Halloween Costume ideas 2015

महान उद्देशाकडे वाटचाल हवी

एम.आर.शेख
9764000737

मनफियत एक है इस कौम के नुकसान भी एक
एक ही सबका नबी दिन भी ईमान भी एक
हरमे पाक भी अल्लाह भी कुरआन भी एक
कुछ बडी बात थी होते जो मुसलमान भी एक
म्यानमारमधून जेव्हापासून रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारासंबंधी बातम्या येत आहेत तेव्हापासून उम्मते मुस्लेमा (जागतिक मुस्लिम समुदाय) अस्वस्थ दिसून येत आहे. हिंदुस्तानपासून ते तुर्कस्तानपर्यंत, इंडोनेशियापासून ते इथोपियापर्यंत सगळे मुस्लिम एका सुरात बोलत आहेत. म्यानमार सरकारवर टिका करत आहेत. म्यानमारच्या प्रधानमंत्री आन सान सू की यांना मिळालेला नोबेल पारितोषिक परत घेण्याची मागणी करीत आहेत. मुस्लिम समाजाच्या या अस्वस्थतेकडे पाहून असे वाटत आहे की, जणू सकल मुस्लिम समाज हा एक आहे. यांच्यामध्ये जबरदस्त युनिटी (एकता) आहे. हे सत्य आहे मात्र अर्धसत्य. जेव्हा-केव्हा मुस्लिम समाजावर मोठी आपत्ती येते तेव्हा हा समाज एक संघ वाटायला लागतो. मात्र इतर वेळी हा समाज अतिशय विखुरलेला असल्याचे सत्य लपवता लपत नाही. इतर वेळी तू शिया मी सुन्नी, तू तब्लीगी मी बरेलवीमध्ये हा समाज विखुरलेला असतो. तो एकमेकांच्या इतका विरोधी होवून जातो की एकमेकांना काफिर (धर्मभ्रष्ट) सुद्धा म्हणायला  मागे पुढे पाहत नाही. प्रसंगी हाणामारी करायला मागे पाहत नाही. यांच्यातील फूट  निवडणुकीच्या काळात चव्हाट्यावर येते. निवडणुकी दरम्यान छोट्या-छोट्या गोष्टीवरून एकमेकांना चाकूने भोसकण्यापर्यंत मजल जाते. मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये एकेका सीटवर 20-20 मुस्लिम उमेदवार उभे होतात. एकमेकांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे इतकेच नव्हे तर एकमेकांच्या विरूद्ध फौजदारी खटले दाखल करण्यापर्यंत यांची मजल जाते. 
असे बिल्कुल नाही की मुस्लिमांना एकतेचे महत्व कळत नाही. मुस्लिम साहित्यामधून, मुस्लिम प्रेसमधून, एवढेच नव्हे तर गल्ली बोळातून होणार्या चर्चेतून, मुस्लिम आपसात एकतेचे महत्व एकमेकांना सांगत असतात. शुक्रवारच्या विशेष नमाजच्या वेळी केल्या जाणार्या विशेष संबोधनामधून उलेमा एकतेचे महत्व सतत अधोरेखित करत असतात. इक्बालपासून ते आजच्या मुशायर्यामधून उर्दू कवी एकतेचे महत्व वेगवेगळ्या उदाहरणातून समर्थपणे पटवून देतात. तरी परंतु, जेव्हा कुठै स्वार्थ आडवा येतो तेव्हा मुस्लिमांमधील फूट अटळ होवून जाते. इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध दारू विकणार्यांनी, सिनेमावाल्यांनी, सिरियल्सवाल्यांनी, फॅशनवाल्यांनी तसेच इतर वाईट गोष्टींचा व्यापार करणार्यांनी केला तर तो लक्षात येण्यासारखा आहे. कारण जेव्हा मुस्लिम लोक समाजातील वाईट प्रवृत्तींच्या विरोधात उभे राहतात तेव्हा प्रस्थापित लोक त्यांचा विरोध करतातच. मात्र मुस्लिमच जेव्हा मुस्लिमांचा विरोध करतात, तो ही जमातवादातून, तेव्हा मात्र हा विरोध दुर्देवी असल्याचे लक्षात येतेे. 
मुस्लिम उम्मत ही जागतिक स्तरावर अनेक गटामध्ये विभागलेली आहे. प्रत्येक गटाला वाटते की आपलाच गट खरा इस्लामी गट आहे. आपणच जन्नतमध्ये जाणार, बाकीचे सगळे दोजखमध्ये जातील. इथपर्यंतही प्रत्येक गटाचा विचार असेल तरीही तो मतभेद म्हणून स्विकारता येईल. मात्र हे गट एकमेकांना शत्रुस्थानी समजतात व एकमेकांचा नायनाट करण्यासाठी शस्त्र हातात घेतात. तेव्हा मात्र यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जोपर्यंत मुस्लिम समाज एक मुस्लिम उम्माह म्हणून आपसातील मतभेदासह सहअस्तीत्वाच्या तत्वावर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपसातील फूट नष्ट होणार नाही. 
फिरकाबंदी है कहीं और कहीं ़जातें हैं
क्या ़जमाने में पनपने की यही बातें हैं
सामान्य मुस्लिमांचा असा समज आहे की, समाजामध्ये एकता निर्माण करण्याची जबाबदारी उलेमांची आहे आणि उलेमांना असे वाटते की समाजातील लोक अशिक्षित, अर्धशिक्षित असल्याने एकतेचे महत्व ते समजू शकत नाहीत. याच कारणाने आपसात एकी निर्माण होत नाही. बेकी मात्र भरपूर निर्माण होते आणि मग कधी गुजरातचे दंगे होतात तर कधी मुजफ्फरनगरचे. अशा दंगलीमध्ये सापडणारे जीव होरपळून जातात. आपसात एकी नसल्यामुळे बाकीचे लोक नुसते पाहत राहतात. म्हणून एकी निर्माण करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. सामान्य माणसाचीही आहे, उलेमांचीही आहे, एवढेच नव्हे तर मुस्लिम बुद्धिवादी लोक, प्रेस, साहित्यकार, शायर, कवी आणि श्रीमंत लोकांची म्हणजे सर्वांचीच आहे. एकीमुळे सामान्य माणसांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे हिम्मत वाढते. जर हे काम आपण करू शकलो नाही तर अगोदरच राजाश्रय नसल्यामुळे सैरभैर झालेला हा समाज आपसातील मतभेदांमुळे अधिकच कमकुवत होईल, यात शंका नाही 
खरे पाहता मतभेद तर जीवंतपणाचे लक्षण आहे. इस्लाम हा बुद्धिमान लोकांचा धर्म आहे. म्हणून या धर्मातील लोकांमध्ये मतभेद होणे नैसर्गिक बाब आहे. धार्मिक गोष्टींमध्ये विचार करणे, चिंतन, मनन करणे याच्यातून आपसात मतभेद तर होणारच. मात्र हे मतभेद सकारात्मक हवेत, याचीही समज समाजात नसणे हे आपले खरे दुखणे आहे. आपण मतभेद करणार्यांना शत्रूस्थानी समजतो. ही चूक जोपर्यंत आपण दुरूस्त करणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाजाचा विकास होणार नाही. शेवटी अल्लाहने या समाजाला जगाचे नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातलेले आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वैचारिक कुवत व त्या सोबत विरोधकांचा सन्मान या दोन गोष्टींची जाणीव असणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. एकमेकांच्या मतभेदांचा आदर करत जीवन जगणे हेच यशाचे सुत्र आहे. आम्ही कितीही गटा तटात विभागलेलो असू तरी शेवटी मुस्लिम आहोत. या एकाच मुद्यावर आपण एकत्र राहू शकतो. आज समाजामध्ये आपण पाहतो की एकमेकांबद्दल आदर राहिलेला नाही. एकमेकांच्या अधिकारांची जाणीव राहिलेली नाही. याबाबतीत यहुदी समाजाकडून शिकण्यासारखे आहे. जगातील सर्वात एकसंघ समाज यहुदी समाज आहे. जगात कुठेही यहुदी कुटुंबामध्ये मूल जन्माला आले तर जन्मताच त्याला इजराईल या देशाचे नागरिकत्व व त्यासोबत इजराईली नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार प्राप्त होतात. त्याच्या संगोपनासाठी इजराईल सरकार मदत करते. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजात काय होते यावर भाष्य करण्याची गरज नाही. 
आम्हाला शांतचित्ताने विचार करावा लागेल. आज सामुहिक कल्याणासाठी परस्पर विरोधी विचार असणारे सेना/भाजप, बीएसपी/ भाजप, काँग्रेस/ राष्ट्रवादी एकत्र येवून एकमेकांचा विकास करतात. तर मग समाजाच्या कल्याणासाठी बरेलवी/तबलिगी, शिया/सुन्नी हे एकत्र का येवू शकत नाहीत. आपण एकत्र नसल्यामुळे म्यानमारसारखा दरिद्री देश सुद्धा मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. इजराईल सारखा छोटा देश गाजामध्ये राहणार्या 20 लाख पॅलेस्टिनींना चोही बाजूंनी घेरून त्यांच्या भूमीचे जेलमध्ये रूपांतरण करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. इजिप्तमधील एक मिलिट्री अधिकारी आपल्याच देशाच्या निर्वाचित राष्ट्रपतीला जेलमध्ये टाकण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. आम्ही एकसंघ नाहीत म्हणूनच अफगानिस्तान, इराक आणि सीरिया उध्वस्त झालेले आहेत. पेट्रोलसारखी शक्ती पायाखाली असताना सुद्धा मुस्लिम राष्ट्र अमेरिकेपुढे लटलटा कापतात. आम्ही एकसंघ नाही म्हणूनच आयएस सारखी इजराईल समर्थक आतंकवादी संघटना खिलाफतीच्या नावाखाली मुस्लिमांना मुर्ख बनविते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या मतभेदांमुळेच आपला विनाश होत आहे. 
आज भारतामध्ये दरवर्षी कोट्यावधी रूपयांची जकात काढली जाते. पण त्याचा म्हणावा तसा लाभ समाजाला मिळत नाही. 70 वर्षात आपण जकातीची एक परिणामकारक व्यवस्था उभी करू शकलो नाही. माझ्या मते इदुल इजहाच्या दिवशी देशभरात कुर्बानी केेलेल्या जनावरांची चामडी जरी एकत्रित करून विकली तरी दरवर्षी एक डीम्ड युनिव्हर्सिटी मुस्लिम समाज उभारू शकतो. मात्र आपल्यामधील मतभेदामुळे संघटन होवू शकत नाही आणि त्यामुळे कोणतेच भरीव काम होवू शकत नाही. 
कोणत्याही समाजासमोर जोपर्यंत एखादा महान उद्देश्य त्याचे नेतृत्व ठेवत नाही. तोपर्यंत तो समाज एकत्रित येत नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे नेतृत्वाच्या अभावामुळे समाजासमोर कुठलेच महान उद्देश्य ठेवता आलेले नाही. म्हणून रोज कोट्यावधी तरूणांचे अब्जावधी मानवी तास व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर बेकार गोष्टी इकडून तिकडे करण्यामध्ये वाया जात आहेत. याची कोणाला काळजी नाही. एकतेचे महत्व सगळ्यांना माहित आहे. सगळे एकत्र सुद्धा होवू इच्छितात. परंतु आपल्या छोट्या-छोट्या नफ्सानी ख्वाहिशात (इच्छा, आकांक्षा)च्या पूर्तीच्या मागे आपण लागतो आणि त्याच्यातच आपले दिवस निघून जातात. मग झूठी शानो शौकत दाखविण्यासाठी मोठ-मोठी लग्ने, मोठ-मोठे वलीमे केले जातात. मग त्यासाठी प्रसंगी कर्जसुद्धा काढले जातात. जोपर्यंत आपण सर्व आपल्या इच्छा आकांक्षांना बाजूला सारून समाजकल्याणाच्या मोठ्या उद्देशासाठी एकत्र येणार नाही. तोपर्यंत आपण प्रगती करू शकणार नाही. यासाठी एक छोटी ट्रिक मी आपल्याला सांगतो. दुसर्यांचा हक्क देतांना थोडेशे जास्त देण्यासाठी राजी व्हा व आपला हक्क घेताना थोडासा कमी घेण्यावर राजी व्हा मग पहा समाजामध्ये किती सुंदर वातावरण निर्माण होते. म्हणून शेवटी एवढेच सांगून थांबतो की, उलेमा, वकील, श्रीमंत, बुद्धीवादी आणि सामान्य माणूस आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एकतेने राहण्याचा निश्चय करा. 
मुत्तहिद होंगे तो बन जाओगे खुर्शिद-ए- मुबीन
वर्ना इन बिखरे हुए तारों से क्या बात बने
जर आपल्याला हे करण्यात अपयश आले तर लक्षात ठेवा अंगमेहनत करण्यासाठी मजुरांची गरज प्रत्येक समाजाला नेहमीच असते. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, हे अल्लाह! आम्हाला एकसंघ राहण्याची समज दे. आमीन.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget