हजरत अब्दुल्लाह इब्ने मसऊद म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की ‘‘अल्लाहने मानवांमध्ये जशा प्रकारे उपजीविकेचे संसाधने वाटून दिली आहेत तशाच प्रकारे नैतिकतादेखील वाटून दिलेली आहे. अल्लाह या जगातील साधनं सर्वांना देतो. ज्यांना ते प्रिय असतात आणि त्यांनादेखील ज्यांना तो पसंत करत नाही. पण ज्यांच्याशी तो आपुलकीचा व्यवहार करतो त्यांनाच केवळ धर्माच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याची बुद्धिमत्ता देतो. ज्यांना अल्लाहने धर्माची समज दिली तो अल्लाहला अधिक प्रिय असतो. ज्याच्या हाती माझे प्राण आहेत त्या अस्तित्वाची शपथ! कुणीही व्यक्ती मुस्लिम होऊ शकत नाही, जोपर्यंत त्याचे हृदय आणि जीभ मुस्लिम होत नाही. आणि कुणीही श्रद्धावंत होऊ शकत नाही जोपर्यंत त्याचा शेजारी त्याच्या अन्याय-अत्याचारापासून सुरक्षित राहत नाही. जो व्यक्ती निषिद्ध माल खातो अल्लाह त्याला बरकत देत नाही. हराम मालामधून त्यांनी जर दान केले तरी त्याचा अल्लाह स्वीकार करणार नाही. जर असा व्यक्ती हराम माल सोडून जगातून उठून गेला तर त्याचा माल त्याला नरकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या कामी येईल. अल्लाह दुष्टांपासून दुष्टतेचा बिमोड करत नाही तर दुष्टतेला भल्या पद्धतीने संपवतो.’’
हजरत सौबान (र.) यांच्यानुसार प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की ‘‘जो पैसा तुम्ही आपल्या मुलाबाळांच्या संगोपनावर खर्च करता त्याचा मोबदला जास्त दिला जाईल. आणि जी रक्कम एक संघर्षकारी आपल्या स्वारीवर खर्च करतो, ज्याच्यावर स्वार होऊन तो संघर्ष करत असतो.’’ यानंतर प्रेषित (स.) म्हणतात की ‘‘अशा माणसापेक्षा अधिक मोबदल्यास पात्र कोण असू शकतो जो आपल्या लहान मुलांची काळजी घेतो. तसे केले नसते तर त्यांच्यावर उपासमारीची आणि इतरांकडून मागून खाण्याची पाळी आली असती.’’ (मुस्लिम, तिरमिजी)
जे अन्न माणूस स्वतः खातो, जे अन्न तुम्ही आपल्या मुलांना खायला देता, तसेच जे अन्न तुम्ही आपल्या पत्नीला देता, हे सर्व दान करण्यासारखेच आहे. (तरगीब व तरहीब, संदर्भ- अहमद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जो व्यक्ती अनाथ मुलांच्या खाण्यापिण्याची सोय ते सज्ञान होईपर्यंत करतो, असा व्यक्ती नक्कीच स्वर्गात जाईल आणि जो व्यक्ती एका मुस्लिम गुलामाची सुटका करेल तो व्यक्ती स्वर्गात जाईल. अशा गुलामाच्या प्रत्येक अवयवाच्या बदल्यात त्या गुलामाची सुटका करणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येक अवयव नरकापासून सुरक्षित राहील.’’ (तरगीब व तरहीब, मुसनद अहमद)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
Post a Comment