Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पारतंत्र्याकडे वाटचाल

आपला देश 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. स्वातंत्र्य मिळून सात दशके ओलांडल्यावरही आपला संपूर्ण देश आणि सर्व जनता खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे असे  म्हणणे धाडसाचे ठरेल. देशातील दलित, आदिवासी, भटके, बेघर, बेकार, वंचित, वेठबिगार, असंघटित, अल्पसंख्याक आणि अगदी महिला यांच्या जीवनात खऱ्या स्वातंत्र्याची पहाटही धड उगवली नाही. ती आज ना उद्या उगवेल या आशेवर देशातील कोट्यावधी लोक आणि जनसमुदाय जीवन जगत होते. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याच्या सूर्याची किरणे धड शिरली  नाहीत तोच आपला देश जमातवादाकडे, मनुवादाकडे, हुकुमशाहीकडे आणि पारतंत्र्याकडे नेला जात आहे. हे अत्यंत थंड डोक्याने,चोरपावलांनी पण नियोजनबद्धरित्या घडवले गेले आहे  आणि जात आहे. हे एकअभूतपूर्व असे ऐतिहासिक षड्यंत्र आहे. या षड्यंत्राचा पहिला टप्पा सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेल्या हिंदू आणि मुसलमान यांच्या स्वतंत्र राष्ट्रांच्या  अप्रत्यक्ष मांडणीचा आहे.
दुसरा टप्पा या मांडणीतून बॅ.जीनासारख्या आधुनिक मुसलमानाच्या मनात भयगंड निर्माण करून, त्याला स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य प्रवाहापासून तोडून आणि त्याच्या मनात सत्तेची  महत्त्वाकांक्षा फुलवून जमातवादी करण्याचा आहे. तिसरा टप्पा स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा न देता विरोध करीत, फाळणीची बीजे पेरीत प्रत्यक्षात अखंड भारताचा जप करून फाळणीचे  खापर महात्मा गांधींच्या माथ्यावर फोडून त्यांच्या केलेल्या भ्याडहत्येचा आहे. चौथा टप्पा स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी जनसंघ नावाचा राजकीय मुखवटा धारण  करण्याचा आहे. पाचवा टप्पा आणीबाणीत संघावर बंदी घालण्यात आल्यावर, तुरुंगवासांतून आणीबाणीला पाठिंबा जाहीर करीत, माफी मागून सुटका करून घेत, आणीबाणी उठताच  लोकशाही वाचविण्याचे नाटक करीत जनता पक्षात सामील होत देशभर सत्तेची भागीदारी मिळवण्याचा आहे. हे पाच टप्पे ही पायाभरणी होती.
जनता पक्षाच्या प्रयोगामुळे देशातील प्रशासकीय यंत्रणा पोखरण्याचा मार्ग खुला झाला. द्वीसदस्यत्वाच्या मुद्द्यावर जनता पक्ष अल्पावधीत फुटताच अत्यंत हुशारीने त्याचे खापर  समाजवाद्यांवर फोडून या प्रयोगातून अंग काढून घेऊन जनसंघाच्या जागी भाजपाला जन्माला घालणे हा सहावा टप्पा होय. या सर्व काळात संघ नामक ऑकटोपसच्या नांग्या आपल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक अंगांना वेढा घालत होत्या. संतांची जागा असंख्य बुवा-बाबा घेत होते आणि अध्यात्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पेरत, जनतेला लुबाडत जनतेचे  हिंदुत्वीकरण करीत होते. पण एवढ्या प्रयत्नांनंतरही राजकीय यश हुलकावणी देत होते. पाया भक्कम झाला होता. पण इमले उभे राहून कळस चढत नव्हता. मंडल आयोगाच्या  मुद्द्यावर देश पेटवण्याचा प्रयत्न करून पाहण्यात आला. मग लक्षात आले की यातून हिंदुंमध्येच फुट पडेल. दलित, बहुजन दुरावतील. आणायचा आहे मनुवाद; पण लढायला हवेत  दलित, आदिवास आणि बहुजन... मनुवादाचे नंतर पाहू, सध्या सर्व हिंदूंना एकत्र काय बांधेल हे महत्त्वाचे. हिंदुराष्ट्राच्या स्वप्नाचा आधार मनुस्मृती जरी असला तरी तो उघडकरून  चालणार नाही. ब्रिटीश राजवट, स्वातंत्र्य लढा आणि गांधी-नेहरू-पटेल-बोस-भगतसिंग युग या काळात हरवलेले हत्यार- मुस्लिमद्वेष पुन्हा बाहेर काढणेच भाग आहे याचा साक्षात्कार झाला.
