Halloween Costume ideas 2015

900 मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिरं साफ केली

वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजी म्हणजे बहुसांस्कृतिक शहर. पोटापाण्यासाठी रोजगार मिळेल या आशेनं कानाकोपऱ्यातुन लोक इथे राहायला आलेले. तस बघायला गेलं तर श्रीमंत गाव.  पंचगंगेच्या पाण्याने सुपीक झालेली शेती शिवाय टेक्स्टाईलच्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी गावात पैसा खेळता ठेवलेला. भारतातील सगळ्यात श्रीमंत नगरपालिका हे बिरुद मिरवल होतं.  राबणाऱ्याना काम देणार गाव अशी ओळख. पण गेले काही वर्ष इचलकरंजीची घडी विस्कटली होती. साल 2009. बरोबर दहा वर्षापूर्वी मिरजेत गणेशोत्सवात दंगल झाली. काही दिवसांनी तीच लोण इचलकरंजीमध्ये देखील येऊन पोचलं. गावात मुस्लिम वस्तीच प्रमाण देखील अधिक आहे. कायम एकत्र असणारे यारदोस्त देखील धर्मापायी एकमेकांच्या जीवावर  उठले. गावात कधीही न पाहिलं असा कर्फ्यु लागला. इचलकरंजीकरांसाठी ती भळभळती जखम होती. साल 2019. टेक्स्टाईलमधील मंदीने गावाला हैराण करून सोडले आहे, जुने माग  बंद पडत आहेत, नवीन मागावरून कापड बनवणं परवडत नाही, कापड गिरण्या बंद पडल्या आहेत, कामगार लोक गाव सोडून वेगळ्या धंद्याच्या शोधात निघून जात आहेत. बेरोजगार  तरुणांना मटका, गुन्हेगारीने गावाला छळलंय. अशातच पंचगंगा नदीचा कोप झाला. पूर कायम यायचेच पण महापूर आला. यापूर्वी 2005 ला महापूर आला होता त्याच्या आठवणी  होत्या. जास्तीतजास्त तिथं पर्यंत पाणी येईल अशी लोकांना अपेक्षा पण यावेळी तो विक्रम मोडला. कधीही न येईल अशा भागात पाणी आले, चांगले आठवडाभर राहिले. गावभागात मातीच बांधकामं असणारी कित्येक घरे पडली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. घरातील सामान वाहून गेलं. निम्मा गाव पाण्यात होता.
12 ऑगस्टला बकरी ईद होती. पूर ओसरायला हळूहळू सुरवात होत होती. इचलकरंजी मध्ये स्टँड जवळ गावातली मुख्य मशीद आहे तिथं ईदच्या आधी मुस्लिम समाजाने एक मिटिंग  बोलावली. यावर्षी बकरी ईद साजरी करायची नाही आणि त्याखर्चातून पूरग्रस्तांना मदत करायची. वर्गणी काढायचं ठरलं. पैशाला पैसा जोडला गेला, बघता बघता जवळपास 4 लाख रुपये एका दिवसात उभे झाले. गावातल्या श्रीमंत मुस्लिम व्यापाऱ्यांनी त्यात स्वतः जवळची रक्कम घातली आणि थोडी थोडकी नाही तर तब्बल 20 लाखांचा निधी गोळा झाला. विशेष  म्हणजे हा निधी फक्त मुसलमान समाजासाठी नाही तर संपूर्ण गावातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरण्याचं ठरलं.
इचलकरंजी नगरपालिका, सामाजिक संस्था, नगरसेवक अशांनी पूरग्रस्त छावण्या उभ्या केल्या होत्या. तिथे मुस्लिम समाजाच्या सेंट्रल किचन मधून जेवण पोहचत केलं जाऊ लागलं.  गेल्या दोन दिवसांपासून पूर ओसरला. पुराने केलेलं नुकसान दिसायला लागल होत. गावभर प्रचंड कचरा गोळा झाला होता, मृत जनावरे यामुळे रोगराईचे आव्हान होत. आता गरज  मदतीची होती. घरी परत निघालेल्या पूरग्रस्तांना आधाराची त्यांचा मोडून पडलेला संसार सावरण्याची गरज होती. फक्त प्रशासन कमी पडणार हे सहाजिक होते. परत सगळ्या मुस्लिम बांधवांची मिटिंग झाली. पैसे तर आहेत, शिवाय बाहेरून ही मदत येतेय पण ग्राउंड लेव्हल ला काम करण्याची गरज आहे. शुक्रवारचा दिवस ठरवण्यात आला. जवळपास 900 मुस्लिम  स्वयंसेवक सकाळी गावातील जामा मशीद येथे गोळा झाले खराटा, खोरं, पाटी अशी आयुध सजली आणि खऱ्या लढाईला सुरवात झाली. वेगवेगळ्या टीममध्ये हे स्वयंसेवक विभागले गेले. चिखललाने भरलेले रस्ते, पडलेली घरे, तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्यात आल्या. लाखोंची मदत केलेला ऐंशी वर्षे वय असलेला तरुण देखील त्यांच्या सोबत गटारी स्वच्छ करत  होता. या इचलकरंजीचा गावभाग तर त्यांनी स्वच्छ केलाच शिवाय पुराने अस्वच्छ झालेली मंदिरे देखील स्वच्छ करण्यात आली. पांढरी टोपी घातलेले मुस्लिम स्वयंसेवक मंदिर स्वच्छ  करत आहेत हे दृश्य पाहायला अख्ख गाव लोटलं. गावकुसाजवळ मरगुबाईचं मंदिर आहे. ओसरत्या पाण्यामुळे अख्ख्या गावातली घाण मंदिर परिसराला भरून टाकली होती. या  मुसलमान बांधवांनी हे मंदिर तर साफ केलंच पण गाभारासुद्धा चिखलाने भरला होता. तो स्वच्छ करण्याची जबाबदारी मुसलमानांनी आपल्या मशिदीच्या मौलनांना दिली होती. मौलनासाहेबानी आपल्या हाताने सर्व चिखल साफ केला, देवीला अभिषेक घातला. तिची साडी धुतली परत देवीला नेसवली. कधीही पाहायला मिळणार नाही असे अपूर्व दृश्य इचलकरंजी   मध्ये दिसत होतं. पोलीस प्रशासन, नगरपालिका दक्षता पथक या मुस्लिम बांधवांच्या सोबत होते. अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी प्रशासनावरचा भार हलका केला म्हणून या  मुस्लिम तरुणाचं कौतुक केलं. महासत्ता चौक परिसरातील ज्ञानेेशर माऊली मंदिरामध्ये या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती देताना तिथल्या मंदिर सांभाळणाऱ्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.
बोल भिडूने या मुस्लिम तरुणांशी संवाद केला. त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की, हे काम देवाचं अस समजून आम्ही केलं. आज वेळ कोणाला सांगून येत नाही. आपण  आपल्या माणसांसाठी उभं राहणार नाही तर कोण राहणार? आमचं नाव सांगण्याची गरज नाही. पण इचलकरंजीतला हा सामाजिक सलोखा सगळ्यांपर्यंत पोहचला पाहिजे.  जातीपातीच्या भिंती पडल्या, दहा वर्षांपूर्वी आलेल्या एकमेकाबद्दलच्या शंका पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. कोणतीही आपत्ती धर्म जात पंथ बघून येत नाही. कितीही वाद असले तरी  सगळे भाऊ संकटाच्यावेळी एकमेकांच्या आधाराला एकत्र येतात हे यानिमित्ताने सिद्ध झाले. मुस्लिम समाजाने जो सामाजिक सलोखा जपला याच कौतुक राज्यभर होतंय.

- (साभार : बोल भिडू)
- भिडू भूषण टारे
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget