Halloween Costume ideas 2015

मुंबईः लोकल ट्रेन की बुलेट ट्रेन

 परळ - एल्फिंस्टन रेल्वे स्थानकावील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा प्राण गेल्यानंतर रेल्वेच्या बाबतीत सरकारची प्राथमिकता काय असावी? या संबंधी मोठ्‌या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. बुलेट ट्रेन देशाच्या विकासाचे प्रतिक असू शकेल मात्र सुरक्षेचे मुल्य मोजून विकासाचे प्रतिक उभे करणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न समाज माध्यमातून  सरकारला विचारला जात आहे. या घटनेनंतर अनेक संस्था, राजकीय पक्षांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शविलेला आहे.
मुंबई एक असे शहर आहे ज्या शहरात दररोज हजारो लोक आपल्या डोळयात विकासाचे स्वप्न घेवून येत असतात. हा सिलसिला गेल्या अनेेक वर्षांपासून चालू आहे. मुंबईनेही या आगंतुक पाहुण्यांचा कधी अव्हेर केला नाही. दोन्ही हात पसरून मुंबईने या येणाऱ्या लोकांचे स्वागत केलेले आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नांना नुसतेच पंख दिले असे नाही तर त्या पंखांना एवढे बळही दिले आहे की ते उत्तूंग भरारी मारू शकलेले आहेत. अनेक कफल्लक लोक मुंबईत येवून गर्भश्रीमंत झालेले आहेत. रेल्वे फलाटावर झोपणारे मोठमोठ्या टोलेजंग इमारतीमध्ये राहत आहेत.
 त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या हजारो लोकांचे ओझे पेलण्यात अलिकडे हे शहर कमी पडत आहे. मुंबईची जनसंख्या इतकी वाढलेली आहे की, ती स्वतःच एक समस्या होवून बसलेली आहे. मुंबईची जीवन वाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन आज मुंबईकरांसाठी मृत्यू वाहिनी होऊन राहिली आहे. रोज चार दोन लटकलेले लोक या लोकलच्या रूळाखाली येवून मरत आहेत. सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी मुंबई शहरामध्ये ट्रेन मधून पडून मरणाऱ्यांची संख्या 12 होती. अजून डिसेंबर यायचाच आहे मात्र आत्तापर्यंत लोकलमध्ये पडून मरणाऱ्यांची संख्या चारशे पेक्षा जास्त झालेली आहे. या संख्येवरून लोकल ट्रेन किती धोकादायक झालेली आहे, याचा अंदाज यावा. एक मोठा पाऊस, एक छोटी अफवा मुंबईमध्ये लोकांचे जीवन धोक्यात घालण्यासाठी पुरेशी आहे. परेलच्या पुलावर सकाळी 10.30 वाजता एकाच वेळेस चार लोकल ट्रेन आल्या. त्यातून उतरलेले सर्व प्रवासी पुलावर आले. पुलावर अगोदरपासून असलेले प्रवासी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे पुलावरच थांबले. येथूनच रेटारेटीस सुरूवात झाली. तेवढ्यात डोक्यावर फुलाचा ताटवा घेवून निघालेल्या एका मजुराच्या ताटव्यातून फुलं गळून पडायला लागली. तेव्हा कोणीतरी ओरडलं ’फुल गिरा’ लोकांना ऐकू आलं ’पुल गिरा’ आणि एकच गलका झाला. चेंगराचेंगरी झाली आणि 23 निरपराध लोक कायमची मुंबई सोडून निघून गेले. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करण्याच्या बाबतीत हा जागतिक उच्चांक आहे. एवढया मोठ्या संख्येने प्रवाशांची नियमित व्यवस्था करणे कुठल्याही रेल्वे नेटवर्कला सहज शक्य नाही. प्रवाशांची ही संख्या असाधारण आहे म्हणून त्यांच्यासाठी सुरक्षेचे उपायही असाधारण असावयास हवेत. परंतु बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्यांना याची जाणीव नाही. मागच्या रेल्वे बजेटमध्ये देशातील संपूर्ण रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी 1 लाख कोटी रूपये आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्याची तर तरतूद झाली नाही उलट सव्वा लाख कोटीच्या बुलेट ट्रेनची घोषणा मात्र झाली. मुंबई शहरामध्ये लोकल ट्रेनला पर्याय नाही. ट्रॅफिक जाममुळे स्वतःचे वाहन असतांनासुद्धा बाय रोड कोणालाही प्रवास शक्य नाही. सीएसटीहून विरार, कल्याण, डोंबिवली, ठाण्याकडे जाणे म्हणजे लोकलनेच जाणे हे सुत्र ठरलेले. अशात गाड्यांची फ्रीक्वेन्सी (वारंवारिता) कमी असल्याने सकाळ आणि संध्याकाळ लोकलने प्रवास करणे दिवसेंदिवस जीव घेणे ठरत आहे. केवळ लोकसंख्या एखाद्या शहराचा प्रश्न असू शकतो याची मुंबई शहराकडे पाहिल्यावरच खात्री पटते. लोकलमध्ये नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तयार झालेल्या माफिया सदृश्य टोळया सुद्धा एक डोकेदुखी आहेत. अशा टोळया नवीन प्रवाशांना डब्यात घुसूच देत नाहीत. कोणी घुसायचा प्रयत्न केल्यास हाणामारी केली जाते. गर्दीमुळे लोकलमध्ये चढणे आणि इच्छीत स्टेशनवर उतरणे या दोन्ही गोष्टी अतिशय जोखीमेच्या असतात. प्लेटफॉर्म आणि डब्यामधील अंतर जास्त असल्यामुळे अनेक लोक चढतांना किंवा उतरतांना त्या गॅपमध्ये पडून मरण पावलेले अथवा कायम जायबंदी झालेले आहेत. नवीन माणसाला तर एकदा प्रवास केल्यानंतर दुसऱ्यांदा लोकलमध्ये प्रवास करण्याची हिम्मत होत नाही. त्यापेक्षा मुंबई नको अशी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते. सर्व कामे बाजूला ठेवून मुंबईच्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, स्टेशनचे आधुनिकीकरण करणे, प्लेटफॉर्मचा विस्तार करणे, रेल्वे पुलांचे रूंदीकरण करणे हे काम सरकारने प्राधान्य देवून करणे गरजेचे आहे.
देशात रोज कुठे ना कुठे रेल्वे रूळावरून घसरत आहे. छोटे-मोठे अपघात होत आहेत. रेल्वे प्रवास पूर्वीसारखा सुरक्षित राहिलेला नाही म्हणून देशभरातील रेल्वेचे आधुनिकीकरण व सुरक्षेचे उपाय ही केंद्र सरकारची प्राथमिकता असायला हवी. त्यानंतर आर्थिक कुव्वत असेल तर बुलेट ट्रेनचा विचार करावयास हरकत नाही. परंतु मुलभूत सुविधा नसतांना बुलेट ट्रेनवर खर्च करणे ही आपल्या देशाला परवडण्यासारखी चैन नाही. शिवाय मुंबई - अहेमदाबाद हे अंतर फक्त 550 किलोमीटर आहे व हे अंतर विमानाने फक्त 40 मिनीटात कापले जाते. या मार्गावर विमानांची संख्या सुद्धा भरपूर आहे. विमानाचे भाडे सुद्धा चार हजाराच्या आसपास आहे. असे असतांना एवढेच दर बुलेट ट्रेनला देवून 40 मिनीटाच्या प्रवासासाठी अडीच तास देवून प्रवास कोणता शहाणा माणूस करेल? हे समजून येत नाही. म्हणून तज्ज्ञांच्या मते मुंबई-अहेमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग व्यापारीक दृष्ट्या तोट्याचा ठरू शकतो.
अपघात आणि अधःपतन परेल ब्रिजवर चेंगराचेंगरी दरम्यान काही लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावले होते. तर काही लोकांनी आपल्यातील पाश्वीवृत्तीचे दर्शनही घडवित होते. बीबीसीने दिलेल्या बातमी अनुसार जेव्हा चेंगराचेंगरी सुरू झाली तेव्हा एक तरूण महिला अनेक प्रेतांच्या खाली दबलेली होती. शेवटच्या घटका मोजत होती. मदतीचा धावा करीत होती. अशा अवस्थेतही एक व्यक्ती तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. अनेक लोकांनी मृत महिलांच्या पर्स, पुरूषांच्या बॅगा, मोबाईल फोन पळवीत होते. या घृणास्पद कृत्यातून आपल्या समाजाची सामुहिक नैतिक पातळी किती खोल गेली याचा अंदाज येतो. चेंगराचेंगरीची घटना जेवढी दुःखाची आहे त्यापेक्षा जास्त दुःख या लोेकांच्या अशा अनैतिक कृत्यामुळे झालेले आहे.
केंद्राची बुलेट ट्रेनची योजना व्यवहार्य नसतांनाही केवळ एका पक्षाचे सरकार दोन्ही ठिकाणी आहे म्हणून महाराष्ट्र शासन या प्रकल्पामध्ये सामील होत आहे. प्रकल्पाची एक तृतीयांश रक्कम महाराष्ट्राला द्यावयाची आहे. बुलेट ट्रेनचा सगळा प्रवास गुजरातमधून होणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी या बुलेट ट्रेनची उपयोगिता फारशी नाही, हे माहित असतांनासुद्धा नाईलाजाने राज्य शासन या अव्यवहार्य प्रकल्पाला जनतेच्या करातून जमा झालेला पैसा खर्च करण्यास तयार झालेले आहे. याचा मुंबईतूनच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातून विरोध व्हावयास हवा. परंतु तो होतांना दिसत नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget