणे हा उपासनेचा भाग आहे, हेतू मात्र अल्लाहाला प्रसन्न करण्याचा असला पाहिजे. प्रेषित सल्लम यांनी सांगितले मित्राचे हसतमुखाने स्वागत करणे देखील दान आहे. जनावरावर ओझे लादताना एखाद्याला हातभार लावणे हे देखील दान आहे. एखाद्या शेजाऱ्याला विहिरीमधुन पाणी काढून देणे हे सुद्धा दान आहे.
निसंशय एखाद्या व्यक्तीचे कर्तव्यपालन ही सुद्धा उपासना हे पैगंबर सल्लम यांनी येथ पावेतो सांगितले की, एखादा माणूस जो काही आपल्या कुटुंबावर खर्च करतो ते सुद्धा एक प्रकारे पुण्यकर्म आहे. त्याला त्याचा मोबदला मिळेल जर त्याने उचित मार्गाने कमाई प्राप्त केली असेल. आपल्या कुटुंबा विषयी दयाभाव दाखविणे हा देखील उपासनेचा अंश आहे. आपल्या पत्नीच्या तोंडात घास भरवणेहे सुद्धा पुण्यकर्म आहे उत्तम दान आहे. एवढेच नव्हे तर ती कामे देखील जी आम्ही अधिकाधिक आनंद घेण्यासाठी करतो जर ती पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार केली गेली तर त्यांचाही उपासनेमध्ये समावेश होतो.
प्रेषितांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, आपल्या पत्नीशी ते जो समागम करतात त्याचाही मोबदला मिळेल. सहकाऱ्यांना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले आम्हाला या कामा बद्दल कशाप्रकारे इनाम मिळेल, आम्ही अधिकाधिक आनंद भोगण्या करता करतो. त्यावर प्रेषिताने सांगितले समजा जर तुम्ही आपली वासनापुर्ती अयोग्य मार्गाने केली असती तर काय तुम्हाला त्याची शिक्षा मिळाली नसती. हो निश्चितच, सहकार्याने उत्तर दिले.
तेंव्हा उचित आहे आपल्या पत्नी द्वारे गरजपूर्ती करण्याबद्दल तुम्हाला इनाम मिळाले पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टीचा उपासनेमध्ये समावेश होतो.
इस्लाम समागमाला घाणेरडी गोष्ट समजत नाही की त्यापासून अलिप्त राहावे. ते कृत्य घाणेरडे व अपराधाचे काम अशावेळी बनते जेंव्हा या गरजेची पूर्तता योग्य मार्गाने आणि वैवाहिक जीवनापासून वेगळे होऊन केली जाते.
उपरोक्त चर्चेने ही गोष्ट स्पष्ट झाली की,इस्लाम धर्मात उपासना विषयीच्या धारणेची व्याप्ती फार मोठी आहे.यात माणसाच्या सर्व स्वीकृत हालचालींचा अंतर्भाव होतो. इस्लामी जीवन जगणे ही उपासनाच आहे. तिच्याभोवती संपूर्ण मानवी जीवन व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, आर्थिक, राजकीय आणि अध्यात्मिक जीवन फिरत राहते.
या पैलूंनी विचार केल्यास उत्साह वाढीस लागतो.
आमचे प्रत्येक कार्य अल्लाहच्या नजरेत आहे आम्ही त्याच्या मर्जीनुसार कार्य केले तर ती उपासना ठरते. अशा प्रकारे कोणत्याही मनुष्याला अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता अधिकाधिक चांगल्या शैलीत काम करण्याचा उत्साह आपल्या अंगी जाणवतो,आणि इथूनच तो स्वतःला वाम मार्गा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्नही करतो.
विधिपूर्वक उपासना अंतर्गत वा बाह्य इस्लाम मध्ये दोन्ही गोष्टीचे महत्त्व आहे खरे तर ज्या कामांना विधिपूर्वक करण्यास सांगितले गेले आहे ते केवळ एवढ्यासाठी कि जर ती मनःपूर्वक केली गेली तर त्याने मनुष्य नैतिक दृष्ट्या उन्नत होतो आणि अशा प्रकारे योग्य तेस पोहोचतो की अल्लाहच्या प्रसन्नते पूर्ण जीवन जगु लागतो. विधिवत दर्शविलेल्या कर्तव्यामध्ये नमाजला दोन कारणांनी मौलिक महत्त्व प्राप्त आहे.
एक असे की हे इमान प्रतीक आहे दुसरे असे की नमाज आपल्या अदा करणाऱ्यांचा संबंध ईश्वराशी दिवसातून पाच वेळा जोडून त्याला प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मा पासून रोखतो जेंव्हा तो नमाज मध्ये वारंवार असे पठण करतो की, हे अल्लाह आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडूनच सरळ मार्गावर चालण्याची मदत मागतो तेंव्हा तो ईश्वराशी आपला संबंध नव्याने जोडतो निसंशय इमान चे पहिले प्राथमिक प्रात्यक्षिक नमाज आहे आणि इमान बाळगणाऱ्यांना यशासाठी गुरुकिल्ली देखील आहे. नमाज नंतर जकात इस्लामचा अति महत्त्वाचा स्तंभ आहे कुराणामध्ये सर्वसाधारणतः नमाज आणि जकातचा एकाच वेळी उल्लेख केला गेला आहे. नमाज प्रमाणेच जकात देखील या विश्वासाची अभिव्यक्ती आहे की, केवळ ईश्वरच या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. त्याने माणसाच्या ताब्यात जे काही देऊन ठेवले आहे, ती त्याची अनामत आहे. जिचा माणसाने अल्लाहच्या आदेशानुसार उपयोग करावा.
श्रद्धा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि खर्च करा त्या वस्तू पैकी ज्यावर त्याने तुम्हाला नायब नियुक्त केले आहे. अशा प्रकारे जकात देखील नमाज प्रमाणे अशी उपासना आहे की, इमान बाळगणाऱ्यांना अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करून देते. या खेरीज जकात संपत्तीच्या विकेंद्रीकरणाचे एक साधन आहे. जे वर्ग आणि समूहामध्ये अंतर मिटवते सामाजिक दृढता निर्माण करण्यात जकातचा महत्त्वाचा वाटा आहे. श्रीमंतांना स्वार्थीवृत्ती पासून हटवून आणि निर्धनाचे समाजविरोधी निर्माण होणाऱ्या द्वेष भावनेपासून जतन करून जकात वर्गसंघर्षाच्या उद्रेकास पायबंद घालते आणि बंधूत्व व प्रेम भावना वृद्धिंगत करते ही दृढता धनिकांच्या स्वतःच्या इच्छेवर आधारित नाही. किंबहुना जर त्यांनी इन्कार केला तर, बलपूर्वक त्यांच्याकडून वसुली केली जाते. रमजानचे रोजे देखील महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. रोजाचे मूळ कार्य मुसलमानास आतून स्वच्छ शुद्ध करणे आहे. या वृत्तीने चांगल्या-वाईटातला तारतम्य भाव जागृत होतो आणि हाच आशय कुराणमध्ये पुढील आयतीतून दिसून येतो.
“हे श्रद्धावंतानो विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यावर जेणेकरून तुम्ही इश परायान व्हाल.”
एका सही हदीस मध्ये प्रेषित सल्लम यांनी सांगितले, “हा रोजा पाळणारा माझ्याकरिता खाणे-पिणे आणि समागमेच्छेचा त्याग करतो. म्हणूनच त्याचा मोबदला माझ्या जबाबदारीवर आहे”. रोजा माणसाची चेतना शक्ती जागृत करतो आणि एकाच वेळेस संपूर्ण समाजात भलाईचे संचलन करतो. अशाप्रकारे माणसात एक शक्ती संचारते त्यासोबतच रोजा कामाच्या ओझ्याने लादलेल्या मानव यंत्रास संपूर्ण महिनाभर पुरेपूर आराम देतो. रोजा माणसाला अशा गरजवंताकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करतो जे संपूर्ण जीवन किंवा वर्षभर आपल्या गरजा भागविण्यासाठी तळमळत राहिले. रोजा मुळेच इतरांच्या दुःखाची जाणीव होते आणि माणसाच्या अंगी इतरांबद्दल सहानभुती दयाभाव उत्पन्न होतो.
शेवटी हजकडे वळू या हा देखील इस्लामच्या महत्त्वपूर्ण स्तंभा पैकी एक आहे. इस्लामचा हा स्तंभ प्रबल एकतेचे धोतक आहे. जो प्रत्येक प्रकारचा भेदभाव मीटवतो. जगातल्या कानाकोपऱ्यातून आलेले मुसलमान सारखीच वेशभूषा असलेले एका स्वरात एकाच भाषेत हजच्या हाकेला प्रत्युत्तर देताना म्हणतात लबैक अल्लाहुम्मा लबैक ,मी हजर आहे हे माझ्या अल्ल्हा मी हजर आहे.
हज मध्ये आत्मनियंत्रणावर विशेष भर दिला गेला आहे. या प्रसंगी केवळ पवित्र वस्तुंचाच आदर राखला जातो किंबहुना रोपे आणि चिमण्यांच्या जीवनाशी ही कसल्याही प्रकारे छेडछाड केली जात नाही. यासाठी की प्रत्येक वस्तू वा जीव सुरक्षित व शांतीपूर्वक जगावा. समस्त जगातील मुसलमानांच्या प्रत्येक समूहाला वर्ग संघटनांना आणि शासनांना हज या गोष्टीची संधी उपलब्ध करून देतो की, वर्षभरातून एक वेळ त्यांनी या मोठ्या संमेलनात सहभागी व्हावे या महान संमेलनाचा समय आणि कार्यक्रम अल्लाह द्वारे निश्चित केला गेला आहे. प्रत्येक मुसलमानास संपूर्ण संरक्षण व स्वातंत्र प्राप्त असते. त्या वेळे पर्यंत की त्याने स्वतः आपल्या स्वातंत्र्यास आघात पोहोचवू नये. अशाप्रकारे इस्लाम मध्ये इबादत, उपासना विधीपूर्वक असो वा नसो माणसाला अशा रीतीने प्रशिक्षित केले जाते की, त्याने आपल्या कर्तव्याशी प्रेम करावे आणि आपल्या अंगी एवढे सामर्थ्य एकवटावे की त्याने मानव समाजातील वाईट गोष्टींचा नाश करावा आणि जगात ईश्वराच्या वाणीस व शिक्षणास उन्नत करावे.
संकलक
- अब्दुल मजीद खान
नांदेड, 9403004232
Post a Comment