Halloween Costume ideas 2015

कृत्रिम हलाला इस्लामला मान्य नाही

- बशीर शेख
6 आक्टोबर रोजी महाराष्ट्रभर एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे नाव हलाल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलेले असून, चित्रपटाची कथा राजन खान यांनी लिहिलेली आहे. सदर चित्रपटाचे महाराष्ट्रभर स्वागत होत आहे, असे जरी भासविले जात असले तरी मुळात हा चित्रपट तद्‌न फालतू आणि चुकीच्या कथानकावर आधारित आहे. लोकसत्ता सारख्या दैनिकाने आपल्या 11 आक्टोबरच्या अंकात या
चित्रपटाचे परिक्षण सादर करतांना ’विसंगतीवर अचूक भाष्य’ असे शिर्षक लावलेले आहे. या चित्रपटात मुस्लिमांमधील नसलेल्या एका परंपरेला ती आहे, असे भासवून त्यावर एक पूर्ण चित्रपट बेतलेला आहे, यात शंका नाही की तीन तलाक हा मुस्लिमांमधील एक गंभीर प्रश्न आहे. मात्र हलाला हा मुस्लिमांमधील प्रश्न कधीच नव्हता आणि नाही. अपवादात्मक परिस्थितीत ठरवून हलाला केल्याच्या काही घटना उदाहरणार्थ कमाल अमरोही-मीना कुमारी घडलेल्या आहेत. हे नाकारता येत नाही. परंतु अशा घटना अतिशय अपवादातील अपवाद आहेत. चित्रपटाची कथा अशी आहे की, एका गावात एक मुस्लिम पुरूष आपल्या पत्नीला एकाच वेळेस रागाच्या भरात तीन तलाक देतो. मात्र राग शांत झाल्यावर काही दिवसांनी तो परत तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी तयार होतो. मात्र गावातील एक आलीम हा त्यास विरोध करतो व हलाला केल्याशिवाय त्याला पत्नीला पुन्हा नांदविता येणार नाही, असे सांगतो. पुढे काय होते याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. मुळात गफलत इथेच झालेली आहे. तीन तलाक दिल्यानंतर पत्नीला परत नांदविता येत नाही हे सर्व मुस्लिमांना माहीत आहे. मग चित्रपटातील नायकाला ते कसे माहित नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तीन तलाक दिलेले असतांना कुठलाही शहाणा पुरूष परत त्याच स्त्रीकडे जावून तिच्याशी पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न मुदलातच करू शकत नाही. म्हणून या चित्रपटातील नायक तसा प्रयत्न करतो हेच मुळात इस्लामी शरियाला धरून नाही. म्हणजेच यातील पुढील कथानक आपोआप फसत गेलेले आहे. ठरवून हलाला अर्थात कृत्रिम हलाला करता येत नाही, हे साधे धार्मिक तत्व आहे.
    मुळात कुरआनमध्ये जी तरतूद आहे ती अशी की,एखाद्या मुस्लिम पुरूषाने आपल्या पत्नीला तलाक दिलेला असेल. मग एक असो का तीन व तिला सोडून दिलेले असेल व तिचा पुनर्विवाह झालेला असेल व काही कारणांमुळे तिचा तिचे त्या ठिकाणीही नांदणे लागलेले नसेल आणि त्या पुरूषानेही तिला नैसर्गिक कोर्समध्ये तलाक दिलेला असेल व तिची इद्दत संपलेली असेल तेव्हा पहिल्या पतीला जर असे वाटत असेल की तिच्याशी पुन्हा लग्न करावे तर तो करू शकतो. या संदर्भात पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘नंतर जर (दोन वेळा तलाक दिल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तिसऱ्यांदा) तलाक दिला तर ती त्याच्यासाठी वैध नाही. जोपर्यंत तिचा (स्वैच्छेने) दुसऱ्या पुरूषाशी विवाह होवून त्यानंतर (स्वैच्छेने) तो पुरूष तिला तलाक देईल तसेच पहिल्या पतीला आणि या स्त्रीला वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे आपण पालन करू शकू तरच त्यांना पुन्हा विवाह करून वैवाहिक जीवन जगता येईल. या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत. ज्या तो लोकांच्या मार्गदर्शनासाठी स्पष्ट करीत आहे. जे (त्याच्या मर्यादा भंग करण्याचा परिणाम) जाणतात.’ (संदर्भ : कुरआन : सुरे बकरा आयत नं. 230) 
    मात्र तीन तलाक दिल्यानंतर पश्चाताप झाल्याने तिच्याशी पुन्हा लग्न करण्यासाठी ठरवून एखाद्या विश्वासपात्र व्यक्तीबरोबर तिचे अस्थाई लग्न लावून त्याच्याशी तिचे शारीरिक संबंध झाल्यानंतर परत त्याला तलाक देण्यास भाग पाडून पुन्हा तिच्याशी विवाह करणे हे अनैतिकच नसून गुनाहे कबीरा ’मोठा गुन्हा’ आहे. इस्लामसारख्या नैतिक व्यवस्थेच्या धर्मामध्ये अशी माणुसकीला काळीमा फासणारी तरतूद असूच शकत नाही, याची साधी माहिती स्वतःला राजन खान म्हणणाऱ्या लेखकाला नसावी ही दुर्देवाची बाब आहे. राजन खानचा साहित्य इतिहास व त्यांची विचारधारा पाहता त्यांनी इस्लामच्या तरतुदींचा विपर्यास केला यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. मुळात चार-दोन लोकांनी ठरवून हलाला केला असेल तर ते इस्लामच्या नजरेमध्ये सर्व गुन्हेगार आहेत. इस्लामच्या धार्मिक तत्वांशी त्यांना जोडता येणार नाही. इस्लाममध्ये ठरवून हलाला करताच येत नाही. त्यामुळे हलाल चित्रपट हा विसंगीतवर अचूक भाष्य नसून चुकीचे भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही. मुळातच चुकीच्या कथानकावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपट लिहिणाऱ्या राजन खानची नियतच मुळात चुकीची आहे. शेवटी एवढेच म्हणावे वाटते की इस्लाममधे असली कुठलीच हिणकस तरतूद नाही जी स्त्रीत्वाचा अपमान करेल. त्यामुळे हलाल चित्रपटाचा ज्या ठिकाणी उल्लेख येईल हे सत्य वाचकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget