ईद-उल-अजहा उत्साहात साजरी : मुफ्ती सोहेल कास्मी यांनी केली अल्लाहकडे दुआ
लातूर (शोधन सेवा)
ऐ अल्लाह! तूच या सृष्टीचा रचियता आहेस. तू आमच्या सर्वांवर कृपा कर. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदींसह तामिळनाडू आणि केरळ राज्यात पावसाने कहर केला असून, पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेकांचे नातेवाईक दगावलेत, शेती वाहून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली, फार हाल आहेत. ऐ अल्लाह ही परिस्थिती लवकरात लवकर निवळू दे, येथील नागरिकांना संयम, धैर्य दे. त्यांना या संकटातून बाहेर काढ. आम्हा सर्वांना त्यांची मदद करण्याची प्रेरणा दे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. सर्वच लोक पाऊस नसल्याने परेशान आहेत, तुझ्याचकडे आशेने पाहत आहेत. ऐ अल्लाह ! येथे रहेमतचा पाऊस पडू दे. येथील लोकांच्या चेहऱ्यांवर आलेली निराशा काढून टाक. देशभरात जे लोक अन्याय आणि अत्याचारामुळे त्रस्त आहेत. त्यांना न्याय मिळू दे. देशात शांतता, एकात्मता, सौहार्द नांदू दे, अशी आर्त दुआ अल्लाहकडे मुफ्ती सोहेल कास्मी यांनी मागितली. लातूरच्या ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी 9.30 वाजता ईद-उल-अजहाची नमाज अदा केली. यावेळी त्यांनी दुआ केली. प्रारंभी मुफ्ती ओवेस कास्मी यांचे संबोधन झाले. मुफ्ती ओवेस म्हणाले, आजची ईद त्याग, समर्पण आणि बलिदानाचे प्रतिक आहे. ही ईद प्रेषितपूर्व काळापासून सुरू आहे. प्रेषित हजरत इब्राहीम अलै. यांची अल्लाहप्रती असलेली दृढ निष्ठा, पुत्रा प्रती असलेले अस्सीम प्रेम, पत्नी प्रती असलेले प्रेम. तसेच मुलगा हजरत इस्माईल अलै. यांचे आई- वडिलांप्रती असलेले प्रेम, त्यागाची भावना आणि अल्लाहवरील दृढ निश्चय तसेच मानवकल्याणाप्रती असलेल्या त्यागाची भावना म्हणजेच ईद उल अजहा आहे. या ईदनिमित्त केलेल्या कुर्बानीचा कुठलाही हिस्सा अल्लाहला पोहचत नसून कुर्बानी करणाऱ्याची नियत आणि त्याचे मानवांप्रती प्रेम आणि अल्लाहप्रती असलेली निष्ठा पोहोचते. या ईदनिमित्त आम्ही सर्व बांधवांनी कमीत कमी सहा गोष्टींचा आज निश्चय करणे गरजेचे आहे. तरच आम्ही ईदचा संदेश स्वतः जगू आणि इतरांपर्यंत पोहोचविल्याचे सार्थक होईल. एक त्यागाची भावना, दूसरा खैरे उम्मत होण्याचा हक. म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी समस्त मानवकल्याणासाठी अल्लाहची आदर्श संहिता आमच्यापर्यंत जी पोहोचविली आहे. ती सर्वांपर्यंत पोहोचविणे. स्वतः त्या आचारसंहितेवर अमल करणे आणि दुसऱ्यापर्यंत ती पोहोचविणे. आम्हाला खैरे उम्मत म्हणजे सर्वांच्या कल्याणाकरिता स्वतःला निवडावे. प्रत्येक व्यक्तीच्या सुख, दुःखात सहभागी होऊन त्यांच्या भलाईचा विचार करणारे बनावे. तीसरा म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर देणे. आम्हाला कुरआनने सर्वप्रथम शिक्षण घेण्याचे सांगितले आहे. त्यात दोन्ही प्रकारचा समावेश आहे. एक धार्मिक (इल्मूल आदियान) आणि दूसरे भौतिक (इल्मूल आशिया) शिक्षण घेणे बंधनकारक केले आहे. या शिक्षणातून आम्हाला मानवकल्याचे हित साधावयाचे आहे.
चौथे म्हणजे सद्यःपरिस्थिती पाहता निराश ना होणे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की ईश्वराच्या आज्ञेशिवाय झाडाचे पानदेखील हालत नाही. मग देशात होत असलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला निराश व्हायचे नाही तर त्याला समर्थपणे तोंड द्यावे लागेल. आपल्यातील धैर्य आणि नैतिकता ढासळू द्यायची नाही. आम्ही खैरे उम्मत आहोत. त्यासाठी आमच्यासमोर मानवकल्याण असले पाहिजे. ना की तो माझा आणि तो त्याचा. कुठलाही भेद मनात पाळायचा नाही. सगळ्यांसाठी चांगले काम करीत रहावे. पाचवे म्हणजे स्वच्छता आणि सदृढ शरीरप्रकृती. पाकी आधा ईमान आहे. म्हणजे स्वच्छता अर्धे इमान आहे. त्यामुळे आम्ही स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही आपले घर, परिसर, गल्ली आणि शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच आम्ही आमच्या शरीर प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. कुठल्याही प्रकारची नशा हराम आहे. मग आम्ही ती केली नाही पाहिजे. तंबाखू, गुटखा, दारू, जुगार आदींपासून आम्ही परावृत्त झाले पाहिजे. तंबाखू, गुटख्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. ज्यावेळेस अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, कुठल्याही प्रकारची नशा हराम आहे. तर आम्ही त्याचे अनुसरण केले पाहिजे. शरीरप्रकृती सुधारली पाहिजे. सदृढ शरीराचे माणसेच देशाला पुढे नेऊ शकतात. आम्हाला भारत सशक्त करायचा आहे. त्यासाठी आम्हाला स्वतःला सदृढ रहावे लागेल.
सहावे म्हणजे नैतिकतेत वाढ करणे आणि वृक्ष लागवड करणे. आज नैतिकतेचा स्तर मोठ्या प्रमाणात घसरत आहे. त्यामुळे आम्ही आमचे वाचन वाढविले पाहिजे. प्रत्येक कामात आम्ही नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावले पाहिजे. ते वृक्ष जोपर्यंत राहिल आणि त्याच्या सावलीखाली जो कोणी व्यक्ती त्याचा लाभ घेईल त्याचे पुण्य वृक्ष लावणाऱ्याच्या नावे असेल. विज्ञानाच्या दृष्टीकोणातूनही वृक्ष लागवडीला अधिक महत्व आहे. निसर्ग टिकला पाहिजे तरच आम्हीही टिकू. अल्लाहने निर्माण केलेल्या या निसर्गाची निगा राखणे आमचे कर्तव्य आहे. आणि आम्हाला वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. यातून जर बाहेर पडायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक वृक्ष लावणे अनिवार्य करावे. यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी देण्याचे आवाहनही मुफ्ती ओवेस कास्मी यांनी केले.
Post a Comment