Halloween Costume ideas 2015

मुस्लिम युवक आणि महापूर!

‘‘फोटो काढून आमचं पुण्य कशाला वाया घालवताय?’’ म्हणणाऱ्या जावेद शेखनी प्रत्येकाच्या मनात घर केले. त्यांचा लांबलेला हात खूप दूरवर पोचला. भिडला! पण हे एकमेव नव्हते.  मला माहितीये की हे ‘त्ययांच्यापैकी’ कोणी लिहीणार नाही. पण ज्या दिवशी सांगलीत पाऊल टाकले त्याच दिवशी ठरवले की आपण हे मांडायचे.
इतिहासाची पुस्तके एवढी वाचलीत की टोपी दिसताच औरंगजेब आठवायचा. बिनामिशीचा दाढीवाला दिसला की चंगेजखानापासून (मुस्लिम नसतानाही) ओवेसीपर्यंतचा ‘अंध’ प्रवास  डोळ्यासमोर यायचा. बाबरीपासून कबरीपर्यंत. मन हेलकावत राहायचं. आपली सुटलेली पोटं पाहून ‘‘पंधरा मिनीट के लिये *** की फौज निकालो’’ वाक्य आठवून भिती वाटियची’’ भावा  जावेद सारं विसरायला भाग पाडलंस!
सात दिवस फक्त तीन-तीन तास झोप घेऊन साडेतीनशे तरूणांना पूरग्रस्तांसाठी कामाला लावणारे मुस्तफा सर असो की, पाण्यात राहून पायाला जखम झालेले पोलिस इक्बाल शेख  असो. ‘‘सर तुम्ही आमच्यासाठी इथे आलात, पैसे नकोत.’’ म्हणणारा ऑटोवाला असो, कर्नाटकातील अख्ख्या चिकोडी तालुक्याला रसद पुरवणारा मुस्लिम समाज असो, की शिरोळीतील  मदरशात अन्न पुरवणारा मुस्लिम असो... कितीतरी ज्ञात अज्ञात उदाहरणे. एक गोष्ट मात्र खरी की आपण आधीपासूनच एक होतो, या महापूरने एक असल्याची जाणीव करून दिली.  महापूरही बघा कसा योगायोग घेऊन आला. एकीकडे ३७० कलम, एकीकडे तीन तलाक, एकीकडे मॉब लिंचींग, निवडणुका तोंडावर. पण कृष्णेच्या या पुरात माणूसकीच्या महापुराने मात्र  आपल्या सीमा ओलांडल्या. क्वचित महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं ज्यामध्ये मुस्लिम युवकांचा एवढा सहभाग असेल.
ऐन बकरी ईद रोजी आमचा कॅम्प (सांगली मिरज) कुपवाड येथील एका मशिदीत होता. शंभर एक पुरग्रस्त गैरमुस्लिम आश्रयाला होते आणि त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात मुस्लिम  बांधव व्यस्त होते. पाठीमागे झोमॅटोवाल्यासोबत झालेला प्रसंग आठवला. कट्टरवाद्यांना दोन्ही बाजूंनी दिलेली ती एक सनसनीत कानाखाली होती. जिथे त्यांना क्षणोक्षणी आपलं देशप्रेम  सिद्ध करावं लागतं तिथे त्यांनीच सिद्ध करून दाखवलं की, अल्लाहचा इस्लाम वेगळा आहे आणि मुल्लाहचा इस्लाम वेगळा आहे. ना इथे कोणी कोणाचे नाव पाहिले ना गाव, ना धर्म ना  वय, ना कोणता फतवा. इथे फक्त माणसासाठी माणूस उभा होता. कोणीतरी आपला नेता हातात डब्बा घेऊन भिक्षा मागत येईल आणि मग आपण मदत करू असा विचार त्यांनी केला  नाही. मिळेल त्या प्रत्येक मार्गाने प्रत्येकाने नि:स्वार्थ प्रयत्न केले. करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
मुस्लिम मित्रांनो तुमचं पुण्य बिलकुल कमी होणार नाही, काळजी नसावी. धन्यवाद तर म्हणणारच नाही. जावेदभाईला कळलं तर आणखी चिडायचे. (टीप : आयुष्यातील पहिली २० वर्षे  कट्टर अशा मराठवाड्यात गेली आणि नंतरची १० वर्षे नागपूरात. इथे मुस्लिमांच्या तोंडून मराठी खूप कमी वेळा ऐकली पण ‘‘आरं खुळ्या उचल की त्यो बॉक्स’’ हे जेंव्हा एका  टोपीधारीच्या तोंडून ऐकलं तेंव्हा उमगलं की मराठीला मरण नाही)

(लेखकाच्या वॉलवरून)

– डॉ. प्रकाश कोयाडे
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget