Halloween Costume ideas 2015

माफक दरात रूग्णांकडून शुल्क घेतल्याने बरकत येते

नागपूर (डॉ.एम.ए.रशीद)
आपल्यामध्ये सेवा आणि त्यागाची भावना मोठ्या प्रमाणात असायला हवी. रूग्ण नव्हे तर अल्लाह प्रसन्न होईल, ही भावना मनात असायला पाहिजे. जेणेकरून निवाड्याच्या दिवशी आपली पकड होणार नाही, या दृष्टीने प्रत्येक चिकित्सकाने काम केले पाहिजे. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी कमी शुल्कामध्ये आपण जर रूग्णांवर उपचार करू तर आपल्यावर अल्लाहची बरकत नाजील झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास नाक, कान व घसा तज्ञ डॉ.जव्वाद खान यांनी येथे व्यक्त केला.
    जमाअते इस्लामी हिंद व मेडिकल सर्व्हीस सोसायटीद्वारा नागपूर शहरातील अहेबाब कॉलनीमधील शबाना बेकरी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमएसएस नागपूरच्या  अध्यक्षपदी डॉ. नईम नियाजी यांची पुनश्‍च एकदा निवड झाली याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आसिउज्मा खान होते. मंचावर सय्यद जुबेर, डॉ. नईम नियाजी होते.    
    पुढे बोलताना डॉ.जव्वाद खान म्हणाले, यशस्वी चिकित्सक बनण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येक नमाजनंतर अल्लाहकडे दुआ मागणे गरजेचे आहे. शिवाय, इस्लामी विधीअंतर्गत रोग आणि त्यांच्या उपचारामध्ये वैध आणि अवैध यांच्यातील अंतरस्पष्ट करणारा दृष्टीकोण बाळगणे परमआवश्यक आहे. प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचे जीवनकार्य आणि कुरआनचे मार्गदर्शन यासाठी सर्व डॉक्टरांना सहाय्यक ठरू शकेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गरीब रूग्णांवर आपल्याला जास्त ध्यान केंद्रित करावे लागेल. अशा रूग्णांना जेवढे शक्य असतील तेवढे उपचार सुलभपणे कसे करता येईल, याकडे प्रत्येक डॉक्टरने लक्ष द्यावे. समाजामध्ये मुस्लिम चिकित्सक कसा आदर्श असतो या दृष्टीने आपली ओळख तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या रूग्णांची मनापासून सेवा करत आहोत त्याचे फळ रूग्णाकडून नव्हे तर अल्लाहकडून मिळेल, अशी डॉक्टरांनी आशा बाळगणे गरजेचे आहे. इस्लामी शरियतमध्ये नमूद केल्याप्रमाणे रोगीच्या घरी जावून त्याची सेवा करण्यामध्ये किती लाभ आहेत आणि त्याचा चांगला मोबदला अल्लाह किती मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना देईल, याकडेही लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. आपण सर्व डॉक्टरांनी सर्वात अगोदर आपली नियत स्वच्छ ठेवली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर रूग्णांकडून शुल्क घेऊन आपले मरणोत्तर जीवन कोणीही उध्वस्त करू नये.
    एमएसएसचे उद्देश आणि त्याची कार्यप्रणाली या विषयी उपस्थितांना अवगत करून देण्याचे कार्य एमएसएसचे राज्य सचिव डॉ. सय्यद जुुबेर यांनी केले. त्यांनीही रचनात्मक पद्धतीने चिकित्सा करून चिकित्सेमध्ये नैतिकता आणण्यावर भर दिला. शहरातल्या अनेक प्रसिद्ध चिकित्सकांबरोबर एमएसएसचे सदस्य मोठ्या प्रमाणात याप्रसंगी हजर होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. आसिफुज्जमा खान म्हणाले की, नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. एवढेच नव्हे तर हे एक मेडिकल हब आहे. केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर शेजारी राज्यातील अनेक रोगी या ठिकाणी उपचारासाठी मोठ्या आशेने येतात. अल्लाहची ही आपल्यावर फार मोठी कृपा आहे की, त्याने आपल्याला मानव म्हणून जन्माला घातले व त्यातही चिकित्सक सारख्या महत्वपूर्ण पदासाठी आपली निवड केली. या निवडीबरोबर नुसते आर्थिक फायदेच नव्हे तर सामाजिक जबाबदार्‍याही येतात याचे भान आपल्या सर्वांना असायला हवे. आपल्याला रूग्णांची शक्य तेवढी सेवा आणि सहाय्यता करावी लागेल आणि हे काम संघटित होऊन केल्यानेच जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. शफी मुहम्मद यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन डॉ. अदनानुल हक यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात डॉ.नुरूल अमीन यांनी केलेल्या कुरआन पठणाने झाली.
मेडिकल सर्व्हीस सोसायटी नागपूर शाखेची कार्यकारीणी
    राज्य सचिव डॉ. सय्यद जुबरे यांच्या उपस्थितीत एमएसएस नागपूर शाखेचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यात डॉ. नईम नियाजी यांना अध्यक्ष, डॉ. कश्फत दूजा खान यांना उपाध्यक्ष, डॉ. नुरूल अमीन यांना सचिव तर डॉ. अदनानुल हक यांना कोषाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. शिवाय, एमएसएसच्या कार्यकारिणीमध्ये डॉ. शफी मुहम्मद, डॉ.हसनुल बन्ना, डॉ.एम.ए. रशीद, डॉ.इद्रीस शेख, डॉ. मुबीन शेख, डॉ. तारीख अजमल, डॉ. हारिस खान, डॉ.मुदस्सीर अली, डॉ.मुहम्मद खलील, डॉ.जुबेर काजी यांची निवड करण्यात आली.
आरोग्यसेवेत उच्चांक
    सत्काराला उत्तर देताना डॉ. नियाजी म्हणाले की, गेल्या दोन वर्षात तीन रक्तदान शिबीरांच्या मार्फतीने एमएसएस नागपूरद्वारे 1200 युनिट रक्त संग्रहित करून गरजूंना पुरविण्यात आले. ज्यात 500 रूग्णांना निःशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात आले. बाकीच्या रूग्णांकडूनही मेंटेनन्ससाठी लागणारे तेवढे नाममात्र शुल्क घेण्यात आले. 20 शिबिरांचे आयोजन करून पाच हजार रूग्णांची तपासणी केली गेली. त्यात 3 हजार रूग्णांची इसीजी आणि एक लक्ष रूपयाच्या औषधी मोफत वितरित केल्या गेल्या. 2 लाख रूग्णांना एमएमएसकडून विलाजासाठी आर्थिक मदतही पुरविण्यात आली. मेडिकल गायडन्स सेंटर नागपूर द्वारे 2 हजार रूग्णांना मार्गदर्शन देण्यात आले. राज्यशासनाने राजीव गांधी योजनेअंतर्गत 100 रूग्णांच्या एनजीओग्राफी, 50 रूग्णांच्या एनजीओप्लास्टी, 50 रूग्णांच्या बायपास शल्यचिकित्सा, 15 कॅन्सरवरील चिकित्सा, 30 ऑर्थोपेडिक आणि सामान्य शल्यचिकित्सा शिवाय 150 मोतीबिंदूच्या शल्यचिकित्सा केल्या गेल्या. समाजसेवेअंतर्गत विभिन्न शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती अभियान तसेच मधूमेह आणि टीबी या आजारासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. बेसिक लाईफ सपोर्टिंग ट्रेनिंगची दोन शिबीरे नागपूर रोड यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले. रमजान आणि मधूमेह या विषयावर मार्गदर्शन करणारी निःशुल्क मार्गदर्शिका रमजानमध्ये वितरित करण्यात आली.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget