फैसले सच के हक में होते हैं
मैं अभीतक इसी गुमान में थामागच्या आठवड्यात 30 जुलैला जेव्हा तीन तलाक प्रतिबंधक बिल राज्यसभेमध्ये मंजूर झाले तेव्हा अनेक लघुदृष्टी असणाऱ्या लोकांना कमालीचा आनंद झाला, त्यात काही मुस्लिमांचाही समावेश होता. मात्र या कायद्याच्या समर्थनार्थ उभ्या असणाऱ्या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की, या कायद्यामुळे भविष्यात त्यांच्यासमोर किती अडचणी उभ्या राहणार आहेत? ’सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ सारखी आश्वासक घोषणा देऊन पंतप्रधानांनी आपल्या दूसऱ्या कारकिर्दीचा शुभारंभ केला, तेव्हा वाटले होते की, ते आपल्या पहिल्या कारकिर्दीत झालेल्या चुका दुरूस्त करून अधिक परिपक्वपणे देशासमोरील खऱ्या प्रश्नांना सामोरे जातील. मात्र शेतकरी आत्महत्या, व्यापाऱ्यांच्या आत्महत्या, झुंडींचे बळी आणि संभाव्य आर्थिक मंदी, महिलांवरील अत्यचार या सारखे महत्त्वाचे विषय सोडून संसदेमध्ये त्यांनी तीन तलाक बिल अट्टाहासाने मंजूर करून घेतले. हे बिल मंजूर करून घेत असतांना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे बिल मुस्लिम महिलांच्या हितामध्ये आहे, असा युक्तीवाद केला. ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यांना मुस्लिम महिलांचे खरे हित साधावयाचे असते तर त्यांनी मुस्लिम महिलांना आरक्षण दिले असते. झुंडीच्या हिंसेला बळी पडलेल्या पुरूषांच्या घरातील महिलांना आर्थिक मदत दिली असती. तसे न करता त्यांनी हा कायदा मंजूर करून घेतला.
सुलभ तलाक
तोंडी तलाकची व्यवस्था इस्लाममध्ये स्त्री पुरूषांवर दाखविलेली दया आहे. कोणाचाही संसार आयुष्यभर कधीही सरळ चालत नाही. त्यात अनेक अडचणी येतात. कधी त्या अडचणी सोडवण्यालायक असतात, कधी नसतात. शिवाय, अनेक लग्न परस्पर विरोधी संस्कार असलेल्या स्त्री पुरूषांमध्ये होतात. अशा विषम परिस्थितीमध्ये लग्न टिकवून ठेवण्यापेक्षा ते भंग करणे हाच उपाय दोघांच्याही हितामध्ये असतो. म्हणून इस्लामने विवाहाप्रमाणे तलाकचीही पद्धत अतिशय सुलभ केलेली आहे.
तीन तलाक संबंधी मुस्लिम मानसिकता
तीन तलाक दिल्याशिवाय इस्लाममध्ये घटस्फोट होऊच शकत नाही, इतपत गैरसमज समाजामध्ये रूजविण्यामध्ये काही लोकांना यश आले होते. त्यातून मुस्लिम समाजामध्ये जेव्हा कधी तलाकची वेळ येईल तेव्हा सरळ तीन तलाकचा उपयोग केला गेला, हे सत्य अमान्य करता येण्यासारखे नाही. म्हणून शहाबानो ते शायराबानो पर्यंतच्या अनेक तीन तलाक पीडित महिला सर्वोच्च न्यायालयापर्यंत स्वमर्जीने गेल्या व त्याचा परिणाम 22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन तलाक प्रतिबंध करण्याच्या निर्णयाच्या रूपाने समोर आला. याच निर्णयाच्या आधीन राहून 30 जुलै 2019 ला हा कायदा मंजूर करून घेण्यात सरकारला यश आले.
संभाव्य दुष्परिणाम
1. फक्त औपचारिकता म्हणून राहिलेली राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याबरोबर या मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल. आणि एकदाका हा कायदा लागू झाला की त्याचा पहिला परिणाम म्हणून मुस्लिम समाजात एका दमात तीन तलाक देण्याची प्रथा बंद होईल. कोणताही शहाणा माणूस त्याचा उपयोग करणार नाही. मात्र इतर समाजाप्रमाणेच आता नकोशा पत्नीचा खून करण्याकडे काही जाहील (अज्ञानी) मुस्लिमांचा कल वाढेल. जे खून करणार नाहीत ते घरात इतका दबाव निर्माण करतील की महिला स्वतः आत्महत्या करून घेईल.
2. नकोशा पत्नीला तलाक न देता तिला तसेच लटकवून ठेवण्याकडे आता मुस्लिमांचाही कल वाढेल.
3. विवाह कायम राहतील परंतु मन तुटल्यामुळे विवाहबाह्य संबंध वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
4. काही अन्य कारणामुळे ज्या महिलांना नांदायचे नाही अशा महिलांतर्फे पुरूषांवर या संदर्भात खोट्या केसेस दाखल करण्यात आल्यास आश्चर्य ते कोणते? कारण मनं तुटलेली असल्यामुळे त्यातून उत्पन्न झालेल्या अदावतीच्या भावनेला शमविण्यासाठी एखाद दोन खोटे साक्षीदार उभे करणे अल्लाहचे भय नसलेल्या मुस्लिमांना अशक्य नाही.
5. ’498 अ’ भादंवि प्रमाणे या कायद्यातील तरतुदींचाही दुरूपयोग केला जाईल.
6. तीन तलाक पीडित महिलांचा पती जेव्हा तुरूंगात जाईल तेव्हा उपजिविकेसाठी म्हणून रोजगार शोधण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागेल व समाजातील लांडग्यांच्या शोषणाला बळी पडावे लागेल.
लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब
परंतु मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जरी एकावेळेस तीन तलाक देण्यावर कायद्याने बंदी आलेली आहे तरी तोंडी तलाकवर बंदी आलेली नाही. वर नमूद सहाही अघोरी उपायांचा उपयोग न करता थोडासा संयम बाळगून ज्या ठिकाणी तलाक देणे आवश्यकच असेल त्या ठिकाणी ’तलाक-ए-हसना’ म्हणजेच वैध रितीने एक तलाक देऊन, तीन महिने घरात पत्नीला राहू देऊन, त्यानंतरही दोघांमध्ये समेट न झाल्यास सभ्यपणे तिला निरोप द्यावा. कुरआनपासून लांब राहिल्यामुळे एवढा सभ्यपणा मन तुटलेल्या पती आणि पत्नी या दोघांमध्ये येईल याबद्दल मात्र शंका आहे. म्हणून आता वेळ आलेली आहे की, मुस्लिम उलेमा, मुस्लिम बुद्धीजीवी आणि मुस्लिम प्रेस यांनी व्यापक जनजागृती करून वैध तलाक देण्याचे फायदे व तीन तलाक देण्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीसंबंधी लोकांना शिक्षित करावे, अन्यथा वर नमूद प्रमाणे दुष्परिणाम होवून भारतीय मुस्लिम समाज खिळखिळा होण्यास वेळ लागणार नाही.
तीन तलाकचा उगम
ऐ माओं, बहेनों, बेटियों दुनिया की जिनत तुमसे है
मुल्कों में बसती हो तुम्हीं कौमों की इज्जत तुमसे है
तात्काळ तीन तलाकची तरतूद कुरआनमध्ये नाही, हे सत्य एव्हाना भारताच्या बहुसंख्य लोकांना माहित झालेले आहे. मग ही पद्धत आली कोठूण? तर या बद्दल थोडक्यात समजून घेऊया. जमाअते इस्लामीचे संस्थापक मौ. अबुल आला मौदूदी रहे. सुरे तलाकच्या आयतींवर भाष्य करताना लिहितात की, नसाई या हदीस संग्रहामध्ये म्हटलेले आहे कि, एकदा प्रेषित सल्ल. यांना सूचना दिली गेली की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला एका दमात तिहेरी तलाक देवून टाकलेली आहे. त्यावर खाली बसलेले प्रेषित सल्ल. रागाच्या भरात ताडकन उठून उभे राहिले आणि ओरडून म्हणाले कि, ‘‘अल्लाहच्या पुस्तकाचा खेळ चालविला आहे काय? अजून मी तुमच्यात जीवंत आहे.’’ प्रेषितांचा या संदर्भातील राग पाहून त्यांच्या समोर बसलेल्या एका सहाबी रजि. यांनी उठून प्रेषितांना विनंती केली की, ‘‘ मी त्याचे शीर धडापासून वेगळे करू का?’’
दूसऱ्या एका प्रकरणात अब्दुल रज्जाक नावाच्या व्यक्तीने हजरत उबादा बिन अलसामित रजि. संबंधी म्हटलेले आहे कि, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला एका दमात एक हजार वेळा तलाक दिली. या संदर्भात हजरत उबादा यांनी प्रेषित सल्ल. यांच्याकडे जावून यासंबंधी विचारणा केली तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, ‘‘अल्लाहच्या मर्जीविरोधात जावून त्याने आपल्या पत्नीला तलाक दिल्यामुळे ती त्याच्या निकाहमधून विभक्त झाली. राहिलेल्या 997 तलाक संबंधी निर्णय अल्लाह घेईल, मग तो त्यासाठी हजरत उबादाच्या वडिलांना अजाब देईल किंवा क्षमा करील.‘‘
हजरत अब्दुल्लाह बिन उमर यांनी आपल्या पत्नीला रजस्वला असतांना एक तलाक दिली होती. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी ती तलाक लागू झाली नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी प्रेषित सल्ल. यांना विचारले की, ‘‘जर का मी तिला रजस्वला नसतांना व तिच्याशी शरीर संबंध केले नसतांना एका वेळेस, एका दमात तीन तलाक दिली असती तर पुन्हा तिच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकलो असतो का?’’ तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी उत्तर दिले, ‘‘ नाही, तीन तलाकमुळे ती तुझ्यापासून वेगळी झाली असती आणि ते कृत्य गुन्हेगारी कृत्य ठरले
असते.’’ (तफहिमुल कुरआन खंड 5, पेज नं.555-556)
कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ असून तो प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नाझिल (अवतरित) झालेला आहे. म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक कुरआन दुसऱ्या कोणाला समजू शकतो असा दावा करता येणे शक्य नाही. एकदा एका सहाबींनी आई आएशा रजि. यांना प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल संक्षेपामध्ये वर्णन करण्याची विनंती केली, तेव्हा आई आएशा रजि. यांनी एका वाक्यात उत्तर दिले की, ‘‘प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जीवन म्हणजे ते चालते-फिरते कुरआन होते‘‘ याचाच अर्थ असा की, ते साहब-ए-कुरआन होते. या नात्याने त्यांचा निर्णय जगातल्या मुस्लिमांसाठी अंतिम निर्णय आहे. मग जगातील काही मुस्लिम देशांनी जरी तात्काळ तीन तलाकच्या प्रथेवर प्रतिबंध आणला असला तरी ते उदाहरण खऱ्या मुस्लिमांसाठी मार्गदर्शक उदाहरण होऊ शकत नाही. प्रेषित सल्ल. यांची यासंदर्भातील कृती हे आमच्यासाठी आदर्श उदाहरण आहे. इतर मुस्लिम देशात तर दारू, जुगार, वेश्याव्यवसाय सगळेच सुरू आहे. त्यामुळे त्या देशांचे आचरण भारतीय मुस्लिमांसाठी आदर्श उदाहरण ठरू शकत नाही.
आदरणीय प्रेषित (सल्ल.) यांच्या 23 वर्षाच्या प्रेषित्वाच्या काळात चार अशा वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या की ज्यात चारही लोकांनी आपल्या पत्नीला एका दमात तीन तलाक दिलेले होते. तेव्हा अतिशय नाराजी ने का कोईना प्रेषित सल्ल. यांनी त्या चारही घटनांमध्ये तलाक लागू केलेली होती. प्रेषितांची प्रत्येक कृती ही समस्त मुस्लिमांसाठी अनिवार्यरित्या अनुकरणीय असते. त्यातून एका वेळी तीन तलाकच्या या प्रथेचा जन्म झाला. त्यामुळे जरी ही पद्धत कुरआनमधून आलेली नसली तरी प्रेषित सल्ल. यांच्या निर्णयातून आलेली आहे. म्हणून ती अनुकरणीय आहे. मात्र अगदी अपवादातील अपवादात्मक परिस्थिती (अन प्रेसिडेंटेड सिच्युएशन) मध्येच एका दमात तीन तोंडी तलाकचा वापर केला जाऊ शकतो. एका दमात तीन तलाक शल्यचिकित्से (ऑपरेशन)सारखे असते. कोणतीही शल्यचिकित्सा वाईटच. मात्र जेव्हा ती टाळण्यासारखी नसते तेव्हा ती केलेली केव्हाही चांगली. उदा.
अ) कल्पना करा एका व्यक्तीने आपल्या पत्नीला व्याभिचार करतांना उघड्या डोळ्यांनी पाहिले.
ब) एका व्यक्तिच्या पत्नीने त्याच्या डोळ्या देखत त्याच्या आईचा खून केला.
अशा एक ना अनेक आकस्मिकरित्या उद्भवलेया परिस्थितीमध्ये तात्काळ तलाक दिला गेला नाही तर हत्या किंवा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्या जाण्याची भिती असते म्हणून अशा घोर अपवादात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाईट जरी असली ही तरतूद ही उपलब्ध असणे हे समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोणातून आवश्यक आहे. मात्र हे समजून घेण्याइतपत शहाणपणा दाखवला गेला पाहिजे. जे मुस्लिम प्रेषितांच्या या कृतीच्या विरोधात जाऊन तात्काळ तीन तलाकच्या पद्धतीचा विरोध करीत आहेत. ते एक तर अज्ञानी आहेत किंवा गुस्ताख-ए- रसूल सल्ल. (प्रेषितांच्या निर्णय क्षमतेचा अपमान करणारे) आहेत. अल्लाह आपल्या सर्वांना अगोदर तर तलाक न देण्याची व देण्याचीय वेळ आली तर त्यासंबंधी योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची समज देओ. आमीन.
Post a Comment