लातूर
जीआयआये (गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन) कडून 17 एप्रिल रोजी महिला पोलीस व विद्यार्थीनींसाठी दावते इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. विविधतेत एकता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात महिला पोलीस व महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉ्नटर, प्राध्यापक महिलांनी उपस्थिती लावून दावते इफ्तारचा आस्वाद घेतला व इस्लामला जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
लातूर येथील अपना बाजार अंबाजोगाई रोड येथील कॉन्फ्रन्स हॉलमध्ये रविवारी संध्याकाळी नयनरम्य वातावरणात इफ्तार पार्टीचे आयोजन संध्याकाळी 4 ते 7.30 दरम्यान करण्यात आले होते. विशेष म्हणजे 20 पेक्षा अधिक महिला पोलीसही या कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाला संबोधित करतांना डॉ. सिमीन शहापुरे यांनी सांगितले की, ’’रमजानच्या उपवासाचा अर्थ फक्त अन्न, पाण्याच्या त्यागाने साध्य होत नाही तर त्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा रोजा ठेवणे अपेक्षित आहे. डोळ्याने वाईट न पाहणे, तोंडाने वाईट न बोलणे, हाताने वाईट कृत्य न करणे, पायाने वाममार्गाला न जाणे हे सर्व करून त्या उपर ईश्वराची विशेष भक्ती करणे अपेक्षित आहे. यातूनच ईशपरायणता प्राप्त होते. रमजानचे महत्व दोन गोष्टीमुळे आहे. एक गोष्ट या महिन्यात कुरआनच्या अवतरणाला सुरूवात झाली आणि दूसरी या महिन्यात शब-ए-कद्र नावाची एक रात्र येते. जी की हजार महिन्यांपेक्षाही जास्त महत्वाची असते. ती रात्र रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांतील विषम तारखेच्या पाच रात्रींपैकी एका रात्रीत असते. म्हणून या महिन्यात कुरआन पठणावर जास्त जोर दिला जातो. मात्र त्याला समजून वाचणे ही गरजेचे आहे. रमजानचा महिना हा भक्तीभावाने उपासणा करण्याचा महिना आहे आणि मोठ्या प्रमाणात या महिन्यामध्ये लोक फक्त उपासनाच करत नाहीत तर दानपुन्यही करतात.
त्यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तराची संधी देण्यात आली. तेव्हा उपस्थित महिलांकडून हिजाब, तलाक, बहुपत्नीत्व व इस्लामी शिकवणीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. ज्यांची अचुक उत्तरे जमाअतच्या महिला शाखेच्या सदस्या आजरा खान यांनी व जीआयओच्या सदस्या हिफ्जा नवल तसेच डॉ. सिमीन यांनी दिले. कार्यक्रमाचे संचलन हिफ्जा नवल यांनी केले. इफ्तारपूर्वी प्रार्थनेत सुरे रहेमान प्रोजे्नटरवर दाखवण्यात आले. त्यानंतर सामुहिक इफ्तार करण्यात आला.
या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती खलंग्रे म्हणाल्या की, मी स्वतः दोन-तीन रोजे केले आहेत. डॉ. सोनाली (बीडीएस) यावेळी म्हणाल्या की, त्यांना इथे येवून आपल्या मैत्रीनींसोबत जलपान केल्यासारखे वाटत आहे. पोलीस कॉ. प्रणिता मुसणे यांच्या 11 वर्षीय मुलीने पहिल्यांदा रोजा ठेवला होता. सोमय्या या मुलीचा जीआयओतर्फे सत्कार करण्यात आला. श्रीमती सोनाली यांनी या ठिकाणी येवून चांगली माहिती मिळाली आणि बरेच गैरसमज दूर झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ’’इस्लाम आणि स्त्री’’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी जीआयओ अध्यक्षा जाजीया खानम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात 150 मुलींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाची संकल्पना विविधतेत एकता ही होती. जी या कार्यक्रमामध्ये जीवंत झाल्यासारखी दिसली.
या कार्यक्रमास विशेष उपस्थिती कॉक्सीट महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांची होती. मुस्लिमेत्तर मुलींनी जीआयओच्या मुलींना दिवाळी फराळासाठीही आताच आमंत्रन दिले. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ही एक विद्यार्थीनींची संघटना आहे. जी शाळां-महाविद्यालयांमध्ये मुलींमध्ये नैतिक मुल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.
Post a Comment