Halloween Costume ideas 2015

विज्ञान अंधश्रद्धेच्या हल्ल्यासमोर टिकेल काय?

-राम पुनियानी
विद्यार्थ्यांना हे का शिकविले जात नाही की राईट बंधूंच्या विमानाच्या शोधाच्या अगोदर अगोदर शिवकर बापूजी तलपडे नावाच्या एका व्यक्तीने विमान तयार केले होते. या व्यक्तीने राईट बंधूंपेक्षा 8 वर्षे अगोदर विमान उडवूनही दाखविले होते. आमच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हे सांगितले जाते काय? जर सांगितले जात नसेल तर त्यांना हे सांगितले गेले पाहिजे’
  
हे अमृत वचन आहे केंद्रीय मानवसंसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे. जे त्यांनी एका पुरस्कार वितरण समारोहास संबोधित करतांना उच्चारले आहे. अशा गोष्टींव्यतिरिक्त असे निती नियम ही लागू केले जात आहेत जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशातील शोध आणि शिक्षणाच्या दिशेवर विपरित परिणाम टाकत आहेत.काही दिवसांपूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी एक उच्चस्तरीय समिती गठित करून त्यांना सांगितले होते की, ’’ पंचगव्याच्या फायद्यांवर संशोधन करावे. पंचगव्य म्हणजे गोमुत्र, शेण, दूध, दही आणि तुपाचे मिश्रण. पंचगव्यावर शोध करण्यासाठी आयआयटी दिल्लीला नोडल संस्थान म्हणून नियुक्त केले गेले आहे. अशाही बातम्या येत आहेत की, मध्यप्रदेश सरकार शासकीय दवाखान्यात ॲस्ट्रो ओपीडी अर्थात ज्योतिष बाह्य रूग्ण विभाग सुरू करणार आहे. ज्या ठिकाणी ज्योतिषी रूग्णांना हे सांगतील की त्यांना कोणता आजार आहे. हे पुण्यकर्म राज्य शासनाद्वारे स्थापित आणि पोषित एका संस्थेद्वारे केले जाणार आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य मंत्रालयाच्या आयुष विभागाच्या सह्योगाने संजीवनी बुटीला शोधून काढण्यासाठी एक परियोजना सुरू केलेली आहे. संजीवनी बुटीचा उल्लेख रामायणात आलेला आहे. जेव्हा लक्ष्मण रावणाबरोबर युद्ध करतांना बेशुद्ध झाले तेव्हा ही बुटी आणण्यासाठी हनुमान यांना पाठविण्यात आले. हनुमान यांना त्या बुटीची ओळख नसल्याने त्यांनी तो पूर्ण डोंगरच उचलून आणला होता. प्रतिष्ठित आयआयटी खडकपूर आपल्या पदवीपूर्व पाठ्यक्रमामध्ये वास्तूशास्त्राला सामिल करणार असल्याचे समजते. या ठिकाणी एक वास्तुशास्त्र केंद्रही आहे जे लोकांना वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी आपल्या घरासमोर भगवान गणेश आणि हनुमानाची मूर्ती लावण्याचा सल्ला देते. हे नीतिनियम संघ प्रशिक्षित भाजपा नेत्यांची वैज्ञानिक समज किती प्रगल्भ आहे, ह्याचे दर्शन घडविते. काही वर्षापूर्वी आपल्य प्रधानमंत्र्यांनी मुंबईमध्ये एका आधुनिक रूग्णालयाच्या उद्‌घाटनाच्या वेळेस बोलतांना श्रोत्यांना या गोष्टीची आठवण करून दिली होती की प्राचीन भारतामध्ये विज्ञानाने किती जबरदस्त प्रगती केली होती. ते म्हणाले होते की, एक काळ असा होता की, चिकित्सा विज्ञानामध्ये आपल्या पूर्वजांनी अशी प्रगती केली होती की ज्यावर आम्हाला गर्व करता येईल. आपण सगळयांनी महाभारतातील कर्नाबद्दल वाचलेलेच आहे. महाभारतात हे म्हटले आहे की, कर्ण आपल्या आईच्या गर्भातून जन्मले नाही याचाच अर्थ त्या काळात अनुवांशिक विज्ञान अस्तित्वात होते. तेव्हा तर कर्ण आपल्या आईच्या गर्भाच्या बाहेर जन्मू शकले. आपण सर्व भगवान गणेशाचे पूजा करतो. त्या काळात एखादा प्लास्टिक सर्जन असेल ज्याने की हत्तीच्या डोक्याला मनुष्याच्या शरिरावर यशस्वीपणे प्रत्यारोपित केले.’ या काल्पनिक आणि हास्यास्पद गोष्टी हळूहळू शालेय अभ्यासक्रमामध्येही जागा मिळवत आहेत. हे मुख्यतः भाजप शासित राज्यात होत आहे. दिनानाथ बत्रा नामक एक सभ्य ग्रहस्थ आहेत ज्यांचे एक पुस्तक आहे ज्याचे नाव तेजोमय भारत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना सांगते की, ’अमेरिका स्टेमसेल मध्ये शोध लावण्याचा दावा करतो परंतु, सत्य हे आहे की, डॉ. बालकृष्ण गणपत मातापूरकर यांनी अगोदरच शरीराच्या अवयवांचा निर्माण करण्याचे विधीवत पेटेंट करून घेतलेले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटत असेल की हा शोध नवीन नव्हता. डॉ. मातापूरकर यांना महाभारतातून प्रेरणा मिळाली होती. कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र अशाच विधीने प्राप्त झाला होता. जेव्हा गांधारीचे गर्भपात झाले आणि त्यातून एक मांसाचा गोळा निघाला तेव्हा द्वैपायन व्यास ऋषिंना बोलाविण्यात आले. त्यांनी त्या मांसाच्या गोळयाला लक्षपूर्वक पाहिले आणि मग त्यात काही विशिष्ट अशा औषधी मिसळल्या आणि थंड पाण्याच्या एका टाकीमध्ये तो मांसाचा गोळा ठेवून दिला. नंतर त्यांनी त्या मांसाच्या गोळयाचे शंभर तुकडे केले आणि त्या तुकड्यांना दोन वर्षापर्यंत तुपाने भरलेल्या शंभर वेगवेगळया टाक्यांमध्ये ठेवले. याच तुकड्यांपासून दोन वर्षानंतर शंभर कौरव जन्माला आले. हे वाचल्यानंतर डॉ.मातापूरकर यांना असा आभास झाला की स्टेमसेल त्यांचा शोध नाही. स्टेमसेलचा शोध तर भारतात हजारो वर्षापूर्वी लागलेला होता. (संदर्भ : तेजोमय भारत पान क्र. 92-93). याचप्रमाणे पौराणिक कथांना वैज्ञानिक सत्य म्हणून दाखविले जात आहे. पौराणिक कथा ऐकण्याला आणि वाचण्याला दिलखेचक असू शकतात. परंतु त्या सगळया कपोलकल्पीत आहेत, यात कुठलाच संशय नाही. त्यांना खरे मानने वैज्ञानिक दृष्टीकोण आणि विज्ञानाच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे. याचप्रमाणे असेही म्हटले जाते की, भारतात प्राचीन काळात टेलीवीजन होता. कारण की संजयने कुरूक्षेत्रापासून कित्येक मैल दूर बसलेल्या व्यास ऋषींना महाभारताच्या युद्धाचे विवरण ऐकविले होते. हे ही म्हटले जाते की, श्रीराम यांनी पुष्पक विमानातून यात्रा केली होती. म्हणजेच प्राचीन भारतात वैमानिक की विज्ञान सुद्धा अस्तित्वात होते. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, विमानाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अनेक वैज्ञानिक सिद्धांतांची आणि उपकरणांची मदत घ्यावी लागते. अशा सिद्धांतांचा आणि उपकरणांचा विकास 18 व्या शतकानंतरच सुरू झाला. यात कुठलीच शंका नाही की प्राचीन भारताने सुश्रूत, चरक आणि आर्यभट्टाच्या रूपाने उत्कृष्ट असे वैज्ञानिक जगाला दिले. परंतु, हे मानने की हजारों वर्षापूर्वी भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य प्राप्त केले होते. स्वतःला महिमामंडित करण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे. स्वातंत्र्यता संग्रामाच्या चिंतकांनी वैज्ञानिक समज आणि दृष्टीकोनाच्या वाढीवर भरपूर जोर दिला होता. आणि याच कारणामुळे वैज्ञानिक समज वृद्धींगत करण्याला आपल्या घटनेमध्ये सुद्धा स्थान मिळालेले आहे. दूसरीकडे मुस्लिम राष्ट्रवादी आणि हिंदू राष्ट्रवादी इतिहासाला आपापल्या धर्माच्या राजांच्या माध्यमातून महिमांडीत करून त्यांचा उपकरणासारखा उपयोग करीत आहेत. दोघांना वाटते की, त्यांच्या धार्मिक ग्रंथामध्ये जे काही लिहले आहे तेच अंतिम सत्य आहे. आज भारतात हिंदू राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहेत. ते मागील सात दशकातील भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची खिल्ली उडवित आहेत आणि आस्थेवर आधारित कपोलकल्पीत कथांना ज्ञान आणि विज्ञानाचा दर्जा देत आहेत. हे एक प्रतिगामी पाऊल आहे. या प्रवृत्तींच्या विरोधात 9 ऑगस्ट 2017 रोजी वैज्ञानिकांनी आणि तार्किकवाद्यांनी रस्त्यावर उतरून जबरदस्त विरोध प्रदर्शन केलेले आहे. त्यांची मागणी अशी होती की ह्या छद्‌म वैज्ञानिकांना शोध आणि वैज्ञानिक शिक्षणाचा भाग बनविता येणार नाही. अनेक राज्यांमध्ये प्रदर्शन करून लोकांनी ही मागणी केली की, विज्ञान आणि शिक्षणाच्या वाढीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद वाढविली जावी. विज्ञान आणि छद्‌म विज्ञान यांच्यातील अंतर स्पष्ट आहे. विज्ञान प्रश्न विचारण्याला आणि चिकित्सेला प्रोत्साहन देतो. या उलट छद्‌म विज्ञान फक्त श्रद्धेच्याच गोष्टी करतो आणि विरोधाला दाबण्याचा प्रयत्न करतो. भारतात वैज्ञानिक समजूत वाढावी, यासाठी मागील काही दशकांपासून जोरदार प्रयत्न झालेले आहेत. मात्र वर्तमान सरकार त्या प्रयत्नांना मातीमोल ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हिंदीतून अनुवाद: बशीर शेख आणि एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget