Halloween Costume ideas 2015

‘हलाला'चं समर्थन किती दिवस?

-कलिम अजीम, अंबाजोगाई
कॉंट्रॅक्ट मॅरेज'च्या आरोपावरून २० सप्टेंबरला हैदराबाद शहरातून तब्बल २० जणांना अटक करण्यात आली. यात लग्नाळू शेख, काजी व दलालांचा सामावेश होता. एका लॉजमध्ये काही बुजुर्ग शेख अल्पवयीन मुलींसोबत लग्नाचा बाजार मांडत होते. या सर्व आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतलं. या घटनेच्या सहा दिवसांनंतर पुण्यात 'हलाला' नामक 'काँट्रक्ट मॅरेज'वर बदनामीकारक कथा लिहल्याचा ठपका ठेवून काहींनी साहित्यिक राजन खान यांच्या कार्यालयावर हल्ला केला. या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी यात 'काँट्रक्ट मॅरेज' हे  एक साधम्र्य आहे. लेखक राजन खान यांच्या १९८१ साली लिहलेल्या कथेवर सिनेमा तयार झालाय. या सिनेमातून मुस्लिम व इस्लाम धर्माची बदनामी झाल्याचा दावा काही राजकीय  संघटनांनी केला.
विशेष म्हणजे मूळ कथा न वाचता फक्त सिनेमाचं ट्रेलर पाहून त्या राजकीय कार्यकर्यांनी धुडगूस घातला. या विरोधाच्या निमित्तानं सिनेमा साहजिकच चर्चेत आला.  कदाचित हा निर्मात्याचाच स्टंट असावा अशा शंकेला जागा आहे. कारण प्रदर्शानापूर्वी सिनेमाविरोधात तीव्र आंदोलन छेडू म्हणणारे रिलीजनंतर गायब होते. राज्यभरात सिनेमाचे शो  सुरळीत सुरू आहेत. राज्यात मुस्लिम कल्याणासाठी असा पक्ष कार्यरत आहे, हे स्थानिक मुस्लिमांनाच माहीत नाही. मग अशा पक्षाच्या भीतीनं मल्टिप्लेक्स मालकांनी शो करण्यास  नकार दिला. या दोन शक्यतेवरुन निर्माते व विरोधक यांचं व्यावसायिक साटंलोटं होतं, अशी चर्चा रसिकवर्तुळात रंगलीय. असो. मूळ मुद्दा 'हलाला' या प्रथेबाबत आहे. 
हलाल' सिनेमा  पाहिल्यानंतर अनेकांच्या रसिकतेचा भ्रमनिरास झालाय. साहजिकच सिनेमात वादग्रस्त व रसिकता चाळवणारं असा काही मसाला नाही. सिनेमाचं कथानक खूपच सुमार दर्जाचं आहे.  सिनेमाचे मूळ लेखक राजन खान यांनीही म्हटलंय की ‘कथेसोबत अनेक ठिकाणी छेडछाड झालीय' मूळ कथा वाचली नसल्यानं मी त्यावर बोलू शकत नाही पण कथित हलाला  विधीबाबत सिनेमात अर्धवट माहिती प्रसारित झालीय. तलाकच्या अवैध प्रथेवरून हा सिनेमा सुरू होतो. नायक एका दमात पत्नीला तलाक बोलतो. मुळात ही प्रथाच इस्लामविरोधी आहे.  त्यामुळे ‘ट्रिपल तलाक' व ‘हलाला' प्रथेला विरोध करण्याऐवजी त्यांचं समर्थन सिनेमातून करण्यात आलंय. त्यामुळे हा प्रबोधनात्मक सिनेमा आहे असंही म्हणता येत नाही. सिनेमात  नायिकेचा एक डायलॉग आहे, ‘या प्रथेला झुगारून मला घेऊन गेला असता तर खरा मर्द ठरला असता' हा एकच संवाद मला प्रभावी वाटला. बाकी सिनेमाबद्दल बोलण्यासारखं फारसं  काही नाही, अभिनयाच्या बाबतीत सिनेमा खूपच सुमार आहे. सिनेमात तपशीलाच्या अनेक चुका आहेत.
सिनेमा कुठल्या पाश्र्वभूमीवर सुरू होतो हे शेवटपर्यंत कळत नाही. महाराष्ट्रात विभागवार व जिल्हावार भाषा बदलते पण सिनेमात बहुतांश ठिकाणी प्रमाण भाषा वापरलीय. चार-दोन  संवाद सोडले तर ग्रामीण टच भाषेला येत नाही, उलट गावातील मौलाना अस्खलीत लखनवी उर्दूत बोलतात. तर सिनेमाचं कथानक असलेलं मुस्लिम कुटुंबाचं हिंदी, मुसलमानीऐवजी  पुणेरी प्रमाण भाषेत संवादफेक करणं खटकतं. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम कुटुंबात मराठी भाषा बोलली जाते, त्यात प्रामुख्याने कोल्हापुरी व कोकणी मराठी आहे. बाकी राज्यातील अन्य 
भागांत, खानदेशी, दख्खनी, हिंदी, उर्दू या व्यतिरिक्त हिंदी शैलीत स्थानिक बोली बोलतात. पण इथं सिनेमाची मुख्य पात्र प्रमाण मराठी भाषेतच बोलतात. या व्यतिरिक्त तपशीलाच्या  असंख्य न सहन होणाऱ्या चुका सिनेमात आहेत. उत्तम कथेला सिनेमाची स्क्रीप्ट जोडल्यानं कथा भरकटलीय, त्यामुळे सजग दर्शकांनी 'हलाल'कडे पाठ फिरवलीय.
रिलीजच्या पाचव्या दिवशी एकूण आठ दर्शकासोबत पुण्यात एक मोठ्या मल्टिप्लेक्सला मी सिनेमा पाहिलाय. शहरातील इतर थियटरमध्येही हेच चित्र दिसलं. वाद होऊ नये या प्रयत्नात निर्मात्यांनी खूपच 'गुलू-गुलू' सिनेमा बनवलाय. सहन न होणाऱ्या टेक्निकल (भयंकर) चुका सोडल्या तर सिनेमात काहीच वादग्रस्त नाही. त्यामुळे 'हलाल'बद्दलची चर्चा तूर्तास  थांबवतो. कारण माझ्या मते स्वतंत्र लेखाच्या विषयाइतकं महत्व हलाल सिनेमाला नाहीये. पण या निमित्तानं इस्लामच्या नावानं सुरू असलेल्या त्या भयंकर प्रथेबद्दल बोललं व  लिहलं गेलं पाहीजे. 
'ट्रिपल तलाक'नंतर सर्वात जास्त चर्चिला गेलेला शब्द म्हणजे 'निकाह ए हलाला' होय. इतकी चर्चा होऊनही याबद्दलचे गैरसमज अजून दूर झालेले नाहीये. टीव्हीचे  भाष्यकार इस्लामिक स्कॉलरसारखे प्रवचने देऊनही 'हलाला'बद्दल गैरसमजुती काढू शकलेले नाहीये. मुळातच माझी त्यांच्याकडून असलेली अपेक्षा बाळबोध आहे. पण मुस्लिम महिलांच्या  प्रश्नांवर कळवळा आणून बोलणारे हलाला प्रथेवर रसिकरंजन करत होते. हलाला प्रथा भारतीय उपखंडात कशी आली, याबद्दल अनेक तर्क आहेत. पण कुठल्याही तर्कात तथ्यता आढळत  नाही. इस्लामी न्यायशास्त्रात ही प्रथा आढळते. यातूनच १९३७ सालच्या शरियत अ‍ॅक्टमध्ये याची नोंद करण्यात आली. काही इस्लामी भाष्यकारांच्या मते कुरआन व हदीसमध्येदेखील ही प्रथा नाहीये.  मग प्रश्न असा पडतो की याची प्रॅक्टीस नेमकी कुठून आली. जगात बोटावर मोजण्याइतक्या राष्ट्रांत ही कुप्रथा सुरू आहे. बाकी अन्य देशांनी ही प्रथा हराम ठरवून बाद केलीय.
‘तिसऱ्यांदा तलाक दिला तर ती स्त्री त्याच्यासाठी वैध नाही जोपर्यंत तिचा दुसऱ्या पुरुषाशी विवाह होऊन त्यानंतर तो पुरुष तिला तलाक देईल. तसेच त्या पहिल्या पतीला आणि त्या  स्त्रीला वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यांदांचे आपण पालन करु शकू तरच त्यांना पुन्हा विवाह करुन वैवाहिक जीवन जगता येईल.’ -सूरह बकराह : २३०
कुरआनची वरील वचने स्पष्ट सांगतात की तलाकनंतर त्या महिलेचं दुसरं लग्नही काही कारणामुळे टिकलं नाही, तर पहिला पती तिच्याशी लग्न करू शकतो. वरील वचनाच्या एका  अन्य विवेचनात असं म्हटलंय की, नियोजितपणे ‘हलाला’ करणे शरियतचा भाग नसून इस्लामच्या विरोधात आहे. एकदा तला़क झाल्यानंतर कुठलीही महिला आपल्या मर्जीनुसार अन्य  पुरुषाशी लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहे. मात्र दोघांत पुन्हा बेबनाव झाल्यानं अशा परिस्थितीत ती महिला दुसऱ्या पतीनं तलाक दिल्यानंतर पहिल्या पतीसोबत आपल्या स्वखुशीनं लग्न  करू शकते. तसंच या नियोजित लग्नात 'काँट्रेक्ट पद्धती' लादणे किंवा काही दिवसांकरता लग्नासाठी पत्नीला प्रवृत्त करणं गैर आहे, असंही इस्लामनं म्हटलंय,
‘जेव्हा तुम्ही आपल्या पत्नींना तलाक द्याल आणि त्या प्रतीक्षाकाळ पूर्ण करतील, तेव्हा त्यांच्या नियोजित वराशी विवाह करण्यापासून प्रतिबंध करु नका. जेव्हा ते संमतीपूर्वक  एकमेकांशी विवाह करू इच्छित असतील’ -सूरह बकराह :२३२)
पण जाणूनबुजून एका महिलेला हलालासाठी प्रवृत्त करणे इस्लामविरोधात आहे. या प्रकाराला इस्लाममध्ये कडक शिक्षेचं प्रयोजन आहे.
अर्थातच वरील नियम हा तलाकला अवघड करण्यातला एक भाग आहे. तलाकला किचकट केलं तर तलाकचे प्रकार थांबतील असं प्रयोजन या नियमामागे होतं. दुसरं म्हणजे कुठलंही  कारण नसताना पत्नीला झटक्यात तलाक देणाऱ्या नवऱ्याला अद्दल घडावी असा हेतूही यामागे ठळक आहे. एका अर्थानं तलाक प्रथेला निर्बंध घालण्यासाठी वरील वचन आलं आहे. या  निर्बंधातून कोणी पळवाट शोधून नियोजित हलाला करीत असेल तर अशा व्यक्तीचा इस्लामने धिक्कार केलाय. या संदर्भात इब्ने माजाची (१९३६) एक हदीस आहे. यात प्रेषित मुहम्मद  (स) म्हणतात, ‘जो कोणी पूर्वनियोजित पद्धतीने हलाला करीत असेल आणि करवित असेल अशा व्यक्तीवर अल्लाहचा धिक्कार असो!’
भारतीय उपखंडात सुरू असलेली कथित 'निकाह ए हलाला'ची अघोरी प्रथा नेमकी कुठून आली याचे दाखले आढळत नाही. याबद्दल अनेक जाणकारदेखील नेमक्या पद्धतीबद्दल सांगू शकलेले नाही. पण एक मात्र खरंय की पुरुषसत्ताकतेचा पगडा यामागे स्पष्ट दिसतोय. कारण केवळ पुरुषाची चैन म्हणून ही जीवंत ठेवण्यात आली असावी. दुसरं म्हणजे निकाह ए  हलाला आड चालणारा काळा बाजार, मोठी आर्थिक उलाढाल या निमित्तानं सुरू असते. कदाचित हा आर्थिक घोडेबाजार सुरूच राहावा यासाठी 'निकाह ए हलाला'चा रिवाज सुरू असावा.  या अघोरी कुप्रथेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. किती दिवस आम्ही याविरोधात गप्प राहणार, का यासाठी पुन्हा इतर समुदायाच्या लढ्याची आम्ही वाट पाहात बसणार? किती दिवस यावर राजकारण करणाऱ्यांवर आम्ही दात-ओठ खात बसणार? आता पुरे हलाला प्रथेविरोधात आवाज उठवण्याची गरज आता निर्माण झालीय. यासाठी चर्चासत्र आयोजित करून मुस्लिम समुदायात जागरुकता आणण्याची गरज आहे. 'हलाला'बद्दल खूप वैचारिक लिहून झालंय. ते आता कपाटबंद झालंय. त्यामुळे घरोघरी जाऊन, रस्त्यावर उतरून, सार्वजनिक सभा- संमेलनं घेऊन, जाहीर इज्तेमा घेऊन 'हलाला' विरोधात प्रबोधन केलं पाहिजे. नसता पीडित महिला कोर्टात गेल्यास पुन्हा एकदा व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेप नको असं ओरडण्यापूर्वी आपणच ही प्रथा रद्दबातल केली पाहिजे. (सौजन्य : kalimajeem.blogspot.in)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget