Halloween Costume ideas 2015

मिया काव्य : चक्रव्यूवहात फसलेल्या समुदायाचा आवाज

गेल्या 10 जुलै 2019 ला दहा आसामच्या कवींविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. ज्यातील बहुतेक मुस्लिम आहेत आणि साहित्याच्या त्या धारेचे अग्रणी आहेत, ज्याला मियाँ  काव्य असे म्हंटले जाते. लिखो, लिख दो, मैं एक मियाँ हूं, एनआरसी ने मेरा सिरीयल नंबर 200543 है, एक और अगली गर्मियां तक आनेवाला है, क्या तुम उससे भी नफरत  करोगे? जैसे तुम मुझसे नफरत करते हो... या धारेच्या कवींची लेखणी प्रामुख्याने त्या मुस्लिमांच्या पिडेची अभिव्यक्ती करत असते; ज्यांच्या कपाळावर बांग्लादेशी घुसखोर असल्याचा  ठप्पा मारलेला आहे आणि जे विदेशी असल्याचा कलंक सहन करण्यासाठी बाध्य आहेत. या कवितांपैकी काही कविता या इंग्रजी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत तर काही स्थानिक  बोली भाषांमध्ये. या कविंच्या विरूद्ध दाखल एफआयआरमध्ये असे म्हंटले गेले आहे की, हे आरोपी कवी लोक आपल्या कवितेच्या माध्यमातून जगाच्या नजरेत आमच्या राज्याची  प्रतिमा एक हिंसक राज्याप्रमाणे रंगवत आहेत. हा प्रकार आसामच्या सुरक्षेसाठी संकट आहे.
वर उद्धृत केलेल्या कवितेच्या ओळी आसामच्या एका स्थानिक बोली भाषेतील आहेत. कवि अहेमद वर हा आरोप लावण्यात आलेला आहे की, ते आसामच्या भाषेचा अपमान करत  आहेत. यावर अहेमदनी क्षमा याचना सुद्धा केली व म्हटले की, त्यांचा हेतू आसामीया भाषेला उत्तेजन देणे आहे. भाषेविरूद्ध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या सगळ्या घटनाक्रमामुळे  अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्यांची पृष्ठभूमी आसामच्या नागरीकतेच्या मुद्यावरून चाललेल्या कटू विवादाशी आहे. आसाममध्ये मुस्लिमांची मोठी संख्या राहते. एवढी की फाळणीच्या  वेळेस बॅ.जिन्ना हे आसामला पूर्व पाकिस्तानमध्ये सामील करू इच्छित होते. फाळणीच्या काळात आणि त्यानंतर आसाममध्ये मोठ्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम प्रवासी आले आणि  स्थायीक झाले. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतरही ही प्रक्रिया चालू राहिली.
आसाममध्ये एनआरसी तयार केला जात आहे. या प्रक्रियेमुळे 40 लाख लोक मोठ्या संकटात सापडलेले आहेत. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याकारणाने एनआरसीच्या यादीमध्ये  त्यांची नावं सामील केली गेलेली नाहीत. दरम्यान, हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंड्यामुळे भारत सरकार, नागरिकता संशोधन विधेयक घेऊन आलेली आहे. ज्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात  आलेली आहे की, शीख, हिंदू आणि जैन लोकांना तर देशाची नागरिकता दिली जाऊ शकते परंतु मुस्लिमांना नाही. एनआरसीची शेवटची यादी 31 जुलै 2019 ला प्रकाशित होणार होती.  ज्या लोकांची नावे या यादीमध्ये नाहीत ते मोठ्या तणावाखाली जगत आहेत. जर नागरिकता संशोधन विधेयक मान्य केलं गेलं तर यादीतून सुटलेल्या हिंदूंना तर नागरिकता मिळून  जाईल. परंतु मुसलमान देश विहीन होऊन जातील. अलिकडेच सेवानिवृत्त सैन्य अधिकारी मुहम्मद सनाउल्लाह ला याच कारणामुळे नजर कैदेत असणाऱ्यांच्या शिबीरामध्ये पाठविण्यात  आले होते. यावरून स्पष्ट आहे की, एनआरसीच्या प्रक्रियेमध्ये देशातील वैधरित्या राहणाऱ्या नागरिकांनाही अवैध घोषित केले जाण्याची पूर्ण आशंका आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा   सगळ्या देशात एनआरसीची प्रक्रिया सुरू करू इच्छितात. स्पष्ट आहे की, त्यातही नागरिकत्वाचा आधार धर्म असेल.
मियाँ काव्य हा प्रतिरोधक काव्याचा प्रकार आहे. हे काय प्रतिबिंबीत करते? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट आहे की, हे काव्य ना आसामच्या विरूद्ध आहे ना आसामी लोकांच्या विरूद्ध आहे  आणि ना आसामी भाषेविरूद्ध आहे. हे काव्य तर फक्त मुस्लिमांची वेदना आणि त्यांच्या दुर्भाग्याला स्वर देतोय. आसामच्या लाखो नागरिकांवर अनेक वर्षांपासून विदेशी असण्याचा  आरोप लावला जातोय. त्यातीलही बहुतेक मुसलमान आहेत. सुरूवातीला ’डाऊटफुल’ या ’डी’ वोटर घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग विदेशी व्यक्ती म्हणून न्यायाधिकाऱ्यांनी  लोकांना नजरकैदेच्या शिबीरांमध्ये पाठवावयास सुरूवात केली. त्यानंतर सुरू झाली एनआरसीची प्रक्रिया. जरी आसाममध्ये बांग्ला भाषा बोलणारे हिंदूसुद्धा निशान्यावर आहेत. परंतु  त्यांच्यासाठी संतोषजनक गोष्ट ही आहे की, प्रस्तावित संशोधित नागरिकता अधिनियम हिंदू, शीख आणि जैन यांना शरणार्थी म्हणून स्विकारते तर मुस्लिमांना घुसखोर घोषित करते.   राज्यात मुस्लिमांना विदेशी म्हणून निरूपित करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. राज्याचे प्रमुख मुस्लिम नेते आणि प्रतिष्ठित नागरिक जेव्हा कधी शासनाची आलोचना करतात  किंवा कुठल्या विषयावर आपले मत व्यक्त करतात, तेव्हा तात्काळ त्यांना पाकिस्तानला निघून जाण्याचा सल्ला देण्यात येतो.
मागील काही दशकांपासून सगळ्या जगामध्ये इस्लाम विषयी भय आणि घृणेचे वातावरण तयार केले जात आहे. 9/11/2001 च्या घटनेनंतर यामध्ये आणखीन वेग आलेला आहे. त्या   अगोदरसुद्धा जागतिक स्तरावर धर्माच्या नावावर, कच्च्या तेलावर कब्जा मिळविण्याचे अभियान सुरू होते. भारतात 1992/93 साली (बाबरी मस्जिदीच्या विध्वंसानंतर) 2002 मध्ये  गुजरात आणि 2013 मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर मुस्लिमांच्या बाबतीत खोट्या धारणा बहुसंख्य समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेल्या आहेत. भारतीय मुस्लिमांचा  या देशाच्या संयुक्त विरासतीवर तेवढाच अधिकार आहे, जेवढा की हिंदूंचा आहे. मुसलमान हे गेल्या शेकडो वर्षांपासून भारताच्या सामाजिक जीवनाचा भाग राहिलेले आहेत. आणि आज  त्यांना देशातील बहुसंख्य लोकांसाठी संकट म्हणून सांगितले जात आहे. ही प्रक्रिया वेगवेगळ्या रूपाने समोर येत आहे. मला तेव्हा आश्चर्य झाले होते जेव्हा 2005-06 साली देशातील  कित्येक प्रमुख मुस्लिम लेखक, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक इत्यादींनी एकत्रित येवून या प्रश्नावर विचार केला होता की, ’’आज भारतात मुस्लिम होण्याचा अर्थ काय आहे?’’ आपण  सर्व पाहत आहोत की, कशा पद्धतीने मुसलमान हे आपल्या मोहल्ल्यामध्ये अंकुचित होत आहेत. असुरक्षेच्या भावनेने त्रस्त या समुदायावर कट्टरपंथी तत्वांची पकड अधिक मजबूत होत  चाललेली आहे. मियाँ काव्य त्याच मानसिक उद्वेगाचे प्रतीक आहे. ज्यामधून आसामचे मुसलमान प्रवास करत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती देशाच्या काही अन्य भागातही आहे.  नागरिकाचा दर्जा कुठल्याही व्यक्तीसाठी यासाठी महत्त्वपूर्ण आहे की, तो दर्जा त्याला त्याचे मुलभूत अधिकार देतो. मियाँजी ही एक सन्मानार्थ उपाधी आहे. ज्याचा आजच्या  आसाममध्ये वेगळाच अर्थ झालेला आहे. या ठिकाणी कोणाला मियाँ म्हणण्याचा अर्थ तो बांग्लादेशी घुसखोर आहे असा आहे. मियाँ शब्द शिवीसारखा होऊन गेलेला आहे. आपल्यापैकी  जे लोकशाही मुल्यांमध्ये विश्वास ठेवतात त्यांना हा विचार करावा लागेल की, शेवटी का म्हणून एक समुदाय एवढा घाबरलेला, तणावग्रस्त आणि व्याकुळ आहे. शेवटी त्यांना का   खालच्या नजरेने पाहिले जात आहे. साहित्य कोणत्याही समुदायाच्या व्यथेच्या अभिव्यक्तीचे माध्यम राहिलेले आहे. आपण सर्वांनी पाहिलेले आहे की, नामदेव ढसाळ आणि जे.व्ही.  पवार यांच्या मनाला हेलावून टाकणाऱ्या कवितांमधून दलितांची पिडा कशा प्रकारे व्यक्त झाली होती. महिला आंदोलनाचे सुद्धा स्वतःचे साहित्य आहे. ज्यात ’हाफ द स्काय’ (अर्धे   आकाश) च्या पीडेची अभिव्यक्ती होते. जर आपल्याला समता मूलक समाज निर्माण करावयाचा आहे तर आपल्याला नागरिकांच्या वेगवेगळ्या गटांच्या पीडेच्या अभिव्यक्तीला ऐकावे,  समजावे आणि सहन करावे लागेल. या लेखाच्या सुरूवातीला उद्धृत केलेल्या कवितेच्या ओळी मनाला भीडणाऱ्या आहेत. त्यावरून लेखकाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे काय  औचित्य आहे, हे समजून येत नाही.


- राम पुनियानी
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget