Halloween Costume ideas 2015

शांततेसाठी प्रबोधनाची गरज


आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे व असे संबंध देशभरात आहेत, परंतु असे संबंध जेव्हा सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवतो व त्यामुळे आपण त्यांना वेगळे वाटतो. हा वेगळेपणा जर बहुसंख्य बांधवांना पावलो पावली उपयोगी ठरत असेल तर ते त्याचा विरोध करणार नाहीत. अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच तसे नैतिक जीवन जगत नाही जसे की कुरआनला अपेक्षित आहे. मग दुसऱ्यांसमोर ते कसे मांडणार? 


कुछ अजनबी से लोग थे कुछ अजनबी से हम

दुनिया में हो न पाये शनासा किसी से हम

गळवादी जीवन शैलीमुळे नैतिकता, करूणा, त्याग, माणुसकी हे विषय इतके मागे पडलेले आहेत की, आज या विषयावर बोलणे / लिहिणे मागासपणाचे लक्षण ठरत आहे. माणसे इतकी स्वार्थी झालेली आहेत की, हजारो वर्ष जीवंत राहिलो तरी आपण एक दिवस निश्चितपणे मरणार याचा जवळपास सर्वांनाच विसर पडलेला आहे. आजूबाजूच्या घटनांचा सुक्ष्म परिणाम प्रत्येकावर नकळतपणे होत असतो. म्हणूनच आजूबाजूच्या चंगळवादी जीवनशैलीचा सुक्ष्म परिणाम भारतीय मुस्लिमांवरही झालेला आहे. त्यामुळे इतर समाजापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या मुख्य कर्तव्याचाच त्यांना विसर पडलेला आहे. परिणाम समोर आहे. देशात दिवसेंदिवस सांप्रदायिक वातावरण मुद्दामहून तापविण्यात येत आहे. रामनवमी सारख्या शांततापूर्ण सणात सुद्धा निघालेल्या मिरवणुकीमधून अनेक ठिकाणी हिंसा झालेली आहे. अगोदर विनापरवाना मिरवणूक काढायची व ती मुद्दामहून मुस्लिम वस्त्यांतून न्यायची, वाटेत येणाऱ्या मस्जिदींसमोर डीजे लावून डान्स करायचा, प्रसंगी मस्जिदीवर गुलाल टाकायचा हे सर्व प्रकार कमी होते की काय म्हणून यावेळी मस्जिदीच्या मिनारीवर चढून तिथे भगवे झेंडे लावण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत. या सर्वांसाठी प्रत्यक्षात जे लोक ही कृती करीत आहेत व पोलीस शांतपणे पाहत आहे आणि देशाचे नेतृत्व गप्प आहे. या सर्वांची मानसिकता समजून घेतल्याशिवाय यावर उपाय योजने शक्य नाही. या सर्वांची एकच मानसिकता आहे ती ही की, त्यांना प्रामाणिकपणे असे वाटते की, मुस्लिमांचे अस्तित्व हे त्यांच्या आणि देशासाठी फक्त अनुपयोगीच नव्हे तर धोकादायक आहे. म्हणून ते कधी लव जिहाद, कधी हिजाब, कधी उर्दू, कधी हलाल मांस, कधी तीन तलाक, कधी आतंकवाद, कधी आक्रमणकर्त्या मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहास (ज्यांच्याशी स्थानिक मुस्लिमांचा काहीही संबंध नव्हता.), कधी मदरसे तर कधी मस्जिदीचा विषय काढून मुस्लिमांना या ना त्या प्रकारे हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांची इस्लाम विषयीची चुकीची धारणा जेवढी कारणीभूत आहे तेवढीच ती धारणा चुकीची होईल इथपर्यंत वाट पाहणारे आणि तशी ती धारणा होऊ नये यासाठी काहीही प्रयत्न न करणारे 20 कोटी मुसलमानही कारणीभूत आहेत. मुळात जोपर्यंत आपल्या वाणी, लेखणी आणि वर्तणुकीतून मुस्लिम समाज बहुसंख्य बांधवांना आपण देशासाठी व त्यांच्यासाठी उपयोगी आहोत हे दाखवून देत नाही. तोपर्यंत हे असेच चालत राहणार. जसे पाणी उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करून काही उपयोग होत नाही तसेच एकदा का जातीय दंगली सुरू झाल्या की दंगली करणाऱ्यांना उपदेश देऊन काही उपयोग होत नाही. जेव्हा शांत वातावरण असते, जेव्हा लोक ऐकण्याच्या मनस्थितीत असतात, तेव्हा त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने पोहोचत राहील याची व्यवस्था करणे व आपल्या वर्तनातून आपण देशाला उपयोगी आहोत हे पावलो पावली तोपर्यंत सिद्ध करत राहणे जोपर्यंत बहुसंख्य समाजाची इस्लामविषयीची धारणा बदलणार नाही, हे मुस्लिम  समाजाचे प्राक्तन आहे. याचा विसर पडल्याने देशाची स्थिती मुस्लिमांच्या विरोधात जात आहे. या गोष्टीचा शांतपणे विचार करून जोपर्यंत उपाय केला जाणार नाही तोपर्यंत हे प्रकार वाढतच जाणार. 

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही स्थिती ठीक तशीच आहे जशी सातव्या शतकात मक्कामध्ये मुठभर मुस्लिमांची होती. मक्का शहरातील बहुसंख्य कुरैश हे मूर्तीपूजक होते व एका ईश्वराची उपासना करणाऱ्या अल्पसंख्यांक मुस्लिमांविषयी जी धारणा बाळगून होते अगदी तीच धारणा आज भारतीय बहुसंख्य समाज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल बाळगून आहे. म्हणून त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी बहुसंख्य कुरैश यांच्याशी व्यवहार करतांना जे धोरण अवलंबिले होते तेच धोरण आपल्याला आता अवलंबवावे लागेल. त्यासाठी त्या काळात प्रेषित सल्ल. कसे वागले? त्यांचे सहाबा रजि. कसे वागले? त्यांनी त्या काळात बहुसंख्यांशी व्यवहार करतांना कुठली काळजी घेतली? इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून उलेमांना मस्जिदीमधून मुस्लिमांना मार्गदर्शन करावे लागेल. त्यांचे प्रशिक्षण करून घ्यावे लागेल. तेव्हा कुठे भविष्यात फरक पडू शकेल. नशीबाने रमजान सुरू आहे. मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. या संधीचा लाभ घेऊन उलेमांनी लोकांचे प्रबोधन केले तर या रमजानचा सदुपयोग केल्यासारखे होईल. कारण आजही आपल्यात बऱ्यापैकी माणुसकी जीवंत आहे, नैतिकता जीवंत आहे आणि माणूस म्हणून दुसऱ्या माणसांचा सम्मान करण्याची प्रसंगी त्यांना मदत करण्याची उर्मी जीवंत आहे, ही बाब कोविडमध्ये मुस्लिमांनी दाखवून दिलेली आहे. कोविड 19 च्या साथी दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून ज्या हिररीने मुस्लिम तरूणांनी समाजोपयोगी कामे केली त्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की, मुस्लिम समाजामध्ये आजही धैर्य, धाडस आणि माणुसकी जीवंत आहे. याचा असा अर्थ मुळीच नाही की इतर समाजामध्ये हे गुण नाहीत. आहेत! जरूर आहेत हे स्विकारून रमजानमुळे माणसात चांगुलपणा कसा निर्माण करता येतो याचे प्रशिक्षण करण्याचे सौभाग्य मात्र फक्त मुस्लिम समाजालाच लाभलेले आहे. हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. 

ईश्वराने माणसाच्या निर्मितीसाठी दोन गोष्टी घेतलेल्या आहे. एक जमिनीतून माती ज्याने त्याचे शरीर निर्माण केलेले आहे व दूसरी आकाशातून आत्मा. म्हणूनच मृत्यूनंतर शरीर माती होऊन जाते आणि आत्मा आकाशाकडे प्रयाण करून आपल्या मूळस्थानी निघून जातो. माणसाला जीवंत राहण्यासाठी दुहेरी आहार लागतो. एक शरीरासाठी तर दुसरा आत्म्यासाठी. शरीर जे की मातीपासून बनलेले आहे त्याचा आहारही मातीमधून येेतो. उदा. अन्नधान्य, भाजीपाला इत्यादी. तसेच त्याचा आत्मा जो की आकाशातून आलेला आहे त्याचा आहारही आकाशातून येतो जो की कुरआनच्या स्वरूपात आलेला आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत शाश्वत राहणार आहे. मातीतून मिळत असलेल्या आहारावर सर्वांचा विश्वास आहे. परंतु आकाशातून मिळालेल्या आहारावर फार कमी लोकांचा विश्वास आहे. मुस्लिमेत्तर तर सोडा मुस्लिमांचीही मोठी संख्या कुरआनला फक्त एक पूज्यनीय ग्रंथ मानते, त्याप्रमाणे अनुकरण करणे आवश्यक आहे, ही बाब त्यांच्या गावीसुद्धा नाही. 

रमजानचा हा महिना कुरआनच्या अवतरणाचा महिना असल्यामुळे आत्म्याच्या आहाराचा पुरवठा याच महिन्यापासून 1443 वर्षांपूर्वी सुरू झाला होता व 23 वर्षापर्यंत सतत सुरू होता. याची जाणीव बहुसंख्य मुस्लिमांना नाही. कुरआन म्हणजे दूसरे तीसरे काही नसून फक्त ईश्वरीय आदेश (वहीं)चा समुच्चय आहे व त्याचा विषय मनुष्य आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, याची जाणीव बहुसंख्य मुस्लिमांना नाही. जी माणसं कुरआनच्या निर्देशाप्रमाणे जगतील ते यशस्वी होतील जे जगणार नाहीत ते अयशस्वी होतील. याची आठवण करून देण्यासाठी जणू हा महिना दरवर्षी येतो. 

माणूस तेव्हाच समाजउपयोगी होवू शकतो जेव्हा त्याचे मन शुद्ध असेल. वाईट मनःस्थिती असणारे लोक समाजासाठी हानीकारक असतात. रमजानचा महिना मानसिक शुद्धी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आपल्यासोबत घेऊन येतो. म्हणून या महिन्याचे महत्त्व हे हा महिना येण्यापूर्वीच जाणून घेणे आवश्यक ठरते. नसता हा महिना फक्त डायटिंगचा महिना ठरण्याची भीती असते. जे लोक चंगळवादामध्ये गळ्यापर्यंत रूतलेले आहेत त्यांच्या मनावर चांगल्या गोष्टींचा परिणाम फार कमी होतो. कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे मुस्लिमांनी स्वतः वागून आपले उदाहरण इतर समाजासमोर ठेवले तर त्याचा नक्कीच प्रभाव बहुसंख्य समाजावर होईल. मात्र अडचण येथेच आहे. बहुसंख्य मुस्लिमांचा कुरआनशी संपर्क अक्षरशः तुटलेला आहे. ज्यांचा संपर्क त्याच्याशी जुळालेला आहे तो फक्त त्याचे वाचन (तिलावत) करण्यापुरता आहे. जे कुरआनला समजून वाचतात त्यांच्यामध्ये कुरआनच्या आदेशांची अंमलबजावणी आपल्या जीवनात व कुटुंबात करावी याचे धाडस नाही. सध्याच्या चंगळवादी जीवन शैलीमध्ये कुरआनच्या आदेशाप्रमाणे जीवन जगणे त्यांना अनाकर्षक वाटते. परंतु त्यातच शांती, स्थैर्य आणि समाधान आहे. यावर विश्वास एक तर त्यांना नाही किंवा त्याबाबतीत त्यांना संशय आहे. ज्यांचा कुरआनिक जीवनशैलीवर ठाम विश्वास आहे व त्याप्रमाणे ते वागतही आहेत, अशांची संख्या तुलनेने अत्यल्प आहे. जोपर्यंत यांची संख्या वाढणार नाही व कुरआनी जीवनशैलीप्रमाणे जीवन जगणारे मुसलमान मोठ्या प्रमाणात सर्वांना डोळ्यासमोर दिसणार नाहीत तोपर्यंत मुसलमानांची जी प्रतीमा मुद्दामहून बनविण्यात आलेली आहे त्यापासून मुक्ती मिळणे शक्य नाही.

अल्पसंख्यांक मुस्लिम आणि बहुसंख्यांक हिंदू बांधवांच्या संंबंधांची व्याख्या करताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. म्हणतात, ’’बिगर मुस्लिम कौमों के साथ मुस्लिम कौम के तआल्लुकात की दो हैसियते हैं. एक हैसियत तो ये है के, इन्सान होने के नाते हम और वो एकसां हैं. दूसरी हैसियत ये है के, इस्लाम और कुफ्र के इख्तेलाफ ने हमें उनसे जुदा कर दिया है. पहिली हैसियत से हम उनके साथ हमदर्दी, फय्याजी, रवादारी और शफक्कत का हर वो सुलूक करेंगे जो इन्सानियत का तकाजा है. और अगर वो दुश्मने इस्लाम न हों तो उनसे दोस्ती मसलेहत और मसालेहत भी कर लेंगे और मुश्तरका मकासिद के लिए तआव्वुन में भी दरेग (मुद्दामहून सहकार्य न करने) न करेंगे. मगर किसी भी तरह का मआद्दी और दुनियावी इश्तेराक हमको इस तौर से जमा नहीं कर सकता के हम और वो मिलकर एक कौम बन जाएं. और इस्लामी कौमियत को छोडकर कोई मुश्तरका हिंदी, चिनी, मिस्त्री कौमियत की तरह कोई कौमियत कुबुल कर लें. क्यूं की हमारी दुसरी हैसियत इस किस्म के इज्तमा में मानेअ है. और कुफ्र और इस्लाम का मिलकर एक कौम बन जाना कतअन मुहाल (अशक्य) है.’’ (संदर्भ : मसला-ए-कौमियत पान क्र . 36).

म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे व असे संबंध देशभरात आहेत, परंतु असे संबंध जेव्हा सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवतो व त्यामुळे आपण त्यांना वेगळे वाटतो. हा वेगळेपणा जर बहुसंख्य बांधवांना पावलो पावली उपयोगी ठरत असेल तर ते त्याचा विरोध करणार नाहीत. अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच तसे नैतिक जीवन जगत नाही जसे की कुरआनला अपेक्षित आहे. मग दुसऱ्यांसमोर ते कसे मांडणार? 

लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांक लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरीही ते बहुसंख्यांकांसमोर आव्हान उभे करू शकत नाहीत. म्हणून जीभेचा कमी वापर करून प्रत्यक्षात चांगले काम करणे, योजनाबद्ध पद्धतीने स्वतःला देशासाठी उपयोगी बनविणे, याशिवाय आपल्यासमोर दूसरा मार्ग नाही. यासाठी ’लंबा इतंजार’  करण्याची हिम्मत आणि ’खामोशी से काम’ करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात कुरआनशी संपर्क नसल्यामुळे छोट्या-छोट्या घटनांमधून तात्काळ संतप्त प्रतिक्रिया देण्याची खाज आपण दाबू शकत नाही. मुस्कान खानच्या हिजाबच्या घटनेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. 

इस्लामचा उद्देश लोकांना नैतिक दृष्टिने श्रेष्ठ बनविणे आहे. हे जोपर्यंत बहुसंख्य मुस्लिमांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत परिस्थितीच काहीच फरक पडणार नाही. 

खामोशी की तह में छुपा लिजिए सारी उलझनें 

शोर कभी मुश्किलों को आसां नहीं करता

म्हणून अत्यंत संयमाने देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक परिस्थितीला धैर्यपूर्वक तोंड देण्याशिवाय, आपल्या समोर पर्याय नाही. कारण ही परिस्थिती इथपर्यंत चिघळू देण्यासाठी आपणही तेवढेच जबाबदार आहोत जेवढे की परिस्थिती चिघळवणारी आहे. आर्मी मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे की, ’शांततेच्या काळात सैन्य जेवढा जास्त घाम गाळेल युद्धाच्या काळात त्याला तेवढेच कमी रक्त गाळावे लागते.’ हीच गोष्ट मुस्लिमांसाठी लागू होते. शांततेच्या काळामध्ये आपल्या वाणी,  लेखणी आणि वर्तनातून मुस्लिम समाज जेवढे इस्लामी आचरण करेल तेवढाच अशा सांप्रदायिक तेढ निर्माण झालेल्या परिस्थितीत कमी रक्त सांडेल.

रमजानचा महिना सोपा नसतो. कडकडीत उन्हात उपवास ठेवणे पोरखळ नव्हे. म्हणून अनेक धडधाकट मुस्लिम लोक हा बा-बरकत महिना लाभूनही रोजे ठेवत नाहीत. त्यांची अवस्था त्या पालत्या घागरीसारखी असते जिच्यावर कितीही पाणी ओता, आत काहीच जात नाही. त्यांना रमजानचीच काय इस्लामची मुलभूत शिकवण काय आहे? याचीही माहिती नसते. दुर्दैवाने अशाच मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे सध्या देशात मुस्लिम विरोधी वातावरण तापविणे सहज शक्य होत आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र सांघिक प्रयत्न करणे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह! माझ्या या प्रिय देशामध्ये हे जातीय तेढीचे वातावरण जे लोक निर्माण करत आहेत त्यांना सद्बुद्धी दे. त्यांना कळत नाही के ते देशाचे किती मोठे नुकसान करत आहेत आणि आम्हाला इस्लामच्या शांततेचा संदेश बहुसंख्य बांधवांपर्यंत पोहोचविण्याची समज, शक्ती दे.’’ (आमीन. )


- एम. आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget