औद्योगीकरण, शहरीकरण, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी झाडांची अंदाधुंद कत्तल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर उपसा, प्लास्टिक, इंधन आणि कागद यांचा अतिवापर, मोठ्या प्रमाणावर ई-कचऱ्याची निर्मिती आणि जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा अभाव, अन्नाची नासाडी, विजेचा दुरुपयोग यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडले आहे. प्रदूषणामुळे जगभरात जीवघेणा आजार वाढत आहे, मानवी सरासरी आयुर्मान कमी होत आहे आणि वन्यजीव, पक्ष्यांची संख्या देखील कमी होत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सातत्याने वाढ, सोबतच रासायनिक कचरा आणि प्लास्टिकमुळे ओझोन थर, पक्षी, जलचर प्राण्यांनाही नुकसान होत आहे. संसाधनांची गरज आणि स्टेटस सिम्बॉल यातील फरक न समजणे मानवी जीवनासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
वायू प्रदूषण:- स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्टनुसार, वायू प्रदूषण हा अकाली मृत्यूसाठी जगातील चौथा प्रमुख जोखीम घटक आहे. भारतातील अंदाजे 12.5 टक्के मृत्यूचे कारण हवेचे प्रदूषण आहे. स्टेट ऑफ इंडिया च्या पर्यावरण अहवालात असे आढळून आले आहे की वायू प्रदूषण दरवर्षी पाच वर्षांखालील सुमारे 1 लाख मुलांचे प्राण घेतो. वायुप्रदूषणामुळे भारतात जन्मलेल्या मुलाचे सरासरी आयुर्मान किमान 1.5 वर्षांनी कमी होण्याचा अंदाज आहे; 2019 मध्ये, 1.16 लाख भारतीय शिशुंचा मृत्यू झाला. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ इफेक्ट्स अँड हेल्थ मॅट्रिक्स असेसमेंटच्या तज्ञांद्वारे दरवर्षी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, 2019 मध्ये 4.5 दशलक्ष मृत्यू बाहेरील वायू प्रदूषणाशी संबंधित होते. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश, भारत आणि चीन, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचा सर्वाधिक खर्च सहन करत आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, जागतिक लोकसंख्येपैकी 90 टक्क्यांहून अधिक लोक प्राणघातक हवेत श्वास घेत आहेत. सुमारे 91% अकाली मृत्यू कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले आणि सर्वात मोठी संख्या दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिकमध्ये झाली.
प्लास्टिक कचरा:- प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 1,000 वर्ष पर्यंतचा कालावधी लागू शकतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नुसार, देशात दररोज 25,940 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. जगात दर मिनिटाला भरलेल्या ट्रकचा वजनाबरोबरचा प्लॅस्टिक कचरा समुद्रात प्रवेश करतो. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम नुसार दरवर्षी 300 दशलक्ष टन प्लास्टिक तयार केले जाते, सर्व प्लास्टिक पैकी फक्त 9% रिसायकल केले जाते, 12% जाळले जाते आणि उर्वरित 79% लँडफिल किंवा पर्यावरणामध्ये मिसळून जातात. जगभरात दर मिनिटाला दोन दशलक्ष प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. गार्डियनच्या अहवालात असे आढळून आले आहे की जगभरात प्रत्येक मिनिटाला 1 दशलक्ष प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतल्या जातात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील 1,350 प्रमुख नद्यांमधून महासागरात टाकण्यात येणारा 88-95% प्लास्टिक कचरा आशिया आणि आफ्रिकेतील फक्त 10 नद्यांमधून येतो. सरासरी, प्रत्येक व्यक्ती वर्षाला 70,000 मायक्रोप्लास्टिक्स खातो. 100 अब्ज प्लास्टिक पिशव्या तयार करण्यासाठी 12 दशलक्ष बॅरल तेलासह 2018 मध्ये 150 दशलक्ष टन सिंगल-यूज प्लास्टिकने 750 दशलक्ष टन कार्बन तयार केला. भारतातील प्लास्टिक कचरा 2015-16 मध्ये 15.89 लाख टन होता, जो 2019-20 मध्ये दुप्पट होऊन 34 लाख टन झाला असून गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक 21.8 टक्के वाढ झाली आहे.
जल प्रदूषण:- डब्ल्यूएचओ च्या मते, 78.5 कोटी लोकांना पिण्याच्या पाण्याची मूलभूत सेवा देखील नाही, जागतिक स्तरावर, किमान 2 अब्ज लोक सांडपाण्याने दूषित पाण्याचा वापर करतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, कॉलरा, अतिसार, उलट्या, टायफॉइड, ताप, त्वचारोग, पोटाचे आजार इत्यादी रोग होतात आणि दरवर्षी 4.85 लाख अतिसारामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, 2025 पर्यंत, जगातील निम्मी लोकसंख्या पाण्याची कमतरता असलेल्या भागात राहणार आहे आणि भारतातील पाण्याच्या मागणीत 70% पेक्षा जास्त वाढ होईल. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018 मध्ये भारतातील 351 प्रदूषित नद्यांची ओळख केली आहे, जलद शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे ही समस्या आणखी वाढली आहे.
बायोमेडिकल कचरा:- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 रुग्णांच्या निदानात्मक क्रियाकलाप आणि उपचारांमुळे भारत आत्तापर्यंत दररोज सुमारे 146 टन जैव-वैद्यकीय कचरा निर्माण करत होता. जून 2020 ते 10 मे 2021 दरम्यान, भारताने 45,308 टन कोविड-19 बायोमेडिकल कचरा तयार केला. भारताने 2020 मध्ये दररोज 677 टन जैववैद्यकीय कचरा निर्माण केला, तर 2019 मध्ये दररोज 619 टन जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला. 2015 मध्ये, भारतात बायोमेडिकल उत्पादन दररोज 502 टन होते.
ई-कचरा:- 'ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर' नुसार, 2019 मध्ये जगभरात 53.6 दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण झाला, त्यापैकी फक्त 17.4% रिसायकल झाला. चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा सर्वात मोठा ई-कचरा उत्पादक देश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या अहवालानुसार, 2019-2020 या आर्थिक वर्षात भारताने 1,014,961 टन ई-कचरा निर्माण केले, जे 2018-2019 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32% अधिक ई-कचरा आहे. भारतात दरवर्षी साधारणपणे 18.5 लाख टन ई-कचरा निर्माण होतो.
जंगले:- भारतातील 24.4 टक्के भूभाग जंगले आणि झाडांनी व्यापलेला आहे, तरी हे जगाच्या एकूण भूभागाच्या केवळ 2.4 टक्के आहे, भारतातील लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती/चौरस किलोमीटर आहे आणि त्यावर 17 टक्के मानवी लोकसंख्या व 18 टक्के गुरांची संख्येच्या गरजा पूर्ण करण्याचा दबाव आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत 188 देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरातील सुमारे 1.60 अब्ज लोक त्यांच्या उपजीविकेसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. नेचर जर्नलच्या अहवालात दावा केला आहे की दरवर्षी जगभरात आपण सुमारे 15.3 अब्ज झाडे गमावत आहोत त्यापैकी केवळ 5 अब्ज झाडे लावली जातात, अर्थातच दरवर्षी 10 अब्ज झाडांचे नुकसान थेट आपल्याला सहन करावे लागते. जगात दरडोई झाडांची संख्या 422 आहे, तर भारतात एका व्यक्तीचा वाट्यात फक्त 8 झाडे आहे.
भेसळ आणि अशुद्ध अन्न:- फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालाने चिंताजनकपणे उघड केले आहे की 2018-2019 मध्ये 28% अन्न नमुने भेसळयुक्त होते आणि हे 2012 च्या तुलनेत दुप्पट भेसळ आहेत. असे सांगितले जात आहे की प्रत्येक चार खाद्यपदार्थांपैकी एक भेसळ आहे. 2013 मध्ये, फूड सेन्ट्री अहवालाच्या आधारे, 111 देशांमधून घेतलेल्या 3,400 सत्यापित अन्न सुरक्षा नमुन्यांपैकी 11.1% सह भारताला अन्न उल्लंघनकर्ता म्हणून शीर्ष स्थान देण्यात आले. अशुद्ध अन्नामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत असे 200 हून अधिक रोग होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात, अंदाजे 600 दशलक्ष, 10 पैकी 1 लोक - दरवर्षी अशुद्ध अन्नामुळे आजारी पडतात, परिणामी 4.2 दशलक्ष मृत्यू आणि 33 दशलक्ष निरोगी जीवन वर्षाचे नुकसान होते. जगात दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक, ज्यापैकी 1.5 दशलक्ष लहान मुले आहेत, दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजाराने मरतात; त्यापैकी सुमारे 7 लाख एकट्या दक्षिण आशियाई देशांतील आहेत.
नैसर्गिक आपत्ती:- युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या अहवालानुसार, भारतातील नैसर्गिक आपत्तींच्या 321 घटनांमध्ये 79,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 108 कोटी लोक प्रभावित झाले आहेत. जगभरातील इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा पुरामुळे जास्त नुकसान झाले आहे आणि चीननंतर भारत हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला दुसरा देश आहे. भारतात दरवर्षी सरासरी 17 पूर येतात, ज्यामुळे सुमारे 345 दशलक्ष लोक प्रभावित होतात. चक्रीवादळ, भूस्खलन, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी आणि पूर यांमुळे देशातील निसर्गासोबतच प्राणांना देखील गंभीर नुकसान होते.
ग्लोबल वॉर्मिंग:- अलिकडच्या वर्षांत अत्याधिक उष्णतेच्या लाटांमुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, अंटार्क्टिकाने 1990 पासून जवळपास चार ट्रिलियन मेट्रिक टन बर्फ गमावला आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर आपण जीवाश्म इंधने आपल्या सध्याच्या गतीने खर्चत राहिलो, तर पुढील 50 ते 150 वर्षांत समुद्राची पातळी अनेक मीटरने वाढू शकते आणि जगभरातील किनारी समुदायांचा नाश होऊ शकतो. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि हवामान बदल-संबंधित पूर तीव्र होत असताना, समुदायांना त्रास होऊन मृतांची संख्या वाढत आहे. डब्ल्यूएचओ च्या मते, जर आपण आपले उत्सर्जन कमी करू शकलो नाही, तर 2030 ते 2050 दरम्यान, हवामान बदलामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 2.5 दशलक्ष अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता आहे आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष लोकांना गरिबीत ढकलले जाईल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जगभर समाजाचे शत्रू, स्वार्थी माणसे गिधाडप्रमाणे जीवन देणाऱ्या निसर्गाला संपवण्यासाठी तयार आहेतच.
-डॉ. प्रितम भी. गेडाम
भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041
Post a Comment