Halloween Costume ideas 2015

रमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी


खरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी, मजूर, मालक, चालक, संचालक या सर्वांना इशपरायणतेची नित्तांत गरज आहे. कारण इशपरायणतेविना रयतेचे हेच शासक, प्रशासक व रक्षक, राष्ट्राचे राक्षस सिद्ध होऊ शकतात. 

सत्य,न्याय, वचनपालन, विश्वासपात्रता, सहानुभूती, दया, करुणा, उदारता, धैर्य, सहनशीलता, दृढनिश्चय, गंभीरता, धाडस, हिम्मत शौर्य, आत्मसंयम, स्वाभिमान, सौजन्य, एकनिष्ठता, दक्षता, कर्तव्य तत्परता शिस्त, सहकार्य, समन्वय, सहयोग, समता, बंधुता, सेवा संघटन संघर्ष इत्यादी ही सर्व मानवी जीवनाचे सुंदर व स्वीकृत घटक आहेत. यांना व्यक्तिमत्वाचे सद्गुण म्हणून ओळखले जाते. या मानवी सद्गुणांचा समावेश व्यक्तिच्या चारित्र्यामध्ये होतो. मानवी सद्गुणाचे व्यक्तीच्या विचार व वर्तनामध्ये परीवर्तन होण्याच्या क्रियेला चारित्र्य म्हणतात. साध्या व सरळ भाषेत याला माणुसकीसुद्धा म्हणतात.

चारित्र्य हा मानवी जीवनाचा केवळ स्थायी, स्तब्ध व साहित्यीक भाग नव्हे तर सक्रिय व व्यावहारिक वर्तन होय. म्हणून मानवी चारित्र्याचा स्तर वृंद्धींगत व विकसीत करण्याच्या प्रक्रियेला चारित्र्य संवर्धन म्हणतात. विचार व वर्तनामध्ये सकारात्मक परीवर्तन होत राहणे ही चारित्र्य संवर्धनाची ओळख आहे. वांंड्.मयीन भाषेत याला नैतिकता तर व्यावहारिक वर्तनात याला सदाचार म्हणतात. ही बाब सर्वमान्य आहे की, मानवी सद्गुणांचा विचारांमध्ये स्विकार आणि आचरणामध्ये अंगीकार केल्याशिवाय मानवी स्वभाव व वर्तनास पूर्णत्व व स्थायित्व प्राप्त होत नाही. 

चारित्र्य संवर्धनाचे स्वरूप हे जग आणि जीवनाच्या मुलभूत विचारसरणीशी निगडीत असते. प्रत्येकाच्या जीवनात एकवेळ अशी येते की, ऐकणारे कान, अवलोकन करणारे डोळे आणि संवेदनशील हृदयात चिंतन करणारे मन विचार करते की मी ज्या जगात जगत आहोत याचा निर्माता कोण? मग तो एक की अनेक? त्याचे गुण दोष कोणते? माझा त्याच्याशी संबंध काय? त्याने माझ्या गरजा व मार्गदर्शनाची काय व्यवस्था केली आहे? माझे त्याच्याप्रती काय उत्तरदायित्व आहे? माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? मृत्यू माझ्या ऐहिक जीवनाचा अंत आहे पण मरणोपरांत सुद्धा जीवन आहे का? असेल तर कसे? 

विशाल विश्वामध्ये भ्रमण करणारे अगणित ग्रह, तारे आणि सृष्टीतील विविध व असंख्य चराचर निर्मिती ग्वाही देते की, हे जग अनाथ नाही. या जगाचा नाथ तो एकमेव निर्माता आहे जो सकलजणांचा पोशिंदा आहे. त्यानेच मानवाला जीवन प्रदान केले की, जेणेकरून माणसाची परीक्षा घ्यावी. यासाठी निर्मात्याने आपल्या प्रेषितांद्वारे मानवाला भक्तीचा एकमेव जीवनमार्ग दाखविला. भक्तीसंबंधी निर्मात्याचं आज्ञापण आहे की, माणवाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ईश्वरीय आदेशांचे पालन करावे. कारण ऐहिक जीवनाच्या प्रगतीचा व पारलौकिक जीवनात मुक्तीचा एकमेव मार्ग हाच आहे. ज्याला समर्पण अर्थात इस्लाम म्हणतात. 

रमजान महिन्यामध्ये दिव्य कुरआनचे अवतरण समस्त मानवांसाठी मार्गदर्शक आहे. हा ग्रंथ स्पष्ट पुराव्यांसह सत्य-असत्याची कसोटी आहे. या महिन्यासंबंधी ईश्वरीय आदेश आहे की, श्रध्दावंतांनी महिनाभराचे उपवास करावे. जेणेकरून त्यांना इशपारायणता प्राप्त व्हावी. केवळ ईश्वराची मर्जी संपादन करण्याकरीता, सत्कर्मास तत्पर राहणे व दुष्कर्मापासून स्वतःस दूर ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजे इशपरायणता होय. याला अरबी भाषेत तक़वा म्हणतात. इशपरायणतेची धारणा मानवी मनामध्ये स्वतःबद्दल कर्तव्याची, समाजासंबंधी परोपकाराची आणि ईश्वराप्रती उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करते. इशपरायणता मानवाच्या विविध सद्गुनांमध्ये समन्वय व सातत्य निर्माण करणारी विशेष नैसर्गिक संवेदना आहे. ही संवेदना मानवामध्ये हा विश्वास जागृत व उत्तेजित ठेवते की, माझे कर्म कोणी पाहो न पाहो माझा ईश्वर मात्र पाहत आहे आणि पारलौकिक जीवनात माझ्या कामाचं मूल्यांकन होणार आहे. इशपरायणतेची ही भावना उन्हाळ्यात उपवास करणाऱ्या लहान (उर्वरित आतील पान 7 वर)

मुलांमध्ये जेव्हा जागृत होते तेव्हा चोरून खाण्यापिण्याची संधी असतांनासुद्धा ते आपली तहान-भूक शमवीत नाहीत. कारण  घरातील कोणी पाहो न् पाहो पण माझा प्रभू मला पाहत आहे. हा त्यांचा दृढ विश्वास आहे. 

छोट्या मुलांची ही इशपरायणता जर समाजाच्या मोठ्यांमध्ये निर्माण झाली तर प्रत्येकाचे चारित्र्य उज्ज्वल आणि प्रदूषित समाजाचे स्वरूप निखळून प्रफुल्लित होऊ शकते. खरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी, मजूर, मालक, चालक, संचालक या सर्वांना इशपरायणतेची नित्तांत गरज आहे. कारण इशपरायणतेविना रयतेचे हेच शासक, प्रशासक व रक्षक, राष्ट्राचे राक्षस सिद्ध होऊ शकतात. ईश्वरी आदेशाप्रमाणे सदाचाराचा अंगीकार व दुराचाराचा नकार करण्याकरिता जागतिक पातळीवरील एक महिन्याच्या सामुदायिक प्रशिक्षणात सामील होऊन सुद्धा जर कोणी, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वैराचार, व्याभिचार व दुराचाराचा मार्ग सोडत नसेल तर हे फार मोठे दुर्भाग्यच समजावे लागेल. प्रेषित मुहम्मद (सल्लम) म्हणतात, ’’जो कोणी उपवास असून सुध्दा खोटे बोलणे व खोटे वर्तन सोडत नसेल तर अल्लाहला याची काहीच गरज नाही की त्याने विनाकारण आपले खाणेपिणे सोडून द्यावे. धन्यवाद !   

- बशर इनामदार, 

रायगड 

8806567086  


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget