परिवर्तन प्रेमानेच घडेल. एकमेकांच्या भिंतींवरचे फोटो विसरा!
परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की, आपले छोटे अहंकार विसर्जित केले पाहिजेत. आपले उद्दिष्ट व्यक्तीचे महत्त्व वाढवण्याचे की समाजात समानता आणण्याचे, हे महत्त्वाचे आहे. थोडे मतभेद झाले तर एकमेकांना अपमानित करण्याची गरज नाही. पुरोगामी कार्यकर्ते एकमेकांच्या भिंती आणि त्यावरचे फोटो तपासतात. त्यावरून शिक्का मारला जातो. मित्रांनो, एकमेकांच्या घरी न्यायाधीश म्हणून नाही, तर मित्र म्हणून जा!
आजच्या अस्वस्थ परिस्थितीत काळवंडून आल्यासारखे वातावरण निर्माण झाले असताना काय बोलायचे, आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या, कोणत्या मार्गाने जायचे, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. कसा सोडवायचा हा गुंता?
मी माझ्या अनेक भाषणांमधून वारंवार महात्मा बसवेश्वरांचे एक वचन सांगत आलो आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नये. हा आमचा, हा आमचा असे म्हणावे.’ भारतातल्या संमिश्र समाजाने हा अतिशय सुंदर उपदेश अवलंबावा. हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या धर्माचा, श्रीमंताचा की गरिबाचा असे विचारू नये. यातला प्रत्येकजण आमचा आहे, त्याच्याशी माझे नाते आहे; पण त्याला प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जगण्याचा, आपल्या पूर्ण क्षमतेने फुलून येण्याचा अधिकार आहे, असे म्हटले पाहिजे. आदर्श समाज म्हणजे तरी काय?- ज्या समाजात १०० टक्के लोकांची १०० टक्के प्रतिभा फुलण्याचे स्वातंत्र्य आणि संधी उपलब्ध आहे तो आदर्शवत समाज. तो खर्या अर्थाने माणसांचा समाज, असे म्हणता येते. एखाद्या मोठया पर्वताचे ओझे आपल्या छातीवर पडलेले असताना त्याचा एखादा टवका उडवावा, एवढेच काम माझ्या पिढीर्पयतच्या इतिहासकारांनी केलेले आहे. तो पर्वत उलथवून टाकण्याचे काम आता तरुण पिढीचे आहे. ज्यांची बाजू मांडणारे कोणी नाही, मस्तक असूनही ज्यांना मेंदूचे ऐकता आले नाही, जिभा असूनही बोलता आले नाही त्यांचा आवाज बनणे हे नव्या इतिहासकारांचे कर्तव्य आहे.
माहितीचे प्रचंड स्रोत सध्या निर्माण झाले आहेत. खिशातील मोबाइलमध्ये सगळे विश्वच उपलब्ध असते; पण हे गुगलने दिले आहे, ते विकिपीडियाने दिले आहे म्हणजे ते सत्य, असे म्हणता येणार नाही. कारण, तेथे माहिती भरणारा एक मेंदू काम करत असतो. त्या मेंदूचे काही हितसंबंध आहेत, तेच सत्य तो मेंदू सांगतो आहे. पूर्वी छापून आले की ते खोटे कसे असणार, असे समजण्याचा एक काळ होता. आणि आता जे जे गुगलवर आहे ते सत्य असे आपण समजू लागलो आहोत. आणि ही लढाई जगभरात आहे. ती फक्त आपल्याच देशात आहे, असे समजण्याचे कारण नाही.
प्राचीन काळापासून दोन सांस्कृतिक प्रवाह एकमेकांच्या विरोधात झुंजत आले आहेत. त्यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत. यातला कोणताच प्रवाह कायमचा विजयी किंवा पराभूत होणार नाही. ते प्रवाह रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर जाणार आहेत. त्यामध्ये चढ-उतार होत राहतील. काही घटनांमुळे आपल्या मनात अस्वस्थता निर्माण झाली तरी, तरुण पिढीने हे लक्षात ठेवावे की राष्ट्राच्या, समाजाच्या इतिहासामध्ये पाच-दहा वर्षे हा फार मोठा काळ नाही. त्यामुळे जीवनमूल्य हरले, पराभूत झाले असे मानण्याचे कारण नाही. काळाच्या ओघात अशी उलथापालथ सततच होत आली आहे.
आपण वैदिक आणि अवैदिक प्रवाह असे दोन प्रवाह मानतो. धर्मग्रंथांनी, ऋषिमुनींनी जे सांगितले, ते अंतिम सत्य आहे. त्याची चिकित्सा मानवी बुद्धीने करायची नाही, असे वैदिक प्रवाह सांगतो. चिकित्सा करण्याची परवानगी वेद संस्कृतीने माणसाला दिली नाही. जो असे करेल त्याच्यावर बहिष्कार टाकला जात असे. बहिष्काराचे गांभीर्य आपल्याला आता कळणार नाही. मात्र, बहिष्कार टाकणे म्हणजे माणसाला आपल्या चाकोरीत यायला भाग पाडणे अन्यथा नाकारणे. त्याच्याशी खाण्यापिण्याचे व्यवहार बंद, विद्येचे, लग्नाचे व्यवहार बंद. हे एकाकीपण फार भयाण असते.
अवैदिक प्रवाह सांगतो की, माणसाला चिकित्सा करण्याचा अधिकार आहे. चार्वाकाने या बौद्धिक स्वातंत्र्याचा जबरदस्त आग्रह धरलेला होता. स्वातंत्र्य हाच मोक्ष असे त्याने म्हटले. चार्वाक मानवी स्वातंत्र्याला महत्त्व देत होते. मृत्यूनंतर ब्रम्हज्ञान, आत्मज्ञान हे आम्हाला मान्य नाही. प्रत्यक्ष जीवनातले विचार करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे, असा आग्रह चार्वाकांनी धरला. आपल्या पूर्वजांनी सगळे प्रश्न सोडवून ठेवले आहेत असे मानू नका, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत असत. एखादी गोष्ट ऐकिव माहितीतून, परंपरेतून, ग्रंथांतून, गुरुंकडून तुमच्याकडे आली म्हणून ती स्वीकारू नका. आपल्याला पटेल, अनुभवता येईल तेव्हाच स्वीकारा, असा त्याचा अर्थ! स्वतर्चा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे.
प्रत्येकाला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे तो इतरांच्या मेंदूचे चालण्यासाठी नाही. इतरांच्या मेंदूचे ऐकावे आणि आपला मेंदू वापरून विचार करून पटले तरच स्वीकारावे. प्रत्येक गोष्ट चोखंदळपणे, डोळसपणे तपासून स्वीकारणे हेच तारुण्याचे, आधुनिकतेचे, तंत्रज्ञानाचे लक्षण आहे. सोने तोलावेइतक्या सूक्ष्मतेने हे करता येणारे नाही, हे खरे आहे; पण त्या दिशेने किमान आपले प्रयत्न असले पाहिजेत.
सामाजिक जीवनात लाटा येतात आणि जातात, सत्ताही येते-जाते. मात्र, राजकीय सत्तेपेक्षा सांस्कृतिक सत्ता अधिक महत्त्वाच्या असतात. आजच्या सांस्कृतिक लढाईत शोषक वर्गाच्या हातात तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती आहे. याविरोधात संघर्ष करताना शोषितांना हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी एकीचे बळ दाखवावे लागेल. राजकीय अभिलाषेने सत्ताधार्यांच्या मागे जे जे कोणी धावले, ते ते सारे गुलामच राहिले आहेत. तुमच्या जीवनाची मूल्ये अन्य कोणी ठरवत असेल, तुम्ही मनाने गुलाम असाल, तर सत्ता-संपत्ती काय कामाची? आपल्याला स्वातंत्र्यप्रिय असले पाहिजे. स्वातंत्र्यप्रिय असेल तर त्याचे मोलही महाग असते. ते आयते मिळत नाही. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण आपणच करणे गरजेचे आहे. संविधान मोलाचे, दिशा दाखवणारे आहे. त्याचे रक्षण आपण केले तर ते आपले रक्षण करू शकेल.
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतर्ला विचारून पाहा र् आपण जी मूल्ये मानतो, त्यासाठी आपण किती वेळ द्यायला तयार आहोत? वेळेचे दान समाजासाठी द्यायची आपली तयारी आहे का? ही तयारी क्वचित दिसते. आपण दिवसेंदिवस वेदनाहीन होत चाललो आहोत. यात गुलामगिरी लादणार्यांचा दोष किती आणि गुलामगिरी स्वीकारणार्यांचा दोष किती? समाज आंतरिकदृष्टया कधी एक होणार, हा प्रश्न मला नेहमी सतावतो.
आज एक सांस्कृतिक लढाई सुरू आहे. तंत्रज्ञानाची प्रचंड शक्ती शोषक वर्गाच्या हातात आहे. आता दुबळ्या लोकांना हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी बलाढय शक्तींपुढे संघर्षासाठी उभे रहावे लागणार आहे. संख्याबळ ही शोषित वर्गाची प्रचंड शक्ती आहे. मात्र, या संख्याबळाचे मोठे वैगुण्य म्हणजे ऐक्याचा अभाव. समता, स्वातंत्र्य, न्यायासाठी झगडणारे लोक एक झाले तर तरच ही लढाई लढता येईल. तरुणाईत खूप ऊर्जा, उत्साह आहे. ऊर्जा नियंत्रित पद्धतीने प्रवाहित करण्याची आणि त्यासाठी ऐक्याची गरज आहे. परिवर्तनाच्या चळवळीला बुद्धाइतका मोठा आदर्श नाही. परिवर्तन प्रेमानेच घडेल. ते हृदयाकडून मस्तकाकडे झाले पाहिजे, असे बुद्धविचार सांगतो. जो आपल्या विचारांचा नाही, तो आपल्या विचारांचा व्हावा असे वाटत असेल तर प्रेमाने जवळ गेले पाहिजे. त्याच्या कपाळावरील एक आठी जरी कमी करण्यात यश आले तरी त्याचा प्रवास आपल्या विचारांकडे सुरू झाला, असे समजावे.
-डॉ. आ. ह. साळुंखे
(लेखक परिवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, विचारवंत विश्लेषक आणि ख्यातनाम समीक्षक-लेखक आहेत.)
शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग
(साभार : दै. लोकमत, ९ जून २०१९)

Post a Comment