350 मशीदी... 5000 कार्यकर्ते, 7000 पूरग्रस्तांना जेवण
कोल्हापूर
कोल्हापुरातील महापूर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला नाही. अशा वेळी शहरातील संपूर्ण मुस्लिम समाज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकवटला आहे. शहरातील 350 मशीदींमध्ये व्हेज पुलाव आणि डाळ-भात बनवण्याचे काम सुरू असून जवळपास 5000 मुस्लिम कार्यकर्ते जेवणाची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत आहेत. या वेळची ईद छोट्या स्वरूपात साजरी करतानाच बकऱ्याची कुर्बानी न देता त्याचे पैसे पूरग्रस्तांच्या मदसाठी खर्च करण्याची घोषणादेखील समाजबांधवांनी केली आहे. पूर ओरसेपर्यंतच नव्हे, तर ओसरल्यानंतरही ही मदत सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापुरातील कसबा बावडा, लाइन बजार, लक्ष्मीपुरी, महावीर कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, शाहुपुरी इत्यादी भागांमध्ये अजूनही पुराचे पाणी ओसरलेले नाही. अशा वेळी पूरग्रस्तांच्या मदतीला शहरातील मुस्लिम बांधव देवदुतासारखे धावून आले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना अजूनही बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरूच आहे. आता या लोकांना ज्या ठिकाणी आश्रय दिला आहे, तिथे संपूर्ण समाजबांधव जेवणाची पाकिटे, पिण्याचे पाणी, लहान मुलांना दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवत आहेत. बैतुलमाल कमिटी, उलेमा-ए-हिंद, सुन्नत-ए-मुस्लिम, जमाअत-ए- इस्लामी हिंद इत्यादींसह शहरातील वेगवेगळ्या जमाती कोल्हापुरातच नव्हे, तर सांगलीतील पूरग्रस्तांसाठीही मदत पाठवत आहेत.
कोल्हापुरातील संपूर्ण मुस्लिम बांधवांनी यंदाची बकरी ईद छोट्या स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या वेळी कोणीही बकरा कापणार नसून त्याचे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च करण्याचेदेखील ठरवले आहे. ‘कुर्बानी देऊ नका, पूरग्रस्तांना मदत करा’, अशी घोषणाच करण्यात आली आहे. आतापर्यंत बांधवांनी 50 लाख रुपये जमा केले आहेत. त्यातून शहरातील 350 मशीदींमध्ये स्वयंपाकघर तयार करून जेवण बनवले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून निरंतरपणे जेवण तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार 500 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत मदत करत आहे. तयार जेवणाची पाकिटे दररोज 5 हजार लोकांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती बैतुलमाल कमिटीचे समीर सय्यद यांनी दिली.
महापुरामध्ये बहुतांश घरांमध्ये कचरा आणि घाण साचलेली आहे. त्या सर्व घरांमध्ये जाऊन मुस्लिम कार्यकर्ते घर लिक्विड आणि स्प्रेचा वापर करून धुण्याचे काम करत आहेत. पूर ओसरेपर्यंत हे कार्य सुरूच राहणार आहे. घर स्वच्छ करून दिल्यानंतर एका कुटुंबाला 5 किलो तांदूळ, 5 किलो साखर, 2 किलो डाळ आणि पावशे चहा अशी किट दिली जाईल. त्यासाठी 700 किलो तांदूळ आणि 700 किलो साखरेचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
- साभार : दिव्य मराठी
Post a Comment