पाच लोकांचे वाचविले प्राण : अडीच हजार गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले
सांगली (शोधन सेवा)
सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गावात लोकांना वाचविण्यासाठी आलेली नाव उलटली होती. त्या नावेत असलेले लोक बुडत होते. त्यातच डॉ.रफिक तांबोळी बसलेले होते. त्यांनी हिमतीने पाण्यात उडी मारून पाच लोकांचे जीव वाचविले. डॉ. तांबोळींचे घर आधीच वाहून गेले होते. त्यामुळे ते आपली पत्नी रिजवानासह नावेतून जात होते. तेव्हा ती नाव पलटली आणि रफिक तांबोळी यांनी पाच लोकांना बुडविण्यापासून वाचविले. एवढेच नव्हे तर या दाम्पत्याने जवळ- जवळ अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थानी पोहोचविण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा केली. डॉ. तांबोळी होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. तर त्यांची पत्नी रिजवाना पोलीस पाटील आहेत. विशेष म्हणजे त्यांचा परिवारा ब्रह्मनाळ गावातील एकमेव मुस्लिम परिवार आहे.
तहसील कार्यालयाने 5 ऑगस्टला रिजवाना यांना सूचना दिली होती की कृष्णा नदी ही धोक्याच्या निशाणीच्या वर वाहत आहे. तेव्हा रिजवाना यांनी ग्रामपंचायतच्या मदतीने लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम आपल्या पतीच्या मदतीने सुरू केले. 6 आणि 7 ऑगस्टला लाकडी बोटीने त्यांनी 2500 लोकांना अथक परिश्रम करून सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. परंतु, 8 ऑगस्टला सहाव्या फेरीत बोट उलटली. तेव्हा बोट किनाऱ्यापासून 200 फुटावर होती. तेव्हा डॉ. तांबोळी यांनी बोटचालक हनुमंत श्रीमान याच्यासह पाच लोकांना बुडण्यापासून वाचविले. या दुर्घटनेमध्ये एकूण 14 लोकांना जलसमाधी मिळाली. डॉ. तांबोळी म्हणाले, मला ही गोष्ट सातत्याने सतावत राहील की, बुडालेल्या त्या 14 लोकांना मी वाचवू शकलो नाही. डॉ. तांबोळी व त्यांच्या पत्नी रिजवाना यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Post a Comment