Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१६१) ...आम्ही यांच्यासाठी त्या बऱ्याचशा पवित्र वस्तू निषिद्ध ठरविल्या ज्या पूर्वी यांच्यासाठी वैध होत्या२०१ आणि यांच्यापैकी जे अश्रद्धावंत आहेत त्यांच्यासाठी आम्ही दु:खदायक प्रकोप तयार ठेवला आहे,२०२
(१६२) परंतु यांच्यामध्ये जे लोक परिपक्व ज्ञान राखणारे आहेत आणि श्रद्धावंत आहेत ते सर्व त्या शिकवणीवर श्रद्धा ठेवतात, जी हे नबी (स.)! तुमच्या कडे अवतरली गेली आहे आणि  जी तुमच्यापूर्वी अवतरली गेली होती.२०३ अशाप्रकारे श्रद्धा ठेवणाऱ्या आणि नमाज व जकातचे नियमित पालन करणाऱ्या आणि अल्लाह आणि मरणोत्तर जीवनाच्या दिवसावर खरी श्रद्धा  बाळगणाऱ्या लोकांना आम्ही अवश्य महान मोबदला प्रदान करू.
(१६३) हे नबी  (स.)! आम्ही तुमच्याकडे त्याचप्रकारे दिव्य प्रकटन (वही) पाठविले आहे, ज्याप्रकारे नूह (अ.) आणि त्यानंतरच्या पैगंबरांकडे पाठविले होते.२०४ आम्ही इब्राहीम (अ.),  इस्माईल (अ.), इसहाक (अ.), याकूब (अ.) आणि याकूबची संतान, इसा (अ.), अय्यूब, यूनुस, हारून आणि सुलैमान (अ.) कडे दिव्य प्रकटन पाठविले. आम्ही दाऊद (अ.) यांना  जबूर२०५ दिला.
(१६४) आम्ही त्या पैगंबरांवरदेखील दिव्य प्रकटन अवतरित केले ज्यांचा उल्लेख आम्ही यापूर्वी तुमच्याशी केला आहे आणि त्या पैगंबरांवरदेखील ज्यांचा उल्लेख तुमच्याजवळ केला नाही.  आम्ही मूसा (अ.)शी अशाप्रकारे बातचीत केली ज्या रीतीने बातचीत केली जाते.२०६



२०१) हा त्याच विषयाकडे संकेत असू शकतो जो पुढे सूरह ६, आयत १४६ मध्ये येणार आहे. म्हणजे बनीइस्राईलवर ती सर्व जनावरे अवैध (हराम) केली ज्यांची नखं असतात आणि  त्यांच्यासाठी गाय आणि शेळीची चरबीसुद्धा हराम (अवैध) केली गेली आहे. याव्यतिरिक्त संकेत इतर प्रतिबंधावर असेल जे यहुदी धर्मशास्त्राप्रमाणे आहे. एखाद्या लोकसमूहासाठी  जीवनक्षेत्राला संकुचित करणे म्हणजे त्या लोकांना दिलेली शिक्षा च आहे. (तपशीलासाठी पाहा, सूरह ६ : १४६ टीप. १२२)
२०२) म्हणजे या लोकसमुदायाचे जे लोक ईमान आणि आज्ञापालन पासून दूर आहेत आणि ते द्रोह आणि नाकारण्याच्या वर्तनावर दृढ आहेत, त्यांच्यासाठी अल्लाहकडून घोर यातना  तयार आहे. जगातसुद्धा आणि परलोकातही. दोन हजार वर्षापासून जगात अपमानित आणि दुर्दशापूर्ण जीवन ते जगत आहेत. तशा प्रकारचे जिणे जगात कोण्या दुसऱ्या लोकसमुदायाच्या  नशिबी कधीही आले नाही. यांच्यावर असलेला अल्लाहचा शाश्वत कोप पाहा की राष्टे्र येतात व जातात परंतु हे यहुदी लोकसमुदायाला मृत्यू कधीही येत नाही. या धिक्कारित  लोकसमुदायाला जगात `लायमुतुफीहा व लेयह्या' (न मरतात, न जिवंत राहातात) अशी शिक्षा दिली गेली आहे, जेणेकरून जगाच्या अंतापर्यंत जगासाठी एक जिवंत बोधप्रद उदाहरण  डोळयांसमोर नेहमी राहावे. अल्लाहच्या ग्रंथाला बगलेत ठेवून अल्लाहच्या विरोधात विद्रोहात्मक दुस्साहस करण्याचा परिणाम काय होतो हे जगाने यांच्यापासून पाहून घ्यावे. परलोकात   तर तेथील प्रकोप यापेक्षाही भयानक असेल. (या ठिकाणी जो संशय पॅलेस्टीनमध्ये इस्राईली राज्याच्या स्थापनेने बळावतो त्याला नष्ट करण्यासाठी पाहा कुरआन ३ : ११२)
२०३) म्हणजे त्यांच्यातील जे लोक ईशग्रंथांच्या खऱ्या शिकवणींना चांगल्या प्रकारे जाणतात आणि प्रत्येक प्रकारच्या पक्षपात,  अज्ञानता आणि पूर्वजांच्या अंधानुकरणापासून मुक्त होऊन  व मनाच्या दासतेला झुगारून देऊन सच्च्या गोष्टीला सच्च्या मनाने मानतात; ज्यांचा पुरावा ईशग्रंथात मिळतो; अशा लोकांचे आचरण यहुदींच्या आचरणांपेक्षा बिलकूल वेगळे आहे.  त्यांना एकाच दृष्टीत कळून चुकते की ज्या जीवनव्यवस्थेची (धर्माची) शिकवण मागील पैगंबरांनी दिली होती तीच शिकवण आता कुरआन देत आहे. म्हणून हे लोक विशुद्ध हृदयाने सच्च्या मनाने दोन्हींवर ईमान आणतात.
२०४) याने अभिप्रेत आहे की मुहम्मद (स.) यांनी अनोखे काही आणलेले नाही जे पूर्वी आलेले नसावे. त्यांचा हा दावा नाही की मी जगात पहिल्यांदा एक नवीन काही सांगत आहे.  वास्तविकपणे त्यांनासुद्धा त्याच एका ज्ञानस्त्रोताद्वारे मार्गदर्शन प्राप्त् झाले आहे ज्याच्यापासून मागील सर्व पैगंबरांना मार्गदर्शन मिळत गेले आहे. हेसुद्धा त्याच वास्तविकतेला आणि  सत्याला प्रस्तुत करीत आहेत ज्यास जगात विभिन्न भागात आलेले पैगंबर प्रस्तुत करीत होते. `वह्य' चा अर्थ आहे, इशारा करणे, मनात बिंबविणे, गुप्त्पणे सांगणे आणि संदेश देणे.
२०५) (बायबलच्या जुना करारात १९ व्या ग्रंथात भजनसंहिता (Pasamas) `सामस' आहे तीच `जबूर' आहे.) हे पैगंबर दाऊद (अ.) द्वारा प्रस्तुत पूर्ण ईशग्रंथ जबूर नाही. त्यात लोकांच्या पद्यमय गोष्टींचा भरणा आहे. परंतु जे पद्य स्पष्टत: पैगंबर दाऊद (अ.) यांचे आहे त्यात वास्तविकपणे सत्यवाणीचा प्रकाश दिसतो. याचप्रकारे बायबलमध्ये सुलैमान (अ.) यांचा  `नीतीवचन' ``नावाने जो ग्रंथ आहे त्यातसुद्धा बरीच भेसळ आहे. त्याचे शेवटचे दोन अध्याय तर स्पष्टत: नंतर वाढविलेले आहेत. तरीही या `नीतीवचना' चा मोठा भाग सत्याधिष्ठित  वाटतो. या दोन ग्रंथांसह आणखी एक ग्रंथ पैगंबर अय्यूब (अ.) यांच्या नावाने बायबलमध्ये आहे. परंतु तत्त्वदर्शीतेचे अनेक अनमोल हिरे असूनसुद्धा त्याला वाचतांना वाटते की पैगंबर  अय्यूब (अ.) यांच्याशी हे असंबंधित आहे. कुरआनमध्ये आणि स्वयं या ग्रंथात प्रारंभी पैगंबर अय्यूब (अ.) यांच्या महान धैर्याची प्रशंसा केली आहे, याच्या विरुद्ध हा पूर्ण ग्रंथ सांगतो की  पैगंबर अय्यूब (अ.) आपल्या आजारपणात आणि संकटकाळात तर अल्लाहच्या विरोधात होते. त्यांच्याजवळ उठणारे बसणारे त्यांचे सांत्वन करून सांगत की अल्लाह अत्याचारी नाही;  तरी ते मानावयास तयार नव्हते. या ग्रंथांऐवजी बायबलमध्ये बनीइस्राईलींच्या पैगंबरांचे सतरा सहिफे (पुस्तिका) आहेत ज्यांचा बहुतांश भाग सत्य वाटतो.
२०६) दुसऱ्या पैगंबरांवर दिव्य प्रकटन आवाजाने येत असे किंवा देवदूत संदेश ऐकवत असे आणि पैगंबर ऐकत असत. परंतु पैगंबर मूसा (अ.) यांच्याशी या संबंधात विशिष्ट व्यवहार   केला म्हणजे अल्लाहने स्वत: त्यांच्याशी वार्तालाप केला. या वार्तालापाचा उल्लेख कुरआन मध्ये २० : ११-१४ आला आहे. बायबलमध्येसुद्धा पैगंबर मूसा (अ.) यांच्या या वैशिष्टयाचा  उल्लेख याचप्रकारे केला गेला आहे. लिहिले आहे, ``जसा कोणी आपल्या मित्राशी बोलतो त्याचप्रमाणे प्रभु समोरासमोर येऊन मूसाशी बोलत असे.'' (निर्गमन ३३ : ११)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget