सर्व सृष्टीच्या निर्मात्याकडून मानवालाच सर्वांत उच्च स्थान, श्रेष्ठत्व, विचार करण्याची शक्ती, चांगल्या-वाईटाची जाण, सदसद्विवेक बुद्धी मिळाली. आज आधुनिकतेच्या जगात आम्ही ग्लोबल वॉर्मिंग तंत्रज्ञानात, वैज्ञानिक स्पर्धात्मक युगात वावरणारे आम्ही बलाढ्य भारत देशाचे नागरिक प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहोत, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची व मान उंचावणारी आहे.
आम्ही समाजात राहतो म्हणजे स्त्री-पुरुष सर्व कुटुंबच राहतो. पण कुटुंबाचा एक आधारस्तंभ, समाजवृक्षाचे मूळ, कुटुंबाला सुसंस्कारी करणारी, माहेर-सासरची ज्योत ही स्त्रीच! हे निर्विवाद सत्य आहे. स्त्री उच्चशिक्षित होत आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. पण ती कितपत सुरक्षित आहे, हा फार मोठा प्रश्न आहे.
स्त्रीशिवाय समाज अपूर्ण आहे. समाजाला घडविण्याचे, दिशा देण्याचे सामर्थ्य स्त्रीच्या अंगीच. म्हणून तिला संस्काराची खाण, घराची स्वामिनी, महान स्त्री शिक्षित झाली, परंतु तिला समाजात दुय्यम स्थान का? तिला आजही समस्यांचे गाठोडे का समजले जाते? तिला पाश्चिमात्यांच्या भूलथापांना का बळी पडावे लागत आहे? स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीच का बदलली आहे? तिला तिच्या अधिकारांपासून का वंचित ठेवले जात आहे? असे एक नाही अनेक प्रश्न आमच्यापुढे उभे आहेत.
आज स्त्री-अत्याचाराची मालिका ही तिला जन्माला येण्यापूर्वीपासून सुरू होते. आईच्या गर्भातच स्त्री-अर्भक फुलण्याआधीच खुडले जाते. तिला जगण्याचा अधिकार संपवला जातो. स्त्री-भ्रूणहत्या हा समाजाला मोठा कलंक लागलेला आहे. संसारात पत्नी हवी, आई हवी, भावाला बहीण हवी, मग स्त्री-जन्म का नको? आईच्या पायाखाली स्वर्ग! मग का बरे तिची ही दुर्दशा?
सध्या अत्याचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून हत्या, अॅसिड हल्ले, छेडछाड, महिला शोषणाचा वाढता आलेख हे सर्व पाहून काळजाचा थरकांप उडतो. वासनांध तिच्या शरीराची राखरांगोळी करत आहेत. अमानुश पाशवी कृत्ये मोठमोठ्या शहरी भागातच नाही तर खेडोपाडीदेखील घडत आहेत. प्रति मिनिटाला अशा क्रूर घटना घडत आहेत. बलात्कारपीडित तरुणीचा करुण अंत झाल्यावर त्याविरोधात देशभर अल्पकाळ पडसाद उमटतात. कॅंडल मार्च, निदर्शने आयोजित होतात, पण त्या तरुणीचे काय? तिचे संपूर्ण आयुष्यच भस्म झालेले असते. अशा अत्याचारातून ती वाचली तरीही समाजाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. अतिशय कठीण परिस्थितीत तिला जीवन जगावे लागते. न्यायासाठी तिला दीर्घकाळ वाट पाहावी लागते. ते सर्व सहन न झाल्याने शेवटी ती टोकाची भूमिका घेते.
दुसरे म्हणजे आज कौटुंबिक हिंसाचाराचा डोंब उसळत आहे. उच्चशिक्षित स्त्री ही आज आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बाहेर पडते. नोकरी करत घरची जबाबदारी सांभाळत तिची खूप तारांबळ उडते. मुलांकडे दुर्लक्ष होते. पैशासाठी घरात भांडण-तंटे उद्भवतात. त्यात एखादा पती व्यसनी असेल तर संसाराची दुर्दशा व्हायला वेळच लागत नाही. कॉलसेंटर, सॉफ्वेअर कंपनीत काम करणाऱ्या स्त्रिया रात्रभर कानाला फोन लावून कार्य करतात. रात्री बेरात्री कामावर रुजू होण्यासाठी तिला विवश केले जाते. काही वेळा तर ऑफिसातील सौंदर्य बनून तिला राहावे लागते. अनेकांना देहविक्री करून हॉटेल्स, क्लब्स, बारमध्ये काम करावे लागते. पैशासाठी कलह वाढतात. तिला मारहाण देखील होते. जाळले जाते. तिला शारीरिक, मानसिक, शाब्दिक छळाला बळी पडावे लागते. माणसाला माणुसकीच्या दर्जावरून पतन करणारी दारु, नशा सुद्धा हिंसाचाराला कारणीभूत ठरते. आज तर मॉलमध्ये काय किंवा किराणा दुकानात, सर्रास दारु विक्री होत आहे. संसाराची राखरांगोळी करणारी दारु समाजाला पोखरून टाकत आहे. भावी पिढीच नष्ट होत आहे. जेव्हा एखादा तरुण नशा करतो तेव्हा त्याच्या वाईटाचा सामना प्रथम एका स्त्रीलाच करावा लागतो. जवळपास ७० टक्के बलात्काराच्या घटना या दारुच्या नशेतच होतात. आता खुलेआम दारुविक्री सुरू आहे. त्यामुळे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. म्हणून फ्री-मिक्सिंग, स्वैराचार, विवाहबाह्य संबंध याला आळा घालणे आवश्यक आहे.
दुसरी अत्यंत घृणास्पद गोष्ट म्हणजे कुटुंबात हुंड्याच्या नावावर स्त्रीचे शोषण केले जाते. हुंड्यासाठी वधूची पिळवणूक सारे काही आपण पाहत आहोत. हुंडा घेणे वा देणे दोन्ही समाजघातक रोग आहे. तो समाजाला पोखरत चालला आहे. हुंडा घेऊन विवाह करणे म्हणजे स्वतःला गुलाम बनवून स्वतःची विक्री करून घेणे होय. विवाह एक आदर्श बंधन हे अतिशय सोप्या पद्धतीनेच पार पडायला हवेत.
आपल्या भारत देशात जलदगती न्यायालये आहेत. स्त्री-समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. स्री-भल्यासाठी मोफत सल्ला केंद्र, जिल्हा व तालुका स्तरावर आहेत. ह्युमन राइट कमिशन, नॅशनल उमेन कमिशन इत्यादी संस्थांद्वारे प्रयत्न केले जाऊ शकतात. डावरी अॅक्ट १९६१ नुसार हुंडा घेणे वा देणे कायद्याने गुन्हा आहे. विवाह योग्य वेळी व अतिशय सोप्या पद्धतीनेच व्हावेत.
पवित्र ईशग्रंथ कुरआनातील अध्याय २ मधील १८७ क्रमांकाच्या आयतीत म्हटले आहे की “स्त्रिया तुमच्यासाठी पोषाख आहेत. आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोषाख आहात.”
स्त्रीला दुय्यम वागणूक न देता तिचे अधिकार अबाधित राखून संसाररुपी जीवन आनंदाने जगता येईल.
- डॉ. आयेशा पठाण
नांदेड मो. ९६६५३६६४८९
Post a Comment