शेगाव येथे मस्जिद परिचय
शेगाव (शोधन सेवा)
इस्लाम धर्मातील रूढी, परंपराची अन्य धर्मियांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी. तसेच मस्जिदमध्ये नेमके काय चालते हे समजून घेण्यासाठी शेगाव येथे मस्जिद परिचय हा उपक्रम रविवार, 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
संतनगरी शेगाव येथील जामा मस्जिदमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील हूड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश दळवी, हभप शास्त्री , इस्लामचे विचारवंत इश्तीयाक अहेमद, मुहम्मद अमीन, मुहम्मद हारून यांच्यासह जमाअते इस्लामी हिंदचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
जो सर्व समाजाला एकत्र आणतो, सर्वांना सोबत घेऊन चालतो तो खरा धर्म. या तत्वाला समोर ठेवून जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. मस्जिद पाहण्यासाठी आलेल्या सर्वधर्मीय लोकांचे मस्जिद ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी करून मस्जिदीसंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यात वजू कशाला म्हणतात, नमाज कशी अदा करतात इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. कितीवेळेस नमाज होते, शुक्रवारच्या नमाजचे महत्वही यावेळेस समजावून सांगण्यात आले. प्रास्ताविक मुहम्मद जाकीर यांनी केले. मुफ्ती अनिस आणि हिदायत शेख यांच्या व्याख्याना पश्चात नमाजचे प्रात्यक्षिकही दाखविले गेले. अनेक मुस्लिमेत्तर बांधवांनी जोहरच्या नमाजामध्ये सामील होऊन सामुहिक नमाजचा अनुभव घेतला. काहींनी गॅलरीत बसून नमाजचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेतले. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शेगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल हुड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश दळवी, हभप शास्त्री यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमातून शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आपसामध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम स्थान म्हणजे मस्जिद. अशी भावना म्हणजे अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार पत्रकार फहीम देशमुख यांनी मानले. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जमाअते इस्लामी हिंदचे स्थानिक सदस्यांचाही समावेश होता. यावेळेस जमाअततर्फे दोन कुरआन करून 20 पुस्तिका मुस्लिम्मेत्तर बांधवांना जमाअततर्फे देण्यात आले.
Post a Comment