Halloween Costume ideas 2015

विकृत मानसिकता

दोन्ही काठ भरलेली नदी शांत असली की सुंदर भासते. तिच्या शांततेतही एक प्रकारचे संगीत असते व त्यातून सुख आणि समृध्दीचा संदेश आपोआपच प्रसूत होत असतो. मात्र तीच नदी जेव्हा आपली मर्यादा ओलांडते तेव्हा केवळ विनाशच आणते. अनेकांना देशोधडीला लावते. समाजाचेही असेच असते. सगळे शांत- समंजसपणे जगणार असतील तर जगातल्या ८० ते ९० टक्के समस्या आपोआपच संपतील. किंबहुना त्या निर्माणही होणार नाहीत. मात्र जर कोणी खळखळाट सुरू केला की समाज दुभंगायला सुरूवात होते. अशांतता आणि बेदीली माजते.
अमेरिकेतील लास वेगास येथील एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी स्टीफन पॅडॉक नावाच्या माथेफिरूने घडवलेल्या सामूहिक नरसंहाराच्या घटनेचे वृत्त ऐकून सारे जग हबकले. ओपन एअर म्युझिक फेस्टीव्हलममधील ५९ नागरिक या माथेफिरूच्या गोळीबाराला बळी पडले. पाचशेच्यावर लोक यात जखमी झाले असून यातील अनेकांच्या जीवाला असलेला धोका अजून टळलेला नाही. हा दहशतवादी स्वरूपाचा हल्ला नव्हता. पॅडॉक नावाचा हल्लेखोर चांगला सुस्थितीतील ६४ वर्षीय अमेरिकन वृद्ध इसम होता. सुरक्षा सैनिकांच्या गोळीबारात तो ठार झाला. त्याला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम होता ही बाब पुढे आली आहे. अमेरिकेत म्हणे सध्या मर्डर ऍडिक्ट लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विकृत मानसिकतेतील हे लोक अशी हत्याकांडे तेथे अधूनमधून घडवत असतात. पण स्टीफन पॅडॉकने या साऱ्यांवर कडी केली आहे. गेल्या वर्षी फ्लोरिडात ओरलांडो येथे ४९ जणांचे हत्याकांड झाले होते. त्या आधी २०१२ ला सँडीहुक येथे २७ जणांचे आणि २००७ ला व्हर्जिनियात ३२ जणांचे हत्याकांड झाले होते. १९९१ पासून आतापर्यंत सामूहिक हत्याकांडाची अशी ८ मोठी प्रकरणे तेथे घडली आहेत. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेला माणूस बंदुका घेतो आणि दुसऱ्यांचे जीव घेत सुटतो हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य पूर्ण बिघडवणारा आहे. केवळ विकृती मानसिकतेतून लोकांचे जीव घेण्याचे अधिकांश प्रकार अमेरिकेतच पाहायला मिळतात. स्वताची विकृती शमवण्यासाठी असे दुसऱ्याचे जीव घेत सुटणे हा अघोरीपणाचा कळसच म्हणावा लागेल. आजार नियंत्रण संरक्षण वेंâद्रा (सीडीसी) नुसार, अमेरिकेत बंदुकीच्या हल्ल्यात दरवर्षी १२ हजार मृत्यू होतात. मागच्या ५० वर्षांत अशा घटनांत अमेरिकेत १५ लाखांहून अधिक बळी गेले. यात अंदाधुंद गोळीबार हत्येशी संबंधित लाख मृत्यूंचाही समावेश आहे. उर्वरित बळी आत्महत्या, चुकीने झालेला गोळीबार कायदेशीर कारवाईचे आहेत. अमेरिकेत शस्त्रास्त्र बाळगणे हा कायदेशीर अधिकार आहे. नागरिक दुकानातून सहज शस्त्रे विकत घेतात. वर्षांपूर्वी शाळेत गोळीबार झाल्यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शस्त्रास्त्र कायदा आणण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेतील ७० टक्के लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे अद्यापही कायदा बनू शकला नाही. जगभरातील एकूण सिव्हिलियन बंदुकांपैकी ४८टक्के केवळ अमेरिकी नागरिकांकडे आहेत. सुमारे ३१ कोटी शस्त्रे अमेरिकी लोकांकडे आहेत. ८९ टक्के अमेरिकी लोक जवळ बंदूक बाळगतात. यातील ६६ टक्के लोक एकापेक्षा जास्त बंदुका बाळगतात. अमेरिकेत बंदुका बनवणाऱ्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ९१ हजार कोटींची आहे. २.६५ लाख नागरिक या व्यवसायाशी निगडित आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्थेत शस्त्रांच्या विक्रीतून ९० हजार कोटी रुपये येतात. दरवर्षी एक कोटीहून अधिक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल यासारख्या बंदुका येथे बनतात. शस्त्रांच्या वापरातून होणाऱ्या हिंसा मृत्यूंमुळे २० हजार कोटींचे नुकसान झाले. हा जीडीपीचा १.४ टक्के भाग आहे. (आकडेवारी : सीएनएन, सीडीस, आयबीआयएस) तेथे सहजपणे उपलब्ध होणारे शस्त्रास्त्र परवाने हे यामागचे मुख्य कारण आहे. या घटनेत बंदुकीचा चाप जरी स्टीफन पॅडॉकने ओढला असला आणि तो दोषी असला तरी त्याच्या हातात बंदुक देणारे अथवा बंदुक हाती असलेल्या व्यक्तीला त्याच्याही कळत नकळत त्याचे लक्ष्य निर्धारीत करून देणारे यात अधिक दोषी ठरतात. तो दोष अमेरिकेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे जातो. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी प्रचारकाळातच इतका विखारी प्रचार केला होता व अमेरिकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा जो निर्धार ठामपणे मुठी आवळून व्यक्त केला होता त्याला काठावर बसलेले अनेक लोक भुलले असल्याचे त्यांच्याच विजयावरून स्पष्ट होते. देशात शांतता, स्थैर्य नांदले पाहिजे ही जबाबदारी तर सत्ताधाऱ्यावर येतेच; पण आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेचीही जबाबदारी त्याची असते. तसे असेल तरच जगातली सगळ्यांत परिपक्व लोकशाही म्हणून टेंभा मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. आपण संथ पाण्यात विनाकारण जी खळबळ निर्माण केली आहे व त्यामुळे जो गढूळपणा आला आहे, तो वाढणार नाही याची दक्षता येथून पुढच्या काळात अमेरिका आणि तिचे प्रमुख घेतील, हीच अपेक्षा!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget