(९०) पाहा, आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परतून या, नि:संशय माझा पालनकर्ता फार दयाळू आहे आणि स्वनिर्मित सजीवांवर प्रेम करणारा आहे.’’१०१
(९१) त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे शुऐब (अ.)! तुझ्या पुष्कळशा गोष्टी तर आम्हाला कळतच नाहीत१०२ आणि आम्ही पाहतो की तू आमच्या दरम्यान एक दुर्बल मनुष्य आहेस, तुझी जातबिरादरी नसती तर आम्ही तुला केव्हाच दगडांनी ठेचून मारले असते. तुझे सामर्थ्य तर इतके नाही की तू आम्हाला जड जावास.’’१०३
(९२) शुऐब (अ.) ने सांगितले, ‘‘बंधुनो! माझे कुटुंब तुमच्यावर अल्लाहपेक्षा वरचढ आहे काय की तुम्ही (कुटुंबाची भीती बाळगता आणि) अल्लाहला पूर्णपणे पाठीमागे टाकता? समजून असा की जे काही तुम्ही करीत आहात ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही.
(९३) हे माझ्या समाजातील लोकांनो! तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा. आणि मी माझ्या पद्धतीने करीत राहीन, लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कुणावर अपमानजनक प्रकोप ओढवतो आणि कोण खोटा आहे. तुम्हीही प्रतीक्षा करा आणि मीदेखील तुमच्याबरोबर वाट पाहात आहे.’’
१०१) म्हणजे अल्लाह निर्मम आणि पाषाणहृदयी नाही. त्याला आपल्या निर्माण केलेल्या निमिर्तीशी काही एक शत्रुत्व नाही. त्याला वाटेल तशी शिक्षा देत राहावी आणि दासांना मारून मारूनच तो प्रसन्न होतो असे मुळीच नाही. तुम्ही आपल्या उदंडतेत जेव्हा सीमा पार करता आणि बिघाड करतच जाता, तेव्हाच अल्लाह तुम्हाला शिक्षा देतो. अन्यथा त्याची स्थिती अशी आहे की तुम्ही कितीही अपराध करा परंतु जेव्हा आपल्या कर्मांवर लज्जित होऊन त्याच्याकडे परटून याल तेव्हा त्याच्या कृपेचा वर्षाव तुमच्यासाठी असेल. कारण अल्लाह आपल्या निमिर्तींशी असीम प्रेम करतो. या विषयाला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दोन सुंदर उदाहरणाने स्पष्ट केली आहेत. एक उदाहरण म्हणजे तुमच्यापैकी एखाद्याचा उंट वाळवंटात हरवला आणि त्याच्या खाण्यापिण्याचे सामान त्याच उंटावर आहे आणि तो उंटाला शोधता शोधता थकून गेला आहे. जीवनापासून निराश होऊन तो एका झाडाच्या सावलीत पडला होता तेवढ्यात अचानक तो उंट त्याच्यासमोर येतो. त्या वेळी त्याला जो अत्यानंद होतो त्यापेक्षा अनेक पटीने खुशी अल्लाहला होते जेव्हा एखादा भटकलेला दास परतून त्याच्याकडे येतो. दुसरे उदाहरण यापेक्षाही अधिक प्रभावकारी आहे. माननीय उमर (रजि.) सांगतात की एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत काही युद्धकैदींना पकडून आणण्यात आले. त्यांच्यापैकी एक स्त्री होती जिचा दूधपिता लहान बालक सापडत नव्हता. ती आपल्या ममतेने इतकी व्याकुळ झाली की एखादे बालक दिसले की त्याला आपल्या छातीशी लावून दूध पाजू लागते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या स्त्रीची दशा पाहून आम्हाला विचारले, "काय तुम्ही आशा करू शकता की ही आई आपल्या बाळाला स्वत:च्या हाताने अग्नीत फेकून देईल? आम्ही सांगितले, "कदापि नाही, स्वत: फेकून देणे तर लांबचे पण बाळ रडत असेल तर त्याला आपला जीव धोक्यात घालून वाचवेल." पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, "अल्लाहची दया आपल्या दासांवर याहून अनेक पटीने अधिक आहे जी दया ही आई आपल्या बालकासाठी ठेवते."
विचार केल्याने हे स्पष्ट होते की तो अल्लाहच आहे ज्याने मुलांच्या पालनपोषणासाठी आईवडिलांच्या मनात प्रेम उत्पन्न केले आहे. अल्लाहने त्या प्रेमाला निर्माण केले नसते तर आई आणि वडिलापेक्षा मुलाचा जास्त कट्टर शत्रू दुसरा कोणी नसता. कारण हेच सर्वात जास्त कष्टदायक त्यांच्यासाठी आहेत. आता कोणालाही कळेल की जो अल्लाह आईची ममता आणि वडिलांचे प्रेम निर्माण करणारा आहे, त्याच्यात आपल्या दासांसाठी किती असीम प्रेम असेल.
१०२) हे कळत नव्हते कारण आदरणीय शुऐब (अ.) यांची वेगळी भाषा होती. वार्तालाप सरळ आणि सोपाच होता आणि त्याच बोली भाषेत होता. परंतु लोकांची मनं इतकी वक्र झाली होती की ते शुऐब (अ.) यांची सरळ व सोपी भाषासुद्धा समजू शकत नव्हते. जे लोक पक्षपात आणि मनोकामनाच्या दासतेत कट्टरपणे ग्रस्त होतात आणि विशेष धारणेवर परिपक्व होतात, ते असे आपल्या मनाविरुद्धचे काहीच ऐकू शकत नाहीत. ऐकले तरी त्यांना कळत नाही की ही कोणत्या जगाची गोष्ट बोलली जात आहे.
१०३) हे नजरेसमोर ठेवा की हीच परिस्थिती या आयती अवतरण होताना मक्का शहरात होती. त्या वेळी कुरैशचे लोक याचप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या रक्ताचे तहानलेले झाले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन संपवून टाकावे हे त्यांचे ध्येय होते. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर हात टाकण्यास ते भीत होते कारण बनू हाशिम हे त्यांचे सहाय्यक होते. शुऐब (अ.) आणि त्यांच्या राष्ट्राची ही घटना कुरैश आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी जोडून सांगितली जात आहे. पुढे पैगंबर शुऐब (अ.) यांचे बोधप्रद उत्तर नक्कल केले गेले आहे. त्याचा अर्थ होतो, "हे कुरैशच्या लोकांनो! तुम्हालासुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून हेच उत्तर आहे."
Post a Comment