-सुनिलकुमार सरनाईक, ४९२०३५१३५२
‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’’ ही क्रांतिकारी प्रतिज्ञा होती डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांची! आपल्या घोर प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसमवेत नागपूर येथील नागभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्यागकेला व बौद्ध धर्मात प्रवेश केला. खरं तर हिंदू धर्मात जन्मलेल्या बाबासाहेबांवर हिंदू धर्माचा त्याग करण्याची पाळी आली ती इथल्या विषमतेवर आधारलेल्या समाजरचनेत त्याच्या झालेल्या होरपळीमुळेच! अलीकडे हिंदू धर्म आणि संस्कृतीचे भले मोठे कौतुकाचे ढोल बडविले जात आहेत, पण किती जरी जोरजोरात गोडवे गायिले तरी या संस्कृतीनेच दीनदुबळ्यांच्या डोक्यावर सतत आपल्या वर्णवर्चस्वाच्या लाथेने प्रहार करून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यात आनंद मानला होता, त्यांना गावकुसाबाहेर सक्तीने ठेवून त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादली होती. या संस्कृतीने आणि धर्ममार्तंडांनी सतत मानवतेचे वस्त्रहरण करून नागवे केले होते. हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. अशा पाश्र्वभूमीवर भयानक व भीषण अस्पृश्यता, जातिभेद आणि उच्चनीचतेचा आगडोंब व त्यात झालेली समस्त दलितांची होरपळ पाहूनच डॉ. बाबासाहेबांची हिंदू धर्मात राहण्याची इच्छाच जळून खाक झाली होती आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या एकूणच सर्व वाङ्मयामध्ये आपणाला दिसून येते.
डॉ. बाबासाहेबांनी या देसाची घटना लिहिताना राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून लोकशाहीचे संवर्धन करणे, याकरिता धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंतर्भूत केले आहे. धर्मनिरपेक्ष समाजरचनेसाठी त्यांनी संविधानात ज्या तरतुदी नमूद केल्या आहेत त्या अशा...
(अ) कलम १५(१) - धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही.
(ब) कलम २५(१) - सार्वजनिक व्यवस्था, नीतिमत्त्व व आरोग्य यांच्यावर या भागातील अन्य उपबंधाच्या अधिनतेने सक्षम विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रज्ञापित करावयाच्या आचरणाच्या व त्याच्या प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्वशक्ती सारख्याच हक्कदार आहेत.
(क) कलम २८(१० - राज्याच्या पैशातून चालविल्या जाणाNया कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
(ड) कलम ३०(१) - धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व समाजांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालविण्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे.
राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या या वरील तत्त्वानुसार देशाचा राज्यकारभार चालतो, संविधानातील या तरतुदीमुळेच भारतात विविध धर्मांचे लोक राहात असतानाही राज्यकारभारात कुठल्या एखाद्या धमार्तचा हस्तक्षेप होत नाही.
‘डोनाल्ड युजेन स्मिथ’ धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताना म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे जे सर्वांना व्यक्तिगत आणि सामुदायिक धर्मस्वातंत्र्य बहाल करते. घटनात्मकरित्या कोणत्याही विशिष्ट धर्माला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बांधलेले नसते. त्याचप्रमाणे ते कुठल्याही विशिष्ट धर्मास उत्तेजन देत नाही किंवा कोणत्याही धर्मात हस्तक्षेपही करीत नाही.’’
एम. एन. रॉय म्हणतात, ‘‘जेव्हा राज्याचा विशिष्ट धमार्तशी शरीराच्या अवयवाप्रमाणे कोणताही संबंध नसतो, तेव्हा त्यास धर्मनिरपेक्ष राज्य म्हणता येईल.’’
वेबस्टरचा शब्दकोश सांगतो, ‘‘धर्मनिरपेक्षता म्हणजे शिक्षण आणि नीतीयिम यांना धार्मिक वर्चस्वापासून दूर अलिप्त ठेवणे इष्ट आहे, असे मानणारा विचार होय.’’
बायन विल्सन म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्षता ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यातून धार्मिक विचार-क्रिया-कला आणि संस्थेचा सामाजिक प्रभाव कमी होतो.’’
पं. जवाहरलाल नेहरू म्हणतात, ‘‘धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ भौतिक विचार किंवा धर्मविरोधी विचार नव्हते, सर्व धर्मांना समान मानण्याची आणि सर्व धर्मांचा आदर करण्याची प्रवृत्ती होय.’’
म. गांधी तर म्हणतात की, ‘‘देशातील शासनाने धर्माच्या बाबतीत तटस्थ राहणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय.’’
वरील व्याख्यांवरून धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे स्पष्ट होते. धर्मनिरपेक्षतेमध्ये प्रत्येक धर्माचे अस्तित्व मान्य आहे.
डोनाल्ड युजेन स्मिथ यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत नमूद केल्याप्रमाणे, ‘‘धर्मनिरपेक्ष राज्य कोणत्याही धर्मास उत्तेजन देत नाही,’’ हे वादातीत आहे. ममात्र ‘‘धर्मात हस्तक्षेपही करीत नाही’’ या विधानावर भारताच्या राज्यकारभाराबाबत वाद होऊ शकतो.
शासन हे कल्याणकारी असते. धर्मसंस्था प्राचीन काळापासून ‘आहे तशा’ पद्धतीने चालत आलेली आहे. ‘‘धर्म सांगेल तसे शासन चालावे’’ ही मध्ययुगीन संकल्पना आहे. समता, स्वातंत्र्य आणि विज्ञानावर या संकल्पना आधुनिक आहेत. त्यामुळे त्या धर्मात सापडणे शक्य नाही, हे डॉ. बाबासराहेबांना ठाऊक होते, म्हणून ते म्हणतात, ‘‘देशात समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी राज्याने निधर्मीकरण आचरणात आणणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय.’’
‘‘समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि विज्ञानवाद या आधुनिक संकल्पना समाजात अंमलात आणायच्या असतील तर शासनाने धर्मात हस्तक्षेप केलाच पाहिजे,’’ असेही डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते. अर्थात त्यामुळेच भारतीय राज्यघटना लिहिताना त्यांनी धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेचा ठिकठिकाणी पुरस्कार केलेला दिसून येतो.
धर्मनिरपेक्षता हे भारताचे मूलभूत अंग आहे, ते कोणत्याही स्वरूपात बदलता येणार नाही, हे अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ठणकावून सांगितले आहे, असे असतानाही काही राजकीय पक्ष आणि धर्मवादी संघटना ‘‘भारत हे हिंदूराष्ट्र आहे!’’ असे म्हणून या देशाला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी या ना त्या प्रकारे प्रत्नशील आहेत. विशेष म्हणजे असा विचार मांडणारे, तसेच अशा विचाराला पाठबळ देणारे सरकार केंद्रात विराजमान झाले आहे. त्यामुळे हिंदूराष्ट्राची कल्पना वास्तवात आणणे त्यांना थोडे सुलभ झाले आहे; असे वाटते. मात्र यामध्ये देशाच्या धार्मिक विविधता कशा टिकवायच्या हे मोठे आव्हान उभे आहे. खरं तर फाळणीनंतर भारत ‘हिंदूराष्ट्र’ म्हणून जाहीर व्हावे, असा मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्या वेळी झाला होता, अजून तो सुरूच आहे, मात्र तो अजूनही यशस्वी झालेला नाही, तरीही हिंदुत्ववादी राजकारणाला ‘हिंदूराष्ट्र’ अभिप्रेत आहे. आज भारतीय लोकशाहीला धर्मांधतेचे म्हणून जे आव्हान उभे आहे, ते स्वातंत्र्यानंतर इथे जी राज्यव्यवस्था निर्माण झाली, ती ज्यांच्या हातात एकवटली, ज्यांच्या हातात इथल्या राज्यव्यवस्थेच्या सत्तेचे दोर होते, त्यांच्या कार्यपद्धतीचा हा परिपाक आहे. नेहरू-इंदिरा-राजीव गांधींच्या सत्तेने इथल्या मूलभूत सामाजिक ‘फॅसिझम’ला आवर घालण्याचे, त्याला क्षीण करण्याचे काम तर केले नाहीच, उलट त्या शक्तींना अननुभूतपणे व प्रच्छन्नपणे खतपाणी मिळेल अशा पद्धतीने सत्ता राबविली. त्याचा परिपाक म्हणून जुन्या सामाजिक सत्तेच्या, अमानवी समाजरचनेच्या शक्ती पुन्हा पुन्हा उफाळून येत आहेत. लोकशाहीला अशा धर्मांधतेचे आव्हान उभे ठाकले आहे, यात शंकाच नाही.
या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. हिंदू तत्त्वज्ञान लोकशाहीला पूरक आहे का?, हिंदू तत्त्वज्ञान समतेचा पुरस्कार करते का?, किंवा हिंदू धर्मग्रंथ मसतेचा आणि बंधुतेचा विचार देतात का! अशा प्रश्नाचे जंजाळ अनेकांच्या डोळ्यात घर करून राहते, त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ‘‘हिंदुत्व म्हणजेच धर्मनिरपेक्षता’’ असे उद्दामपणे व रेटून बोलतात, त्या वेळी सर्वसामान्य जण अधिकच गोंधळात पडतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचाराकडे कानाडोळा करून काही सेक्युलरवादी सत्तेच्या लालसेने ‘संघा’च्या ‘हो’ला ‘हो’ करताना दिसतात. काही परिवर्तनवादी नेते तर त्याच्या गोटात जाऊन सुखनैन निद्रा घेतात. हे पाहून बहुसंख्यकांना हेच खरे वाटू लागते, आणि तेही ‘री’ ओढायला सरसावतात. हे वास्तव आहे. मात्र डॉ. बाबासाहेबांनी या आक्रमक धर्मवादाला शरण जाणाNयांना थोपविले आहे. ते म्हणतात,
‘‘हिंदुत्व ही फॅसिझम किंवा नाझीझमप्रमाणे एक राजकीय विचारधारा आहे आणि ती सर्वथा लोकशाहीविरोधी आहे. हिंदुत्वाला मोकळे रान सोडले तर (आणि ते म्हणजे हिंदू बहुसंख्यत्व) तर जे हिंदूधर्माच्या बाहेर आहेत व त्याला विरोधी आहेत, त्यांच्या वाढीला तो एक अडसर आहे. हा दृष्टिकोन केवळ मुस्लिमांचाच नाही तर दलित आणि ब्राह्मणेतरांचादेखील हाच दृष्टिकोन आहे.’’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, पृ.२४१, खंड-१)
म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या दृष्टीतून इथल्या लोकशाहीला वा मानवतेला हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणीचा नक्कीच धोका संभवतो.
आपला भारत देश केवळ हिंदुंचा नाही, भारतामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक राहतात. आपल्या देशाच्या विकासप्रक्रियेत मुस्लिम, खिश्चन व इतर अल्पसंख्याकांचाही सहभाग आहे. अर्थात म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी ‘धर्मनिरपेक्षता’ अधोरिखेत केली आहे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास करण्यासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक असते. त्याकरिता धर्मनिरपेक्षतेची नितांत गरज आहे, व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी धर्मनिरपेक्षता उपोयगी ठरते.
सहिष्णुतावृत्तीचा विकास करण्यासाठी आपण सर्व मानवजातीचे घटक आहोत या विचाराने परस्पर बंधुभाव जोपासला पाहिजे; विघटन कार्यशक्तीचा बिमोड करण्यासाठी आणि धार्मिक व सामाजिक समस्याचे निर्मूलन करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची गरज आहे.
(संदर्भ : (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ - (प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई-१२), (२) राज्यशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमातील पुस्तके.)
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील पुरोगामी डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
Post a Comment