फाळणीत झालेली हिंसा, काश्मिर, 370 कलम, समान नागरी कायदा यांनी हे हत्यार धारदार बनणार नाही. आणि मग निघाला राम जन्म भूमीचा मुद्दा. अडवाणी यांची रथ यात्रा आणि  बाबरी मशिद विध्वंसाने मिळालेली संजीवनी हा सातवा टप्पा. तशात घडले गोध्रा आणि कारसेवकांचे हत्याकांड. आता मात्र देश मुस्लिमांना धडा शिकवायला सज्ज झाला. याचे नेतृत्व  केले मोदी-शहा जोडगोळीने. रथयात्रेत गुरु अडवाणी यांच्या रथाच्या पायरीवर भोंगा घेऊन बसलेल्या नरेंद्र मोदी नामक अज्ञात स्वयंसेवकाला गुरूने निष्ठेचे फळ गुजरातच्या मुख्यमंत्री  पदाच्या रूपाने पदरात टाकलेच होते. या मोदी नामक रामाचा हनुमान अमित शहा ही राम-हनुमानाची जोडी मुस्लिम रूपी रावणाच्या दहनासाठी उभी राहिली. मदतीला होते हिंदू धर्माची  नव्याने दीक्षा दिलेले आदिवासी आणि गुजरात प्रशासनाचे वानरसैन्य! रावणाचे एक तोंड ठेचण्यात आले. आता मोदी नामक राम रामराज्य स्थापन करण्याकडे निघाला होता. पण  रामराज्याकडे जायचे असेल तर रावणाची संपूर्ण लंका जाळायलाच हवी. हे महान कार्य करणारा एका छोट्या तुकड्याचा अधिपती असून कसा चालेल? तो संपूर्ण राज्याचाच राजा  व्हायला हवा. इकडे काँग्रेस नामक दुसरा रावण राज्याला विळखा घालून बसला होता. मग सुरू झाला आठवा टप्पा.
देशात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधी (यातील कोणतेच भ्रष्टाचार पुढे सिद्ध करता आले नाहीत हा भाग वेगळा) आणि लोकशाहीच्या वतीने न भुतो न भविष्यती असा माहोल उभा करण्यात आला. मदतीला आले प्रति महात्मा गांधी आणि मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड विनर्सची फौज. प्रशासनात आधीच पेरलेलेही उपयोगी पडले. कॅगने तर लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची  प्रकरणे बाहेर काढण्याचा धडाका लावला. (पुढे सांगण्यात आले की हे सर्व अंदाज होते). याच्या काही काळ आधीच अरब स्प्रिंगच्या नावाखाली अरब जगातील हुकुमशाह्या  धडाधडकोसळत होत्या. काही वर्षांपूर्वीच अमेरिकेने ज्या हुकुमशहांना रेडकार्पेट अंथरले होते आणि ज्यांना वर्षानुवर्षे पोसले होते त्यांना निष्ठुरपणे संपवण्यात आले. पण तिकडे सिरीयांत  इसिससारख्या भयानक संघटनेला जन्म देण्यात आला. जगभर सिटीझन्स फॉर डेमोक्रसी, सिटिझन्स अगेन्स्ट करप्शन वगैरे नावाखाली चळवळी फोफावू लागल्या. यातील अनेक गोष्टी  अमेरिका, वर्ल्ड बँक आणि जागतिक नाणेनिधी घडवीत होती हे जगाच्या लक्षात यायला फार वेळ लागला.
इकडे आपल्या देशातील जनतेला काँग्रेस सरकार बदलणे गरजेचे वाटू लागले. या सरकारने 70 वर्षांत भ्रष्टाचार आणि घराणी पोसणे याशिवाय काहीच केले नाही असा साक्षात्कार जनतेला झाला. देश पेटू लागला. मदतीला थैल्या घेऊन उद्योगपती आणि विज्ञान घेऊन माध्यम तंत्रज्ञ होतेच. आणि नवव्या टप्प्यात नायक संपूर्ण राज्याचा अधिपती म्हणून सिंहासनावर आरूढ झाला. पण देशाची घटना त्याला हे पद तह्हयात देणे शक्य नव्हते आणि घटना लगेचच बदलणे त्याला शक्य नव्हते. राज्य हाती घेताच त्याने आपल्या सर्व अपूर्ण  हौशीमौजी पूर्ण करायला सुरुवात केली. उपकारकर्त्यांचे उपकार फेडणेही गरजेचे होते. (यांत गुरूला स्थान नव्हते कारण तो उपकार करीत नसतो). यासाठी अर्थव्यवस्थेला पूर्ण कंपू- भांडवलशाहीचे स्वरूप देणे, ती अमेरिकेच्या पूर्ण दावणीला बांधणे, गरजेचे होते. हे करताना छोटे उद्योग आणि शेतकरी संपविणे अपरिहार्य होते. दुसऱ्या बाजूला जनतेला जमिनीवरील  वास्तवाचा विसर पाडण्यासाठी सतत हवेतील घोषणा आणि हवेतील गोष्टींमध्ये (हवाई हल्ला वगैरे) अडकविणे आवश्यक होते. या वाटचालीबरोबर जनतेच्या हिंदुत्वीकरणाची वाटचाल  घडविण्याचे कार्य करण्यासाठी बुवा-महाराज-योगी-साध्वी यांच्या फौजा सत्ता देऊन मोकाट सोडण्यात आल्या. अत्यंत पद्धतशीरपणे होयबांची फौज न्यायव्यवस्था,निवडणूक यंत्रणा, सैन्यदले, गुप्तचर यंत्रणा, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आयकर यंत्रणा, माध्यमे, साहित्य- कलाक्षेत्रे यांत पेरण्यात आली. या यंत्रणेच्या मदतीने विरोधक नेस्तनाबूद आणि हवे तेव्हा नामशेष 
करण्यात आले.
देशातील सर्व संस्थांमध्ये आपले निष्ठावान पेरण्यात आले. मदतीला बेहिशोबी अपरंपार धनशक्ती, अनेक बाहुबली, धर्मांध युवक, राखीव जागा आणि सत्ता यांच्या आशेने आलेला बहुजन समाज आणि खोट्या अफवांचे, बदनाम्यांचे, खोट्या प्रगतीच्या बातम्यांचे पीक पेरणारा, गरज पडल्यास ई.व्ही.एम.मध्ये घुसू शकणारा आय. टी.चा अत्याधुनिक तरुण वर्ग! या   सर्वांच्या मदतीने अधिपती आता पुन्हा निर्विवाद बहुमताने सिंहासनावर आरूढ झाला आहे.
आता दहावा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात वरच्या सदनात बहुमताकडे जायचे आहे म्हणजे हवे तसे कायदे बदलता येतील, वेळप्रसंगी घटनाही बदलता येईल, विरोधक संपवून टाकायचे आहेत म्हणजे विरोधी आवाजच येणार नाही, अनेक धोरणे हिंदुत्व आणि कंपू-भांडवलशाही पूरक करायची आहेत, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जनतेला भीतीखाली ठेवायचे आहे, अडचणीच्या विरोधकांना आणि नबघणाऱ्या उद्योगपतींना आयकर-कर दहशती (टॅक्स टेररिझम) खाली ठेवायचे आहे. जे शरण येतील ते पावन होतील. जे निष्ठावान आहेत आणि  नव्याने बनतील त्यांना सर्व गुन्ह्यांपासून अभय असेल! मग अमित शहा गृहमंत्री बनतील, साक्षी महाराज, प्रज्ञा सिंग खासदार बनतील, योगी मुख्यमंत्री बनेल आणि सेंगर बलात्कार  करू शकेल. तोंडी तिहेरी तलाक देताच मुस्लिम पुरुष तुरुंगात जाईल पण हिंदू पुरुष देशासाठी त्याग केला असे म्हणून सत्तेच्या शिखरावर पोहोचेल.
भविष्यात गरज लागली तर सैनिकी शाळांच्या नावांखाली देशात समांतर सैन्यही उभे करता येईल. शस्त्र पूजेच्या नावाखाली हत्यारबंद फौजा उभ्या राहिल्याच आहेत. त्या स्थानिक पातळीवर विरोधकांचा समाचार घेतील, यांत प्रामुख्याने वैचारिक विरोधकांचा समाचार घेतला जाईल. याही पलीकडे गरज लागली तर यु.ए.पी.ए. (अनलॉफुल अ‍ॅक्टीव्हिटी प्रिवेन्शन लॉ)  नावाचे ब्रम्हास्त्र आहे. याच्याद्वारे कोणालाही; लवंगी फटाकडाही न फोडलेल्या किंवा बंदुकीला हातही न लावलेल्या व्यक्तीला अतिरेकी म्हणून घोषित करून विनाचौकशी, विनापुरावा,  अजामिनपात्र पद्धतीने ताब्यात घेता येईल. हे अधिकार राज्याला म्हणजेच पर्यायाने पोलीस यंत्रणेला दिले जातील.
नव्या शिक्षण धोरणाचा नवा कस्तुरीरंगन अहवाल (ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019) सादर झाला आहे. हा अहवाल अत्यंत पद्धतशीरपणे 21व्या शतकाची भाषा करीत जुन्या  वैदिक कर्मकांडी भारतीय परंपरांकडे नेण्याचा प्रयत्न आहे. हा अहवाल शिक्षणाला सरकारची जबाबदारी न मानता खाजगीकरणाकडे नेऊन देशातील बहुजनांना शिक्षणापासून वंचित   करणारा आहे. हा अहवाल शिक्षण क्षेत्राच्या मदतीने नवी जातिव्यवस्था निर्माण करणारा आहे जी हिंदुत्वाच्या पुढील वाटचालीला पूरक असेल. त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्राची सूत्रे आणि  सत्ता एकहाती एकवटण्याचा प्रयत्न आहे. तसाच प्रयत्न वैद्यकीय क्षेत्राबाबत करण्यात आला आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी आता नॅशनल मेडिकल कमिशन स्थापण्यात  आले आहे. या कमिशन मार्फत वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण आणि व्यापारीकरण कमी न करता सूत्रे सरकारच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न आहे. या नव्या कायद्याने कुडबुडेवैद्य  जन्माला घालण्याचा घाटही घालण्यात आलेला आहे. पण अधिपतीने सर्वांत मोठा हल्ला चढवला आहे तो माहिती अधिकारावर. (आर.टी.आय. अमेंडमेंट 2019). आर.टी.आय. मुळे  अधिपतीच्या शिक्षणाचे वास्तव, वैवाहिक स्थितीचे वास्तव अशा अनेक अडचणींचा सामना सरकारला करावा लागत होता. या कमिशनच्या प्रमुखपदी बसणाऱ्या व्यक्तींची सूत्रे आणि  भवितव्य आपल्या हाती ठेवले म्हणजे सत्ताधारी अडचणीत येतील असे प्रश्न कोणी विचारले तरी त्याची उत्तरे देण्याचे धाडस कोणी करणार नाही. कारण त्याला हवे तेव्हा पदमुक्त  करणे सरकारच्या हाती, म्हणजे अधिपतीच्या हाती असेल. दुर्दैवाने नीतिधैर्य आणि धैर्यही गमावलेल्या अनेक विरोधीपक्षांनी या बदलाला विरोध केला नाही. अधिपतीला एक पक्के कळून  चुकले आहे की हवेतील घोषणा आणि हवेतील मोहिमा जनतेला आकाशाकडेबघायला लावतात आणि भाबडी जनता जमिनीवरील वास्तव विसरते. काश्मिर, अतिरेकी आणि पाकिस्तान हे  प्रश्न धगधगत ठेवले की देशप्रोच्या नावाखाली द्वेषाची आग धगधगत ठेवता येते. जनता येणारे पारतंत्र्य हसत स्वीकारते! कारण देशासाठी केलेल्या त्यागाचा तो भाग बनतो.
स्वातंत्र्य दिनाच्या दिनी; हरवत जाणाऱ्या स्वातंत्र्याचे दु:ख तर आहेच पण त्यापेक्षा आम्हाला दु:ख आहे ते जनतेला पारतंत्र्याची चाहूलही न लागण्याचे!!! असेही वाटून जाते की जनतेला  आपल्या देशाच्या इतिहासाचे चक्र एकदा हुकुमशाहीतून जाऊ द्या असे तर वाटूलागलेले नाही? पारतंत्र्य भोगल्याशिवाय स्वातंत्र्याची किंमत कळत नाही असे म्हणतात. पण धर्माधिष्ठित हुकुमशाही ही किती भयानक असते याचे अनेक दाखले इतिहासात जागोजागी आहेत. म्हणूनच तमाम भारतवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(साभार : पुरोगामी जनगर्जना, पुणे)

- डॉ.अभिजित वैद्य

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget