Halloween Costume ideas 2015

तबरेज अन्सारी, जयश्रीराम आणि घृणेतून झालेल्या हत्या

राम पुनियानी
संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेच्या 17 व्या बैठकीमध्ये भारतात मुस्लिम आणि दलितांविरूद्ध होणार्‍या हेट क्राईमच्या संदर्भात मॉबलिंचिंगचा मुद्दा उचलला गेला. जरी पंतप्रधान मोदी यांचा हा दावा असेल की अल्पसंख्यांकांना पुरेशी सुरक्षा दिली जाईल तरीसुद्धा लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत राहिलेली आहे. नुकतीच झारखंडमध्ये तबरेज अन्सारी नावाच्या एका तरूणाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि जयश्रीरामच्या घोषणा देण्यासाठी बाध्य केलं गेलं. एका अन्य मुस्लिम धर्मगुरू हाफिज मुहम्मद हलदर यांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देण्यात आलं आणि मुंबईजवळ फैजूल इस्लाम नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण केली गेली. या आणि अशा इतर घटनांची सुची मोठी आहे आणि दिवसागणिक मोठीच होत चालली आहे.
    अशा घटनांकडे सरकार कोणत्या दृष्टीने पाहते त्याचे एक उदाहरण पंतप्रधानांचे हे वक्तव्य आहे, ज्यात त्यांनी तबरेज अन्सारीच्या क्रूर हत्येवर चर्चा न करताच म्हटले की, अशा प्रकारच्या घटनांना प्राथमिकता दिल्याने झारखंडची बदनामी होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये राज्यसरकारचे सैलवर्तन सुद्धा लपून राहिलेले नाही. दरम्यान, देशभरात असे अनेक आयोजन झाले ज्यात मुस्लिमांसहित अन्य समाजाच्या लोकांनीही अशा मॉबलिंचिंगच्या घटनांच्या विरूद्ध आपला रोष व्यक्त केला. आश्‍चर्य म्हणजे मेरठ पोलिसांनी त्या शेकडो तरूणांवर एफआयआर दाखल केला जे मॉबलिंचिंगच्या घटनांच्या विरूद्ध आपला राग सनदशीर मार्गाने व्यक्त करत होते.
    या घटना त्यातही विशेष करून तबरेज अन्सारीच्या हत्येने सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलेले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पिओनी धार्मिक स्वतंत्रतेच्या पक्षामध्ये आवाज उठविण्याचे आवाहन केले. धार्मिक स्वतंत्रता आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षा संबंधीच्या सुचकांकामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताची स्थिती पिछाडीवर जात आहे. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्‍नांवर देशाचे लक्ष आकर्षित केले जात आहे. अल्पसंख्यांकांवर हल्ल्यांच्या घटना वेगवेगळ्या स्थानांवर होत आहेत. मात्र त्यांच्यात समानता स्पष्ट आहे. मुस्लिमांना कुठल्यातरी किरकोळ गुन्ह्यात किंवा कुठल्यातरी अन्य कारणाने पकडले जाते आणि झुंडीच्या स्वरूपात आलेले लोक त्यांना मारहाण करतात, त्यांना जयश्रीराम म्हणण्यास बाध्य करतात. यापूर्वी गाय आणि बीफच्या मुद्याला घेऊन झुंडींनी अनेकांच्या हत्या केलेल्या आहेत. आता जयश्रीरामच्या घोषणेची त्यात भर पडलेली आहे. या हिंसा आणि झुंडीची आक्रमकता ह्या स्वयंस्फूर्त नाहीत. ह्या घटना यासाठी होत आहेत की, देशामध्ये या घटना होऊ दिल्या जात आहेत. त्यांना रोखले जात नाहीये. याच्या मुळाशी मुस्लिम आणि काही प्रमाणात ख्रिश्‍चनांसंबंधी पसरवल्या गेलेल्या भ्रामक धारणा आहेत. या धारणा लोकांच्या मनात घट्ट बसविण्यासाठी सघन आणि सातत्याने प्रयत्न केले गेलेले आहेत. यात अनेक गोष्टी सामील आहेत. उदाहरणार्थ इस्लामला विदेशी धर्म म्हणणे. सत्य परिस्थिती ही आहे की, इस्लाम गेल्या अनेक दशकापासून भारताच्या विविधतेचा एक भाग राहिलेला आहे. तसेही धर्माला कुठल्याही राष्ट्राच्या सीमेच्या बंधनामध्ये बांधता येत नाही. लोकांच्या मनामध्ये हे रूजविले गेले  आहे की मुस्लिम शासक अत्यंत क्रूर आणि आक्रमक होते. त्यांनी मंदिरे तोडली. तलवारीच्या जोरावर आपला धर्म पसरवला. मात्र सत्य हे आहे की, भारतात इस्लाम मलबारच्या तटावर अरबी व्यापार्‍यांच्या काफिल्यांसोबत दाखल झालेला आहे. या अरबी व्यापार्‍यांच्या संपर्कात जे भारतीय नागरिक आले त्यातल्या काहींनी इस्लाम धर्म स्वीकारला. या व्यतिरिक्त जाती व्यवस्थेच्या दमनापासून स्वतःला वाचविण्यासाठी सुद्धा अनेक हिंदूंनी इस्लामचा स्विकार केला.
    मुस्लिमांना देशाच्या फाळणीसाठीही दोषी ठरविले जाते. वास्तविकता ही आहे की, फाळणी कित्येक कारणांचा एक संयुक्त परिणाम होती आणि त्या कारणांपैकी प्रमुख कारण इंग्रजांची भूमीका होती. जे आपले राजकीय आणि आर्थिक उद्देश्य दक्षीण एशियामध्ये येथील सत्ता सोडल्यानंतरही राखून ठेवू इच्छित होते. येणेप्रमाणे अनेक भ्रामक धारणांची एक लांब सूची आहे, जी की दिवसेंदिवस आणखीन लांब होत चाललेली आहे. ह्या मिथकांना इतक्या आक्रमक पद्धतीने प्रचारित केले गेले आहे की, त्या गोष्टी सामुहिक, सामाजिक मानसिकतेचा एक घटक बनून गेलेले आहे. कोणत्याही घटनाक्रमाला मुस्लिम विरोधी रंग दिला जातो. मग ती घटना अजानची असो की कब्रस्तानचा मुद्दा असो. एकूण मुस्लिमांचे दानवीकरण करण्यात आलेले आहे. मुस्लिमांविरूद्ध जी हिंसा होते ती मूळात मागास प्रवर्गातील लोकांच्या हाताने करवून घेतली जाते. मात्र त्यांना हिंसेसाठी भडकवणारे लोक आपापल्या घरात बसलेले असतात. मुस्लिम आणि इस्लामच्या बाबतीत भारतीय समाजाचे जणू एकमत झालेले आहे. हिंदू आणि मुस्लिम शासकांमध्ये झालेल्या लढायांनाही धार्मिक चष्म्याने पाहिले जावू लागले आहे. काही मुस्लिम राजांच्या ठराविक कृत्यांसाठी संपूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरविले जात आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक घटनेमध्ये पाकिस्तानलाही ओढले जात आहे. अतीराष्ट्रवादाचे भरण पोषण करण्यासाठी कायम एका शत्रूची गरज असते. पाकिस्तानला तो दर्जा दिला गेलेला आहे आणि पाकिस्तानचे कारण पुढे करून भारतीय मुस्लिमांवर निशाना साधला जात आहे. एकंदरित मुस्लिमांच्या ओळखीशी जोडले गेलेल्या भावनात्मक मुद्यांना घेऊन त्यांना दोषींच्या पिंजर्‍यामध्ये उभे केले जात आहे. काही वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर जातीय दंगलींचा उपयोग करून समाजाचे ध्रुवीकरण केले जात होते. हळूहळू त्याचे स्थान गाय आणि गोमांसच्या नावावर होणार्‍या हिंसेने घेतलेेले आहे. आणि आता जयश्रीरामच्या घोषणेला राजकीय रंग देण्यात आलेला आहे.
    या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. परंतू, मूळ गोष्ट ही आहे की, समाजाच्या विचार प्रक्रियेचेच जातीयकरण करण्यात आलेले आहे. म्हणून झुंडींकडून घृणा आधारित अपराध होत आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान, महात्मा गांधींनी सर्व धार्मिक समुदायांची समांतर मुल्ये आणि शिकवणींना समोर ठेऊन भारतीय नागरिकांना खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरूद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले होते. आता उलटी गंगा वाहत आहे. आता विभिन्न धार्मिक समुदायांच्या शिकवणी आणि मुल्यांमध्ये जे मामुली अंतर आहेत त्याला वाढवून, चढवून प्रस्तूत केले जात आहे. हे आपल्या घटनेमध्ये निहित बंधुत्वाच्या मुल्याच्या विरूद्ध आहे. आता आवश्यकता ही आहे की आपण समाजात अल्पसंख्यांकांच्या विरूद्ध व्याप्त चुकीच्या धारणांना मुठमाती द्यावी. तेव्हा कुठे आपण घृणा आणि त्यातून निर्माण होणार्‍या हिंसेचा सामना करू शकू.आज आपल्या देशासमोर आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी सारखी प्रश्‍न ’आ’वासून उभी आहेत. अशा परिस्थितीत विघटनकारी राजकारणाचा खेळ देशाला आणखीन मागे घेऊन जाईल. आपल्याला देशातील जनतेला एकत्र करावे लागेल. तेव्हा कुठे आपण आशा करू शकतो की देशात शांती नांदेल आणि आपल्या सर्वांचे पाऊल प्रगतीच्या दिशेने पुढे पडेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget