Halloween Costume ideas 2015

रमजानचे रोजे का ठेवले जातात..?


आमच्या पैकी ज्या कोणाला हा पवित्र रमजान महिना मिळाला तर त्याला पाहिजे की या महिन्याचे रोजे (उपवास) ठेवावे.’’ (2:185). सर्वप्रथम सर्व भारतीय बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा ! कारण हा महिना सर्व मानवजातीकरिता आहे. परंतु काहीच लोक आहेत जे या महिन्याचा लाभ घेतात तर . काही लोकांना या महिन्याचे विषयी कुतुहल असते की काय असते रमजान?, रोजे कसे व का ठेवतात? या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात देण्याचा प्रयत्न करेन...

रमजान कुरआन अवतरणाचा महिना. कुरआन इस्लामचा आधार आहे. इस्लामची तत्वे, नीतिमूल्ये, उपासना, इमान, आदेश आणि उपदेश तसेच अन्य शिकवणीचा स्त्रोत असणारा ग्रंथ आहे. इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यावर या ग्रंथाचे अवतरण रमजान महिन्यात सुरू झाले. पुढील 23 वर्षे या ग्रंथाचे अवतरण होत राहिले. मात्र सुरुवात रमजान महिन्यात झाली म्हणून या महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. किंबहुना हे महत्व अल्लाहतर्फेच निर्धारित करण्यात आले आहे.

रमजान महिन्यात कुरआनच्या अवतरणासंदर्भात कुरआनात आलेली आयत अशी आहे की, ’’रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुरआन अवतरीत केले गेले; जे मार्गदर्शक आहे समस्त मानवजातीसाठी. ज्यात मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण आणि सत्य-असत्यादरम्यान फरक करणारे निकष आहेत. तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी या महिन्याला  प्राप्त करेल, त्याने रोजांचे पालन करावे. (सुरह बकरा : आयत 185)

वरील आयाती मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, हा कुरआन संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत करण्यात आला आहे फक्त मुस्लिम लोकांसाठी  नाही, परंतु आमचे दुर्दैव हे की, आम्ही कुरआन ला फक्त मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजून बसलो आहोत. त्यामुळे कुरआन कधीच आपण वाचले नाही.

अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्वाचा ठरतो. दिवसाच्या ठराविक वेळेचे काही लाभ असतात. सकाळी केलेले व्यायाम शरीरासाठी अन्य वेळी केलेल्या व्यायामापेक्षा लाभदायक ठरते. रात्रीच्या झोपेचे लाभ दिवसाच्या कोणत्याही वेळची झोप घेऊन प्राप्त केले जाऊ शकत नाहीत. तसेच अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यातून प्राप्त होणारा अध्यात्मिक लाभ अन्य कोणत्याही महिन्यात प्राप्त केला जाऊ शकत नाही. म्हणूनच अल्लाहतर्फे या महिन्याची निवड विशेष उपासनेसाठी करण्यात आली. ’रोजा’ अल्लाहची विशेष उपासना आहे. अल्लाहप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी ही उपासना केली जाते. एखादी व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनःपूर्वक या महिन्याच्या उपासनाविधी पार पाडते, तेव्हा अभूतपूर्व आत्मिक शुद्धी अनुभवते.

तरावीह (रात्रीत थांबून नमजपठण)

या महिन्यात जगभरात मुस्लिमांतर्फे महिनाभर रोजांचे पालन केले जाते. विशेषतः नमाज ’तरावीह’ च्या माध्यमातून महिन्याभरातून संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. रोजा आणि तरावीहची विशेष नमाज या महिन्यातील उपासनेचे अत्यंत महत्वाचे अंग आहेत. या व्यतिरिक्त रमजानच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात दानकार्य केले जाते. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) या महिन्यात वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यापेक्षा जास्त दानशूरता दाखवीत असत. म्हणून धर्माचरण करणारे मुस्लिम अनुयायी जगभरात मोठ्याप्रमाणात दानकार्य करतात. सदका, खैरात, फित्रा आणि जकात सारख्या अनेक स्वरूपात गरजूंना आणि वंचितांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

नातेवाईकां सोबत सदव्यव्हार

या महिन्यात नातेवाईकांवर विशेष लक्ष देण्यात येते.तसेच आपल्या शेजाऱ्यांना उपवासाच्या पूर्वी घरचे जेवण देवाण घेवाण करतात. तसेच लहान मुलांनी रोजा ठेवला तर त्याला रोजा खुलाई म्हणतात आणि त्याला सर्व परिसरातील बांधव पैसे आणि कपडे बनवितात त्यामुळे लहान मुलांना खूप मजा वाटते. 

दया व करुणा

तसेच हा महिना प्रेम आणि वात्सल्याचा आहे. जर कोणत्या बांधवाला कोणीही कर्ज दिले असेल आणि त्याला देण्याची ऐपत नसेल तर त्याला सवलत दिली जाते आणि कोणी-कोणी तर माफ सुद्धा करून टाकतात. आणि सहानुभूतीने वागतात.

आत्मचिंतन

रमजान महिन्यात श्रद्धा आणि चिंतन मनन सोबत जर कोणी रोजे ठेवले तर त्याचे मागील पाप माफ करण्यात येतात. त्यामुळे या महिन्यात सर्व इमानधारक मागील वर्षात कोणत्या चुका केल्या किती वाईट आणि चांगले कार्य केले याचे चिंतन, मनन करीत असतात आणि आपल्या वाईट कृत्या वर अल्लाह समोर दया याचना करून पापाचे प्रायश्चित्त करून घेतात. म्हणूनच तुम्ही पहाल की जो 11 महिने काही वाईट कृत्य करीत असेल तर या महिन्यात ते करत नाही कारण त्याला रोजा असतो तर रमजानचे हेच उद्देश आहे. 

मुस्लिमांना 11 महिन्यांसाठी अश्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते की त्यांनी वर्षभर अशाच प्रकारे आपले जीवन इमानदारीने अल्लाहचे भय बाळगून जगावे आणि एक समाजउपयोगी मनुष्य निर्माण व्हावा हा रमजानचा उद्देश आहे.

मागे झालेल्या वाईटकृत्यांची क्षमायाचना

माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे. कळत नकळत त्याच्या हाताने अनेक चुका होत असतात आणि त्या स्वाभाविक आहेत. परंतु चुकीला चुक समजणे हा सुद्धा एक नैतिकगुण आहे. म्हणूनच पवित्र रमजान महिन्यात प्रत्येक रोजा धारण करणारा इमानधारक बांधव आपल्या मागील कृत्यावर चिंतन करून त्याची अल्लाहसमोर उभे राहून क्षमायाचना करतो. रात्रीला उठून आपण केलेल्या वाईट कृत्यांवर पश्चाताप करून समोर असं वाईट कृत्य न करण्याचा निर्धार करतो. त्यामुळे त्याला एक नैतिक सकारात्मक बल प्राप्त होते आणि रोजांचा उद्देश सुद्धा हाच आहे की मानवाला नैतिकता शिकवून आदर्श समाज निर्माण करणे. जो की कोणत्याही कृत्याचा जाब द्यायचा आहे या भीतीने पुढील 11 महिने आपले जीवन जगावेत.

माझ्या बंधूंनो! अल्लाह कडून आपल्या सर्वांना हा महिना मिळाला आहे त्याचे खूप मोठे उपकार आहेत. असेही होऊ शकते की, पुढचा रमजान आपल्यातील काही लोकांना मिळणारसुद्धा नाही. त्यामुळे या मिळालेल्या संधीचा उपयोग करून याच महिन्यात पवित्र कुरआन आपल्या भाषेत वाचण्याचा निश्चय करा आणि या महिन्यातच आपल्या मराठी भाषेत कुरआन वाचा जर मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत कुरआन वाचण्याची ईच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मोफत घरपोच कुरआन पोहोचवू त्यासाठी माझ्या वरील नंबरवर पत्यासह एक मॅसेज करावा किंवा कॉल करावा.

धन्यवाद....!


- प्रा. सलमान सय्यद, 

पुसद.,9158949409


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget